“किर्लोस्कर “चे दिवस

बातम्या

मी १९६५मध्ये बी. ए. झालो. १९६७ मध्ये एम्. ए. हिंदी झालो आणि ६८ मध्ये एम्. ए. मराठी पूर्ण केले.६७ मध्ये एम्. ए. झाल्यावर काय करावयाचे असा प्रश्न माझ्यापुढे होता.कारण दोन मार्काने माझा क्लास हुकला होता.. व्यापार करावयाचे की नौकरी? मी नौकरी करावयाचे ठरवले. तोपर्यंत माझी पत्रकारिता दहा वर्षांची झाली होती. नववी/दहावी मध्ये असतांनाच मी दै. समाचारचा वार्ताहर व नंतर दै. केसरीचा वार्ताहर म्हणून काम पाहिले. लोकयुग, संघ शक्ति, लोकशाही या साप्ताहिकांचे कामही मी आवडीने केले. ‘मिलिंद ‘पाक्षिक ही मी पत्रकारितेच्या मुशीतून चालवले. वाईचे तर्कतीर्थ लक्षमण शास्त्री जोशी, पुण्यातील व्हीनस प्रकाशनाचे स. कृ. पाध्ये, द. बा. डावरे, व डॉ. श्रीराम रानडे यांना सल्लागार पदी घेऊन मी मिलिंद पाक्षिक चालवले होते. पण आता पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मोठी उडी घ्यावी असे वाटत होते. यदुनाथ थत्ते यांच्या साधना साप्ताहिकात अनेक लेख व कविता तोवर प्रकाशित झाल्या होत्या. त्यांना विचारायचे असे ठरवून मी एके दिवशी पुण्याकडे प्रस्थान ठेवले..
यदुकाकांना मी भेटलो. हिंदी मराठीत एम् ए केल्याचे त्यांना सांगितले. व साधनात काम करता येईल काय, असे विचारले. यदुकाका म्हणाले, ” जवाहर, तू ये. माझी काहीच हरकत नाही. तू डबल एम् ए झाल्याचे मला अगोदरच कळाले होते. परंतु इतके शिक्षण केल्यावर जो पगार द्यावयास हवा, तो आम्हाला झेपेल असे वाटत नाही. तूच ठरव. मी काय ठरविणार? ” थोडा वेळ मी बसून राहिलो. मग तेच म्हणाले,” असं कर, तू किर्लोस्कर मासिकात का जात नाहीस.. तेथे तुला संधी मिळू शकते. प्रयत्न कर. तेथे राहून ही तू साधनाचे काम करू शकशील.. पहा जमले तर.”. किर्लोस्कर मध्ये राहून साधनाचे काम करावे, ही यदुकाकांची इच्छा मला भलतीच रोमॅण्टिक वाटली. तरिही यदुनाथ थत्तेंचे ते शब्द प्रमाण मानून मी किर्लोस्कर मासिकाकडे जाऊन चौकशी तरी करू, असे ठरवले. परंतु त्यानंतर आपण नगरला जाऊन आधी पत्र लिहून मगच चौकशी करावयाची असे ठरवून मी नगरला परतलो. नगरला आल्यावर मी लगेच मुकुंदराव किर्लोस्करांना पत्र लिहिले. व त्यात म्हटले की, मला सहसंपादक म्हणून काम दिले तर करावयास आवडेल. ७/८ दिवसांनी श्री दत्ता सराफ यांची ‘कम सून’ या अर्थाची तार आली. त्यांनी भेटावयास बोलावले होते. मी सर्व बायोडाटा व लोकयुग, मिलिंद, लोकशाही, लोकशक्ती, सकाळ, नवभारत, केसरी यातील लेख व इतर कात्रणांची फाईल घेऊन पुण्यातील स्वारगेट जवळ असलेल्या मुकुंद नगर मध्ये गेलो. “किर्लोस्कर प्रेस “अशी पाटी बाहेर लावली होती. रखवालदाराला माझे नाव व काम सांगितले. त्याने आत फोन केला. व मला म्हणाला, ‘आधी दत्ता सराफांना तुम्ही भेटा. तुम्ही आत जा. ‘त्या प्रमाणे मी आत गेलो. सरळ जाउन उजवीकडील इमारतीत किर्लोस्कर मासिकाचे कार्यालय होते. आत जाताच, दत्ता सराफ कोठे बसतात म्हणून चौकशी केली. समोरच्या केबीनकडे शिपायांने बोट दाखवले. मी समोर गेलो. केबिनचा दरवाजा उघडून मी आत डोकावले. “या sss ” म्हणत दत्ता सराफांना हसून माझे स्वागत केले. मी पुणे येथे येत असल्याचे या आधीच कळवले होते. श्री सराफांशी चांगली तासभर चर्चा झाली. त्यांना सर्व लेखांची, कात्रणांची फाइल दिली. इतर विचारपूस करून ते म्हणाले की’ तुम्हाला चाराठ दिवसात कळवू. परंतु सध्या सहसंपादकाची जागा नाही. आम्हाला प्रॉडक्शन मध्ये तुमच्या सारखा माणूस हवा आहे..विचार करून अवश्य कळवू. ‘मी निरोप घेऊन केबिन बाहेर आलो. तेथे ५/६ सहसंपादक आपापल्या टेबलासमोर बसून कामात गर्क होते. दत्ता सराफ ही केबिन बाहेर आले. आणि त्यांनी सर्वांशी ओळख करून दिली. श्री मो. प्र. फडके, व. र. देशपांडे, बा. कृ. गलगली, ह. मो. मराठे. विद्या बाळ, भा. ल. महाबळ या सर्व सहसंपादकांशी नमस्कार-चमत्कार झाले. व मी किर्लोस्कर प्रेसच्या बाहेर पडलो.
पुढे आठ-दहा दिवसांनी मला श्री दत्ता सराफांची नगरला तार आली. ‘ जाॅईन ऍज सून ऍज पाॅसिबल’ अशी ती तार होती. मी हरखून गेलो. किर्लोस्कर मासिकाच्या टीममध्ये मला काम मिळाले याचा मनस्वी आनंद झाला. माझी निवड होइल असे खरे तर मला वाटले नव्हते. परंतु दत्ता सराफांनी ज्या आपुलकीने व आदराने मला मुलाखती च्या वेळेस वागवले होते, त्या वरून ‘एखाद्या वेळी काॅल येईल ही ‘असे वाटत होते. माझे हे ‘वाटणे’ खरे ठरले. लब्ध प्रतिष्ठित किर्लोस्कर मासिकांच्या संपादक मंडळात माझा सहभाग झाला होता. तार, मला वाटते, २४/२५जूनला आली होती. मी १जुलै १९६७रोजी सकाळी ९वाजता किर्लोस्कर प्रेसमध्ये जाऊन रूजू झालो. मला पगार २५०रू.द.म.ठरविण्यात आला होता, पण तो लगेच २७५/-द.म.देण्यात आला. मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अतिथिगृहात तात्पुरती सोय लावली. श्री म. श्री. दीक्षित व प्रा. भिमराव कुलकर्णी यांनी मला फारच चांगले सहकार्य केले. जवळजवळ दोनेक महिने मी तेथे राहिलो असेन. तोपर्यंत मी श्री ग. ल. ठोकळ यांच्याकडे जाऊन मी पुण्यात आल्याचे सांगितले होते. त्यांनी मला बोलावून आवर्जून सांगितले की आमच्या शेजारच्या बंगल्यातील ‘श्री लाॅज’मध्ये एक खोली बांधली जात आहे तुम्हाला ती चालेल का पहा. मी तसे पाहिले व खोली आवडली. दर महा साठ रुपये भाड्याने ती मला श्री पावसकरांनी दिली. श्री पावसकर हे त्या बंगल्याचे व श्रीलाॅजचे चालक-मालक होते. टीळकरोडवरून मुकुंद नगरला किर्लोस्कर प्रेसमध्ये जाणे अवघ्या काही मिनिटांचे होते. माझ्या जवळ त्यावेळी व्हेस्पा स्कूटर होती. एक लिटर दराने पेट्रोल मिळायचे. पाच लिटर पेट्रोल आठवडाभर जात असे. सबंध स्टाॅफमध्ये व्हेस्पा स्कूटर माझ्या कडेच होती. त्यामुळे पुण्यात भरपूर फिरणे व्हावयाचे. सुरवातीला मी प्रेसच्या अलिकडच्या इमारतीत, जिथे ग्रंथालय होते, तिथे मला टेबल दिले गेले. माझ्या शेजारच्या खोलीत प्रख्यात चित्रकार श्री ग. ना. जाधव यांची केबिन होती. किर्लोस्कर मासिकाच्या मुखपृष्ठांची व आतील मजकुरासंदर्भाची चित्रे ते तयार करीत व मला दाखवीत. मी ओके कैल्यावर ती छापली जात. जाधवांचा स्वभाव सरळ व मोकळा होता. त्यामुळे त्यांच्याशी गप्पागोष्टी हरघडी रोज होत असे. ग्रंथालयात मी बसत असल्याने ग्रंथपाल श्री देशपांडे माझ्याशी नेहमीच सौजन्याने वागत असत. रूजू होताच दत्ता सराफांनी मला बोलावून सांगितले की ,”किर्लोस्कर प्रकाशनातर्फे महाराष्ट्रातील जिल्हावार माहिती असणारे ग्रंथ आपण प्रकाशित करणार आहोत. तुम्ही नगरचे आहात. तेव्हा नगर पासून सुरूवात करू या. तुम्ही या जिल्ह्यातील संपूर्ण माहिती त्याच्या इतिहास,भूगोल व वर्तमानसह तयार करुन ती लिहावयाची. तेव्हा तुम्ही लगेच नगरला जा. ऍडव्हान्स तुम्हाला मिळेलच. व सर्व माहिती गोळा करून या. तो डाटा तयार झाला की तुम्ही सुंदर पुस्तक साकारू शकाल” मी तयारी केली व दुसऱ्याच दिवशी नगरला परतलो. अनारसे घरी रहायला मिळत होते लग्न होऊन एखादे वर्ष झाले होते. त्याही घरी राहून काम करणे बरे, असे वाटत होते. मी घरी राहून नगर जिल्ह्यातील सर्व तांत्रिक व भौगोलिक माहिती असलेली पुस्तिका,गॅझेटियर, कलेक्टर कचेरी कडून मिळवली. राहुरी, कोपरगाव, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर या तालुक्याच्या साखर कारखान्यांना भेटी दिल्या. नगर जिल्हा हा साखर उत्पादनात अव्वलस्थानी होता बाबुराव तनपुरे, पद्मश्री विखे पाटील, शंकर राव कोल्हे व काळे, संतुजीराव थोरात यांनी सर्व ते आवश्यक सहकार्य मला दिले. मुळा धरण, भंडारदरा धरण पाहिले., कर्जत राहिला भेटी दिल्या. व सर्व मला हवी असलेली माहिती घेऊन वीसेक दिवसांनी पुण्यात हजर झालो. सराफांना सर्व हकिकत सांगितली व माहिती ही पाहिली. ते जाम खूश झाले व म्हणाले, “मला हवे तसेच काम तुम्ही केले आहे. आता या सर्व माहीतीत सुसूत्रता आणून तुम्ही लिहा. पण तत्पूर्वी मला असे वाटते की तुम्ही औरंगाबादला जाऊन त्या जिल्ह्यातील अशीच सर्व माहिती मिळवावी. म्हणजे पुढील २/३ महिन्यात तुम्ही दोन ग्रंथ लिहून शकाल. लगेच आपण ते प्रकाशित करू. ” आम्ही दोघे मुकुंदरावांकडे गेलो. मुकुंदरावांंनी अगत्याने दिड एक तास चर्चा करून संमती दिली. व मी पुढील १/२ दिवसातच औरंगाबादला डेरे दाखल झालो.
औरंगाबाद ला मी पौर्णिमा हाॅटेल मध्ये मी उतरलो होतो. गावातील मध्यवर्ती असे ते होटेल होते. तेथूनच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव पालोदकर यांचेशी मी संपर्क साधला. त्यांनी हवे ते सहकार्य देण्याचे कबूल केले व दिले ही. श्री गोविंद भाई श्राॅफ, अनंतराव भालेराव, (संपादक,दै.मराठवाडा) यानाही मी जाऊन भेटलो. त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती ही दिली.
जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडून जिल्ह्यातील सर्व विषयांची (क्रषि,शिक्षण, सहकार,आर्थिक, सांस्कृतिक, कला वगैरे)आकडेवारी ही घेतली. औरंगाबाद गैझेटिअरही मिळवले.एक दिवस अजंठा व एक दिवस वेरूळला दिला.राजकीय पक्षांची माहिती व प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना ही जाऊन भेटलो.ती सर्व माहिती दोन सूटकेसमध्ये भरून मी माघारी नगर मार्गे पुण्यास गेलो.श्री मुकुंदराव व श्री सराफ याना अहवाल दिला.दोघेही समाधान पूर्वक म्हणाले,” मुथा,फारच छान काम केले तुम्ही..आता आरामात लिहा.”पुढच्या महिन्यातच ‘ समग्र अहमदनगर जिल्हा’ मी तपशीलवार लिहिला. जवळजवळ दोनशे-अडीचशे फुलस्केप पाने भरतील एवढे मजकूर असलेली फाईल जेव्हा मुकुंदरावांच्या हाती दिली तेव्हा,” बरं बरं बरं” असा मोठ्ठा हेल काढून त्यांनी हस्तांदोलन केले. ती त्यांच्यी पद्धत एव्हाना माझ्या खूप परिचयाची झाली होती.
काही दिवसांनी श्री मुकुंदराव, श्री सराफ व मी अश्या आमच्या तिघांची एक बैठक झाली. मुकुंदराव सागत होते, ” किस्त्रीम बुक क्लब ची योजना आता मार्गी लावावयास हवी. मुथांच्या कडे ती दहा-वीस हस्तलिखिते द्या.. मुथा ती आपल्या सवडीने लवकर वाचतील व पहिल्या दहा पुस्तकांची निवड करतील. तो संच आपण लगेच प्रकाशित करू.. ” सराफांनी होकार दिला. मुकुंदराव पुढे म्हणाले, ” एकदा पुस्तकांची निवड झाली की तुम्ही तिन्ही मासिकातून जाहिरात करा.. ” सराफांना मान डोलावली. मिटींग संपली तेव्हा वीसेक हस्तलिखितं मुकुंदरावांनी माझ्या जवळ दिली. ती आदबशीरपणाने घेऊन मी माझ्या टेबलावर येऊन बसलो. देशपांडे-जाधवांना हकिकत सांगितली. जाधव म्हणाले, “आता काय, वाचन सुरू….
आठ/दहा दिवसातच मी १५/२० हस्तलिखितं वाचून दहा पुस्तकांची निवड केली. सौ. कमला फडके यांनी डॉ .ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या आत्मचरित्राचा हृदयाची हाक या शिक्षकाने जो मराठी अनुवाद केला होता त्यास मी पहिल्या क्रमांकाची पसंती दिली. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षातील किर्लोस्कर, स्त्री, मनोहर चे अंक चाळून त्यातील निवडक व्यंगचित्रे व विनोदाचा मी संपादित केलेला हसाल किती हे पुस्तक होते. किर्लोस्कर मासिकाच्या सहसंपादक पदी अनेक ज्येष्ठ व्यक्ती होत्या. परंतु यापूर्वी कोणाचेही पुस्तक किर्लोस्कर ने प्रकाशित केले नव्हते. ‘हसाल किती ‘ या पुस्तकाच्या निमित्ताने माझे पुस्तक प्रकाशित करण्याचा सन्मान ‘किर्लोस्कर’ ने मला दिला.
मला अजूनही एका गोष्टी चे खूप अप्रूप वाटते. या तीनही मासिकात किमान वर्षभर दोन-दोन स्तंभलेखन करणारा मी एकटाच सहसंपादक होतो, हे ते अप्रूप! त्याचे असे झाले, एके दिवशी मुकुंदरावांनी व सराफांना मला एकदा बोलावले व म्हटले, “मुथा, तुमचे लेखन भरपूर आहे. साधे-सरळ प्रवाही भाषेत तुम्ही लिहिता. याच महिन्यापासून तुम्ही ‘स्त्री ‘मासिकात ‘सुचित्रा’ व ‘हसरे पान’ ही दोन सदरे तुम्ही लिहावयाची” मी लगेच होकार दिला. “त्याचप्रमाणे मनोहर मध्ये ‘की जय’ हे राजकीय व ‘नवं काय वाचालं’ हे ग्रंथ समीक्षेचे आणि किर्लोस्कर मध्ये ‘मुलाखती’चे हे सदर लिहा”- मुकुंदराव म्हणाले. अशाप्रकारे मी सुमारे दोन वर्षे किर्लोस्कर, स्त्री, मनोहर मध्ये भरपूर लेखन केले. ह. मो. मराठे, विद्या बाळ, भा. ल. महाबळ, फडके, कुंभोजकर या सहसंपादकांना जी संधी कधीच मिळाली नाही, ती स्वतः च्या नावाने लेखन करण्याची संधी मला मुकुंदराव व सराफांनी दिली. सर्वच सदरे मी माझ्या नावाने लिहीत होतो. एका ज्येष्ठ सहसंपादकाने त्यावेळी, मला वाटते, जरा नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘हसरे पान ‘हे सदर मी टोपणनावाने लिहावे असे मला वरिष्ठांकडून सुचवण्यात आल्याने मी माझे महाविद्यालयीन टोपण नाव ‘प्रिती घोष ‘ या नावाने ते सदर लिहीत असे. याच स्त्री मासिकात मी चित्रपट, रंगभूमी विषयक’सुचित्रा: हे सदर लिहीत असे. हे सदर मी माझ्या च नावाने लिहित असे. चांगल्या चित्रपट, नाटकाचे समीक्षण, घटनांचे विश्लेषण या सदरात मी देत असे. एकदा मला वाटले की या पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्या इंस्टिट्यूट वर आपण का लिहू नये.. मी स्कूटर ने प्रभात रोडवरील त्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. स्कूटर पार्क केली. समोरून दोन मुली येत होत्या. एक उंच तर दुसरी थोडी बुटकी..मला फार गंमत वाटली. नाकीडोळी त्या कमालीच्या सुंदर होत्या. त्या दोघींचा परिचय करून घ्यावा असे वाटले. मी त्यांना थांबवून माझा परिचय दिला व येण्याचे प्रयोजन सांगितले. एक पत्रकार आपल्या शी बोलतोय याचे भान त्यांना आले. बुटकी म्हणाली, “मैं जया बहादुरी व ही रश्मी.आम्ही दोघी एक्टिंगच्या कोर्सला आहोत (हीच जया बहादुरी पुढे जया अमिताभ बच्चन झाली) तुम्हाला आमची मुलाखत चालेल? ” तिनं विचारले. मी ‘त्यांनी नहीं’म्हणत कॅंटीनकडे पाहीलं.. आम्ही तिघे कॅंटीनकडे गेलो. चहा बिस्किटे झाली.. पुढल्या काही दिवसात मी रोज फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ लागले. त्या दोघांबरोबर असरानीही तिथे होता. त्याची इच्छा ही मी मुलाखत घ्यावी अशी होती. मी त्याला टाळलं.. व त्या दोघांनी भरपूर बोललो.. माझी आणि जयाची चांगली च गट्टी जमली. कधी ती तर कधी रश्मी ला स्कूटर च्या मागे बसवून हिंदू फिरू लागलो. मार्च १९७०च्या स्त्री मासिकातील सुचित्रा सदरात मी या दोघींविषयी लिहिले. ही मुलाखत मराठी मासिक वर्गात त्या काळात खूप गाजली. स्त्री मासिकात मी जशी दोन सदरे लिहित होतो, तशीच दोन सदरे, ‘ की जय ‘ आणि ‘नवं काय वाचाल ‘ मनोहर मासिकात मी लिहित असे. की जय सदर संपूर्ण राजकीय विश्लेषण असलेले तर नवं काय वाचाल या सदरात नविन प्रकाशित झालेल्या पुस्तकांविषयीचं, माझं बनलेलं मत मी नोंदवहीत असे. एकावेळी मी पाच दहा पुस्तकांविषयीचं अभिप्राय मी देत असे.
या सर्व लिखाणाचा फार मोठा वाचकवर्ग मी तयार केला होता. महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक माझे मित्र बनून ओळखू लागले. पुण्यातील साहित्यिकांची तर गोष्टीच वेगळ्या.. विद्याधर पुंडलिकापासून तो बाळ ज. जोशी पर्यंत सर्व जण मला सन्मान देऊ लागले.. त्या सर्वांविषयी नंतर केव्हातरी लिहीनच…
– प्रा. जवाहर मुथा

Leave a Reply