मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत आनंद ऋषिजी महाराज

लेख

प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर

आज आनंदऋषिजींवर लेख लिहितांना मन मोहरून गेलं आहे…त्यांची 123वी जयंती साजरी होत असताना अनेक आठवणी, अनेक विचार मनात गर्दि करून येत आहेत. माझ्या ८3 वर्षाच्या जीवनात चार महापुरूष येऊन गेले… माझ्या बालपणी त्यांचं सान्निध्य मला लाभले…. मी दोनेक वर्षांचा असेन… आनंदऋषिजीचा वर्षावास पाथर्डीला होता… आई मला रोज त्यांच्याकडे घेऊन जात असे… आनंदऋर्षिजींनी एकदा माझा तळवा हाती धरला… व ते सहज म्हणून गेले, “हा हुशार आहे… शिकेल व प्रोफेसर होईल”… त्यांचे शब्द नंतरच्या काळात खरे झाले… आनंदऋषिजीचा वर्षावास जेथे होई तिथं मी गेल्याचे चांगले स्मरते… पाथर्डी,अहमदनगर,पुणे, घोडनदी, वांबोरी, आश्वी, चांदा ही गांवे तर चांगलीच लक्षात राहिली… नंतरच्या काळात मी त्यांचेशी चर्चा करीत असे…
आनंदऋषीजीनी काही सुभाषितवजा काव्यरचना केली होती. त्यातील काही ओळी त्यावेळी मी लिहून घेतल्या होत्या…
अधर्म अश्रद्धा,
धर्म श्रद्धा आहे
असत्य अधर्म
सत्य श्रद्धा आहे…
ही त्यापैकीच एक… अधर्म ही अंधश्रद्धाच आहे आणि धर्मावर विश्वास ही खरी श्रद्धा आहे. खोटेपणा हा अधर्म असून सत्य हीच खरी श्रद्धा आहे, असा अर्थ या रचनेत सामावला आहे. फक्त दहाच शब्द ! परंतू किती अर्थवाही !
आनंदऋषीजींच्या बाबतीत असे अनेक प्रसंग सांगता येतील ! आपण सर्व जण जो संसार करतो, त्यात आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनवादी आहेत. देह नश्वर असतो, पण गुण शाश्वत असतात ! ही त्यांची त्याबाबत चोख विचारधारा आहे. गुणांनी सालंकृत होऊन जो संसार करतो, त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त होतो, हे त्यांचे विचारधन आहे ! परंतु त्या बाबत ते फार सावधही आहेत, कारण गुणांचा पुरस्कार करताना ते भावनावश होत नाहीत तर ते म्हणतात, “निर्विवादपणे गुण महत्त्वाचे असतात परंतु या गुणांचा गर्व मनुष्याने कधी करू नये ! तसे झालं तर त्या सर्व गुणांवर पाणी फिरलं जायचं !’
गुणांचा इतका नम्र विचार आनंदऋषीजी करतातच कसे ? निखळ, उज्ज्वल विचारांचा सखोल आशय त्यामागे असले पाहिजे. म्हणूनच आज त्यांचे जीवनचरित्र लिहिण्याचे मी ठरवले. आनंदऋषीजींचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी, परोपकारी व प्रयत्नवादाला प्रतिष्ठीत करणारे आहे.
मोठ्या माणसांचा जन्म लहान गावात होत असतो, असे म्हटले जाते. जगातील बहुतेक मोठी माणसे एखाद्या खेड्यातच जन्माला आली आहेत. म. गांधींचा जन्म पोरबंदरचा, अब्राहम लिंकनचा जन्म लिंकन नावाच्या एका खेड्यामधला, तर विनोबा भावे यांचाही जन्म नागोडे नावाच्या महाराष्ट्रातील एका खेड्यातलाच ! आचार्य आनंदऋषीजी ह्यांचेही तसेच ! नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यांतील शिराळ-चिंचोंडी हे आनंदऋषीचे जन्मगाव ! श्री देवीचंदजी गुगळे व श्रीमती हुलासाबई हे त्यांच्या पित्याचे व मातेचे नाव ! नेमिचंद्र हे आनंदऋषीचे मूळ नाव. त्यांना एक भाऊ व एक बहीण. अगदी सुरुवातीस त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चिचोंडी या गावांत चालत होता.
नेमीचंद्रची बुद्धी लहान वयातच प्रगल्भ बनत चालली होती. त्यांचे सर्व सवंगडी जेव्हा खेळण्यात मग्न असत तेव्हा हा प्रवचण मध्ये लीन होई. गावांत आलेल्या प्रत्येक साधुंकडे त्यांची उठबस असे. संतसमागम, भजन-कीर्तन, प्रवचन श्रवण यातच त्यांचा वेळ निघून जाई. नेमीचंद्र स्वत: गाणी गात असे. त्याचा गळा अत्यंत सुरेल होता. शिराळ हे गाव पाथर्डीपासून जवळच १३ मैलांवर वसलेले. ते पाथर्डीलाही अधूनमधून येत. पाथर्डी हे गाव तालुक्याचे असले, तरी तेथे बुधवारचा आठवडा बाजार अलोट गर्दीत भरे. लहान वयातच नेमिचंद्रची प्रवृत्ती आध्यात्मिक बनत चालली होती. एकदा गावात जैन मुनी रत्नमुनी महाराज आले होते. नेमिचंद्र त्यांच्याकडे रोज जाई. अध्यात्म, धर्म, ईश्वर, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय यांच्याविषयी ते त्यांच्याकडून माहिती करून घेत.

रत्नऋषी महाराज चिचोंडीला आले त्यावेळी नेमिचंद्रने त्यांच्याकडून सामायिक प्रतिक्रमणाचा विधी शिकून घेतला. जवळ जवळ दीड-दोन तास मांडी घालून दररोज हे सूत्र कंठस्थ करावयाचे असते. नेमिचंद्रजी चिचोंडीहून मिरीला आले. तेथेही रत्नऋषींचा चातुर्मास दुसऱ्या वर्षी होता. नेमिचंद्रने जैन धर्माचा सर्वांगीण अभ्यास त्या काळात पूर्ण केला. उतारेच्या उतारे अर्थासह कंठस्थ केले. पाली व अर्धमागधी भाषेबरोबरच संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्या भाषेतील अनेक ग्रंथ वाचले. अहिंसा, प्रेम, दया, अपरिग्रह या जैन धर्मातील अनेक सूत्रांचा नेमिचंद्रावर सखोल प्रभाव पडला. रत्नऋषिंनी त्यांचया आई-वडिलांच्या सल्ल्याने व सर्व संमतीने दिक्षा देण्याचे योजिले.
मार्गशीर्ष शुक्ल नवमी विक्रम संवत १९७० मध्ये वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी नेमिचंद्रने जैन धर्माची दीक्षा मिरी या गावी रत्नऋषींच्या कडून घेतली. नेमीचंद्राचे नाव बदलून आनंदऋषीजी हे नवे नामाभिधान त्यांना लाभले व साधना पथावर त्यांचे मार्गक्रमण सुरू झाले. प्रगाढ भक्ती, अनंत श्रद्धा आणि असीम सेवा या तीन गुणांमुळे त्यांनी रत्नऋषींचे मन जिंकले. साधू जीवनाचे आचरण खडतर असले तरी, ते मनापासून स्वीकारल्या नंतर सहज होते. हा विचार त्यांनी त्या लहान वयात बोलून दाखवला. रत्नऋषीजी त्यांच्या या विशुद्ध आचरणाने प्रभावित झाले. त्यावेळी वरखंडीला पं. कृष्णाजी नावाचे एक संस्कृत विद्वान होते. रत्नऋषींनी त्यांना पाचारण केले व आनंदऋषींना संस्कृतातील मर्म शिकविण्याची इच्छा व्यक्त केली. केवळ दोन महिन्याच्या अवधीत संस्कृतमधील शब्द रूपावली, धातू, रूपावली, समासचक्र आणि रघुवंशाच्या दोन सर्गाचे अध्ययन आनंदऋषींनी त्यावेळी करून दाखविले. त्यानंतर बनारसहून व्यंकटेशशास्त्रींना पाचारण करण्यांत आले. त्यांनी आनंदऋषींना लघुकौमुदी व किरातार्जुनीयच्या दुसऱ्या सर्गाचे अध्यापन केले. त्यानंतर काशीहून आणखी एक विद्वानाला बोलावले गेले. व्हायचे काय की जे जे विद्वान आनंदऋषींना प्रदीर्घ काल शिकविण्यासाठी यायचे, ते सर्व काही महिन्यांतच परतायचे. याचे कारण आनंदऋषींची प्रगाढ ज्ञान ग्रहण शक्ती ! जो विषय १ महिन्यांत संपेल असे वाटे, तो विषय अवघ्या ४-६ दिवसांतच आनंदऋषीजी ग्रहण करीत. आनंदऋषीजींची ती ग्रहणशक्ती पाहून रत्नऋषींनी त्यांना विद्येचे माहेरघर पुणे येथे नेण्याचे ठरवले व ते पुण्यास आले.
पुण्याच्या दै. केसरीमध्ये आनंदऋषींना शिकवण्यासाठी संस्कृतमधला प्रकांड पंडित पाहिजे, अशी जाहिरात दिली गेली. वाराणसी विद्यापीठातील पंडित श्री. राजधारी त्रिपाठी यांची निवड त्यासाठी आलेल्या अर्जातून केली गेली. त्रिपाठीजी अनेक शास्त्रांचे मर्मज्ञ व अनुभवी विद्वान होते. त्यांना आनंदऋषींना अलगुरपदे, सिद्धांत कौमुदी, जैनेन्द्र व्याकरण, शाकटाय व्याकरण, प्राकृत व्याकरण, साहित्य दर्पण, काव्यानुषासन, नैषेधीयचरित, अठरा स्मृतीग्रंथ, न्यायशास्त्र, पिंगलशास्त्र इत्यादी अनेक पुस्तकांचे व विषयांचे अध्यापन त्यांनी केले.
विक्रम संवत् १९८४ च्या ज्येष्ठ महिन्यांत कृष्ण सप्तमीच्या दिवशी रत्नऋषींजींची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. आपल्या परमप्रिय गुरुदेवांच्या वियोगाने आनंदऋषीजी एकटे पडले. त्यांच्या गुरूशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला. दीक्षाग्रहण होऊन १४ वर्षे झाली होती. या चौदा वर्षांत त्यांनी ज्ञानाच्या सर्व दालनातून गुरूपदेशाप्रमाणे मुक्त विहार केला होता.
त्यानंतरच्या काळात त्यांनी अनुवादाचे फार मोठे कार्य केले. आनंदऋषीजींना मराठी अतिशय चांगल्या प्रकारे अवगत होती. मराठीतूनसुध्दा ते खेडोपाडी व्याख्याने देत. त्यांनी विचार केला की, जैन धर्माची शिकवण आता हिंदी किंवा अर्धमागधीतून नाही तर मराठी भाषेतून महाराष्ट्राच्या लोकांना दिली गेली पाहिजे. आत्मोन्नतीचा सरळ उपाय, अन्य धर्मापेक्षा जैन धर्मातील विशेषता, वैराग्यशतक जैन दर्शन व जैन धर्म, जैन धर्माविषयी अजैन विद्वानांचे अभिप्राय (दोन भाग) उपदेश रत्नकोष, जैन धर्माचे अहिंसा तत्त्व, अहिंसा ही त्यांनी इतरांच्या सहाव्याने अनुवादीत केलेली काही पुस्तके पाहिली की त्यांच्या द्रष्टेपणाची लगेच जाणीव होते. त्यांनी हिंदी भाषेतून अनेक ग्रंथ लेखन केले. तिलोकऋषीजींचे जीवन चरित्र, रत्नऋषीजींचे जीवन चरित्र, ऋषी संप्रदायाचा इतिहास, अध्यात्म दशहरा, समाजस्थिती दिग्दर्शन, सम्राट चंद्रगुप्त, चित्रालंकार काव्य-एक विवेचन, ही त्यांनी लिहिलेली काही हिंदी पुस्तके.
आनंदऋषीजींनी मराठी-हिंदी पुस्तके जशी लिहिली, तसेच त्यांनी त्याकाळी हेही ओळखले होते की, जैनांच्यासाठी ज्ञानाचा मार्ग खुला करायचा असेल, त्यांना शिक्षित करावयाचे असेल तर काही संस्थाही आता उघडायला हव्यात. पाथर्डीत त्यांनी रत्न जैन पुस्तकालयाची स्थापना केली. नागपूर येथे जैन धर्म प्रचारक संस्था उघडली. श्री. तिलोक जैन विद्यालय व अमोल जैन सिद्धांत शाळेची स्थापनाही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर पाथर्डीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अखिल भारतीय जैन धार्मिक परीक्षा बोर्ड स्थापून, त्याच्या कार्याला सुरुवात केली. संबंध भारतात आजही ही संस्था जैन धर्माचे शिक्षण व परीक्षा घेण्याचे काम करते आहे.
मुंबईची अमोल जैन पाठशाळा, बोदवड (नासिक) ची रत्नजैन बोर्डिंग, पुण्याची महावीर जैन पाठशाळा, चिचोंडीचे महावीर वाचनालय, राजस्थानमधील स्थानकवासी जैन छात्रालय, श्रीरामपूरची रत्न जैन श्राविका, पंजाबच्या फरीदकोट येथील जैन सिद्धांत शाळा या अशासारख्या २५ संस्थांना आनंदऋषींनी ऊर्जितावस्था दिली. संस्था शिक्षणाची खरी गरज समाजामध्ये आहे हे आनंदऋषींनी ओळखले. १९९९ विक्रम संवत मध्ये जेव्हा आचार्य देवजी ऋषींचे महानिर्वाण झाले. तेव्हा साधूसंघाने आनंदऋषींना “आचार्य’ हे पद देण्याचे ठरविले. वांबोरी, जि. नगर येथे त्यावेळी त्यांचा चातुर्मास होता. त्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे संवत २००६ मध्ये राजस्थानातील ब्यावर येथे जैन धर्मातील पाच संप्रदायांचे शिखर संमेलन झाले होते. त्या संमेलनात सर्व संमतीने “आचार्य’ म्हणून आनंदऋषीजींना पुन्हा निवडले व हे त्या संघाचे “मंत्री’ झाले. आत्मारामजी महाराज त्यावेळी प्रधानाचार्य होते. त्यानंतर तीनच वर्षांनी म्हणजे विक्रम संवत २००९ मध्ये सादडी येथे झालेल्या साधू संमेलनात आचार्य आनंदऋषीजींना “आचार्य सम्राट’ म्हणजेच प्रधानाचार्याचे पद मिळाले. आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत ते हे पद भूषवीत राहिले.
आनंदऋषींच्या दर्शनार्थ भारतातील तमाम प्रांतामधून जैन व जैनेतर लोक अहमदनगरला येत व त्यांचा उपदेश ग्रहण करीत. आपल्या जीवनांतील सुरुवातीचा व नंतर शेवटचा काही भाग त्यांनी अहमदनगरला जणू दिला होता. मधल्या ५० वर्षात त्यांनी भारताची पायी भ्रमंती केली. खानदेश, विदर्भ, राजस्थान, मुंबई, मेवाड, माळवा, मध्यप्रदेश, पंजाब, जम्मूतावी, उत्तरप्रदेश या भागांतील अनेक शहरांत त्यांनी चातुर्मास केला व तेथील लोकांना जैन धर्मातील विश्वव्यापक दर्शन घडविले. हर्षमुनी, प्रेमऋषी, मोतीऋषी, ज्ञानऋषी, कुंदनऋषी, चंद्रऋषी, हिम्मतऋषी, रतनमुनी हे त्यांचे प्रमुख शिष्य. आनंदऋषींनी आपल्या अमोघ वाणीने व प्रभावी व्यक्तिमत्त्वाने जैन व जैनेत्तर लोकांवर आपला अमीट प्रभाव टाकला. म्हणूनच त्यांचे जीवन महाराष्ट्रातील आधुनिक संतांच्या शृंखलेत अग्रक्रमाने तळपत राहिले व भविष्यकाळातही त्यांच्या अमोघ कार्याला तोड असणार नाही असे वाटते. अभ्यास, चिंतनशीलता, अध्यात्मवृत्ती, वैराग्यभावना आणि उत्कृष्ट कवि आणि वक्ता यांमुळे भारतातीलच नाही तर परदेशातही त्यांचा लैकिक सतत वृद्धिंगतच होईल यात शंका नाही.

——––——————————————––————————————

आनंदऋषीजी यांना मिळालेले सन्मान

  1. १९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधूंच्या संमेलनामध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचे प्रधान म्हणून घोषित करण्यात आले.
  2. १३ मे १९६४ साली अजमेर येथे (फाल्गुन शुक्ल एकादशीला) झालेल्या समारंभात आनंदऋषीजींना श्रीमान संघाचे दुसरे आचार्य म्हणून जाहीर करण्यात आले.
  3. आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पूर्ण करून पुण्याला आल्यावर त्यांचा शनवारवाडा येथे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला.
  4. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणून गौरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली. हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
  5. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे.

Leave a Reply