नगर संकेतचे प्रकाशन तेहतीस वर्षापूर्वी ३ मे १९९२ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री ना. शरद पवारांच्या हस्ते अहमदनगर येथे झाले होते. केवळ वाड्मयीन कार्य चळवळीला वाहिलेले हे एकच साप्ताहिक उभ्या महाराष्ट्रात चालते तरी कसे, याचे अनेकांना आश्चर्य आजही वाटत आहे. आम्ही स्वतः ही चकीतच आहोत. पण आमची दोन बोटे तोंडात व दोन बोटे लेखणीत सतत गढलेली आहेत! पुन्हा एक तपापूर्वी आमच्या साहित्य व पत्रकारितावर पीएच. डी.चा प्रबंध, भारताचे ‘ऑक्सफर्ड’ समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात संपन्न झालेला ! कोणत्याही हयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या वाट्याला न येणारा हा सन्मान आमच्या पदरी पडलेला. संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यात व देण्यात संपूर्ण राजकारण असते. त्याची वेगवेगळी गणिते असतात. परंतु वाङ्मयीन संशोधनात मात्र राजकारण नसते, तेथे वाड्मयीन श्रेष्ठताच निरपवादपणे श्रेष्ठ असते! मराठी साहित्यसंमेलन ही आता औटघटकांची केवळ मजा असते. ती दिंडी काय, ती बैलगाडी/ट्रक काय, ते संमेलनाध्यक्ष काय, साराच मामला राजकीय स्तर व अस्तरांचा ! तेथे आमची वर्णी लागणार कशी ? राजकीय नेत्यांना जवळ वाटणारे हे लोक सदोदित राजकीय व्यवहारांची गणितं सोडवीत बसतात.. ते आम्हाला कधीच जमले नाही.. म्हणूनच आम्ही संमेलनाध्यक्षाच्या निवडप्रक्रियेपासून जाणीवपूर्वक अनुभवसमृद्ध होऊन दूर राहिलो. जे करावयाचे होते ते आम्ही योजनापूर्वक केले. सुभाष भेंडेची निवड किती भ्रष्टाचाराने युक्त होती, ते खालच्या कोर्टात आम्ही निर्विवादपणे सिद्ध करून दाखवले व त्यांची ‘निवड’ अवैध ठरवली गेली! ” दूषित अध्यक्षपदा” चा मान त्यांना मिळाला..आमच्या दृष्टीने ते भरपूर होते. आणि आम्ही त्या रडकथेतून स्वतःला सोडवून घेते झालो. २००३ च्या त्या अध्यक्षीय निवडणुकीत तसे आम्हीच विजेते होतो व आहोतही! परंतु राजकारणाचे जूं ज्यांच्या खांद्यावर जोखडलेले आहे, त्यांना त्याचे काय ? प्रत्येक संमेलनाध्यक्ष हा स्वतःला दीड दिवसाचा ‘राजा’ म्हणवून घेतच असतो साहित्य, शास्त्र आणि संशोधनाचा वारा ही अंगी न लावता प्रसिद्धीची झिरमिरीत वस्त्रप्रावरणे लेवून ही मंडळी साहित्य-शारदेची काय पूजा करणार ? त्यांचे फलित ही म्हणून त्यांना विद्यापीठीय स्तरावर कोणीच बळ देत नसते ! त्यांचे बिनचलाऊ, पांचट लेखनही तसेच थिजून जाते. .ना त्यात उर्मी ना आत्मविश्वास.. नुसतीच मखलाशी .. त्यामुळे मराठीचे प्रारब्ध का विकसीत होणार ? साहित्य शारदेचे खरे पुजारी म्हणूनच कधी समेलनाध्यक्ष होऊ शकत नाही ! १९८० पर्यंतचे अध्यक्ष व त्यानंतर.. यांमध्ये म्हणूनच विचारांची व आचारांची खूप मोठी दरी आहे.. त्या दरीत नुसते उगवलेले ‘कांग्रेसी गवत’ आहे ..एखादेच रानफूल तेथे भूल पालवते ! तुम्ही म्हणाल ‘नगर संकेत’ च्या वाढदिवशी हे काय लावले चर्हाट ? पण ऊबग तरी का दाबून ठेवावी ? त्यापेक्षा मन मोकळे केलेले बरे ..वसंत आबाजी डहाकेंनी लिहिलेला साहित्य कोष पाहिला किंवा वाचला तर त्यातील गटबाजी आणि काही बाबी पाहून शिसारीच येते ! ज्या साहित्यकोषात सातत्याने प्रकाशित होत असलेल्या नगर संकेत’विषयी एक ही शब्द नसावा, तो ‘साहित्यकोष’ आहे की ‘कंपूकोष’ आहे? कोणी ही त्याबद्दल त्यांनाच दोषी घरेल, यात शंका नाही ..डहाकेंची ही अनऐतिहासिक’ दृष्टीच मराठी साहित्येतिहासाला विपरीत दिशा दाखविणारी आज तरी ठरली आहे.. सत्य ,मौलिकता, वस्तुस्थिति, हे सर्व समीक्षकच दवडून ठेवतात ; हा समज वसंत आबाजी डहाकेंनी सार्थ ठरवला..या परते मराठी वाड्मयीन कार्य ते काय ? असो.. नगर संकेत आपल्या परीने साहित्यसेवा करीत राहील अशी ग्वाही आज येथे मी देत आहे ..आपला वाचक वर्गांचा कृपालोभ असा असू द्यावा,ही विनंती..विचार खूप आहेत.. पण येथे ते आता देत नाही.. नगरसंकेत विषयी ख्यातकीर्त साहित्यिक आनंद यादव यांनी लिहिलेला लेख येथे मुद्दाम देत आहोत.. त्यातून भावना आपणास कळतीलच.