नवीपेठ येथे जय जिनेंद्र, जय महावीर अशा जयघोषात जय आनंद मंडळातर्फे मिरवणुकीचे स्वागत
नगर : जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती नगर शहरात भक्तीमय वातावरणात साजरी झाली. सत्य व अहिंसेचा संदेश देणार्या भगवान महावीरांच्या विचारांचे स्मरण करीत नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे महावीर स्वामींचा जगा व जगू द्या हा संदेश दिला. चौक सजावट करताना मंडळाने शुभ्र बदकांच्या रथात भगवान महावीरांची मूर्ती विराजमान करून आजूबाजूला सुंदर आकाश दाखवून भूतदयेचा संदेश दिला. शिक्षा अभियान, बेटी बचाओ, वृक्षलागवड, शाकाहार सर्वश्रेष्ठ आहार, अहिंसा परमो धर्म:, समस्त प्राणीमात्राची सेवा, जगा आणि जगू द्या असे संदेश सजावटीतून देण्यात आले.
याशिवाय महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीचे जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय महावीर स्वामी अशा गजरात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की, मंडळाच्या नावातच भगवान महावीर स्वामी व आचार्यश्रींचे नाव आहे. त्यामुळे या महान विभूतींच्या विचारांचे तंतोतंत पालन करीत मंडळ सामाजिक तसेच धार्मिक कार्यात अग्रेसर असते. भगवान महावीरांनी समस्त मानवजातीबरोबरच भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या कल्याणाचा संदेश दिला. सत्य व अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांनी समाजाला दिले. अहिंसा परमो धर्म: सांगणारे त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून मंडळाने नेहमीच या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम केले आहे. मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा म्हणाले की, भगवान महावीर यांनी सांगितलेले अहिंसेचे तत्वज्ञान संपूर्ण प्राणीमात्रांना समावून घेणारे आहे. आजच्या काळात याचीच मोठी गरज आहे. नगरमध्ये निघालेल्या मिरवणुकीचे स्वागत करताना विशेष आनंद मिळाला.
.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष राहुल सावदेकर, संतोष कासवा, महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा, सेक्रेटरी सुरेखा बोरा यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.