पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन

बातम्या

“आदिवासींची सुरक्षा हीच महिलांची सुरक्षा”

वन नवैभव, खनिज संपत्ती आणि विविधतेने नटलेला गडचिरोली जिल्हा. भाषा, संस्कृती, इतिहास, ज्ञान, कला, जीवनमूल्यांची समृद्धी असलेला जिल्हा. मात्र, इथल्या या साऱ्या वैभवावर ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ असा शिक्का बसला. या दुष्कीर्तीचा विपरीत परिणाम भोगावा लागला, तो इथल्या सर्वसामान्य माणसाला, आदिवासी महिलांना निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला. हे चित्र बदलण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत मी २०१६ ला घराबाहेर पडले. एकता परिषदेचे अशोकभाई चौधरी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत होते.
तीन महिने सतत विविध सामाजिक संस्था-संघटनांसोबत संवाद, चर्चा झाली. गडचिरोलीतील आदिवासी समूहाला विविध बाजूंनी हादरे बसत असल्याचे दिसले. हीच परिस्थिती इतर राज्यांतील आदिवासी भागातही दिसली. ती थोपवून धरता येईल का? त्यातून निश्चिंत कोणता मार्ग निघू शकेल? हा ध्यास मनात घेऊन महिला साहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. हे संमेलन गडचिरोलीमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. मला या सर्व प्रवासादरम्यान लिहिणारे व कृती करणारे भेटले. त्यांचा मेळ घालून काम केले तर मार्ग निघू शकेल, या मार्गामुळे अधिक परिणामकारक प्रगती साधली जाऊ शकते, असा विश्वास वाटला. ‘महिलांच्या सुरक्षिततेतून समाजाची सुरक्षा’ हा एकमेव पर्याय आहे हे स्पष्ट झाले. ही सुरक्षा देण्याची जबाबदारी घ्यावी म्हणून आम्ही पाऊल उचलले, समाधानाची बाब म्हणजे, आदिवासी महिला साहित्य संमेलनात त्यावर व्यापक मंथन होऊन दिशा निश्चितीचं पाऊल पुढे टाकण्यासाठी मार्ग गवसला.
संमेलनाच्या अध्यक्षपदी मेघालयातील साहित्य अकादमी सदस्य आणि खासी समुदायावर विपुल लेखन केलेल्या डॉ. स्ट्रीमलेट डखार, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या नजुबाई गावित यांचं नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आलं. हे साहित्य संमेलन आजवरच्या कोणत्याही साहित्य संमेलनापेक्षा निराळे, साहित्य परंपरांना छेद देणारे ठरले. संमेलनाच्या बोधचिन्हावर मोहफूल, तेंदूपत्ता, बांबू व लेखणी आहे. तेंदू, बांबू व मोह हे आदिवासी समुदायाचे जीवन आहे. आदिवासींचे अस्तित्व जंगलावर अवलंबून आहे. मात्र, या अस्तित्वालाच हादरे बसतं आहेत, हे जग नष्ट केले जात आहे. याला विरोध म्हणून मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली, अजूनही सुरू आहेत. या आंदोलनांना लेखणीची जोड देण्याचाही एक महत्त्वाचा उद्देश या संमेलनाच्या आयोजनामागे होता. देशाच्या विविध भागांतील आदिवासी महिला पुरुषांच्या सोबतीने साहित्य संमेलनात सहभागी झाल्या होत्या. संमेलनाचा उद्देश केवळ आदिवासी समाजातील समस्या, महिला शोषण आणि त्यावर केवळ चर्चा इतकाच नव्हता.जल-जंगल-जमीन आणि खनिज संपत्तीच्या बचावासाठी आदिवासींचे लढे हे पृथ्वीवरील सर्व जीवन अस्तित्व वाचवणारे लढे आहेत, हा संदेश या संमेलनाच्यामाध्यमातून दिला गेला. या संमेलनात आयोजित विविध चर्चासत्रे आणि परिसंवादांतून आदिवासी समुदाय, आदिवासी महिला आणि त्यांचं जगणं यासंदर्भात अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करण्यात आले. बाह्यजग आणि जागतिकीकरणाचे वारे स्पशून गेलेल्या आदिवासी समाजात आता पूर्वीप्रमाणे महिला- पुरुष समानता दिसत नाही, महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, त्यांना डावलले जाते ही उद्घाटक नजूबाई गावित यांनी व्यक्त केलेली खंत या संमेलनाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करायला पुरेशी ठरावी. आदिवासी कल्याण विकास आणि प्रकल्प या शासकीय शब्दावलीत बदल झाले, पण आदिवासी जीवनात अपेक्षित बदल झाले नाहीत. म्हणून विकासाची दिशा, गती, वर्तमान स्थिती यावर साहित्यिकांनी मंथन करावे, अशी अपेक्षा या संमेलनात व्यक्त करण्यात आली. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणताना पाश्चिमात्य देशातील विकास आणि आदशांचे प्रारूप अर्थात • मॉडेल आदिवासींवर थोपवले जाऊ नये, असा सूरही उपस्थित मान्यवरांच्या चर्चेतून निघाला. या संमेलनाच्या निमित्ताने काही ठरावही मंजूर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक राज्यात अशा पद्धतीचे आदिवासी महिला साहित्य संमेलन भरवण्यात यावे, आदिवासी साहित्य अकादमी स्थापन केली जावी, देशातील सर्व विद्यापीठांमध्ये आदिवासी संशोधन व अध्ययन केंद्र बनवावे, गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासी संशोधन केंद्र म्हणून संबोधले जावे, आदिवासी महिलांच्या अंगभूत कलाकौशल्य विकासासाठी केंद्र शासनाने विशेष केंद्र तयार करावे यांसारख्या विविध ठरावांचा समावेश होता.
या साहित्य संमेलनातील चर्चेचा केंद्रबिंदू आदिवासी संस्कृती, इतिहास, ज्ञान, परंपरा, अस्मिता, कला, संगीत, भाषा, जीवनमूल्ये आणि जल-जंगल-जमीन, खनिज संपत्ती, नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणारे जीवन अस्तित्व वाचवणे हा होता. संमेलनाचं नामकरण आदिवासी महिला साहित्य संमेलन असले, तरी सर्व समाजातील कर्तृत्ववान महिलांची संमेलनाला उपस्थिती होती. या कर्तृत्ववान महिलांनी विश्वाच्या उत्थानासाठी एकत्र येऊन काम करावे, मानवता जोपासावी, त्यातून विश्वाचा कल्याणकारी मानव धर्म स्थापन व्हावा या भावनेने हे संमेलन पार पडले. आणि हीच या संमेलनाच्या आयोजनामागची फलश्रुती ठरली, असे मला वाटते.


– कुसुम अलाम

Leave a Reply