आम्ही विद्याधामिय सुवर्ण महोत्सव अंकानिमित्त

लेख

आम्ही विद्याधामिय (अकरावी 1973 बॅच) सुवर्ण महोत्सव, अशा शिर्षकाचा हा अंक हाती पडला आणि वाटलं, अरे हे काहीतरी वेगळंच आहे बर का! उत्सुकते पोटी पाहिलं तर विद्याधाम प्रशालेचा फोटो असलेले मुखपृष्ठ आणि वरती उजव्या कोपऱ्यात परमपूज्य गुरुवर्य गो.ना. वाघ सरांचा फोटो. मुखपृष्ठ आवडलं आणि अंक चाळला तो थक्क होऊन गेले ५० वर्षानंतर १९७३ च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आणि आठवणींचे, मैत्रीच्या ठेव्याचे जतन म्हणून हा अंक काढलेला. आश्चर्य मिश्रित कौतुक वाटलं. अंक चाळला वाचला आणि या अंकावर काही लिहावसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.
“ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी”

किती सार्थ आहे नाही हे. कुणाचे ऋणानुबंध कुठे जुळलेले असतील हे काही सांगता येत नाही. त्याशिवायच का वेगवेगळ्या घरातील, निरनिराळ्या वस्तीतील मुलं एका शाळेत शिकायला येतात, त्यांचे ऋणानुबंध जुळतात आणि ते कायम टिकतात. नुसते टिकतच नाही तर त्यांच्या सतत भेटीगाठी कार्यक्रम होतात आणि मग त्यातीलच काही विद्याधामियांसारखे लोक या भेटीगाठी अजरामर करण्यासाठी ओळखीचा सुवर्ण महोत्सवही साजरा करतात, नुसताच साधासुधा नव्हे तर प्रॉपर संमेलन घेऊन.
आपल्या शाळेतील अकरावीच्या वर्गातील सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शोधून एकत्रित करणे, सगळ्यांना एका व्यासपीठावर आणणे, त्यांचे संमेलन भरवणे, शिवाय पन्नास वर्षे झालेत म्हणून सगळ्यांच्या आठवणींचे संकलन करून त्याचा एक सुवर्ण महोत्सवी अंक काढणे हे सगळं अवघड असे शिवधनुष्य पेलून दाखविलं आहे विद्याधाम प्रशालेतील 1973 च्या अकरावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी, तब्बल पन्नास वर्षांनी. ही सगळी मुलं आता ज्येष्ठ मुलं झाली असून, (मी वृद्ध हा शब्द वापरणार नाही या सगळ्यांच्या उत्साहापुढे तो कुचकामी आहे) त्यांची नातवंड आता अकरावीच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे. या वयात प्रचंड उत्साहाने या सगळ्या जेष्ठ मुलांनी हे ठरवलं आणि प्रचंड मेहनतीने पूर्णत्वाला आणलं. त्यावेळी एका वर्गात शिकत असलेली ही निरागस मुलं
“इनका किसी से बैर नही इनके लिये कोई गैर नही
भाषा की तक्रार नही मजहब की दीवार नही”

या स्थितीतले.
नंतर संसार चक्राच्या रहाटगाडग्यात विखुरलेले, काळाच्या पडद्याआड झालेले पुन्हा एकदा त्याच निरागस भावनेने एकत्र आलेत. जेवढे मिळतील तेवढ्या शिक्षकांनाही आपल्या सामील करून घेतलं, त्यांच्याकडून आठवणींचे पट उलगडून घेतले, लिखाण करून घेतले आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे पाऊल टाकत हे शिवधनुष्य समर्थपणे पेलून दाखवले.
गुरुजनांचा आशीर्वाद घेणे याचं मला खूप कौतुक करावसं वाटतं, कारण ज्या पायांवर डोकं टेकवावं असे पायही मिळणं दुरापास्त असलेल्या या आजच्या काळात असे पाय शोधून त्यांना नमन करून पुढे जाणं, या ज्येष्ठ वयातही ज्यांना सुचले ती मस्तकं खरोखर आशीर्वादाला पात्रच होती असं म्हणावसं वाटतं.
या अंकाच्या वाटचालीच्या वारीत अनेक जणांनी भक्ती भावाने आपली हजेरी लावली आहे. या सगळ्याची धुरा सांभाळण्याचं म्हणजे या अंकाचं संपादन करण्याचे प्रमुख कार्य यशस्वीपणे पार पाडलं आहे पूर्वाश्रमीची चंदाराणी जगताप उर्फ आत्ताची प्रसिद्ध कवियत्री, विदुषी प्रभा सोनवणे यांनी. अंकाच्या मुखपृष्ठावर शाळेच्या इमारतीचे दर्शन झाल्यानंतर आपण लहान असून शाळेत जाऊन प्रार्थनेच्या रांगेत उभे आहोत असं वाटतं, कारण आतील पानावर लगेच शाळेची प्रतिज्ञा आणि प्रार्थना आहे. नितांत सुंदर असे संपादकीय आहे. त्यानंतर शिक्षक वृंदाचे आशीर्वाद रुपी लेख आहेत. त्यानंतर पाच-दहा नव्हे तर तब्बल ८१ मुलांनी आपल्या आठवणी लेखरूपाने सादर केलेल्या आहेत. काही कविताही यात घेतल्या आहेत. कुणी आपलं बालपण सांगितलं आहे, कुणी शाळेतील ह्रुद्य प्रसंग, आठवणी कुणी मित्रमैत्रिणींच्या तर कुणी शाळेच्या, शिक्षकांच्या आठवणी. प्रत्येकाने आपल्या नाव, पुर्वाश्रमीचे नाव(मुलींनी) यासोबतच आपापली जन्मतारीख पण दिली आहे.
आज आपल्यात नसलेल्या शिक्षक वृंद आणि त्या बॅचचे विद्यार्थी यांना मलपृष्ठावर आतल्या बाजूने आदरांजली वाहून त्यांचेही स्मरण केले आहे. खेडेगावात टँकर द्वारे मोफत पाणी उपलब्ध करून देणारा जुना विद्यार्थी आत्ताचा समाजसेवक धरमचंद फुलफगर यांचा फोटो देऊन त्याच्या कार्याचा गौरव मलपृष्ठावर केलेला आहे.
हा सर्वांग सुंदर अंक माझी मैत्रीण प्रभा सोनवणे हिच्यामुळे मला बघता आला वाचता आला आणि त्यावर लिहिण्याची उर्मी निर्माण झाली, त्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद. मैत्र असंच असतं मित्रांना अनेक संधी देत पुढे जातं.
या मित्र-मैत्रिणींनी हे पन्नास वर्षाचं जपलेल मैत्र असंच अबाधित राहो आणि अमृत महोत्सवी आणि शतकोत्सवी अंक सुद्धा निघावा अशा शुभेच्छा देते. हा, या अंकाचा गवसलेला सूर, सुरू झालेला यज्ञ अव्याहत सुरू रहावा आणि दरवर्षी या बेॅचने असा अंक काढावा ही सदिच्छा देते आणि थांबते.

वासंती वैद्य, पुणे.
मो – 9850315790.

Leave a Reply