आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाभोजन
नगर : आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवसेवेचा महान संदेश आपल्या जीवन कार्यातून दिलेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण सर्वजण वास्तव्यास आहोत हे आपले परमभाग्य आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. संतांनी नेहमीच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांसाठी कार्य करण्याची शिकवण दिली आहे. या निरपेक्ष सेवेतून मिळणारा आनंद जगातील सर्वात मोठा आनंद असतो. त्यांच्या या आदर्शानुसारच जय आनंद महावीर युवक मंडळ कार्यरत आहे. अन्नदानातून मिळणारे पुण्य सर्वात मोठे पुण्य असते. दरवर्षी हा उपक्रम राबवून मंडळाने आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन मर्चंटस् बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसाद वाटपाच्या शुभारंभप्रसंगी अनिल पोखरणा बोलत होते. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, मर्चंटस् बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक सी.ए.आयपी अजय मुथा, संजीव गांधी, संजय बोरा, संजय चोपडा, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपसभापती मिनाताई चोपडा, मिनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रदीप परदेशी, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उद्योजक शरद मुनोत, संपत गुगळे, विशाल वालकर, राजूभाई बुब, डॉ.शरद कोलते, मोहनलाल मानधना, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा, दिलीप शिंदेे, महिला अध्यक्षा संध्या मुथा, सेक्रेटरी सुरेखा बोरा, उपाध्यक्ष राधिका कासवा आदींसह सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, भुकेलेेल्या माणसास अन्न व तहानलेल्यास पाणी देणे सर्वात मोठे पुण्य असल्याची शिकवण आपल्या भारतीय संस्कृतीने दिली आहे. जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनी दरवर्षी अन्नदान करण्याचा उपक्रम राबविला आहे. आचार्यश्रींची मानवतेची, सेवेची शिकवण मंडळ अतिशय चांगल्या पध्दतीने अंमलात आणत आहे.
दिलीप सातपुते म्हणाले की, जय आनंद महावीर युवक मंडळ सेवाभावी वृत्तीच्या लोकांचे मंडळ आहे. सामाजिक कार्यात मंडळ नेहमीच अग्रेसर असते. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त सर्वांना भोजन देऊन मंडळ अतिशय पुण्याचे काम करीत आहे.
प्रास्ताविकात शैलेश मुनोत यांनी सांगितले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करणाऱ्या जय आनंद महावीर युवक मंडळाने 28 वर्षांपूर्वी आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. यावर्षीही सर्वांना बुंदी, पुरी भाजी, मसालेभात असा रूचकर मेन्यू देण्यात आला. याशिवाय शहरातील वंचित, अनाथ, अपंग मुलांच्या विविध संस्थांनाही भोजन पोहोच करण्यात आले. भोजनावेळी सर्वांसाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली तसेच उन्हाळा लक्षात घेवून कुलरचीही व्यवस्था केली. आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी मंडळाकडून दरवर्षी अन्नदान केले जाते, यातून प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते. जय आनंदचा जयघोष, डाळरोटी खाओ, प्रभू के गुण गाओ अशी प्रार्थना करीत मंडळाच्या महाप्रसाद भोजनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आनंद मुथा यांनी आभार मानले.