आता सामाजिक चळवळीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावर – डॉ. सुधा कांकरिया

Uncategorized बातम्या

अ.नगर – येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ व स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया या नांवाचे पोस्टाचे तिकीट इंडियन पोस्ट माय तिकीट अंतर्गत प्रकाशित झाले. औचित्य होते जागतिक महिला दिनाचे! अहमदनगर येथील वरीष्ठ पोस्ट अधिक्षक श्रीमती हनी गंजी यांच्या हस्ते डॉ. सुधा कांकरिया यांना तिकीट प्रदान करण्यात आले. श्रीमती हनी गंजी यांनी डॉ. सुधाताईंच्या सेवाभावी कार्याचे, चळवळीचे कौतुक करून अभिनंदन केले.
सदर प्रसंगी डॉ. सुधाताई कांकरिया म्हणाल्या की सामाजिक चळवळीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावर उमटले आहे. परमेश्वराचा प्रसाद समजून मी याचा स्विकार करते. 1985 पासून निरंतर स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ ही चळवळ कार्यरत आहे. यात हजारो व्यक्ती योगदान देत आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. तसेच हे पोस्टाचे तिकीट मी विश्वभरातील सर्व चिमुकल्या लेकींना समर्पित करते
डॉ. सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवे बरोबर त्या स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत. 1985 साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरूवात डॉ. सुधा ताईंनी केली. याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये सन्मानपूर्वक डॉ. सुधा कांकरिया आद्य प्रवर्तक बेटी बचाओ चळवळ (The First Proto Originator of Save Girl Child Mission in India) अशी करण्यात आलेली आहे. तीन तपापेक्षा जास्त त्यांची ही तपश्चर्या आहे. दोन राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीने निर्मलग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2008 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीत चळवळीचे कौतुक केले. युरोप येथील युनिर्वसिटी ऑफमाऊंटन्सच्या वतीने डॉ. सुधाताईंना वुमन एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदि 150 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या.
डॉ. सुधाताईंनी स्त्रीजन्माच्या स्वागतासाठी केवळ प्रबोधनच नव्हे तर 11 कलमी कृती कार्यक्रमाची निर्मिती करून समाजमनावर ती बिंबवली आणि देशभर उभारणी केली. तसेच ’आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा’ आणि नकोशीला करूया हवीशी द्वारे अनेक समाज उपयोगी नविन पायंडे पाडले, आजवर 1200 पेक्षा जास्त नकोशी हवीशी झाल्या तर 11 हजार पेक्षा जास्त जोडप्यांनी आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा घेतला. सामुहिक शपथच्या माध्यमातून डॉ. सुधाताईंनी 30 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना या चळवळीत सामावुन घेतले आहे. डॉ. सुधाताई यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीजन्माच्या स्वागताचे हजारो ठराव घेण्यात आले.
डॉ. सुधाताईंनी सर्व विद्यापीठांना सोबत घेत युवापिढीमध्ये सजगता निर्माण केली. एन सी सी व एन एस एस विद्यार्थ्यांना त्यांनी त्यात सहभागी करून घेतले. शासनाच्या पी. सी. पी. एन. डी. टी. स्टेट अ‍ॅडव्हायझरी कमिटी मेंबर म्हणून ही त्यांनी आपली भुमिका चोख बजावली आहे. चळवळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो स्त्रीभ्रुण वाचले जाण्यात सुधाताईंच्या कार्याचा महायज्ञ व तप कारणीभूत ठरले आहे. याची नोंद इतिहास मात्र निश्चीत घेणार आहे.
डॉ. सुधाताईंनी विवाह दृष्टिभेट नेत्रसेवा द्वारे हजारो युवतींच्या जीवनात आनंद पेरला असून नेत्रदान व अंधत्व निवारण द्वारे अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या त्या ब्रँड अबॅसिडर आहेत. पोलिओ निर्मुलन, ग्रामविकास प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान, पडिक जमीन विकास, नृत्य, बालनाटय, गीत, संगीत, साहित्य वगैरे अनेक क्षेत्रातील डॉ. सुधाताईंचे कार्य सर्वश्रुत आहे. कोरोना महामारीला न घाबरता 9000 पेक्षा जास्त कोरोना पिडीत रूग्णांना त्यांनी मोफत हिलिंग सेवा पुरविली ही एक अलौकिक बाब आहे. राजयोगा मेडिटेशन द्वारे डॉ. सुधाताईंनी सुमारे 11000 व्यक्तींना दिलासा दिला आहे. कारागृहातील कैदी बांधवांमध्ये राजयोगा मेडिटेशनद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची ही त्यांची तपश्चर्या आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply