गणगौर उत्सवातून पारंपरिक सण उत्सवांचा एकत्रित आनंद : सुरेखा चंगेडिया
नगर : शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्यावतीने करण्यात आले होते. यासाठी सहेली ग्रुपच्या छायाताई फिरोदिया व जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.
जय आनंद महावीर महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या सत्येन मुथा, सुवर्णा प्रमोद डागा, हर्षा शुभम मेहेर, दीपिका प्रितेश गांधी या दाम्पत्यांच्या हस्ते गण-गौरची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी सहेली ग्रुपच्या आशाताई सुरेश मुनोत, आशाताई ईश्वर मुनोत, प्रमिला मुथा, जय आनंद महिला मंडळाच्या उपाध्यक्ष राधिका कासवा, जिजाऊ ग्रुपच्या मनिषा गुगळे, मंगल मुनोत, शकुंतला पितळे, कोमल ग्रुपच्या सदस्या आदींसह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
जैन ओसवाल पंचायत सभेचे प्रधान मंत्री शैलेश मुनोत, सहसेक्रेटरी संतोष गांधी, बाळासाहेब भंडारी, कमलेश भंडारी, पोपटलाल भंडारी,
मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गण-गौरची भव्य वरात इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळील मंगल प्रमोद गांधी (राजलक्ष्मी) यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. बँड पथक, पारंपारिक वेषभूशा केलेल्या व डोक्यावर शिव पार्वतीची मूर्ती घेतलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या. वरातीत महिलांनी पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य सादर केले. त्यानंतर वरात केशरगुलाब कार्यालयात पोहचली. याठिकाणी विवाह संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी फळतीज पूजा, दुसर्या दिवशी झालावरणा व तिसर्या दिवशी विवाह असे धार्मिक कार्यक्रम झाले. हेमा गुगळे, प्रगती चोपडा, मनिषा मुनोत यांनी अतिशय सुंदर राजस्थानी गीत सादर करतानाच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गणगौर व्रत उत्तर भारतात गुढी पाडव्याच्या पर्वात साजरे केले जाते. या व्रताने पतीची कृपा आपल्यावर रहाते आणि कुमारिकांना चांगला पती मिळतो, अशी श्रध्दा आहे. याचदिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्री जातीला सौभाग्य बहाल केले होते. सुवासिनी हे व्रत घेण्यापूर्वी गौरीची स्थापना करतात व त्यांचे पूजन करतात. त्यानंतर गौरीची कथा सांगितली जाते.
यावेळी बोलताना सहेली ग्रुपच्या सुरेखा चंगेडिया म्हणाल्या की, राजस्थानी संस्कृतीत गणगौर उत्सवाला मोठी परंपरा आहे. नगरमध्येही गणगौर सारखा पारंपरिक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करून महिला पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहचवत आहेत. यानिमित्त सर्वजणी एकत्र येवून एकमेकींशी संवाद साधून सणाचा आनंद घेतात.
शैलेश मुनोत म्हणाले की, जैन ओसवाल पंचायत व जय आनंद महिला मंडळाने सण उत्सव एकत्रित साजरे करून महिलांना एकत्र आणण्याची परंपरा सुरू केली आहे. स्व. सुवालालजी गुंदेचा यांनी गणगौर उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केला. तेव्हापासून
दरवर्षी गण गौर विवाह सोहळ्यात महिला व युवती आवर्जून सहभागी होतात. अशा उपक्रमांतूनच पूर्वापार चालत असलेल्या परंपरांचे जतन होत असल्याचे त्यांनी सांगितले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनतर्फे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सौ.पुष्पा ललित बनभेरु यांनी सर्व पूजेची व्यवस्था पाहिली. चकोर मुळे गुरुजी यांनी पूजाविधी केला.
गण-गौर व्रत घराघरामधून केले जाते. त्यासाठी पांढर्या शुभ्र कागदावर शिव-पार्वतीची (गण-गौर) छबी कोरण्यात येते. त्यावर चंद्र,सूर्य व स्वस्तिक अशी मांगल्याची प्रतिके असतात. या प्रतिकांच्या वर ठिपक्यांच्या एका खाली एक तीन रांगा करतात. पहिल्या रांगेतील ठिपक्यांना कुंकु, दुसर्या रांगेतील ठिपक्यांना मेहंदी तर तिसर्या रांगेतील ठिपक्यांना काजळ लावून सजविले जाते. या चित्राभोवती मोळी फुलांच्या माळेसारखी बांधतात. जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शेवटी सेक्रेटरी आनंद मुथा यांनी आभार मानले. हेमराज केटरर्सच्या रूचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी केशरगुलाब कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.