अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

लेख

आकाशकणी केंद्रावरील भाषण [१ ऑगष्ट २००९]

लेखक- प्रा. जवाहर मुथा, प्रमुख संपादक साप्ता. नगर संकेत

१९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्‌गारले, ‘अण्णा, हा आमचा जवाहर’,
अण्णाभाऊ साठेंची आणि माझी ही पहिली ओळख मी कधीच विसरू शकत नाही. कारण त्यावेळी अण्णांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहात, ‘असं का येये’ म्हणत जवळ बसवून घेतले होते. अण्णांनी माझी ओळख स्वतःहून करून घेतली. ते त्यांचे मोठेपण होते. मला काय कळणार ? ते म्हणाले, ‘तुझं नाव जवाहीरलाल आहे, म्हणजे तू चांगलाच असणार !’ मला त्या वाक्याचा काहीच अर्थ कळला नाही. अमरशेखांबरोबर ही तात्यांनी माझी ओळख अशीच करून दिली होती. ते आठवले! परंतु ते वर्षभरापूर्वीचे होते.
मी त्यावेळी नगर कॉलेजमध्ये एस्. वाय्.बी.ए. ला होतो. ‘साहित्य-साधने’ चा सेक्रेटरी म्हणून मी कॉलेजमध्ये कामही करीत होतो. प्रा. बंडेलू हे साहित्य साधनेचे अध्यक्ष होते. प्रा. स. वा. मुळे, प्रा. वसंत दीक्षित यांचे मार्गदर्शन या संस्थेला असावयाचे. प्रा. ह. कि. तोडमल हे जरी मराठी शिकवीत असत तरी ते एन्.सी.सी. चे ऑफिसर असल्याने त्यांची एकूणच देहयष्टी ही लष्करी अधिकाऱ्याचीच वाटायची.
मी कॉलेजमध्ये मराठी विषयाचा विद्यार्थी आहे व मी कविता ही लिहितो, हे कळताच अण्णांना मी त्यांचाच वाटलो. ते नगरला काही दिवस मुक्कामासाठी आले होते. भाई सथ्थांकडे ते उतरले असावेत. कारण निघताना ते म्हणाले होते, ‘उद्या तिथून पुन्हा इकडे येणारच आहे. पिक्चरचं शुटींग आहे, तेव्हा काही दिवस नगरलाच ! भेटू या. ‘
दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट झाली. अण्णांनी त्यांच्या रशियाच्या प्रवासासंबंधी बऱ्याच गोष्टी आम्हांला सांगितल्या. त्यातल्या एक-दोन अजूनही आठवतात, अण्णा म्हणाले होते, ‘आम्ही लेनिनग्राडला’ विमानाने जात असताना एक तरुणी भेटली होती. ती विमानात खिडकी शेजारी बसली होती. मान कलती करून तिने खिडकीच्या काचेवर टेकवली होती. तीचे बंद असलेले डोळे उमलत्या कळीप्रमाणे मला भासले. तिच्या पुढे एक लहानसा पाळणा होता व त्यात शुभ्रवस्त्रात तिचे लहान मूल झोपले होते. उद्याचा रशियन नागरिक मला त्यात दिसला. किती काळजी घेतात ते लहान मुलांची ! नाहीतर आमची फरफट आहेच. ज्या देशात लहान मुलं सुखी तो देश किती सुंदर !’
अण्णांची ती व्याख्या ऐकून मला खूपच नवल वाटले होते व त्यांच्या आस्थेवाईक तत्त्वज्ञानाची ओळख मला पटायलाही लागली होती.
त्यानंतरच्या काळात अण्णाभाऊ साठेंना मी ७/८ वेळा भेटलो असेल. कधी मुंबईत तर कधी नगरला. १९५७ च्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णांनी ‘दलित साहित्य’ ही संकल्पना फार विस्ताराने मांडली होती. त्यावेळेस मी दहावीत होतो. वृत्तपत्रात मी त्यांचे भाषण व त्यांच्याविषयी बरेच वाचलेले आठवते. त्यातच संमेलनातील त्यांचे वाक्य, ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’ हे नंतरच्या काळात तत्त्वज्ञान बनून राहिले होते.
अण्णाभाऊंना १९६१ मध्ये त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार लाभला होता. १९६७ पर्यंत खऱ्या अर्थाने त्यांची घोडदौड चालू राहिली. त्यांनी दलित साहित्याला चळवळीचे स्वरूप दिले होते. ते एकदा मला म्हणाले होते, ‘जवाहर, परंपरागत मूल्य व्यवस्थेला शह द्यावयाचा असेल तर त्याला चळवळीचे स्वरूप द्यावे लागते. गप्प बसून कसे चालेल.’
अण्णांच्या फकिरा, वैजयंता, वारणेचा वाघ या कादंबऱ्या मी वाचून काढल्या. चित्रा या कादंबरीवर नाटक लिहिले गेले जाईल असे मला वाटले होते. मी त्यांना तसे बोलून दाखवले होते.
मुंबईच्या बौद्ध साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष असताना ते मला एकदा भेटले होते. अहमदनगरची आस्थेवाईकपणे चौकशी करीत ते म्हणाले, ‘जवाहर, ही परिषद चालली पाहिजे, तू त्याच्यात लक्ष घालतो, ही चांगलीच बाब आहे.’
अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याचे शुटींग नगरला, अकोळनेर जवळच्या एका ओढ्यात चाललेले मी पाहिले. तात्या, कमला वहिनी, नंदिनी ने त्यातील काही दृश्यात काम केले. तात्यांनी पागोटे घातलेल्या एका पाटलाची भूमिका केली. एका माणसाच्या खाड्दिशी मुस्कटात मारायची, असे दृश्य होते. तात्यांनी ते समजावून घेतले व १/२ रिटेक मध्ये पूर्ण केले.
अण्णाभाऊ हे मातंग समाजाचे होते. त्यांना ‘लोकशाहीर’ हा किताब जनतेने बहाल केला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अमरशेखांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनजागृती केली होती. त्यांचा जन्म १९२० चा ! वयाच्या १४व्या वर्षी आपल्या मूळ वाटेगावहून पायी प्रवास करीत मुंबई गाठली होती. रस्त्यात वेठबिगारी केली. शिक्षण न घेताही ते विचारप्रवृत्त बनले. व मार्क्सवादकडे झुकले. ते अवघे ४९ वर्षे जगले; परंतु त्या काळात ३५ कादंबऱ्या, १५ कथा संग्रह, १० पोवाडे, १२ चित्रपटकथा आणि एक प्रवासवर्णन एव्हढे साहित्य त्यांनी निर्मिले. आजपर्यंत फकिरा कादंबरीच्या १७ आवृत्त्या निघाल्या. त्यांच्या कथा निरनिराळ्या २७ भाषेतअनुवादीत झाल्या. त्यांच्या हयातीत महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर १९६३ मध्ये ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित केला होता.
ते एकदा मला म्हणाले होते, ‘बरं का जवाहर, खरी गम्मत मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना यायची, त्यांनी माझ्या तमाशावर बंदी आणली होती. पण त्यांची ‘बंदी’ फुसकी ठरली. मी जिथे जाई तिथे लोक मला वग करायला सांगत आणि आमचे ‘तमाशे’ दुपारीच होऊ लागे. पोलीस त्यावेळी पेंगलेले असायचे’
१९६२ मध्ये अण्णांनी ‘पिऱ्याचोर’ हे वगनाट्य लिहिले होते. ते त्यावेळी बरेच गाजले. त्याचा एक प्रयोग नगरला त्यावेळी झाला होता. ‘रंगभवन’ च्या खुले नाट्यगृहातील त्या प्रयोगाला मी आवर्जून उपस्थित होतो. अण्णांनी त्या वगनाट्यात खापऱ्याचोराचे काम केले होते. प्रयोग संपल्यावर अनेकांनी अण्णांना गराडा घालून त्यांचे अभिनंदन केले होते.
आमचे एक भाडेकरी आमदार बा. म. भारस्कर हे मंत्री झाले होते. समाजकल्याण खाते त्यांच्याकडे आले असावे. भारस्कर, दादासाहेब रुपवते हे अनुक्रमे टिळकरोड व स्टेशनच्या आमच्या बोहरी चाळचे कैक वर्षे भाडेकरू होते. दादा रुपवते तर किमान ४० वर्षापासूनचे भाडेकरी होते. त्यामुळे त्या दोघांचा माझ्याशी चांगला संबंध होता. भारस्कर हे काँग्रेसचे व अण्णाभाऊ साठे भारस्करांच्या शपथविधीच्या कार्यक्रमास हजर होते. आपला एक दलित मित्र मंत्री होत होता त्याचा त्यांना तसा आनंदच होत असावा.
अण्णाभाऊंची पुण्यातही अधून मधून भेट व्हायची ६६-६७ मध्ये मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक म्हणून रुजू झालो, तेव्हा ही एक-दोनदा भेटलो. घाटकोपरच्या झोपडपट्टीतून गोरेगावच्या फ्लॅटमध्ये ते १९६८ मध्ये राहायला आले होते. परंतु त्यांना तिथे करमले नाही. १९६९ च्या जुलै मध्ये जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा ‘साधना’ मध्ये मी त्यांच्यावर लेख लिहिला.
२००९ मध्ये औरंगाबाद येथे मातंग समाज प्रतिष्ठानने मला जीवन गौरव पुरस्कार दिला. तो अण्णाभाऊंच्या नावाचा होता म्हणून घेण्यासाठी मी गेलो. गृहमंत्री भुजबळांच्या हस्ते तो घेताना भुजबळ म्हणाले, ‘मुथा, तुमचा आणि अण्णाभाऊंचा संबंध हा एक योगच म्हणावा लागेल !’ त्यांच्या त्या उद्‌गाराने मी स्वतःला कृतार्थ समजून घेतले. माझे मित्र श्री. लहू कानडेंनी पाठपुरावा केला नसता तर या आठवणी कदाचित मी लिहिल्याही नसत्या, अजूनही खूप काही आहे. परंतु नंतर केव्हा तरी !

Leave a Reply