नगरच्या मातीत आपल्या कर्मात रंगलेल्या, स्थितप्रज्ञासम जीवन असलेले, जीवनावर व माणसांवर प्रेम करीत स्वतः समृद्ध होत, इतरांना समृद्ध करणारे प्रा. जवाहर मुथा म्हणजे नगरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण होय. त्यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच्.डी. झाली आहे. हयातीत पीएच.डी. झालेले नगर जिल्ह्यातील ते एकमेव साहित्यिक आहे. ज्ञानाचे तप आचरून जी माणसं स्वतः समाधानाने जगून दुसऱ्यालाही ते देण्यासाठी राबतात, त्यांच्या पाठीमागे ईश्वर उभा असतो या याचा अनुभव त्यांच्याशी संवाद साधताना नेहमीच होतो.
जवाहर मुथांचे जन्म १२ मार्च १९४० रोजी पाथर्डी या गावी त्यांच्या आजोळी झाला. आजोळचा अधिक लळा असल्यामुळे तेथे शैशव व्यतित झाले. धार्मिक, समाजाभिमुख व मोकळेपणाचे संस्कार शैशवातच त्यांच्यावर झाले.. शाळेत भोंग गुरुजींचे संस्कार, वडील व आनंदऋषीजी यांनी घातलेली समजूत यामुळे ते अभ्यासू बनले. माध्यमिक शाळेतील अभ्यासाबरोबर नाटक, ग्रंथवाचन संस्कृत पाठांतर यांचा बंद सतत विकासित होत होता. या वाचनाच्या सवयीतून इ. ११ मध्ये असताना त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. आणि सावकारी पाश या नावाची एक नाट्यछटा त्यांनी लिहिली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना साहित्य, संगीत, कला, राजकारण, विद्यार्थी चळवळ, नाट्य, वार्तालेखन अशा विविध गोष्टींमध्ये रस घेणारे धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले, या बरोबरच त्यांचा ज्योतिषशास्त्रावर सुद्धा हातखंडा आहे.जवाहर मुथा हे सामाजिक आणि राष्ट्रीय बांधीलकी मानून सतत कार्यरत राहणारे आहेत. जाणकार समीक्षक आणिविचारवंत साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती आहे. आनंदऋषीजी, अण्णा हजारे, बाबा आमटे यांच्याबरोबर उत्साहाने सामाजिक प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले आहे व करत आहे. स्वतंत्र बाण्याचे, निर्भिड पुरोगामी विचारंत पत्रकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विविध वर्तमानपत्रातून लेखन यातून त्यांचे कौशल्य प्रकट झालेले दिसते.
कवी, कादंबरीकार, कथालेखन, निबंधकार, साहित्य चळवळीचे कार्यकर्ते, संपादक, कवी, संयोजक, वक्ते या दृष्टीने ते नगरकरांना सुपरचित आहेत. १९६६ सालीच त्यांना उत्कृष्ट कवितेचे रवींद्रनाथ टागोर रौप्यपदक मिळाले. त्याच वर्षी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची प्रस्तावना लाभलेला ‘सूर्यतनू’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह – मोरपिशी, रेशीमबंधांचा, सूर्यतेजस्वी प्रेमभावना व्यक्त करणारा संग्रह प्रसिद्ध झाला आणि मुथा कवी म्हणून प्रकाशात आले. त्यांच्या आगळ्या अभिव्यक्तीविषयी शांता शेळके लिहितात, “मुथा जेव्हा का वेगळ्या लकबीने अनुभव घेतात किंवा पारंपरिक कल्पनांचा आश्रय न घेता आपल्या भावनेला प्रामाणिक अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यांची कविता परिणामकारक होते. तिच्या साधेपणात एक पीळ निर्माण होतो आणि सच्चेपणाचा सूर तिला लाभतो”. ‘सूर्यतनू’ च्या नंतर आठ वर्षांनी त्यांनी ‘स्वप्नांचे दुःख’ रसिकांसमोर मांडले, सरिता पदकींनी त्यांच्या या कवितांचा परिचय करून दिला.
त्यांच्या प्रेमगीतांची मराठी गीतांची ऑडीओ कॅसेट पॅरिस येथे प्रसिद्ध झाली. जवाहर मुथांनी मनापासून नगर जिल्ह्यातील कवींना ‘साद’ घातली. प्रतिसाद उत्तम मिळाला आणि त्यांनी प्रातिनिधिक कवितासंग्रह सादर करून अवघ्या रसिकांना ‘साद’ सादर केला. ‘सरिता’ नावाचे मराठी पद्यपुस्तक संपादित करून महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी पाठ्यपुस्तक तयार केले. ‘ज्वाला आणि फुले’ या बाबा आमटे यांच्या काव्यसंग्रहाचा अनुवाद त्यांनी केला. त्यांना कवितांचा छंद होता तसेच ते गद्यशैलीतही रमले ‘किती हसाल’, ‘विचार वैभव’, ‘रूपिका- बोधकथा संग्रह’, ‘गंगेच्या काठी’ या त्यांच्या कादंबऱ्या या शिवाय ‘स्वप्न फुले ज्योतिबांचे’ हा कृषी विद्यापीठाचा इतिहास, ‘व्यासपीठावर’ या प्रा. सोनग्रांच्या पुस्तकाचे संपादन, पंख माझे बांधलेले’ ही एकांकिका, स्व. चंदनमल भळगट आणि स्व. नेनसुखजी बोथरा स्मृतिग्रंथ, फ्रान्सच्या फिरतीवर हे प्रवासवर्णन, ‘क्रांती बीज’ या आचार्य रजनिशांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद एवढी त्यांची गद्यशैलीतील ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे.
एखाद्या अमराठी भाषिकाने मराठी भाषेत रस घेऊन आपल्या प्रतिभेचा विलास अतीव प्रेमाने मराठीत करावा असा विरळाच योग दिसतो.म्हणूनच त्यांच्या हयातीत पुणे विद्यापीठात त्यांच्या साहित्य व पत्रकारितेवर पीएचडी होण्याचा दुर्मिळ योग चालून आला.केवळ असे स्वतंत्र लेखन करून मुथा थांबले नाहीत, नामवंत मासिके, पाक्षिके यांच्या संपादनात सहभाग दिला आहे. स्त्री, मनोहर, किलोस्कर या मासिकांचे (१९६७-७०) ते सहसंपादक होते. मिलिंद पाक्षिकाचे संपादक राहिले. साप्ता. लोकशाही, साप्ता. लोकशक्ती चे सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले.मुथांची वार्ताहर म्हणूनही कामगिरी मोठी आहे. केसरीचे वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. १९७१ पासून मुक्त पत्रकार आहेत. १९९२ पासून भारतीय भाषाई समाचारपत्र संघटनेच्या कार्यकारी मंडळावर ते नियुक्त झाले. १९९७ पासून महाराष्ट्र हिंदी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून मुंबई येथे त्यांची अविरोध निवड झाली. इंडियन फेडरेशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्यूजपेपर्स (दिल्ली) च्या महाराष्ट्र शाखेचा जनरल सचिव म्हणून त्यांनी ८८ ते ९२ साली काम केले. साप्त, नगर संकेतचे ते प्रमुख संपादकही आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे १९९२ ते ९५ अखेर अध्यक्षपद मुथांनी भूषविले. नगरला साहित्य संमेलन व्हावे यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. याशिवाय अन्य साहित्यिक उपक्रम त्यांनी मोठ्या हिरिरीने राबवले. खानदेश कवी मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा वाचनालयाचे कार्यकारी सदस्य, अध्यक्ष अखिल भारतीय नवीन साहित्य महामंडळ अशा कितीतरी भूमिका त्यांनी बजावल्या. नगरला दलित साहित्य संमेलन भरविण्यात त्यांचा पुढाकार होता. पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचे नगर जिल्हा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. १९९७ मध्ये त्यांना दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार प्राप्त झाला. नाट्यपरीक्षण मंडळावर त्यांनी काम केले. तसेच साहित्य संस्कृती मंडळातही त्यांचा सहभाग होता.
मुथा हे सामाजिक आणि राष्ट्रीय बांधीलकी मानून सतत कार्यरत राहणारे आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समित विश्वस्त, कृषी विद्यापीठाचे अध्यापक संघाचे संस्थापक सहसचिव, विद्यापीठ सेवक संघ या संस्थेचे ते कार्यवाह होते. १९६०-६२ मध्ये सेवादलाचे मुख्य संघटक होते. १९६५ मध्ये त्यांनी शिशू संगोपन संस्थेचे सचिव म्हणून काम केले.लौकिकदृष्ट्या त्यांनी एम.ए. मराठी. एम.ए. हिंदी पुणे विद्यापीठ, संपादन कला विशारद (प्रयाग) अशा उच्च पदव्या प्राप्त केल्या असून कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते हिंदी-मराठीचे प्राध्यापक व नंतर तेथेच संशोधन संपादक होते. एप्रिल 1999 ला ते सेवानिवृत्त झाले.
या सर्व गोष्टींच्या पलीकडे मुथांचा अभिनव छंद आणि श्रद्धेचा व अभ्यासाचा विषय म्हणजे ‘भविष्य’..त्यांच्या ‘भविष्यवेध’ या ग्रंथाला तत्त्वज्ञान विभागांतर्गत उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार 1998/99 चा प्राप्त झाला. राजकीय भविष्याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे अनेक भविष्यसंकेत अक्षरशः शंभर टक्के खरे ठरले आहेत. उदा. स्व. इंदिरा गांधी, मा. पंतप्रधान अटलजी आणि माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन्. त्यांच्या भविष्यविषयक अभ्यासाचा अनुभव स्वतः राष्ट्रपतींनी घेतला होता. भविष्यविषयक अक्षरश: शेकडो लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. भविष्यवेध या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या अवघ्या काही दिवसांत निघाल्या एवढा हा ग्रंथ या शास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना ‘ज्योतिर्विभूषण’ ही सन्मान पदवी देऊन सन्मानित केले. ‘ज्योतिषभास्कर’ या फल ज्योतिष अभ्यास मंडळाचाही त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. त्याबरोबरच त्यांची प्रेमगीत ही ऑडीओ कॅसेट प्रकाशित झाली आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषावर आज पर्यंत त्यांची ३० / ३५ पुस्तके व कादंबरी प्रकाशित झाली आहे.
त्यांचा कार्याचा गौरव ऑगस्ट १९९८ मध्ये राष्ट्रपती डॉ. नारायणन् यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात कार्य गौरव करण्यात आला. १ मे १९९९ रोजी ‘महाराष्ट्राचा सुपुत्र’ : राज्यपाल मा. ना. डॉ. अलेक्झांडर यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील सत्कार, आणि ‘भविष्य वेध” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा ९७-९८ चा तत्त्वज्ञान व शिक्षणशास्त्र विभागातील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती चा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा पहिला साहित्य पत्रकारितेचा दपर्ण पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार हिंदी रत्न’ हा नागरी हिंदी परिषद, मेरठ चा पुरस्कार, पद्मश्री डॉ. दुबे पुरस्कार (पानीपत, उत्तर प्रदेश), ‘हिंदी भूषण’ हा राष्ट्रीय लिपी परिषद नवी दिल्लीचा पुरस्कार, तुका म्हणे साहित्य पुरस्कार, रविंद्रनाथ टागोर रौप्यपदक विजेता, साहित्य ज्योति पुरस्कार पुणे, रणजित बुधकर पत्रकारिता पुरस्कार, “ज्योतिर्विभूषणम्’ आणि ‘ज्योतिषभास्कर’ ही सन्मानपदवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार, मराठी पत्रकारिक्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल, बृहन्महाराष्ट्र मंडळाचा (नवी दिल्ली) पुरस्कार, मातंग समाज सद्भावना मित्र मंडळातर्फे ‘जीवन गौरव पुरस्कार’, अखिल भारतीय सर्वभाषिक साहित्य संमेलन तर्फे ‘गंगा गौरव पुरस्कार’, सांगली येथे झालेल्या अ.भा. ज्योतिष संमेलनात ‘जीवन गौरव पुरस्कार’, अशी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे.
कवी, विचारवंत, ज्योतिषी, साहित्यिक म्हणून ते खरंच ग्रेट आहेत. त्यांना संवेदनशील मन, सजग डोळे, अंतुखतेचे वरदान आणि परतत्व स्पर्शाचा आशीर्वाद दिलेला आहे. शब्द सर्वाधिक सामर्थ्यशील असता हे त्यांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिलेले आहेत. काव्याचे रंगझूल्यातून मनामनाला स्पर्शन जाण्याचे त्यांचे कसब भावतेच तसेच परदेश प्रवासातील अनुभवातून साकारलेली लेखमाला सुद्धा वाचक आवडीने वाचतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीनं मराठी मनाशी नातं त्यांनी जोडलं आहे. प्रसिद्धी पराङ्मुख राहून आपले कार्य निष्ठेने, श्रद्धेने, भक्तीने करीत राहिल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. तसेच त्यांचा सामाजिक योगदानही तेवढाच मोलाचा आहे. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे कार्यकारी सदस्य व अहमदनगर शाखेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरासुद्धा १९९२ ते ९५ या काळात जबाबदारीने त्यांनी सांभाळली.
नगर शहरातले एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थाचे कार्यकर्ते म्हणून नगरच्या नागरिकांना, पत्रकारांना, प्राध्यापकांना अभिमान वाटावा असे बहुआयामी व्यक्तीमत्व होय..जीवनाच्या सर्व क्षेत्रातील जोडलेली माणसं मैत्रीच्या धाग्याने त्यांनी बांधली आहेत. अश्या विद्वान, साहित्यिक, शिक्षाशात्री, पत्रकार आणि ज्योतिष सम्राटाला त्यांच्या 83व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!जिवेत शरद:शतम्..
– लेखक: प्रा. डॉ. राजू रिक्कल