चतुर्थस्थानाचे महत्त्व

ज्योतिष पत्रिका

कुंडलीमध्ये बारा स्थाने आहेत, सर्वांत महत्त्वाचे स्थान कोणते?- असा प्रश्न एका पृच्छकाने मला फोनवर विचारला. क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, “चतुर्थस्थान !’ आणि प्रश्न विचारणारा चकीत झाला, म्हणाला, “काय म्हणता ? अहो, मला आत्तापर्यंत सर्वांनीच लग्नस्थान महत्त्वाचे असते, असे सांगितले. फक्त तुम्हीच पहिले भेटला !’- मी हसलो व फोन ठेवून दिला.चतुर्थस्थान हे लग्नानंतरचे पहिले केंद्र स्थान आहे. त्यामुळे ते अत्यंत शुभ आहे. या स्थानाला सुखस्थान म्हणतात. व्यक्तीला मिळणाऱ्या सौख्याचा विचार या स्थानावरून होत असतो. मातृसौख्य, पितृसौख्य, जमीन-जुमला, घरदार यांचा विचार या स्थानावरूनच करता येतो. शिक्षणाचा, समजूतदारपणाचा पहिला विचार ही या स्थानावरून होतो. स्वत:च्या कर्तव्याने घर मिळेल काय, वाहनसौख्य राहील काय, स्त्री-पुत्रादिकांचे सौख्य कसे राहील, या सर्व सुखोत्पादक प्रश्नांचा विचार ह्याच स्थानावरून होतो.। सुखस्थानम् गतोवापि पश्यन अपि गुरुर्यदि।। बहुसौख्यम् अवाप्नोति जातस् तंत्र न संशय: ।सुखस्थान व गुरूच्या संबंधी असलेला हा श्लोकच खरे तर, बलवान असा आहे. बलवान गुरूची सुखस्थानावर दृष्टी असली किंवा गुरु सुखस्थानात असला तर पुष्कळ सौख्य मिळते, असा या श्लोकाचा अर्थ आहे !
लग्नस्थान व लग्नेश यांवरून शरीर सौख्य, आरोग्य, दीर्घायुष्य पाहिले जाते. हे सर्व महत्त्वाचेच आहे. परंतु मनुष्य जन्मानंतर, तो कसा ही असला तरी, महत्त्वाचे राहते ते त्याला मिळणारे सौख्य ! तेच जर नसेल तर इतर कोणती ही बाब ही दुय्यमच ठरत असते. संपत्ती, बुद्धी, वर्क्तृत्व, भावंडे, पराक्रम, संतती, शत्रुपीडा, पती-पत्नी सौख्य, भाग्य, उद्योग धंदा, कर्ज या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या अशा असल्या तरी जर सौख्य स्थानच दुर्बळ असले, चतुर्थेशच पापग्रह युक्त, दृष्ट असेल तर वरील सर्व महत्त्वाच्या बाबीच एकूण दुय्यम बनून जातात. घरी नळ आहे पण पाणी नाही, बटन आहे पण वीज नाही आणि फ्रेम अज्ञाहीे पण त्यात फोटो नाही; तर काय स्थिती होईल ? नेमकी तीच स्थिती चतुर्थस्थान व चतुर्थेश दुर्बल असल्यावर होईल. आपण श्रीकृष्णाचीच कुंडली या साठी पाहू-

लग्नेश शुक्र स्वगृहीचा उच्चीच्या शनीबरोबर आहे व चतुर्थात सिंह राशी असून चतुर्थेश रवि ही तेथेच आहे. श्रीकृष्णाच्या कुंडलीत चतुर्थस्थान व चतुर्थेश दोन्ही बलवान आहेत. यास्तव तो सर्व सुखांचा धनी बनला. दु:खांवर, संकटांवर मात करीत सुख घेत राहिला. अगदी बालपणापासून !
प्रसिद्ध दिवंगत चित्रपटकार राजकपूरच्या पत्रिकेत चतुर्थात तुळेचा शुक्र आहे, तर राजीव गांधींच्या पत्रिकेत चतुर्थेश मंगळ हा बुधाच्या राशीत द्वितीयात आहे. दोघांच्या जीवनातील फरक तुम्ही पहा ! अधिक सुखी कोण होता? अर्थात राजकपूरच ! इन्दिरा गांधींच्या पत्रिकेत चतुर्थेश शुक्र हा राहूसह षष्ठात होता, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या कुंडलीत गुरु हा भाग्यात होता. वरील सर्व बाबींवरून चतुर्थस्थान व चतुर्थेश यांच्या विषयी निर्विवादपणे काही प्रमुख सूत्रे मांडता येतील. जवळ-जवळ पाचशे अभ्यास करून ही सूत्रे मी संशोधिली आहेत. त्यातील काही प्रमुख सूत्रे अशी-
१) चतुर्थस्थानी शुभग्रह असावेत.
२) चतुर्थस्थानी शुभग्रहांच्या राशी असाव्यात.
३) चतुर्थभावारंभ हा शुभ असला पाहिजे.४) चतुर्थेश केंद्र-त्रिकोणात असणे उत्तम असते.५) चतुर्थेश पाप ग्रहांच्या राशीत किंवा युतीत नको.
६) चतुर्थेश पंचमात अति उत्तम असतो, परंतु पंचमस्थानी पापग्रह किंवा त्यांची दृष्टी नको.
७) चतुर्थेश स्वगृहीचा किंवा उच्चीचा असला तर अनेक सौख्य जातकाला मिळतील !
ही सूत्रे लक्षात ठेवा आणि आता कोणाचीही कुंडली उघडून पहा. या पैकी जास्तीत जास्त नियम ज्या पत्रिकेत असतील, त्या प्रमाणात तो सुखी नक्की असेल !

महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्र, अहमदनगर.

Leave a Reply