डॉ. सुधा कांकरिया राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित

बातम्या

चळवळीच्या आद्य प्रवर्तक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांना दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने चेअरमन कमिशन गव्हमेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली जगदीश यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर समारंभ दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा इथे सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफचे चेअरमन जगदीश यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कमिशन सदस्य भरत जा व कॉर्डिनेटर अनुप चावला उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री जगदीश यादव म्हणाले की देशाची एकता व अखंडता अबाधित राहिली पाहिजे. देशात राहणारे सर्व एकमेकांचे बांधव आहेत. राष्ट्रीय एकात्मता जपणे हे सर्वांचे कर्तव्य असून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देश बळकट करणाऱ्या व देशाची ताकद वाढविणाऱ्या सर्वांचा आज सन्मान होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीने डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ते म्हणाले डॉ. कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवे बरोबर त्या स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत. तीन तपापेक्षा जास्त त्यांची ही तपश्चर्या आहे. दोन राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले असून, चळवळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो स्त्रीभ्रूण वाचले जाण्यात सुधाताईंच्या कार्याचा महायज्ञ व तप कारणीभूत ठरले आहे, असे नमूद करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ सुधा कांकरिया म्हणाल्या की भारत मातेचे आपण सर्व लेकरं आहोत. मग मुलगा मुलगी भेद कशा साठी ? स्त्रीभ्रूणहत्या झाल्यामुळे मुला मुलींच्या संख्येत तफावत निर्माण झाली आहे. आज मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत परिणामी आज स्त्रीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सर्व ताबडतोब थांबविण्याची गरज आहे. यासाठी मी गेल्या चार दशकापासून कार्य करीत आहे. समाज मनाच्या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्यक आहे. तसेच कायद्याची अंमलबजावणी ही चोख व्हायलाच पाहिजे. आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण वयातच विवाह करतानाच सात फेऱ्यांबरोबर आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला तर मुलीच्या स्वागताचे व सन्मानाचे बीज तेव्हाच समाज मनात कोरले जाईल व भविष्यात होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्या आपल्याला रोखता येतील, असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply