
ग्रंथ समीक्षा
ग्रंथाचे नाव – साॅंची दानम्
पृष्ठ संख्या-७४०
मूल्य-रू.१५००/-
प्रकाशक -धम्म लिपी प्रकाशन, भोपाळ
–प्रा. जवाहर मुथा
‘साॅंची दानं’ हे पुस्तक धम्मलिपीकार श्री मोतीलाल आलमचंद्र या मध्यप्रदेशातील लेखकाने एक प्राचीन व दोन अर्वाचीन भाषेत एकत्रित लिहिलेला असामान्य संशोधनाचा ऐतिहासिक महाग्रंथ आहे..तोअविरतपणे लिहिण्याची कल्पना लेखकाला खूप आधी सांची स्तूपाला भेट देताना सुचली.त्या साॅंचीला मी स्वतः १५/२० वेळा गेलो आहे.त्या जवळ असलेल्या भिलसा (विदिशा) या गावात माझी आत्या रहात होती. माझी आत्या मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री स्व. तख़तमल जैन यांची सून होती..त्यावेळी मी अनेक वेळा साॅंचीला जाऊन स्तूपाचे दर्शन घेतले होते..स्तूपातील बुद्धाच्या अस्थिंना अनेकदा वंदन केले होते..अद्भुत शिल्पकला मी पहात असे..अत्यंत रोमांचकारी अनुभव तेव्हा मला होत असे. सांचीच्या वेदींच्या खांबांवर आणि बाजूच्या प्लेट्सवर सम्राट अशोकाच्या काळातील धम्मलिपी (ब्राम्ही, पाली ) वाचण्याची आणि त्या शिलालेखांवर संशोधन करण्याची संधी मात्र मला कधीच मिळाली नाही..परंतु या ग्रंथाचे लेखक श्री मोतीलाल यांना मात्र,त्यांच्या कष्टसाध्य परिश्रमपूर्वक अभ्यास-संशोधनाने ती संधी त्यांना मिळाली. सांचीचा स्तूप एका उंच टेकडीवर बांधलेला आहे. त्याच्याभोवती एक सुंदर प्रदक्षिणा मार्ग आहे. स्तूपाभोवती वाळूच्या दगडापासून बनवलेल्या चार कमानी आहेत, ज्याच्या लांब पटलांवर बुद्धांच्या जीवनाशी संबंधित कथा, विशेषतः जातकांमध्ये वर्णन केलेल्या कथा दर्शविणारी अद्भुत शिल्पे बनवण्यात आली आहेत. या शिल्पात प्राचीन भारतीय जीवनाचे सर्व प्रकार चित्रित केले आहेत. मानवांव्यतिरिक्त, प्राणी, पक्षी, झाडे आणि वनस्पतींचे जिवंत चित्र हे या कलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सांचीच्या शिल्पामागील प्रेरणा म्हणजे साधेपणा, सामान्यपणा आणि सौंदर्याचा उदय.त्यावर धम्मलिपीत तेथे असलेल्या शिलालेखांचे वाचन आजपर्यंत कोणीच केले नव्हते. ते कार्य संशोधनाअंती मोतीलाल आलमचंद्र यांनी केले आहे. जगातील कोणत्याही संग्रहालयात अशा ग्रंथाची निर्मिती नाही,हे अगोदरच मी येथे स्पष्ट करतो. सांची येथील महान स्तूपाचा व्यास १२० फूट आणि उंची ५४ फूट आहे. सम्राट अशोकाचे लग्न विदिशा (भिलसा) येथील वनिकांची सुकन्या देवीशी झाले होते, त्यापासून त्यांना उगेनिया आणि महिंदा हे दोन पुत्र आणि संघमित्ता ही एक कन्या झाली होती.
सांचीच्या महान स्तूपाच्या बाहेरील रेलिंगला वेदिका म्हणतात. वेदी स्तूपाभोवती बांधलेली आहे आणि तिच्या चारही बाजूंना चार कमानी आहेत ,ज्या चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात. एका कमानीपासून दुसऱ्या कमानीपर्यंत एकूण ३१ खांब आहेत. स्तूपाभोवती एकूण १३२ खांब आहेत. दगडी प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेरील रेलिंगवर कोणत्याही कलाकृती कोरलेल्या नाहीत, परंतु आतील रेलिंगवर भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित कोरीवकाम आहे, जे तुम्हाला सहज समजू शकते. तेथे धम्मलिपीत अनेक शिलालेख आहेत. धम्मलिपी ही प्राचीन भारतातील एक लेखन पद्धती होती, जी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात पूर्णपणे विकसित लिपी म्हणून उदयास आली.या सर्वांचे परिशीलन, अभ्यास, चिंतन , संशोधन करून लेखकाने मूळ धम्म लिपी, त्या मजकूराचा इंग्रजी व हिंदी अनुवाद रंगित छायाचित्रासह मोठे ( एन्लार्ज ) करून या ग्रंथात देऊन संशोधनाची परमावधी केली आहे..
मी खरे म्हणजे हिंदी भाषेत या ग्रंथाची समीक्षा लिहिणार होतो, परंतु मराठी भाषिकांसाठी या ग्रंथाचे महत्त्व व संशोधन कळावे म्हणून मराठी भाषेत या ग्रंथाचा परिचय, समीक्षेतून देत आहे.कोणतेही पुस्तक लिहिण्यापूर्वी, त्या विषयाची चांगली समज आणि ज्ञान असणे खूप महत्वाचे असते. .प्राचीन ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या ‘सांची दानम्’ या ग्रंथाचे लेखक श्री मोतीलाल आलमचंद यांनी प्रथम ब्राह्मी लिपी वाचायला शिकली व नंतर ती लिहायला .. आपला अभ्यास सतत वैचारिक द्दष्टीने वाढवित अत्यंत समृद्ध असा हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे . हा ग्रंथ केवळ इतिहासाचे जतन करत नाही तर भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या पैलूंसह पुरातत्वीय वारशाची अमर गाथा आणि महापुरुषांच्या जीवनाचे चित्रण करतो.. ते कसे करतो हे पहाण्यापूर्वी आपण लेखकाचा परिचय पाहू या. कारण मराठी भाषिकांसाठी मोतीलाल आलमचंद्र हे नाव नक्की नवीन आहे.
श्री मोतीलाल आलमचंद्र हे प्रसिद्ध धम्म स्क्रिप्ट लेखक आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखांची भाषा आणि लिपी यावर सखोल प्रभुत्व असलेले ते एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. त्याशिवाय ते कवी, कादंबरीकार आणि सामाजिक विचारवंत देखील आहेत. गेली अनेक वर्षांपासून बौद्ध पुरातत्व स्थळे आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांवर सखोल संशोधन ते करीत आहेत.आत्तापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सांचीच्या शिलालेखांचा सखोल शोध घेणारे आणि धम्मलिपी शिकवणारे ‘सांची दानम’ हे लोकप्रिय पुस्तक आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा शब्दकोष ‘धम्मलिपी डिक्शनरी’ या ग्रंथांनी उत्तर भारतात खूप मोठा नावलौकिक मिळवला आहे.. ‘सिंह विनय’ , भारत एक सामाजिक वेदना, मधुमसगंज, नई कोपलें, धम्मलिपी आणि पाली व्याकरण, सांची आणि सरु-मारू ही त्यांची त्याशिवाय महत्त्वाची प्रकाशित पुस्तके आहेत.सध्या, ते मध्य प्रदेश सरकारच्या राज्य प्रशासकीय सेवेअंतर्गत राजपत्रित अधिकारी आहेत आणि शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी विभागात कार्यरत आहेत.लेखकाचा अभ्यासूपणा आणि सर्जनशीलतेमुळे साहित्यात या ग्रंथाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या कलाकृतींनी साहित्यविश्वात मोठी छाप सोडली आहे. लेखकाने प्राचीन इतिहास आणि संस्कृती तसेच शिलालेख आणि प्रतिमाशास्त्रात एमए केले आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांची भाषा आणि लिपी यावर सखोल प्रभुत्व असलेले ते एक प्रभावी संशोधक आहेत आणि ते कवी, कादंबरीकार आणि सामाजिक विचारवंत देखील आहेत. गेली काही वर्षे बौद्ध पुरातत्वीय स्थळे आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांवर त्यांनी सखोल संशोधन केले आहे.आधुनिक युगात,अठराव्या शतकातील जेम्स प्रिन्सेप हे ब्राह्मी आणि खरोष्ठी लिपी वाचणारे पहिले होते. जेम्स प्रिन्सेप हे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’चे संस्थापक होते. त्यानंतर आता मोतीलाल आलमचंद्र यांचेच नाव घ्यावे लागेल.
प्रारंभी लेखकाचा हेतू काही पुतळ्यांवर संशोधन करण्याचा होता, परंतु अलाहाबाद विद्यापीठाचे पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. व्ही.डी. मिश्रा यांनी त्यांना सल्ला दिला की त्या विषयात खूप फील्डवर्क आहे त्यामुळे ते आव्हानात्मक असू शकते. त्याऐवजी, त्यांनी लेखकाला ग्रंथालयाशी संबंधित संशोधन करण्याचा सल्ला दिला .त्यांनी त्याबरहुकूम अधिक पुस्तके मागवली आणि सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली.
सांची शिलालेखांमध्ये ‘दान’ हा शब्द पकडून जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपीतील अक्षरे वाचण्यात यश मिळवले होते, त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला होता. ‘सांची दानं ‘ या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती त्यानंतर प्रकाशित केली आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये कोरलेल्या शब्दांचे अर्थ देणारा एक प्राकृत-हिंदी शब्दकोश या आधीच त्यांनी तयार केला होता. सांची दानम् या पुस्तकाची छपाई अतिशय आकर्षक आणि स्वच्छ आहे, त्यात ग्लासी कागद आणि रंगीत छायाचित्रे वापरली आहेत. मोतीलाल आलमचंद यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संगणकावर ब्राह्मी लिपी टाइप केली. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक नवीन आणि तार्किक स्थापना केल्या आहेत, ज्या इतिहासातील स्थापित तथ्यांची पुनरावृत्ती करतात.प्राकृत-पाली-धम्मलिपीच्या पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत भाषाशास्त्रातील ऐतिहासिक उपक्रम धम्मलिपी ओगहन, धम्मलिपी फाउंडेशन, धम्मलिपी प्रकाशन यांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. प्रस्तुत “सांची दानम एनलार्ज्ड अँड मल्टीकलर्ड” हा ग्रंथ सुमारे ७४० पानांमध्ये विस्तारित आहे. या आवृत्तीत मध्य प्रदेशातील जवळजवळ सर्व धम्मलिपी शिलालेखांचा समावेश आहे. यावरून तत्कालीन ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक माहिती मिळते.शिलालेखांच्या अभ्यासामुळे समकालीन घटनांसंबंधी अधिकृत माहिती मिळते.हे
शिलालेख इतिहासाचे प्राथमिक आणि विश्वसनीय असे साधन आहे.सांची आणि आजूबाजूच्या परिसरातून सापडलेल्या सर्व शिलालेखांना या पुस्तकात स्थान देण्यात आले आहे. या पुस्तकात मध्य प्रदेशातील सम्राट अशोकाने स्थापित केलेले आणि शोधलेले सर्व लहानमोठे शिलालेख आणि लहान स्तंभ शिलालेखही समाविष्ट आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिवपुरीच्या राष्ट्रीय माधव उद्यानात असलेल्या “चुरैल छज ” या बौद्ध महाविहाराचा धम्मलिपी शिलालेख देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. “कोटमा” येथील सिलागाह शिलालेख देखील येथे समाविष्ट आहे. हा ग्रंथराज प्राकृत-पाली, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये लिहिलेला आहे. आणि त्याची लिपी अनुक्रमे धम्मलिपी, रोमन आणि देवनागरी आहे. सर्व शिलालेखांच्या रंगीत छायाचित्रांमुळे हा ग्रंथ सजीव झाला आहे. सामान्य माणसापासून ते भाषातज्ज्ञांपर्यंत सर्वांसाठी खूप हे महत्वाचे आहे. पुरातत्वशास्त्राच्या माध्यमातून आपला अभिमान शोधू इच्छिणाऱ्या लोकांसाठी, समाजांसाठी, वर्गांसाठी, इतिहासकारांसाठी, संशोधकांसाठी, पर्यटकांसाठी, आणि भक्तांसाठी हे पुस्तक ऑक्सिजनचे काम करेल. लेखक मोतीलाल आलमचंद्र यांनी सात वर्षांच्या सखोल संशोधनानंतर हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात लेखकाची मेहनत स्पष्टपणे दिसून येते. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हे पुस्तक तुम्हाला भारताच्या गौरवशाली भूतकाळात घेऊन जाण्यास सक्षम आहे. प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक खरेदी करावे. या पुस्तकातून धम्मलिपी शिकून तुम्ही स्वतः सम्राट अशोकाचे शिलालेख वाचू शकाल आणि अभिमान वाटेल. आपले ज्ञान आणि घरातील ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी हा ग्रंथ,एक दर्जा प्रतीक आहे.
एखादे पुस्तक वाचताना वाचकाला त्यातून बाहेर पडावे असे वाटत नसेल तर ते पुस्तक सार्थक मानले जाते. मोतीलाल आलमचंद यांचे ‘सांची दानम’ वाचताना हेच जाणवते. ‘सांची दानम’ची ही तिसरी आणि सुधारित आवृत्ती आहे जी आधीच्या दोन आवृत्त्यांपेक्षा अधिक तपशीलवार आहे. मोतीलाल आलमचंदनी बौद्ध आणि ब्राह्मी लिपी वर अनेक पुस्तके लिहिली आहेत. प्रस्तुत ‘सांची दानम’ या ग्रंथावर गेली अनेक वर्षे ते काम करत आहेत, त्याचेच फलित म्हणजे ही तिसरी आवृत्ती आहे.ती पाहण्यासारखी तर आहेच परंतु वाचताना त्या रेकॉर्ड्ससमोर उभे राहून त्यांच्याशी बोलत असल्याचा भासही होतो. ग्लेझ पेपरवर आणि अनेक रंगात छापलेले हे पुस्तक आकर्षक असून छपाई अतिशय कौशल्य पूर्ण आहे. मोतीलालजींच्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांनी त्यातील ब्राह्मी लिपी आपल्याच संगणकावर टाइप केली आहे, हे वैशिष्ट्य पूर्ण व आश्चर्यकारक आहे. ते टाइप केल्यावर व्यवस्थित दिसतात, हा ब्राह्मी फॉन्ट हिंदी फॉन्टमध्येही चांगला वापरला गेला आहे.यामध्ये मोतीलाल आलमचंद यांनी अनेक नवीन आस्थापना केल्या आहेत ज्या तार्किक आहेत आणि इतिहासात आतापर्यंत स्थापित केलेल्या तथ्यांमध्ये बदल केले आहेत.
पुस्तकाच्या शेवटी त्यांचा एक शोधनिबंधही आहे ज्यामध्ये पानागुराडिया आणि सरू मारू यांच्या शिलालेखांच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की, त्यात वापरण्यात आलेल्या राजकुमार शब्दावरून अशोक जेव्हा येथे आला तेव्हा हा शिलालेख कोरला गेला ..सांस्कृतिक प्रगती आणि सामुदायिक विकासासाठी असे ग्रंथ महत्त्वाचे असतात, विकासात्मक परंपरा, मूल्ये आणि सामाजिक संरचना घडवण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्या सक्षमीकरणामुळे अधिक समावेशक आणि समृद्ध समाज निर्माण होतो.पण हे घडायचे तर मूल्यांसंबंधी अभ्यास, चिकित्सा, विश्लेषण आणि विकासाची मुलभूत आस असली पाहिजे. ते सर्व या ग्रंथात आहे. या ग्रंथराजामुळे भारतीय संस्कृतीत अतिशय मोलाची अलौकिक अकल्पनिय भर पडली आहे, हे नक्की.
सम्राट अशोकाने चतुर्दश शिलालेखांमध्ये धम्मलिपी हा शब्द अनेक वेळा लिहिला आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमुळेच त्या काळातील भाषा आज आपल्यासमोर पुनरुज्जीवित झाली आहे. सध्या धम्मलिपीचा जास्तीत जास्त वापर, प्रचार आणि जतन करणे आवश्यक आहे. ही धम्मलिपी भारतातील सर्व भाषांच्या लिपींची जननी आहे. धम्मलिपीचा व्यापक वापर सम्राट अशोकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करेल.सम्राट अशोकाने या देशात “धम्मलिपी” लेखनाची वैज्ञानिक शैली विकसित केली. चला ,आपण धम्मलिपी पुन्हा शिकूया. जरी भारतातील सर्वात जुनी लिपी हडप्पा लिपी आहे, जी आजपर्यंत वाचली गेलेली नाही. भारतातील सर्वात जुनी वाचनीय लिपी धम्मलिपी आहे. या वैज्ञानिक लिपीतील चिन्हे शिकण्याचा, लिहिण्याचा आणि वाचण्याचा गौरव आपण पुन्हा मिळवूया. “धम्मलिपी” शिकून आपण भारताच्या लिपींच्या बीजाला आदरांजली वाहण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करू या.. तसे झाले तरच प्राकृत भाषेत ही अधिक संशोधन होईल व एक नवा इतिहास मानवजातीला कळू शकेल, असे माझे प्रामाणीक नम्र मत आहे.
हे संशोधन ज्ञानाचा साठा वाढवण्यासाठी केले जाणारे सर्जनशील आणि पद्धतशीर कार्य आहे . यामध्ये विषयाची समज वाढवण्यासाठी पुराव्यांचे संकलन, संघटन आणि विश्लेषण समाविष्ट केले आहे. पक्षपात आणि त्रुटींच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लेखकाने विशिष्ट लक्ष दिले आहे . श्री मोतीलाल आलमचंद्र यांना त्यासाठी द्यावेत तेव्हढे धन्यवाद कमीच आहेत.मी सध्या ८५व्या वयात असल्याने फारसा प्रवास करीत नाही..परंतु हा ग्रंथ वाचल्यानंतर तो घेऊन साॅंची ला पुन्हा एकदा जाण्याची इच्छा झाली आहे..ती पूर्ण करणारच…इत्यलम्.
– प्रा. जवाहर मुथा
ग्रंथाचे नाव – साॅंची दानम्
पृष्ठ संख्या-७४०
मूल्य-रू.१५००/-
प्रकाशक -धम्म लिपी प्रकाशन, भोपाळ