‘सरिता’

लेख

सरिता’ या मी व प्रा यशवंत भीमाले यांनी संपादीत केलेल्या पाठ्यपुस्तक (१९७२) याची मी दिलेली प्रस्तावना येथे आज २८जूलै रोजी ५३वी वर्षगाठ असल्यामुळे देत आहे..

दिवसेंदिवस मराठी कवितेचे स्वरूप बदलत आहे. हे स्वरूप अंतर्बाध बदलत आहे. आशयघनता आणि रचनासौंदर्य या दोन्ही बाबतीत आधुनिक मराठी कविता चिंतनशील झालेली वाटते. विषयांच्या चौकटी, अनुभूतींच्या प्रमाणात वाढतच आहेत. आविष्कारांमधील चैतन्य किंवा अपरिहार्यता यांमधील साचेबंदपणा ढासळू लागला आहे; परंपरेचे हवामान मराठी कवितेला अस्वस्थ करून सोडीत आहे; व त्यातूनच अनेक प्रकारचे उद्रेक व आवेग शब्दांतील गहन अर्थाबरोबर बाहेर पडत आहेत. आणि म्हणूनच टीकाकारांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. मराठी कवितेचे स्वरूप कोणते, आधुनिक मराठी कविता एखाद्या खंदकात जाऊन कोसळणार तर नाही ना, तिचे अस्तित्वच आपण मानावयाचे ,की भाववादी कवितेलाच डोक्यावर घ्यायचे, इ. नानाविध प्रश्न आज टीकाकारांसमोर आहेत. परंतु आजची ही मराठी कविता संक्रमणावस्थेत असताना अशा प्रकारचे अनेक प्रश्न उद्भवले नाहीत तरच नवल मानावयाचे !मग अशा या स्थितीत प्रस्तुत ‘सरिता ‘ चे महत्त्व काय ? असाही प्रश्न सहज समोर यावा ! – नव्हे ते स्वाभाविकच आहे. ‘सरिता’ हा मराठी कवितेचा प्रामाणिक आलेख आहे. ज्ञानेश्वरांपूर्वीपासूनची मराठी कविता तो नारायण सुर्वे पर्यंतच्या मराठी कवितेचा हा धावता, महत्त्वाचे टप्पे घेऊन पूर्णत्वाकडे जाणारा, ओघवत्या प्रवाहाचा हेतुपूर्वक प्रवास आहे. समग्र मराठी कवितेचा इतिहास व भविष्यकाळ लक्षात घेऊन साधलेल्या दूरदृष्टीचा वर्तमानकालीन ‘ताम्रपट’ आहे. संपूर्ण मराठी कवितेच्या समन्वयाचा अत्याधुनिक आविष्कार आहे ! आणि म्हणूनच ‘ सरिते’चे महत्त्व बहुमोल असेच ठरावे !
मराठी ग्रंथरचनेची सुरुवात सातव्या आठव्या शतकात झाली. तोपर्यंत मराठी भाषा ही निव्वळ बोलण्यात होती. मराठीतील ग्रंथरचनेचा आयुर्मान चक्रधरांचे ‘ लीलाचरित्रा’पासून महानुभावीय पंथातील कवींच्याकडे जातो. ज्ञानेश्वरापर्यंतच्या काळापर्यंतच महानुभावीय वाङ्मयाचा अंतर्भाव मराठी भाषेत
होतो. त्यानंतर साधारणतः तीन कालखंडांत १८१८ पर्यंतचे मराठी साहित्य विभागले जाते. पहिला कालखंड हा संत कवींचा ! ज्ञानेश्वरापासून तुकाराम रामदासापर्यतचे वाग़्मय यात समाविष्ट होते. दुसरा कालखंड हा पंत कवींचा ! वामन मोरोपंतांच्या पंडिती काव्याचा आविष्कार या काळात झालेला दिसतो! तर तिसरा कालखंड हा तंत-कवींचा ! – म्हणजेच शाहिरी वाङ्मयाचा होय ! अमिनदास या शाहिराने अफझलखानाचा वध’ नावाचा पहिला कडाका ( म्हणजेच पोवाडा ) रचलेला आढळतो. इ. स. १६५९ च्या सुमारास या पोवाड्याची निर्मिती झाली असली तरी नामांकित असे शाहिरी वाङ्मय इ. स. १७६० ते १८४० च्या दरम्यान निर्माण झाले. राम जोशी, अनंत फंदी, गंगू हैबती, होनाजी बाळा, प्रभाकर, सगनभाऊ, परशुराम असे एकापेक्षा एक दर्जेदार शाहीर या काळात झाले व त्यांनी मराठीतील पोवाडे – लावण्यांचा भाग समृद्ध करून ठेवला. संत साहित्याने महाराष्ट्राला अध्यात्माची व निवृत्तीची शिकवण दिली, तंतांनी कथा- पुराणिकांच्या द्वारे मराठी साहित्याला नवा तजेला दिला, तर पंतांनी मराठी साहित्याच्या नव्या रूपाला शोभेल असा पोवाड्या – लावण्यांचा मराठमोळा साज चढविला.
इ. स. १८१८ च्या राज्यक्रांतीनंतर मराठी साहित्यातही आमूलाग्र असे बदल घडून येऊ लागले. विठोबा अण्णा दप्तरदार, कृष्णशास्त्री चिपळूणकर, परशुराम तात्या गोडबोले, कृष्णशास्त्री राजवाडे वगैरेंनी संस्कृत काव्यांची निव्वळ मराठी भाषांतरे केली. या दोघांच्या समकालीन अशी स्वतंत्र मराठी कविताही त्या वेळी अवतरत होती. पण या स्वतंत्र कवितेला विषयाच्या चौकटी होत्या. ‘राजा शिवाजी’ हे महादेव मोरेश्वर कुंटे यांचे काव्य मराठीतले पहिले स्वतंत्र काव्य मानले जाते. जे काव्याच्या बाबतीत तेच थोडेफार गद्याच्याही बाबतीत घडले असे मानावे लागेल.
१८७५ मध्ये मराठी कवितेला विलक्षण प्रत्ययकारी वळण लावले ते केशवसुतांनी ! त्यांनी एकूण १३२ कविता लिहिल्या. त्यांतील सुरुवातीच्या काही कविता या इंग्रजी कवितांची भाषांतरे होती. पण नंतरच्या कवितांमधून आशय आणि अभिव्यक्तीच्या पद्धतीत त्यांनी केलेली अभूतपूर्व स्वरूपाची क्रांती ही वादातीत आहे. केशवसुतांनी प्रथमच मराठीत सुनीत – रचना केली, गूढगुंजनाचा प्रवाह आणून सोडला, आणि सामाजिक प्रश्नांना मराठी कवितेत अधिष्ठान मिळवून दिले ! केशवसुतांनंतर ना. वा. टिळक, विनायक, बालकवी, बी, दत्त,
माधवानुज वगैरे अनेक कवींपर्यंत हा संप्रदाय टिकून होता. मानवतावादी, समतावादी, व्यक्तिवादी अशी ही मराठी कविता १९२० पर्यंत टिकून होती. निसर्गपर, प्रीतिपर आणि कल्पनामय कवितेची ही मुशाफिरी १९२३ मध्ये रविकिरण मंडळाच्या निर्मितीस कारणीभूत ठरली! त्यानंतरच्या कविंवर या मंडळातील कवींचा प्रभाव सलगपणे होता. माधव ज्यूलिअन, गिरीश, यशवंत, श्री. बा. रानडे, सौ. मनोरमाबाई रानडे, ग. त्र्यं. माडखोलकर, द. ल. गोखले व दिवाकर हे या मंडळाच्या स्थापनेच्या वेळचे सदस्य होते. या कवींनी आपापल्या स्वभाव – गुणधर्मानुसार व प्रतिभालंकृत शक्तीनुसार मराठी कवितेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. प्रेम या भावनेचे साध्या, सुबोध व नैसर्गिक रीतीने आविष्कार करून माधव ज्यूलियनांनी त्या भावनेस मराठी कवितेत प्रतिष्ठा मिळवून दिली. गिरीशांनी आपल्या खंडकाव्यातून सफाईदार रचना व संयत भावनेचा नवा आविष्कार घडविला, तर कमालीच्या आत्मपर प्रतिभेतून यशवंतांनी सरस उत्कटतावादी कवितेची निर्मिती केली ! याच काळातील थोडे सुरुवातीचे कवी भा. रा. तांबे ! त्यांच्या व्यक्तिगत जीवनातली मुख्य व प्रभावी भावना सफल प्रीतीची ! त्या भावनेतून निर्माण झालेल्या कवितांनी मधुरतेचा जणू उच्चांकच प्रस्थापित करून ठेवला. त्यांच्या एकूण २२५ कविता, रा. श्री. जोगांनी संपादित केलेल्या ‘ समग्र कवितां ‘त आहेत; त्या व अगदी अलीकडे १९७२ मध्ये प्रा. जवाहर मुथांनी त्यांच्या शोधून काढलेल्या तीन महत्त्वपूर्ण कवितांकडे पाहता त्यांतील रसरशीतपणा किती जिवंत आहे, याचा सहज प्रत्यय येतो. त्याशिवाय दुसरीकडे राष्ट्रीय व ऐतिहासिक कवितेची निर्मिती कवी गोविंद, दु. आ. तिवारी, अज्ञातवासी, कवी माधव, साने गुरुजी, इ. कवींकडून होत होती. वीर सावरकर आणि कवी गोविंद यांच्या राष्ट्रीय कवितेतून दिसून येणारे देदिप्यमान तेज इतर कवितांहून वेगळे व आगळे म्हणूनच उठून दिसणारे आहे. या राष्ट्रीय कवितांप्रमाणेच १९२५ ते १९४० या काळात जानपदगीते, विनोदी व विडंबनात्मक कविता, शिशुगीते असे विविध काव्यप्रकार उदयास आले. जानपदगीतांत चंद्रशेखर, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील, वि. भि. कोलते, ना. घ. देशपांडे, के. नारखेडे, वगैरे कवींनी भरीव कामगिरी केली. विडंबनात्मक कवितेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आचार्य प्र. के. अत्रेंच्या ‘झेंडूची फुले’ या काव्यसंग्रहालाच दिले पाहिजे. तीन१९३० च्या सुमारास मराठी कविता वास्तववादाकडे झुकू लागल्याचे दिसून येते. पु. शि. रेगे यांचा कवितासंग्रह ‘साधना व इतर कविता’ १९३१ मध्ये प्रकाशित झाला. १९३२ मध्ये कभी अनिलांचा ‘फुलवा’, १९३३ मध्ये कुसुमाग्रजांचा ‘जीवनलहरी’, हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले व त्यानंतर मराठी कविता अपारदर्शक बदलू लागली. बा. सी. मर्ढेकरांच्या ‘ शिशिरागमा ‘ नंतर (१९३८) मराठी कवितेचे स्वरूप पालटू लागले. मानवतेची जी दारुण व निर्दय विटंबना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली व यंत्रयुगाच्या अवताराने मानवी जीवनात जी नीरसता व कृत्रिमता निर्माण झाली, त्या सर्वाविषयीची आत्यंतिक चीड मर्ढेकरांच्या कवितांतून बाहेर पडली. मुक्तछंदाचा व विषयवैचित्र्याचा वास्तववादी नवा आविष्कार यामधून उदयास आला. विफलतावादामध्ये गुंतून पडलेली मानवी मने यातून डोकावू लागली. या सर्वाच्या परिणामाने आधुनिक मराठी कविता एकांतिक बनली. मर्ढेकरांची वैफल्यपूर्ण वास्तववादी कविता, कुसुमाग्रजांची ध्येयनिष्ठ जीवनवादी कविता, बा. भ. बोरकरांची सौंदर्यासक्त भाववाढी कविता, मंगेश पाडगावकर व इंदिरा संतांची निसर्गप्रतिमाधिष्ठित प्रेमवादी कविता, बिंदा करंदीकरांची उत्साहप्रेरक क्रान्तदर्शी कविता, बाबा आमट्यांची चिंतनशील कृतीपर कविता, वसंत बापट व नारायण सुर्व्याची प्रगतिशील समाजाभिमुख कविता, आणि शांता शेळके, सरिता पदकी, पद्मा गोळे यांची प्रीतीच्या माध्यमातून प्रकट झालेली तरल कविता; – अशा प्रकारची नानाविध रूपे मराठी कवितेने घेतली. ,
मराठी काव्यरूपी ‘ सरिते ‘ चा प्रवाह हा असा सक्षम आहे. त्याचे मनोहारी दर्शन या ‘ सरिता ‘ काव्यसंग्रहात घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे करताना आधुनिक मराठी कवितेच्या अंतःप्रवाहांनाच प्रामुख्याने स्थान दिले गेलेले आहे, याचीही प्रामाणिक जाण आमच्या मनाला आहे. मराठी कवितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतिहासापेक्षा वर्तमानकाळाकडे अवधान देणे महत्त्वाचे आहे, असे आम्हांला वाटते ! कारण त्यातूनच पुढे भविष्यकालीन कविता आकारणार असते ! मराठी कवितेला त्या युगनिर्मात्या कवीची प्रतीक्षा नाही,- असे म्हणावे तरी कसे ?
या प्रवासात मराठी कविता आधुनिक काळामध्ये अनेक वळणे वगैरे घेत आहे. अनियतकालिकांचे प्रकाशन व दलित साहित्य, हे त्यातलेच काही प्रकार !
अनियतकालिकांमधून प्रकाशित झाले व होत असलेले सर्वच मराठी वाग़्मय टाकाऊ आहे असे म्हणणे आत्मघानाचे होईल. त्यातील किती तरी चांगल्या कविता लक्षात रहण्याइतक्या महत्त्वाच्या अशा अर्थाने परिपूर्ण आहेत. भालचंद्र नेमाडे (‘कोसला ‘कार), अशोक शहाणे, प्रकाश कामतीकर, चंद्रकांत खोत, अनिल बांदेकर, सतीश काळसेकर, इ. चे साहित्य या बाबतीत निश्चितच वेगवान ठरले आहे. नियतकालिकांच्या बाबतीत होणारे काही नवनवीन प्रयोगही लक्षणीय आहेत. अंतर्देशीय पत्रावर छापले गेलेले ‘स. न. वि. वि.’ (जालना, औरंगाबाद) व पोस्टकार्डावर छापले गेले ‘शेज’ (SHEJ) ही त्या त्या बाचतीतही पहिली अनियतकालिके होत! सध्या ‘लहर’ नावाचे अनियतकालिक तर प्रतिवर्षी एकदा पोस्टकार्डावर धुळ्याहून छापले जाते.
दलित साहित्यामधून अण्णा भाऊ साठे,बाबूराव बागूल, दया पवार, श्रीधर शनवारे, यांच्याच्या कादंवऱ्या कवितांची दखल मराठी साहित्याला घेणे अपरिहार्य आहे !
मराठीतील प्रातिनिधिक अशा कवितांचा संग्रह प्रकाशित करताना जो विचार करणे आवश्यक आहे तो या ठिकाणी शिकस्तीने करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ! पृष्ठसंख्येची मर्यादा व वेळेवर संमती न आल्यामुळे इच्छा असून देखील काही रचना समाविष्ट करता आल्या नाहीत. पुस्तक प्रकाशित करताना अनेकांचे सहकार्य आम्हांला लाभले. या संग्रहाचे प्रकाशक श्री. गो. म. किराणे यांनी स्वतः पुढे होऊन आम्हांला प्रोत्साहन दिले. मुद्रक श्री. प्रभाकर सिद्ध यांनी तन्त्मयतेने उत्कृष्ट मुद्रण करून दिले. चित्रकार श्री. श्री. गो. पारनाईक व प्रा. रामचंद्र देशपांडे (कृषी महाविद्यालय, कोल्हापूर) यांच्याही सक्रिय सहकार्याची नोंद घेणे इष्ट! या सर्वांचे आभार मानावे, तितके थोडेच आहेत! डॉ. टी. के. टी. आचार्य (अध्यक्ष, विद्याभ्याम मंडळ, म. फुले कृषी विद्यापीठ), यांनी आम्हांस दिलेले उत्तेजन तर आदर्शवत ठरावे! संग्रहात समाविष्ट केलेल्या कवींनी अगदी तन्मयतेने योग्य ती संमनी देऊन तांत्रिक अडथळा दूर केला. या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
– प्रा. जवाहर मुथा

Leave a Reply