भगवान महावीर निर्वाण कल्याणक निमित्त नगरमध्ये आगम शोभा यात्रा

बातम्या

नगर : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाण कल्याण स्मृतीप्रित्यर्थ दीपावली पर्व साजरे केले जाते. यानिमित्त कार्तिक वद्य अमावस्या दीपावलीपर्यंत 21 दिवस भगवान महावीरांची अंतिम देशनाचे वाचन आणि विवेचन श्रुतज्ञान आराधनेसाठी केले जाते. याअंतर्गत नवीपेठ धर्म स्थानकात चातुर्मासानिमित्त विराजमान मधुर व्याख्यानी महासतीजी ज्ञानप्रभाजी ‘तरल’ यांच्या प्रेरणेतून आगम शोभा यात्रा  (आगम दिंडी) काढण्यात आली. सकाळी घासगल्ली स्थानक येथे जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक अशोक  (बाबूशेठ) बोरा व अहमदनगर मर्चंटस्‌‍ बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत यांच्या हस्ते या यात्रेला जैन ध्वज फडकावून प्रारंभ झाला. शहरातील कापडबाजार जैन मंदिर, सेंट्रल बँक रोड मार्गे नवीपेठ  जैन स्थानकात दाखल झाली. शोभायात्रेत लाल साडी परिधान करून डोक्यावर पवित्र आगम घेतले होते. पुरुष भाविक सफेद वेशभूषा करून यात सहभागी झाले होते. सर्वांनी जय भगवान महावीर, जय आनंद असा जयघोष केला.महासतीजी ज्ञानप्रभाजी म.सा. यांनी सांगितले की, भगवान महावीर यांनी अंतिम काळात अपार करूणा दर्शवत विश्व कल्याणासाठी, जीवन व्यवहारासाठी संपूर्ण ज्ञान सांगितले. त्याला अंतिम देशना म्हणतात. यात जन कल्याणी, भगवद्‌‍ वाणी आणि उत्तराध्ययन सूत्र समाविष्ट आहे. प्रभूंच्या निर्वाण कल्याणक महोत्सवात एकवीस दिवस त्यांच्या अंतिम देशनाचे वाचन, विवेचन करण्यात येते. यातून प्रत्येकाला जीवन जगण्याचे निश्चित ध्येय प्राप्त होते तसेच आत्मकल्याणाचा मार्ग मिळतो, असे सांगून त्यांनी श्रुतदेव उत्तराध्ययनचे महत्व विशद केले. जैन शास्त्रांना आगम म्हणून संबोधतात. आगम म्हणजे पुस्तकांना पालखीत ठेऊन भाविकांनी जयघोष करीत दिंडीत सहभाग घेतला. या दिंडी यात्रेसाठी सचिन डागा, अमोल कटारिया, देवेंद्र गांधी, राजकुमार गांधी, पारस लोढा, हेमंत मुथा व श्रावक श्राविकांनी परिश्रम घेतले. शेवटी श्रावक संघातर्फे सर्वांसाठी नवकारशी ठेवण्यात आली होती

Leave a Reply