लेखक: प्रा. जवाहर मुथा
खरे म्हणजे थोर व्यक्ती किंवा थोर कवी यांच्याशी आपण कधी तुलना करू नये ,पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येत असतात की नकळत त्यांच्याशी तुलना आपल्या मनामध्ये येते. अशा तुलनेने आपण मोठे होऊ शकत नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी, समाधान एवढेच लाभते की,आपल्याही जीवनातील काही क्षण या थोर व्यक्तींच्या चरित्राशी कुठे न कुठे जुडलेले आढळतात.सुप्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करंदीकर यांचा जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवते . विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. अशा कविपुंगवाबरोबर माझ्या जीवनातील तीन चार प्रसंग आणि 5/6वेळा त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठीतून मला जे जाणवते ते थोडेसे असेच काही अलौकिक आहे .विंदा करंदीकरांना 1967 मध्ये जेव्हा ‘सीनियर फुलब्राइट पुरस्कार’ मिळाला होता ,तेव्हा मी पुण्यात किर्लोस्कर मासिकाच्या सहसंपादक म्हणून काम करीत होतो. मुकुंदराव किर्लेस्कर मला म्हणाले की ,’विंदांची मुलाखत तुम्ही मुंबईला जाऊन घेऊन या ‘,कारण अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी कवी होते. मी मुंबईला त्यांच्या घरी फोन लावला. विंदा म्हणाले,” मुथा, मी परवा पुण्याला येत आहे . तिथेच भेटू या का ? “ मी त्यांचा निरोप मुकूंदरावांना सांगितला . त्यांनाही बरे वाटले,म्हणाले , “ मग असे करू या का ..मीच त्यांना भेटतो..” मी ही ‘ बरं बरं ,’ असे म्हणालो व आमची ही भेट राहून गेली . नंतर काही महिन्यांनी ,म्हणजे 1969 मध्ये मी किर्लोस्कर सोडलं व सप्टेंबरमध्ये धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात हिंदी व मराठीचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झालो.72/73ला विंदा, वसंत बापट,व मंगेश पाडगावकर या त्रयकविंची कवी -संमेलने महाराष्ट्रात गाजू लागली .आपणही त्यांना धुळ्याला बोलवावे ,असे वाटू लागले प्रा.डॉ.मु.ब.शहा,शरद भानगावकर, प्रा.पाटील यांच्याशी चर्चा केली व रीतसर निमंत्रण पाठवले . ते धुळ्याला आले …विंदांची प्रत्यक्ष मुलाखत ही अशी झाली. .खूपच मजेशीर ..अघळ-पघळ न बोलता मुद्द्याशी बोलणारे ते मला भेटलेले पहिले कवी.! साम्यवादी विचारसरणीचा अंगीकार करून रात्रंदिवस विचारांशी एकनिष्ठ बांधिलकी ते स्वीकारीत असत.मिश्किल ते बरोबरच गांभीर्याचा गाभारा ते सहजच संभाषणात दाखवित असत . धुळे नगर परिषदेच्या भव्य सभागृहात त्यांचे झालेले काव्यवाचन म्हणूनच कमालीचे यशस्वी झाले .. ‘ पुन्हा भेटू या ..’ असे म्हणत ते दुसऱ्या दिवशी आनंदाने रवाना झाले .. दिवस ,वर्षे जात होती..आणि एके दिवशी साताऱ्याहून वेळ व दिवस ठरवून दोन सद्गृहस्थ मला भेटावया आले.. म्हणाले , ‘ कराडजवळ उंडाळे गावात आम्ही दर वर्षी संमेलन घेत असतो .. या वर्षी विंदा करंदीकर अध्यक्ष आहेत..आपण प्रमुख अतिथी म्हणून यावे ,अशी विनंती आहे ‘ ..मनातून मी राहुल गेलेली भेट पुन्हा होईल म्हणून आनंदलो होतो .. पण तसे न दाखवता गांभीर्याने चर्या करून मोठ्या मिनतवारीने निमंत्रण स्वीकारल्याचे मी दाखवले… ठरलेल्या दिवशी सन 2002च्या फेब्रवारी महिन्यात मी कराडला पोहोचलो.. नामदार विलासराव पाटील हे त्या वेळी महाराष्ट्राचे कायदा मंत्री व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते ..त्यांच्याच पूनम हॉटेलवर माझी राहण्याची सोय होती.. विंदा ज्या कक्षात उतरलेले होते, त्याच कक्षात त्यांच्यासह माझी सोय करण्यात आल्याचे पाहून एक छोटेसे स्वप्न साकार झाल्याचा मला भास झाला .. विंदांनी हसून माझे स्वागत केले..” या.. बसा “, म्हणत माझ्या प्रवासांची ख्याली खुशाली विचारली.. चहा मागवला गेला.. बिस्किटेही आली.. आणि मग नंतरचे तीन दिवस त्यांच्या समवेत मी रंगून गेलो .. इतके की वेळेचं भानही आम्हास राहिले नाही ..दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना विचारले,” विंदा ,तुमची ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता माझी पाठ आहे..त्यात तुम्ही साम्यवादाचा जो पुरस्कार केला तो तार्किक असला तरी भरोसेलायक आहे .पण मला एक सांगा , त्यात जे म्हटले गेले आहे की ,
‘ त्याच्या मागून येईल स्वार
या दगडावर लाविल धार
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड ‘..
विंदा , आला का हो तो स्वार ?.”.विंदानी चमकून माझ्याकडे पाहिले .. क्षणभर विचार केला ..आणि नकारार्थी मान डोलावत म्हटले , “नाही आला ..तुमचा विचारबोध रास्त आहे ..” मग मीही काही विचारले नाही.. विंदा झोपी गेले..शांत निर्व्याज मनाने ..पण मला काही झोप येईना.. विचारचक्रे फिरू लागली ..शब्द स्फुरू लागले ..हलक्या पावलांनी बाहेर आलो ..तेथील सोफ्यावर बसलो..शब्दानी धरलेला अर्थाचा गोफ कवितेच्या रूपाने कागदावर उतरवू लागलो..
”अरे दगडा मन बन
धार नको घर बन
टाप नको आवाज नको
पहा कोणाचे प्राण बन..
..अरे दगडा मन बन..”
पाहता पाहता कवितेच्या ओळी जश्या स्फुरू लागल्या तश्या त्या कागदावर मी उतरवू लागलो.. एक दीड तास झाला असेल .. कविता पूर्ण झाली..दरवाजा हलकेच उघडून आत गेलो .. व निद्रेची आराधना करीत झोपी गेलो..दिवस उजाडला.. विंदा कधीच आवरून बसले होते .. मी मुखप्रक्षालन , प्रातर्विधी करून त्यांच्यासमोर बसलो..” काय ..बरी झाली ना झोप.. ,त्यानी विचारले.. मी म्हणालो,”.. नाही हो..मी रात्री एक कविता लिहीत बसलो.. व मगच झोप आली..” माझ्या कडे हसून पहात ते उद्गारले,” अरे वा ..दाखवा ना वाचून ..” मी कवितेचा तो कागद काढला .. जरा अवघडलो..पण सावरून बसत, त्यांना ,त्यांच्या कवितेला दिलेले उत्तर वाचून दाखवले ..कविता संपताच विंदा जागेवरून उठले व माझे जवळ बसत म्हणाले ,” तुम्ही प्रतिभावान आहात, मुथा..छान कविता लिहिली.. मला आवडली ..शाबास तुमची ..” त्यांच्या त्या उद्गाराला इतकी वर्षं झाली..पण अजूनही ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत ..विंदांनी त्यानंतर माझ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाची व ‘भविष्यवेध’ या राज्य पुरस्कारप्राप्त पुस्तकाची आवर्जून माहिती घेतली.. त्यांच्या हस्तरेषेवरून लवकरच त्यांना मोठे पद किंवा पुरस्कार मिळेल ,असे भविष्यही मी वर्तवले .. विंदाची नंतर भेट मुंबईच्या विले पार्ल्याच्या दीनानाथ नाटय़गृहातील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सत्काराच्या वेळेस 2003 मध्ये झाली . त्याच वर्षी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता व त्यांच्यासह माझा झालेला सत्कार एक योगायोगच म्हणावा लागेल.कराडमध्ये त्यांच्याविषयी मी वर्तविलेले भविष्य त्यांच्या पूर्णपणे लक्षात होते ..त्या दिवशी माझा हात हाती घेत ते उद्गारले , “ मुथा,तुमचे भविष्य खरे ठरले .. “ मीही हसून त्यांना दाद दिली व आभार मानले ,हे सांगणे न लगे . विंदांचे कोकणातील गाव पोंभुर्ले .पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरांचे जन्म गावही तेच ! त्याच पोंभुर्लेत मला महाराष्ट्र पत्रकार कल्याणनिधीचा साहित्य व पत्रकारितेचा ‘ दर्पण पुरस्कार’ साहित्य संमेलनाध्यक्ष अरुण साधूंच्याहस्ते 2003 मध्येच प्रदान करण्यात आला होता.. आहे की नाही हा योगायोग..विंदा सारख्या महाकविबरोबर सार्थकतेचे काही क्षण जीवनात आले ,हेही नसे थोडके..सोबतचे छायाचित्र एक प्रतिक , प्रमाण व प्रज्ञावंतांचा प्रसादच नव्हे काय..?