डॉ. श्रीराम रानडे

लेख

सप्टेंबर महिना उद्या सरेल..या महिन्यातील 2 तारीख ही डॉ. श्रीराम रानडे यांचा स्मृतीदिन! 1967/68 मध्ये त्यांच्या एकषष्ठी निमित्त साधना साप्ताहिकात मी लिहिलेला लेख, मला आज सापडला.. तो येथे मुद्दाम देत आहे.. त्यावरून त्यांची महती,मौलिकता आणि मुमुक्षुतेचा प्रत्यय सहजपणे कळून यावा..

– प्रा. जवाहर मुथा
(प्रथम प्रकाशन साधना साप्ताहिक,हिरवी मने १९६८)


१९६७ ची सार्वत्रिक निवडणूक ! काँग्रेस लोकसभेचे तिकिट कोणाला मिळणार म्हणून साहजिकच जिज्ञासा ! डॉ. श्रीराम रानडे यांना तिकिट मिळणार असल्याची वार्ता सगळीकडे पसरलेली. डॉ. रानडे यांच्या- शिवाय इतर उमेदवारांच्या पार्लमेंटरी बोर्डा- कडे एकसारख्या चकरा सुरू असतात. ज्या दिवशी नाव निश्चित करावयाचे त्याच दिवशी व त्याच वेळेला डॉक्टरांकडे एक रुग्ण आलेला. रुग्णाची तब्येत अतिशय गंभीर. डॉक्टर आपल्या कर्तव्याला प्रथम स्थान देतात. ते रतनला बोलावतात. त्याच्या जवळ एक चिठ्ठी देत म्हणतात, ‘ही चिट्ठी पार्लमेंटरी बोर्डाकडे नेऊन दे.’ चिठ्ठीत लिहिलेले असते’ माझ्याकडे एक सीरियस पेशंट आला आहे. त्याला सोडून मला बैठकीला हजर राहता येत नाही. आपण पाहिजे तो निर्णय वेऊ शकता!’ असे हे डॉ. रानडे ! आमचे तात्या !’ ज्यांनी कर्तव्य प्रथम मानले. तात्या त्या बैठकीला उपस्थित असते तर कदाचित आज ते लोकसभेत सहज दिसलेही असते. पण त्यांनी आपल्या जीवनात राजकारणाला एकमेव प्रमुख स्थान असे कधीच दिले नाही. पण म्हणून त्यांनी त्याला दुय्यम लेखले असेही नाही. अज जवळ जवळ एक तप मी तात्यांच्या जवळपास सतत वावरत आहे. त्यांच्या घरी
आम्ही विद्यार्थी फेडरेशनचे ऑफिस थाटले.त्यांच्या घरी आम्ही नाटकांच्या तालमी घेतल्या. त्यांच्या घरी आम्ही वक्तृत्वाचे धडे घेतले. त्यांच्या घरी आम्ही साहित्यिकांच्या बैठकी घेतल्या. संगीताचे जलसे, कामगारांच्या वैठकी आणि राजकारणाची चर्चा या सर्वांचे निवासस्थान म्हणजे तात्यांचे घर ! आम्हाला कसलीही अडचण आली किंवा आमच्या डोक्यातून एखादी योजना बाहेर पडली की आम्ही तात्यांकडे जातो, त्यांना आमची योजना, आमच्या अडचणी सांगतो ! राहून राहून वाटते, तात्यांचे म्हणणे, त्यांचे मार्ग दर्शन इतके अचूक कसे ? आणि मग वाटते डॉ. श्रीराम रानडे या नावाभोवती एक जादू आहे हेच खरे ! ही जादू अनेकांना भुलविणारी आहे. राजकारणी कार्यकर्त्यांना, कलाकारांना, साहित्यिकांना, कामगारांना, रुग्णांना, सामान्य नागरिकांना …सर्वांना. सर्वांनाच तात्यांचे नाव आप- त्याशी निगडित आहे किंवा असावे असे वाटते. रावसाहेब पटवर्धन नगरमधून बाहेर पडल्यानंतर नगर शुष्क झाले होते. त्यांच्या स्वर्गवासानंतर नगरकरांना तर अतोनात दुःख झाले ! पण ज्या कोर्टगल्लीत राव साहेबांचे घर होते त्याच कोर्ट गल्लीतील डॉ. रानडे यांचे घर रावसाहेबांच्या घरासारखे काही प्रमाणात नाज सर्वांना झाले आहे ! अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तात्यांच्या घरी येतात. कोणाला राज- कारण करायचे असते, कोणाला शिक्षण घ्यायचे असते, कोणाच्या घरी भांडण झालेले असते, कोणाला सर्टिफिकेट हवे असते.. हे सर्वजण तात्यांच्याकडे मोठ्या आशेने येतात, परतताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव असतो. परस्परविरोधी गोष्टींची तर त्यांना सखोल जाणीव ! एकाच माणसात इतक्या भिन्न गोष्टी इतक्या ठळकपणे एकत्र येऊच कशा शकतात ? संगीताचे सूर त्यांच्याघराण्यात सतत निनादलेले. साहित्याचा
रसास्वाद त्यांनी सतत घेतलेला. वातावरणाचा अभ्यास त्यांनी केलेला. निष्णात धन्वंतरी म्हणून तर उभ्या महाराष्ट्राला त्यांचा परिचय ! आणि सहकारी ग्राहक भांडाराच्या चळवळीत त्यांनी केलेले कार्य सबंध भारताला माहीत झालेले. महाराष्ट्र हा नाट्यवेडा आहे. तात्यांनीही किती तरी नाटकांत कामे केलेली. आजही त्यांच्या आठवणी स्वतः तात्या व त्यांची समवयस्क मित्रमंडळी सांगतात. चार पाच वर्षांपूर्वी नगरला भरलेल्या नाट्य संमेलनाचे तात्या स्वागताध्यक्ष होते ! तात्यांचे नाटकांचे वेड पाहण्यापुरते किंवा करण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. त्यांनी स्वतः नाटके लिहिलेली आहेत. वक्ता व लेखक म्हणूनही त्यांची वाणी व लेखणी प्रसिद्ध झालेली. लोकशाहीत तात्यांनी लिहिलेले लेख वाचले म्हणजे आजही त्या लेखांची व त्यातील विचारांची अपयोगिता कोणीही मान्य करील. शैक्षणिक कार्यातही तात्या मागे कुठे आहेत ? एक महाविद्यालय व अनेक माध्यमिक विद्यालये असणाऱ्या हिंद सेवा मंडळाचे तात्या अध्यक्ष आहेत. हिंदी शिक्षणाची आवश्यकता ओळखून नगरच्या नागरी जीवनात हिंदी माध्यमाचे माध्यमिक विद्या लय तात्यांनी ‘राष्ट्रभाषा शिक्षा मंडळ’ स्थापून त्याच्याकरवी सुरू केले ! तात्यांना ग्रंथांविषयी अपार प्रेम. ते ‘अहमदनगर जिल्हा वाचनालया ‘चे विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत. त्याशिवाय ‘ब्रिटिश कौन्सिल ‘चे नियमित सभासद आहेत. इंग्रजी पुस्तकांनी भरलेली ब्रिटिश कौन्सिलची काळी पेटी किती तरी वर्षे तात्यांच्याकडे रेल्वेने येते व जाते. वाचनातला चोखंदळपणा तात्यांना नेहमीच मानवतो. उत्कृष्ट ते वाचलेच पाहिजे, हा त्यांचा खास बाग्रह.
तात्यांच्या या राजकीय, सामाजिक, सांस्कृ तिक कार्यात त्यांना साथ आहे ती सौ. कमलावहिनींची ! आलेल्या पै-पाहुण्यांची सर बराओ करण्यात त्या कधीच मागे राहिल्या नाहीत. गृहिणीचे कर्तव्य त्या इतक्या जाणून आहेत म्हणूनच कदाचित तात्यांना यशाची वाटचाल करणे सोपे गेले असावे. वहिनी स्वतः पदवीधर. हिंदी परीक्षांतून ‘सब प्रान्तों में सर्व प्रथम’ म्हणून त्या काळी – त्यांना मिळालेली पारितोषिकांची पुस्तके पाहून त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढतो ! ज्ञानाचा गर्व है अज्ञानाचे लक्षण आहे हे शील त्यांना माहीत आहे. त्यांची सीजन्य- हसतमुख मूर्ती घरातले घरपण सतत चैतन्यशील बनवत राहते.
आज तात्यांनी एकसष्ठी ओलांडली आहे. अखिल भारतीय कीर्तीचे नेते व प्रजासमाज- वादी पक्षाचे अध्यक्ष श्री नानासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात एकूण एकवीस वक्त्यांनी भाषणे केली ! कॉलेजात शिकणाऱ्या अशोक इनामदारपासून तो महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्यापर्यंत सर्वांनी तात्यांच्या गौरवपर भाषणे केली. अक्षरशः शंभरांवर संस्थांनी तात्यांना पुष्पहार अर्पून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. समारंभ चालू असताना मध्येच अर्धा तास पाऊस झाला. लोक खुर्च्छा सोडून उठले व गॅलरीत जाऊन उभे राहिले पण कार्यक्रमात खंड पडला नाही. पाऊस थांबला तेव्हा पुन्हा पटापट लोकांनी आपल्या खुर्च्छा धरल्या. सुधीर फडके, राम फाटक यांसारखे नामवंत संगीतकार तात्यांच्या एकसष्टीनिमित्त नगरला आले व पहाटे चारपर्यंत गात राहिले. तात्यांच्यावरील अगाध प्रेमाची ही निशाणी ! पुण्याला येण्याअगोदर मी पुन्हा तात्यांच्या घरी गेलो. अजूनही पुष्पहार घेऊन कोणी ना कोणी येतच होते. मी तात्यांना म्हटले, “तात्या, अजून कमीत कमी आठ दिवस तरी या हारांच्यापुढे तुम्हांला हार खावी लागणार !” माझी खात्री आहे, आजही त्यांच्या घरी ताज्या फुलांचा सुगंध दरवळत असणार ! तो सतत दरवळत राहू दे हीच माझी प्रार्थना !
– प्रा. जवाहर मुथा
(प्रथम प्रकाशन साधना साप्ताहिक,हिरवी मने १९६८)

Leave a Reply