लेखक – डॉ. आनंद यादव, पुणे
साप्ताहिक नगर संकेतला आज १ मे महाराष्ट्र दिनीं ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त खास आपल्यासाठी संस्मरण …
आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आत्मनिष्ठेने आणि अखंडपणे गेली १५-१६ वर्षे तेवत राहिलेला “साप्ताहिक नगर संकेत’ हा नंदादीप मानावा लागतो. नंदादीप हा देवाच्या साक्षीने तेवत असतो. त्याचा प्रकाश हा मंदिरातील प्रकाश असतो. तो मिणमिणता असला तरी स्वयंसेवी आणि पवित्र निष्ठेने सातत्य ठेवणारा असतो. आजच्या धंदेवाईक वृत्तीने, स्वार्थी भावनेने, जगणाऱ्या वर्तमानपत्री जगात त्याचा प्रकाश कदाचित दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्यापासून आर्थिक नफा काहीच नाही. पण मनातील, वृत्तीतील स्वार्थाचा क्षुद्र काळोख निपटून काढणारी त्याची शक्ती आहे. मनाला उदात्ततेच्या, समाजहितदक्षतेच्या उच्च तात्त्विक पातळीवर सचेतन प्रकाश टाकणारी त्याची वृत्ती आहे. त्यामुळे चंगळवादी समाजात त्याची उपेक्षा होण्याची, त्याचे महत्त्व न पटण्याचीच शक्यता जास्त आहे…. म्हणूनच समाजातील सुसंस्कृत, जबाबदार व्यक्तींनी त्याला या वावटळीत जपण्याची, सतत तेवत ठेवण्याची गरज असते… “साप्ताहिक नगर संकेत’चे प्रमुख संपादक प्रा. जवाहर मुथा हे नंदादीप तेवत ठेवण्याचे कार्य निष्ठेने गेली १५-१६ वर्षे करीत आहेत. साहित्यक्षेत्रातील त्यांचे हे कार्य मला त्याचसाठी महत्त्वाचे वाटते.
तसा त्यांचा माझा परिचय तीसपस्तीस वर्षांपासूनचा आहे. त्यांच्या कवितांमुळे मी त्यांना ओळखत होतो. त्याचबरोबर पुण्यात “किर्लोस्कर-स्त्री-मनोहर’ ही मासिके प्रसिद्ध होती, त्यांचे कार्यालय पुण्याच्या मुकुंदनगर येथे होते. त्या कार्यालयांतही ते संपादकीय विभागात काम करीत असत. तिथे त्यांच्या भेटी होत असत. “लेखक’ या नात्याने मी तिथे अधूनमधून जात असे. त्यावेळीही त्यांच्याशी एखाद्या वाङ्मयीन विषयावर, प्रश्र्नावर चर्चा होत असे. तेव्हापासून त्यांच्या वाङ्मयीन जाणिवेचा डोळसपणा आणि आत्मीयता माझ्या परिचयाची झाली होती.
प्रा. जवाहर मुथा हे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांचे प्राध्यापक होते. “होते’ अशा अर्थाने की ते अनेक वर्षे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मराठी-हिंदीचे प्राध्यापक होते. सध्या ते निवृत्त प्राध्यापक आहेत. तीसभर वर्षे त्यांनी मराठी-हिंदी विषयाचे अध्यापन केले आहे. तरुण पिढीसाठी अखंडपणे साहित्याचे विवेचन केले आहे. शिवाय ते गेली १६-१७ वर्षे “नगर संकेत’ चालवत आहेत; त्यातही ते अखंडपणे साहित्य-विवेचनपर लेखन करत आहेत. साहित्यक्षेत्रातील अनेक घडामोडींचा स्वतंत्रपणे मागोवा घेऊन, आत्मनिष्ठवृत्तीने त्यांचा अन्वयार्थही लावत असतात असा पडताळा त्यांच्या लेखनातून येतो. त्यांची वाङ्मयीन प्रज्ञा स्वतंत्रवृत्तीने मते मांडताना आणि सतत कार्य करताना दिसते. त्यामुळेच माझ्या सारख्या साहित्यप्रेमी रसिकाला “नगर संकेत’ आवडीने आणि अधीरतेने वाचावा, असे वाटते. किंबहुना मी तर असे म्हणेन की प्रा. जवाहर मुथा यांनी आपली जन्मजात असलेली वाङ्मयीन जाणिवा सजगपणे व्यक्त करण्यासाठीच मराठी-हिंदी विषय एम.ए. पर्यंत घेऊन त्यांच्यात प्रावीण्य संपादन केले आहे.
महाविद्यालयांच्या अध्यापन क्षेत्रात असे प्राध्यापक फारच दुर्मीळ असतात. विशेषत: महाविद्यालयांत भाषेचे अध्यापन करणारे बहुसंख्य प्राध्यापक हे प्रस्तुतची नोकरी मिळविण्यासाठी सोप्यात सोपा विषय म्हणून “हिंदी-मराठी साहित्य’ हा विषय घेतात आणि कशीबशी पदवी मिळवून प्राध्यापकाच्या नोकरीत शिरतात.
मी असे म्हणतो याचे कारण मराठी-हिंदी साहित्याचे बहुसंख्य प्राध्यापक आपला विषय वर्गात शिकविण्यापलीकडे आयुष्यभर काहीही करत नाहीत. तो विषय शिकविण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, तो शिकविणे त्यांच्या हौसेमौजेचा किंवा आवडीचा भाग नसतो; तो नोकरीचा अपरिहार्य भाग असतो; म्हणूनच ते शिकविण्याचा अभिनय किंवा ढोंग करत असतात…. असे प्राध्यापक हे केवळ पोटभरू नौकर असतात. त्यांना स्वत:च्या विषयात गती किंवा आवड नसते. त्यांच्याच भाषेत बोलायचे तर “तो एक पाट्या टाकण्याचा’ प्रकार असतो.
प्रा. जवाहर मुथा त्या पैकी नाहीत ! त्यांच्या आवडीचा विषय म्हणून त्यांनी प्राध्यापकी स्वीकारली; एवढेच नव्हे तर मासिक-प्रकाशनाच्या क्षेत्रात त्यांनी आवडीने सेवा केली. गेल्या पंचवीसतीस वर्षांत मराठीतील अनेक मासिके बंद पडली. केवळ साहित्याला वाहिलेली त्यांत अनेक मासिके होती. त्यांना साहित्यक्षेत्रात प्रतिष्ठा होती. त्यांतून सातत्याने वाङ्मयविषयक चर्चा, चिकित्सा, समीक्षा आणि मतमतांतरे दर्शविणारे लेखन व सदरे प्रसिद्ध होत असत.
अपरिहार्य अशा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरामुळे ही नियतकालिके बंद पडली… त्यामुळे प्रा. मुथांसारख्या सर्जनशील समीक्षकांची कोंडी झाली. तिला वाट करून द्यावी, आपली मते आपणाला स्वतंत्रपणे मांडता यावीत; म्हणून प्रा. मुथा यांनी धाडसीपणाने “नगर संकेत’ नियतकालिक सुरू केले. तेही पुणे-ठाणे-मुंबई सारख्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वाङ्मयीने केंद्रात नव्हे; तर आपण जेथे वाढलो, वावरलो त्या “अहमदनगर’ सारख्या एका बाजूच्या शहरामध्ये त्यांनी हे नियतकालिक सुरू केले. माझ्या दृष्टीने ही अर्थपूर्ण घटना आहे. ध्येयवेड्या व्यक्तीच्या हातूनच अशा घटना घडू शकतात… याचा पडताळा त्यांच्या “नगर संकेत’मधील लेखांतून आणि संपादकीय लेखनातून येतो.
आज मराठी साहित्याच्या क्षेत्रात “कथा, कादंबरी, समीक्षापर लेखन यांची दयनीय अवस्था झालेली आहे. जीवनाला साक्षात उपयुक्त ठरणारे लेखन विपुल प्रमाणात प्रसिद्ध होते. तशा प्रकारचे अनुवादित लेखनही विशेष प्रमाणात मराठीत प्रसिद्ध होत आहे. उद्योजकांची, थोरामोठ्यांची, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे-आत्मचरित्रे किंवा त्यांच्यावरील माहितीपूर्ण पुस्तके, व्यवसायावरील पुस्तके, स्त्रियांची प्रसाधने, संसार वस्तू यांच्यावरील लेखने मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. हौसेमौजेने उमेदवारी करणारे तरुण कवी आपल्या कविता स्वखर्चाने प्रसिद्ध करीत असतात… यात वावगे काहीच नाही. समाजाला अशा प्रकारची माहितीपूर्ण पुस्तके उपयुक्त असतातच.- पण जीवनाचे सौंदर्य आविष्कृत करणारे जे कथा, कादंबरी, ललित गद्य या सारखे “कलावाङ्मय’ किंवा “ललित साहित्य’ आणि त्याची आस्थेने मीमांसा, चर्चा किंवा आस्वाद घेणारी जी साहित्यसमीक्षा असते ती आज मृतप्राय झाली आहे. तिचे गंभीर लेखन करणारी मासिके, नियतकालिके पूर्वी होती; ती आज बंद पडलेली आहेत… जी एकदोन आहेत तीही बकाल किंवा धसमुसळी आणि दिशाहीन वाटतात… या पार्श्वभूमीवर “नगर संकेत’ चांगले समीक्षालेखन किंवा निबंधलेखन करत असते… हे श्रेय प्रा. मुथा यांचे आहे, असे मला वाटते. पडत्या, ढासळत्या काळात ललित वाङ्मयीन चर्चेला आधार देण्याचे कार्य ते “नगर संकेत’ मधील लेखनाने करीत आहेत; हे महत्त्वाचे आहे.
प्रा. मुथा संपादकीय लेखनातून प्रामुख्याने अशा प्रकारचे लेखन करीत असले तरी; तेवढेच करतात; असे मात्र म्हणता येत नाही. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात, त्यावरही ते विवेचनात्मक, मूल्यमापनात्मक लेखन करत असतात. याबरोबरच तशा प्रकारचे लेखन करणाऱ्या इतर लेखकांचेही साहित्य ते प्रसिद्ध करत असतात. त्याचबरोबरच साहित्यक्षेत्रातील व साहित्य संस्थांतील विविध घडामोडींची नोंद, त्यावर मार्मिक चार-दोन ओळी लेखन (“बाबा’ हे सदर) किंवा शेरेही ते मारतात. त्यामुळे “नगर संकेत’ चा प्रत्येक अंक वाङ्मयप्रेमी वाचकाला संपूर्ण वाचावासा वाटतो.
गेल्या वर्षांतीलच काही अंकांवर सहज जरी नजर फिरविली तरी इ.स. २००६ मधील ठळक आणि महत्त्वाच्या साहित्यक्षेत्रीय घडामोडी तुम्हांला कळू शकतात. उदा. “निवडणुका आणि साहित्य संस्था’, “संस्थात्मक निवडणुकांतील भ्रष्टाचार’, “प्रकाशक-लेखक आणि पुस्तके’ यांच्या चमत्कारिक संबंधाचे विवेचन करणार लेख; या सारख्या लेखनावरून सहज नगर फिरविली तरी प्रा. मुथा यांची साहित्य क्षेत्रीय निष्ठा आपल्याला सहज अनुभवता येईल असे मला वाटते.
आजच्या विस्कळीत समाजामध्ये वाङ्मयीन साप्ताहिक यशस्वीपणे चालविणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्यात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. साप्ताहिक किंवा दैनिक चालविणे ही एक औद्योगिक यंत्रणा किंवा व्यवस्था असते. तिच्यात अनेक आनुषंगिक कटकटी असतात. अनेक प्रकारचे उद्योग चालविणाऱ्या व्यापाऱ्यांशी, लोकांशी व्यावहारिक संबंध येत असतात. त्यातूनच अनेक कटकटी निर्माण होतात. लेखनासाठी लागणारा निर्वेध वेळ किंवा एकान्त दुर्मीळ होतो. खपात, कागदाच्या दरात चढउतार होत असतो. ती मग भलतीच कटकट होऊन बसते…. पण प्रा. जवाहर मुथा या सर्व व्यत्ययांना पार करत त्यांनी “नगर संकेत’ टिकवून ठेवले आहे आणि लेखनाचे सातत्य व दर्जाही टिकवून ठेवला आहे… त्यामुळे ते यशस्वी पत्रकार, यशस्वी उद्योजक, यशस्वी साहित्यिक व समीक्षक वाटतात…. गेली १६-१७ वर्षे त्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. त्यासाठी प्रा. जवाहर मुथा यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या “साप्ताहिक नगर संकेत’ची आहे त्याहून अधिक भरभराट आणि उन्नती व्हावी, अशी शुभेच्छा या १६व्या वाढदिवशी व्यक्त करून आशीर्वाद देतो.