नगरचे साहित्यिक गिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Uncategorized

नगरचे ज्येष्ठ साहित्यिक व साप्ताहिक नगर संकेतचे मित्रवर्य विलास गिते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार आशिष शेलार, हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक विलास गिते यांना हा पुरस्कार ; गजानन माधव मुक्तिबोध भाषिक हिंदी साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या ३० वर्षांपासून गिते यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी या तीनही भाषांमध्ये लेखन व अनुवाद केले आहे. बंगाली साहित्याचे देखील त्यांनी अनुवाद केले आहे. प्रसिद्ध बंगाली लेखक दिग्दर्शक सत्यजित रॉय यांच्या प्रमुख पुस्तकांचे त्यांनी मराठीतून अनुवाद केला आहे. दिल्ली येथील केंद्रीय साहित्य अकादमीच्या समकालीन भारतीय साहित्य या नियतकालिकासाठी त्यांनी मराठी कविता व कादंबरी यांच्यावरील हिंदी लेखांचे लिखाण केले आहे. १९९३ मध्ये त्यांना केंद्रीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गीते यांनी महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार तसेच साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार यांच्या निवड समितीवर कामही केले आहे. ” साहित्य क्षेत्रात मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील अनेक पुस्तकांचे लेखन व अनुवाद मी केले. आज मला महाराष्ट्र शासनाने राज्य साहित्य अकादमीच्या जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याचा आनंद होत आहे. आजवर केलेल्या कामाची ही पोच पावती जीवनगौरव पुरस्काराने मिळाली,” अशी भावना , गिते यांनी या वेळी व्यक्त केली.

Leave a Reply