साप्ताहिक नगर संकेत
अहमदनगर – पुण्यातील नवलमल फिरोदिया मेमोरियल हॉस्पीटल ट्रस्टने अहमनदगर येथील जैन सोशल फेडरेशनच्या आनंदऋषीजी नेत्रालयास अत्याधुनिक मोबाईल आय व्हिजन व्हॅनची भेट दिली. याप्रसंगी पद्मश्री आचार्या साध्वी चंदनाजी म.सा., नवलमल फिरोदिया ट्रस्टचे अभय फिरोदिया हे सहपरिवार तसेच जैन सोशल फेडरेशनचे मानकचंद कटारिया, एम.एम.बोरा ट्रस्टचे विश्वस्त अशोक भंडारी, प्रकाश छल्लानी, नेत्रालयाचे आनंद छाजेड इ. उपस्थित होते. या आय व्हिजन व्हॅनमध्ये रेटिनाचे स्क्रिनिंग, मोतीबिंदू तपासणी, संगणकाव्दारे चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेहामुळे नेत्रपटलावर होणारे विकारांचे निदान करणे आदी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आहेत. आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर शहरासह छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये नेत्रसेवेचे कार्य करते आहे. आनंदऋषीजी नेत्रालय गेल्या 6 वर्षांपासून तालुकास्तरावर 25 व्हिजन सेंटरच्या माध्यमातून कार्यरत आहे. या सेंटर मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक नेत्रसेवा पुरविण्यात येत आहे.
नेत्रालयाने आतापर्यंत 60 हजार शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रेटिनाच्या 400 शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. 250 मुलांचा तिरळेपणा घालवून मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया मोफत करत त्यांना नवी दृष्टी देण्याचे सामाजिक कार्य प्रभावीपणे पूर्ण केले. नेत्रालयात 15 अनुभवी नेत्रतज्ज्ञ पूर्णवेळ कार्यरत आहेत. आनंदऋषीजी नेत्रालयामधील अधिक सुविधांसाठी किंवा नेत्ररूग्णांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 8686401515 /9850387427 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन नेत्रालयाचे आनंद छाजेड यांनी केले आहे.