पु. ल., माडगूळकर आणि मी

लेख

लेखक: प्रा. जवाहर मुथा

डेक्कन जिमखानाच्या मागे असलेल्या टेनिस कोर्टवर मी माझी स्कूटर लावून फेरफटका मारीत होतो. वेळ सकाळची होती.. पहाट व सकाळ मधली.. फिरताना जाणवले की ,समोरून पु.ल .व ग.दि.माडगूळकर, दोघे संथगतीने येत आहेत.. ते दोन्ही जवळ येताच मी पुलंना नमस्कार केला.. त्यांनीही प्रतिसाद दिला ..ते थबकले..मी परिचय करून देत म्हणालो,..” येथे किर्लोस्कर मासिकात मी रुजू झालोय्..ओळखले का..” पु ल काही बोलायच्या आत मीच उत्तरलो,” आपण दोन तीन वेळा नगरच्या सरोष कॅन्टीनमध्ये स्नक्स घेतला होता …औरंगाबादला तुम्ही जाताना ..” हो..हो.आठवले..’,पु ल म्हणाले ,’ तुम्ही मुथा ना..,’आणि मग गदिमाकडे वळून परिचय करून देतेसे उद्गारले,’अण्णा,हे नगरचे कवि जवाहर मुथा..” . ते आमचा संवाद ऐकत होतेच..थोडेसे जुजबी बोलून ,’भेटू या ‘,म्हणत ते दोन्ही पुढे गेले.. गदिमांची झालेली ही माझी पहिली प्रत्यक्ष ओळख..व ती ही पु ल नी करून दिलेली..मी हरखून गेलो होतो . . त्यानंतर काही दिवसांनी मला मुंबईला जायचे होते.. मधुकर तोरडमलांची मुलाखत घ्यायला ..मी पुणेरेल्वेस्टेशनवर तिकिटाच्या रांगेत उभा राहिलेलो होतो..काही मिनिटे गेले असतील ..आणि पाहातो तो ..,गदिमा रिक्षातून खाली उतरून छोटी बॅग हाती घेऊन इकडे येत होते ..त्यांचा ‘संथ वाहते कृष्णामाई ‘ हा चित्रपट मी नुकताच पाहिला होता. या वर्षिचा पद्मश्रीचा किताबही त्याना मिळाला होता ..मी त्यांना ओळख दिली. आणि त्यांनीही ओळखले होतेच. मी म्हणालो, “तुम्ही आमदार आहात ,पुढे जाऊन पास दाखवा ना. “ ते हसले ,, म्हणाले, “कशाला.. हा काय आलाय नंबर .”..मी खिडकीतून तिकीट घेऊन बाजूला झालो. गदिमांनी पास दाखवत चिठ्ठी घेतली .थोडेसे जुजबी बोलून मी फलाटावर आलो व बोगीत शिरलो .गदिमा ही प्रथमश्रेणीच्या बोगीसाठी पुढे गेले…ही आमची दुसरी भेट.. नंतर पुण्यात तीन चार वेळाआम्ही भेटलो ..पण बोलणे जुजबी असे . गदिमांचे ‘गीतरामायण’ पेक्षा त्यांची मराठी चित्रपट गीते त्याकाळी अत्यंत गाजत होती.कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी गदिमा हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले होते.गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन मी वाचला होता. त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या होत्या.युद्धाच्या सावल्या ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; ते मी किर्लोस्कर ग्रंथालयात नंतर वाचले होते. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी जोगिया , चार संगीतिका , काव्यकथा , गीत रामायण , गीत गोपाल , ही होती. त्यांविषयी मी त्यांच्याशी कधीमधी बोलत असे. मनोहर, किर्लोस्कर मधील माझे लेखही बहुदा ते वाचीत असावेत .कारण एकदा ते म्हणाले होते, स्त्री मासिकातील तुमचे ‘सुचित्रा ‘सदर मला आवडते . मी दिलेली मनोहर मासिकातील प्रा.मधुकर तोरडमलांची मुलाखतही त्यांनी वाचली होती. त्यानंतरच्या काळात मी धुळ्यात कृषी महाविद्यालयात रुजू झालो . काही वर्षे सरली, आणि 72/73 मध्ये गदिमांची यवतमाळचा साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे मला कळले .त्यांना पत्र लिहून पंचवटीच्या पुणे येथील पत्त्यावर पाठवले . गदिमांची कीर्ती त्याांच्या गीत लेखनाने महाराष्ट्रातच चौफेर झाली होती.वास्तविक पाहता त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही छान लेखन केले होते. दो आँखे बारह हाथ ,गूंज उठी शहनाई, ही त्याची ठळक उदाहरणे. परंतु लोकमानसावर त्यांची मोहिनी पडली ती गीत रामायण व मराठमोळ्या भावनाशील गीत लेखनामुळे . येथे दिलेले छायाचित्र हे पुणे साहित्य संमेलनात ते माजी संमेलनाध्यक्ष म्हणून , प्रकृती ठीक नसतानाही ते उपस्थित झाले होते ,त्यावेळचे आहे.मी त्यावेळी त्यांचे बरोबर होतो .जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा झाल्या होत्या. केसरी चे सहसंपादक रामभाऊ जोशी ,अंबादास माडगूळकरही छायाचित्रात दिसत आहेत. माझ्या जीवनातील काही क्षण का होईना, परंतु गदिमा बरोबर मला घालवता आले ..हे मला चैतन्यदायी वाटते. काही आठवणी निसटुन गेल्या .पण ज्या आहेत त्या मी अजूनही माझ्या आठवणींच्या पोतडीत बांधून ठेवल्या आहेत,हे सांगणे न लगे.

Leave a Reply