Mahatma Gandhi

महात्मा गांधी – तीर्थंकरांचे साधर्म्य

लेख

माझ्या या लेखाचे शीर्षक पाहूनच तुम्ही कदाचित चक्रावून जाल.. परंतु ती स्थिती तशी असली तरी त्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे ,असे मला स्वतःला वाटते ..महात्मा गांधींच्या जीवनाकडे सूक्ष्म रीतीने पाहिले तर आपणास असे स्पष्टपणे दिसून येते की जैनांचे जे चोवीस तिर्थंकर आहेत त्याप्रमाणेच त्यांचे कार्य , जीवन व विचारसरणीही होती व आहे , म्हणूनच मी लेखाचे तसे शिर्षक दिले आहे..म.गाधीच्या जीवनाचा बालपणापासून तपशील तपासून पाहिला तर माझ्या या मताशी तुम्ही ही सहमत व्हाल,याची पूर्ण खात्री मला आहे..
सर्वसंगपरित्याग,ज्ञानबोध घेण्याची अनिवार इच्छा, सर्वांभूती ईश्वर पाहण्यातील श्रेष्ठत्व, देशनिष्ठा,दैनंदिन जीवनातील साधेपणा, नितांत अपरिग्रहता, अनेकांतवादाचा स्विकार,सत्याग्रहाचा विवेक, अहिंसेचा अमर्याद घोष,सत्याचा महामार्ग, गुलामगिरीतून मुक्तता, स्वातंत्र्याचा जयघोष,अध्यात्मिक जीवनाचा स्विकार आणि सुखी,समाधानी,शांतिप्रिय समाजरचनेचे असिधाराव्रती कार्य ही जैन तिर्थंकरांची गुणग्राहकता म.गांधी मध्ये पुर्णपणे एकवटली होती.. त्याच अनुषंगाने त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जागतिक राजकारण केले..कसे ते आपण आता थोडक्यात पाहू या..खरे तर मी याविषयावर एक ग्रंथच लिहिणार आहे.. हा निबंध कदाचित त्याचा प्रारंभ असेलही..
सध्या भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष आपण साजरे करीत आहोत. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.. महात्मा गांधी हे या स्वातंत्र्य चळवळीचे सर्वात मोठे नेते होते… आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात ते सक्रीय झाले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटीश राजवटीचा प्रतिकार केला.. स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक आघाडीवर त्यांचा मोठा वाटा होता. .या चळवळीतील एकजूट आणि प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचे महत् अवघड कार्य त्यांनी यावेळी केले..
महात्मा गांधींच्या भारतातील पहिल्या सत्याग्रहाला या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्तर बिहारमधील त्यावेळच्या संयुक्त चंपारण्‍य जिल्ह्यात हा सत्याग्रह करण्यात आला होता. ब्रिटिश बागायतदारांकडून नीळ (इंडिगो) लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एप्रिल १९१७ मध्ये ते तिथे गेले होते.चंपारण्‍यातील भाडेकरूंना नियमानुसार त्याच्या जमिनीच्या प्रत्येक वीस भागांपैकी तीन भागांवर त्याच्या मालकांसाठी निळची शेती करणे अनिवार्य होते ,असे गांधीजींना त्यावेळी सांगण्यात आले . या व्यवस्थेला तीनकाठीया असे म्हटले जायचे.
त्याकाळी राजकीय भाषणात जमिनीच्या समस्यांचा क्वचितच उल्लेख असावयचा. सुरुवातीला गांधीजी देखील या कामासाठी तयार नव्हते. मात्र चंपारण्‍य मधील राजकुमार शुक्ला या नीळ बागायतदाराने त्यांचे मन वळवले आणि त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात चौकशी सुरु करून त्यानुसार कारवाईची मागणी करण्याची गांधीजींची योजना होती. इंडियन नॅशनल काँग्रेसशी संबंध असल्याबाबत त्यांनी तेथे गुप्तता राखली , हे विशेष. राजकीय मोहिमेपेक्षा मानवतेच्या मोहिमेवर गांधीजी चंपारण्‍यला गेले होते. नेपाळच्या सीमेलगत बिहारच्या उत्तरेकडील जिल्ह्यात त्यांना कुणीही ओळखले नाही. उर्वरित भारतातील राजकीय घडामोडींपासून तो भाग अलिप्त होता.
परंतु,बागायतदार संघटनेचे अध्यक्ष, तिरहूत विभागाचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांसारख्या स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचा दौरा स्वागतार्ह वाटला नाही. त्यांनी गांधीजींना चौकशी करण्यापासून परावृत्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गांधीजींनी जिल्ह्यातील मोतीहारी येथील मुख्यालयातील बाबू गोरख प्रसाद यांच्या घरातून निर्धाराने कामाला सुरुवात केली. हत्तीच्या पाठीवरून गावातील एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यांनतर त्यांना न्यायालयाचे समन्स बजावले जायचे. त्यांच्यावर गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मात्र गांधीजींनी चंपारण्‍य सोडायला नकार दिला. त्यांच्या चौकशीच्या घोषणेने शेतकऱ्यांच्या कल्पकतेला मोहित केले होते. त्यांच्यावर खटला चालवण्याची बातमी फुटल्यावर त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली.
सत्याचा आग्रह म्हणतात, तो हा असा..पुढे १८ एप्रिल १९१७ रोजी जेव्हा गांधीजी मोतीहारी न्यायालयात हजर झाले, तेव्हा त्यांना २००० स्थानिक लोक त्यांची साथ द्यायला आलेले दिसले. यामुळे भांबावलेल्या दंडाधिकाऱ्यांना सुनावणी लांबणीवर टाकायची होती. मात्र गांधीजींना गुन्हा कबूल करायचा होता. गांधीजींनी एक निवेदन वाचून दाखवले आणि त्यात लिहिले होते-” कायद्याचे पालन करणारा नागरिक या नात्याने मला बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन करणे ही माझी अंतःप्रेरणा आहे. ज्यांच्यासाठी मी आलो आहे ,त्यांच्याप्रती माझ्या कर्तव्य भावनेशी हिंसाचार न करता मी असे करू शकत नाही. केवळ त्यांच्यामध्ये राहून  मी त्यांची सेवा करू शकत नाही असे मला वाटते. म्हणून, कर्तव्याच्या या संघर्षामध्ये त्यांच्यातून प्रशासनातून मला बाहेर काढण्याची जबाबदारी मी पार पाडू शकतो…. कायदेशीर प्रशासनाप्रती आदर म्हणून मला बजावण्यात आलेले आदेश मी झुगारले नाहीत तर आमच्या विवेकाचा आवाज सर्वोच्च कायद्याचे पालन करण्यासाठी  केले.”
..मोतीहारी सुनावणी संपुष्टात आली. बिहारच्या नायब राज्यपालांनी गांधीजींविरोधातील खटला मागे घेण्याचे आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीजींना लेखी कळवले कि ते चौकशी करायला मोकळे आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या या इतिहासात हे छोटे पाऊल खूप मोठी झेप घेणारे ठरले. गांधीजी म्हणाले,” अशा प्रकारे देशात नागरी हुकुमाची पायमल्ली करणारा पहिला धडा गिरवला गेला. वृत्तपत्रांमध्ये याला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि गांधींच्या तिर्थंकरीय युगाला प्रारंभ झाला.
मोहनदास करमचंद गांधी (जन्म: 2 ऑक्टोबर 1869 – मृत्यू: 30 जानेवारी 1948) महात्मा गांधी म्हणून ओळखले जातात .भारताचे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते. सत्याग्रह (व्यापक सविनय कायदेभंग) च्या माध्यमातून जुलूमशाहीच्या विरोधात आंदोलन करणारे ते प्रमुख नेते झाले, त्यांच्या संकल्पनेचा पाया संपूर्ण अहिंसेच्या तत्त्वावर घातला गेला होता, ज्यामुळे भारताला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नागरी हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी चळवळीत नेले. संस्कृत भाषेत महात्मा किंवा महान आत्मा हा ‘आदर सूचक’ शब्द आहे. राजवैद्य जीवराम कालिदास यांनी 1915 मध्ये पहिल्यांदा गांधींना ‘महात्मा’ या नावाने संबोधले. त्यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली याबाबत थोडी मतांतरे आहेत.. दुसर्‍या मतानुसार, स्वामी श्रद्धानंद यांनी 1915 मध्ये महात्मा ही पदवी दिली होती, तिसरे मत असे आहे की गुरु रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा ही पदवी दिली होती. 12 एप्रिल 1919 रोजी त्यांच्या एका लेखात. त्यांना ‘बापू’ (ओम बापू म्हणजे गुजराती भाषेत वडील) म्हणूनही स्मरण केले जाते. एका मतानुसार, गांधीजींना बापू म्हणून संबोधणारी पहिली व्यक्ती साबरमती आश्रमातील त्यांचे शिष्य होते. आज आपण दरवर्षी 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींची विचारसरणी जीवनाच्या समग्रतेतून विकसित झाली होती. म्हणूनच ती संपूर्ण देशाची आणि सर्वकाळाची आहे. तिर्थंकराप्रमाणे निवेश आणि कर्मयोग साधनेच्या अवस्थेत म.गांधींनी त्यांच्या जीवनकाळात विचार केला नसेल अशी, कोणतीही वैश्विक आणि दिव्य समस्या नसेल. या अर्थाने त्यांचा विचार हा समग्रतेचा विचार आहे; आणि संपूर्णतेची दृष्टी,जी तिर्थंकरांची होती. ते आधुनिक तसेच प्राचीन आहे. ते पूर्णपणे भारतीय आहेत, आणि पाश्चात्य विचारसरणीनेही प्रेरित आहेत.गीता आणि रामायण हे त्यांच्या विचाराचे विषय असतील तर टॉलस्टॉय आणि रस्किन यांच्या विचारांचे ते प्रेरणास्थान आहेत. स्वातंत्र्य, समता, वैश्विक बंधुता आणि आर्थिक शोषणापासून मुक्ती या लढ्यांमध्ये जैन तिर्थंकराप्रमाणे सक्रिय असलेल्या महात्मा गांधींचा विचार जितका प्रखर आहे तितकाच व्यापकही आहे. आणि ते जितके प्रभावी आहेत तितकेच ते सत्याच्या वापरावर आधारित आहे. गांधीजी आयुष्यभर सत्याचा शोध, संशोधन आणि वापर करीत राहिले हे वेगळे सांगावयला नको. सत्याचा शोध घेण्याची त्यांची पद्धत शास्त्रानुसार आणि अनुभवाच्या स्वरूपावर आधारित आहे; त्यात विज्ञानाचाही समावेश होतो. म्हणूनच ते साधेपण सर्वसमावेशक आहे; आणि स्पष्ट असूनही, ते तिर्थंकराप्रमाणे बहुआयामी आणि भविष्याने परिपूर्ण आहेत. महात्मा गांधींनी कोणत्याही सूत्राचा प्रचार केला नाही किंवा ते कोणत्याही पंथाचे संस्थापकही झाले नाहीत. ‘गांधीवाद ‘नावाच्या कोणत्याही सिद्धांताचे किंवा मुद्द्याचे मूळ असे काही नाही. “किंवा मला माझ्या मागे कोणताही पंथ सोडावयाचा नाही”, असे महात्मा गांधी एकदा म्हणाले होते,हे लक्षणिय आहे.गांधीजींच्या आयुष्यात कोणताही वाद नव्हता,तर सुसंगत सुसंवाद होता. त्यांचे जीवन तिर्थंकराप्रमाणे एक चाचणी, प्रयोगशाळा आहे आणि चाचणीच्या निकालांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी इतिहासकारांवर आहे. हे काळाचे चक्र आहे. पण काळाच्या ओघात गांधींच्या अभ्यासाने त्यांची तत्त्वे आणि हेतू यांना नंतर’ गांधीवाद ‘ म्हटले गेले. त्या वेळी जे योग्य वाटले ते त्यांनी सांगितले आणि केले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हे त्यांच्या जीवनाचे चिंतनशील परिमाण आहेत. ते साधन आणि कृतीच्या कायद्याच्या रूपात प्रतिबिंबित होऊ शकतात. महात्मा गांधींवर जैन तत्त्वज्ञानाचा हा प्रभाव खूप पडला, यात शंका नाही.जैन धर्मात तीर्थंकर (अरिहंत, जिनेंद्र)या व्यक्तीमत्वाचा वापर ज्या चोवीस तिर्थंकरांसाठी केला जातो, त्यांनीच म. गांधीजींचे जीवन व्यापून गेले होते..त्यांनी स्वतपस्येने आत्मज्ञान (केवल ज्ञान) प्राप्त केले होते, हे सर्व मान्य आहे. जगाचा सागर पार करून ज्यांनी तीर्थ निर्माण केले त्यांना तीर्थंकर म्हणतात.त्यासाठी करावा लागणारा त्याग,तपस्या, चिंतन, मनन आणि स्वकर्म यांची योग्य ती सांगड घालून देशातील लोकांसाठी न्यायबुद्धीने उपदेश देऊन यशस्वी पणे मार्गदर्शन दिलेगेले पाहिजे.. ते कार्य म.गांधींनी केले. जैन धर्मात चोवीस तिर्थंकर झाले.. मी महात्मा गांधीजीना म्हणूनच पंचविसावे तिर्थंकर समजतो.म. गांधींनी आई पुतळीबाईंकडे परदेशात जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा आईने परवानगी दिली नाही, परंतु त्यावेळी एक जैन मुनी बेचरणजी स्वामींसमोर गांधींनी तीन प्रतिज्ञा (मांस, मद्य आणि व्यभिचाराचा त्याग) घेतल्यावर आईने परदेशात जाण्याची परवानगी दिली. हे सत्य गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रातही लिहिले आहे.त्यावळचे अजून एक जैन मुनी राजचंद्र याना म. गांधी नी जैन धर्माबाबत आपल्या तेहतीस शंका लिखित स्वरूपात विचारून समाधान करून घेतले होते.. पुणे येथे (1944 ) म.गांधी नी एकवीस दिवसाचे उपोषण केले होते. त्या दिवसात जैन साध्वी उज्जवलकुवरजी यांच्या बरोबर रोज ते जैन धर्माची माहिती घेऊन शंकासमाधान करीत असत. त्यावेळी स्वामी आनंद नावाचे एक साधू होते ते सुरुवातीला हिंसक क्रांतीचे समर्थक आणि सक्रिय कार्यकर्ता होते, परंतु महात्माजींच्या संपर्कात आल्यानंतर ते अहिंसेचे खंबीर समर्थक आणि महात्माजींच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक बनले. ते महासती उज्जवलकुवरजींच्या विचारांनीही खूप प्रभावित झाले होते.. त्यांच्यामुळेच महात्मा गांधी आणि महासतीजींचा संबंध आला. महात्माजी जेव्हा कधी मुंबई किंवा पुणे येथे येत असत तेव्हा ते उज्जवलकुवरजींना भेटत असत. एवढेच नव्हे; महात्माजीं स्वतः साध्वीजींना त्यांच्या आहारातून बेरावत असत. हा संपर्क 1944 पर्यंत टिकला.स्वतः उज्जवलकुवरजी महाराज या माझ्या ही गुरूनिजी होत्या.अहमदनगरला जैन स्थानकात ,माझ्या घराशेजारी त्यांचे कैक वर्षे वृद्धापकाळामुळे वास्तव्य होते.. गांधी-उज्ज्वल वार्तालाप नावाचे एक छोटेखानी पुस्तक ही त्यांनी लिहिले होते..त्याची एक प्रत त्यांनी मला दिली होती. म.गांधीचे शौर्य पाहिल्यावर ते खरे जैन असल्याचे जाणवते. ते भ्याडपणाने वागले असे एकही उदाहरण त्यांच्या हालचालीत आपल्याला दिसत नाही. ते आयुष्यभर शस्त्राशिवाय शूर होते.त्यांची दिनचर्या जैन मुनीसारखीच होती..त्याचा सर्व तपशील मी त्यावर लिहिणाऱ्या पुस्तकात करणारच आहे..गांधींवर जैन धर्माचा आणखी एक मोठा प्रभाव म्हणजे साधेपणा आणि त्यांचा पेहराव..ते फक्त आवश्यक कपडे घालीत असत, तेही कापसापासून बनवलेले. त्यांनी शेवटपर्यंत फक्त पांढरे खादीचे कपडेच घातले होते. महात्मा गांधींनी इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांना एकदा लिहिले होते- “मला दिगंबर जैन संन्यासी व्हायचे होते, परंतु मी आता तसे होऊ शकत नाही.” जैन तपस्वींच्या जीवनावरील प्रभावाचे हे स्पष्ट संकेत होते.महात्मा गांधींच्या जीवनावर जैन संस्कृतीचा अतोनात प्रभाव होता,हे यातून स्पष्ट होते. म. गांंधीजींनी अहिंसेला आत्मविश्वास आणि आत्मशुद्धी विकसित करण्याचा एक निश्चित मार्ग आपल्या नंतरच्या जीवनात अग्रहक्काने मानला. अहिंसा ही जैन धर्माची आचारसंहिता आहे, ज्याला गांधींनी राजकारणासाठी आचारसंहिता बनवण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. खरे तर त्यांचे जीवन म्हणजे अहिंसेचे पालन करणाऱ्या तिर्थंकरांसारखाच अदम्य धैर्याचा अनोखा संदेश आहे. अहिंसा हा तिर्थंकरांप्रमाणे म.गांधींचा धर्म , आचरण आणि कार्य आहे. अहिंसक चिंतन हे तिर्थंकरांच्या जीवनाचे हृदय आहे,जे म. गांधी जवळ होते.स्वतः म. गांधींनी जैन धर्माचा प्रभाव अनेक वेळा मान्य केलेला आहे, हे आपणास अनेकदा त्यांच्या जीवनचरित्रात स्पष्टपणे दिसून येते.. ते एकदा म्हणाले होते की ” जर अहिंसेचे पूर्णपणे पालन आपण करू शकत नसाल तर आपला आत्मा निरर्थक आहे असे समजून घेतले पाहिजे . शक्यतोवर हिंसेपासून दूर राहून मानवतेचे पालन आपण केलेच पाहिजे.” अहिंसेमध्ये इतकी शक्ती आहे की ती विरोधकांनाही मित्र बनवून त्यांचे प्रेम मिळवू शकते, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते.महात्मा गांधींच्या जीवनावर जैन तत्त्वज्ञानाचा खोलवर प्रभाव किती होता हे यातून स्पष्ट आहे. त्यांचा केवळ अहिंसा आणि सत्याशीच सखोल संबंध नव्हता, तर त्यांनी अहिंसा आणि सत्याचे आदर्श समजून घेतले, ते आपल्या जीवनात आणले आणि त्याचे एका जनआंदोलनात रूपांतर केले आणि भारत मातेला स्वातंत्र्याच्या बंधनातून मुक्त केले. महात्मा गांधी हे उर्वरित चोवीस तिर्थंकर प्रमाणेच अहिंसा, शांतता आणि सद्भावनेचे प्रतिक झाले होते, यात तिळमात्र शंका नाही.तत्कालीन लोकांची अवस्था पाहून गांधीजींचे हृदयही कापत असे, त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केला आणि त्यांना ‘हरिजन’ या नावाने संबोधले. विरोधाला न जुमानता त्यांनी हरिजन मुलांना आपल्या आश्रमात ठेवले आणि त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचा भेदभाव दूर करून खाण्यापिण्याचे नाते निर्माण होऊ लागले. ते बहुधा हरिजनांमध्ये राहत असत. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असले पाहिजेत – यासाठी त्यांनी आंदोलन केले आणि आपल्या जीवनात हा मुद्दा सिद्ध करण्याचा अतोनात प्रयत्न केला.कुष्ठरोग्यांची त्यांनी केलेली सेवा मानवतावादाचे आदर्श उदाहरण आहे.महावीर आणि म.गांधी यातील हे साम्य लक्षणीय आहे.
चोवीस तिर्थंकरांची जी प्रमुख छत्तीस लक्षणे सांगितली गेली आहेत त्यापैकी एक महत्त्वाचे लक्षण असे आहे की आई आणि वडिलांच्या शारीरिक साहचर्यची अपेक्षा न ठेवताही, ते त्यांच्या शरीरातील योग्य ते बीजकण सर्व बाजूंनी स्वीकारून नवीन शरीराची निर्मिती करीत असतात. यालाच संयोग- सूक्ष्म -निर्माण -शक्ती असे म्हणतात! म.गांधीचा जन्म ही अश्याच शक्तीची अतिद्रिंय प्रक्रिया असावी,असे त्यांच्याकडे पाहिले की वाटू लागते. त्यांच्या या व्यक्तीमत्वामुळे सबंध इंग्रज शासन ही भारावून गेले होते, हे नाकारता येत नाही.जैन तीर्थंकर जन्मतःच मतिज्ञानी, श्रुतज्ञानी व अवधिज्ञानी असतात, असेही त्यांच्या लक्षण समूहात म्हटले गेले आहे.म.गांधींचे बालपण,तारूण्यावस्था व नंतरच्या अखेर पर्यंत जीवनातील अनेक प्रसंगातून ही लक्षणे प्रगट झाली आहेत. त्यासाठी त्यांचे समग्र चरित्रच आपण वाचले पाहिजे..गांधींचे जैन धर्मातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी जैन तत्त्वे व्यावहारिक बनवली. त्यांनी ती तत्त्वे फार मोठ्या प्रमाणावर जनतेसह सामावून घेतली. आपण असे म्हणू शकतो की सामाजिक आणि राजकीय चळवळींसाठी जैन तत्त्वांचा अवलंब करणारे ते पहिले राष्ट्रीय नेते होते.अजून एक प्रसंग सागण्याचा मोह मला होतो.. तो सा़ंगून मी हा निबंध संपवतो..
आपणासर्वांस शिकागोची सर्व धर्म परिषद माहीत आहे.. स्वामी विवेकानंद यांचे भाषण तिथे झाले होते.. या परिषदेला भारतातून ख-या अर्थाने निमंत्रित केले होते,जैन आचार्य आत्माराजी यांना.! जैन धर्माचे महान संत म्हणून त्यांचा लौकिक अमेरिकेत पोहोचला होता. आणि जैन धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुनी आत्मारामजी यांना ही संधी महत्त्वाची वाटत होती. परंतु जैन धर्माच्या मुनी – आचरण पद्धतीनुसार त्यांना जलमार्गेने प्रवास करणे वर्ज्य होते. अशा परिस्थितीत काय करावे ? असा प्रश्न त्यांना पडला होता. थोडा विचार करता त्यांना एका व्यक्तीचे नाव आठवले. ती व्यक्ती म्हणजे बॅरिस्टर वीरचंद गांधी. बॅ. वीरचंद गांधी यांना आपले प्रतिनिधी म्हणून शिकागोच्या परिषदेला उपस्थित राहण्यास सांगावे ,असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी वीरचंद गांधी यांना त्या परिषदेला उपस्थित राहण्यासंबंधी कळविले. वीरचंद गांधी यांनी त्यांची आज्ञा मान्य केली आणि ते त्या धर्म परिषदेला उपस्थित राहिले. त्या परिषदेत त्यांनी जैन धर्मावर दिलेल्या व्याख्यानांमुळे ते सबंध अमेरिकेत प्रसिध्द झाले. अमेरिकेतील लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.हे वीरचंद गांधी धर्माने जैन व म. गांधी चे मित्र होते.. इतकेच नव्हे तर त्या़ंचा जन्म, बालपण व शिक्षण ही पोरबंदरचेच होते..म.गांधीच्या जीवनावर त्यांचाही खूप मोठा प्रभाव लहानपणापासून होता..हा एक विलक्षण योगायोग होता.. वरील सर्व कारणांमुळे मी , म.गांधीना जैनांचे पंचविसावे तिर्थंकर म्हणतो . त्याचा सर्व समावेशक विचार व निर्णय अ.भा.जैन साधु व श्रावक संघांनी खरे तर केला पाहिजे.अजून काही वर्षांनी तसा निर्णय होईलही यात मला तरी शंका वाटत नाही… ईत्तल्यम्

1 thought on “महात्मा गांधी – तीर्थंकरांचे साधर्म्य

Leave a Reply