प्रस्तावना – स्वप्न फुले ज्योतिबांचे

लेख

प्रस्तावना
राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन होऊन बारा वर्षे झालीत, ही गोष्टच अत्यंत तेजस्वी आहे. “तेजस्वी ” हा शब्द मी अनेक कारणासाठी वापरला आहे. कोणतीही संस्था दीर्घकालपर्यंत कार्यशील असते, यात त्या संस्थेची निकड व गरज, सामाजिकदृष्ट्या तर, महत्त्वाची असतेच, परंतु त्या संस्थेतील कार्याभोवती अनेक वर्षाच्या कार्याचे ‘तेज’ असते. याच दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही एक तेजस्वी संस्था आहे, असे मला वाटते. मी जेव्हा असे म्हणतो, तेव्हा त्या संस्थेतील कार्याचा आढावा, मी घेतलेला असतो.
कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासंबंधी विचार करताना शिक्षणाशी संबंधीत समाज, त्यामधील परिवर्तनाचे सामर्थ्य आणि त्याद्वारे समाजाला मिळणारा एक नवा सचेतन आकार, या गोष्टींशी जखडलेले अंतःप्रवाह आपण नीट तपासून घेतले पाहिजेत. शिक्षणाद्वारे समाजाचे प्रबोधन तर झाले पाहिजेच परंतु समाजाचे परिवर्तनही त्याद्वारे साधले पाहिजे, अशी अपेक्षा सुशिक्षितांची व विचार- वंताची असते. कृषिशिक्षणाच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा, हे शिक्षण ‘राष्ट्रीय गरजेच्या’ संदर्भात अत्यंत महत्त्वाचे ठरते, हे मान्य केलेच पाहिजे. भारतासारख्या कृषी प्रधान देशात ‘कृषि शिक्षण’ हे अनिवार्य ठरते, याला दुसरा पर्यायच असू शकत नाही, ते केवळ हे शिक्षण ‘राष्ट्रीय गरज’ आहे. म्हणूनच !
महाराष्ट्राच्या सुदैवाने आजमितिस चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत ! इतक्या कृषी विद्यापीठांची आवश्यकता आहे किंवा नाही, या वादात मला पडावयाचे नसून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपल्या स्थापनेपासून तो आजपर्यंत, म्हणजे एक तपामध्ये, जे मोलाचे ध्येयदृष्टीपूर्ण व गुणपूर्णतेमध्ये एक विशिष्ट उंची गाठलेले कार्य केले आहे, त्याकडे मला आपले लक्ष, वेधायचे आहे.
असे म्हटले जाते की, विद्यापीठातील संशोधन हे कमी लोकांना माहिती होते. ती उणीव या पुस्तकातील ‘पोत… शोध… बोध…’ या प्रकरणाने मला वाटते, भरून काढली आहे. गेल्या १२ वर्षाचा हा सर्वच कार्यातील एकूण आढावा पाहून मन स्तिमित झाल्याशिवाय रहात नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणसंस्थांची निर्मिती आणि शिक्षणप्रसार याचा वेग कमी होता, परंतु त्या शिक्षणसंस्थांमध्ये ध्येयाची महान आसक्ति होती. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणसंस्था वाढल्या, परंतु त्यात आदर्शाची, ध्येयाची व गुणवत्तेची उणीव थोड्याफार प्रमाणात होऊ लागली. मला सांगायला अभिमान वाटतो की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्विकारलेले ध्येय, आत्मसात केलेला आदर्श व जोपासून वाढवलेली गुणवत्ता ही स्वयंप्रेरीत अस्तित्वाची भरीव अशी कामगिरी आहे.
कोणत्याही शिक्षणाला मर्यादा असली की ते शिक्षण व ती शिक्षणसंस्था, ही निजींव बनू लागते. शिक्षण, संशोधनाच्या दिशा खुल्या ठेवून ज्या संस्थेत त्याचे पायाभूत आदर्श जोपासले जाते ते शिक्षण व ती शिक्षणसंस्था सदैव सजीव राहून सामान्यजनांना शिक्षणाच्या दिशेने अवधान दाखवीत असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही संस्था मला वाटते याच प्रकारात मोडते. बहुजन समाजाला गरजेनुरूप शिक्षण देऊन शहाणे करणाऱ्या ज्या संस्था आहेत. त्यात या कृषि विद्यापीठाचा समावेश आपण केलाच पाहिजे.
या विद्यापीठास एक तप पूर्ण झाले म्हणून या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दत्ताजीराव साळुंखे आणि मराठीचे प्राध्यापक व संशोधन संपादक श्री. जवाहर मुथा यांनी सूत्ररूपाने जो आढावा घेतला आहे तो खरोखरच योग्य व संस्मरणिय आहे. एका तपात विद्यापीठाने काय कामगिरी केली या प्रश्नाला हे एक चोख ब बास्तववादी उत्तर तर आहेच, पण त्याही पेक्षा पुढील वाटचालीचे मनोज्ञ दर्शनही या पुस्तकातून होत आहे. कृषी व आनुषंगिक विज्ञान आणि मानवविज्ञानाच्या शिक्षणाची तरतूद जेवढी केली आहे ती सर्वथा योग्य अशीच आहे, हे या पुस्तकातून स्पष्ट दिसते. कृषी शिक्षण, कृषी संशोधन व कृषी विस्तार शिक्षण या त्रयींना एकत्रित आणून त्यांच्या अभिवृद्धिस दिलेली या एका तपातील चालना मनोज्ञ वाटते. राज्यातील कृषी विकासाच्या प्रगतिसाठी विस्तार शिक्षणाच्या कार्यक्रमाचा अंगीकार करून त्यात एका तपात केलेली उत्कृष्ट कामगिरी या पुस्तकात आपणास दिसून येते.
ग्रामीण महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा या कृषी विद्यापीठांनी स्विकारल्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून, त्या पूर्ण करण्याचे जीवापाड श्रम ही विद्यापीठे घेत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे असे सुसंगत कार्य आहे. शिक्षण देणे म्हणजे संस्कार करणे होय. शिक्षणामुळे संस्कार होतात व चांगली, सु-कृती करण्याची बुद्धी व सामर्थ्य प्राप्त व्हावे, असाही शिक्षणाचा एक उद्देश असतो. मला वाटते की हाही उद्देश प्राप्त करण्यासाठी या विद्यापीठाने जे व्रत अंगिकारले आहे त्यात त्याच्या भावी वाटचालीत खूप यश मिळबील.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ही एका तपाची वाटचाल, भावी कार्यक्रमांना प्रेरणा देत राहो, अशी शुभेच्छा व्यक्त करून ही प्रस्तावना मी संपवितो.

तारीख २१ मे, १९८२
यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान, नवी दिल्ली

Leave a Reply