बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा.जवाहर मुथा

लेख
साहित्यिक, समीक्षक, सौंदर्यशास्त्रवेत्ते ,पत्रकार, कलावंत, तत्वज्ञ, ज्योतिषशास्त्री ,वक्ते, मार्गदर्शक, संघटक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले प्रा.जवाहर मुथा हे १२ मार्च २०२५ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या सर्वंकष कार्याचा वेध घेणारा हा लेख…

       साहित्यिक,समीक्षक,सौंदर्यशास्त्रवेत्ते,पत्रकार,कलावंत,तत्वज्ञ,ज्योतिषशास्त्री,वक्ते,मार्गदर्शक,संघटक,संपादक,राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.जवाहर मुथा.  
  प्रा.जवाहर मुथा यांचा जन्म १२  मार्च १९४१ रोजी नगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावी झाला.त्यांचे माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया मध्ये झाले.येथील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे व विशेषतः मुथा यांच्या आईच्या प्रोत्साहनामुळे त्यांना वाचनाचे,नकला करण्याचे व नाटकात काम करण्याचे वेड लागले.आपल्या घराशेजारी असलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ते शालेय जीवनापासूनच वर्गणीदार व आजीव सदस्य झाले.इयत्ता ११ वी मध्ये असतानाच त्यांनी ‘सावकारी पाश’ या नावाची नाट्यछटा लिहिली.ही नाट्यछटा २५ ऑगस्ट १९५६ रोजी ‘आझाद हिंद’मधून प्रसिद्ध झाली.मुथांचे हे पहिले प्रकाशित लेखन होय. साहित्य वाचनाच्या वेडातून त्यांची प्रतिभा फुलत गेली.नाटकाच्या छंदातून त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व इत्यादी गुण फुलत गेले.काव्यशास्त्र, विनोद,नाटक आणि वक्तृत्व वाचन आणि लेखन यांचा छंद असलेले एक अभ्यासू प्रतिभाशाली आणि लोकाभिमुख,विचारी असे त्यांचे व्यक्तिमत्व बहरत गेले.मुथा यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले.येथेच त्यांची रतनलाल सोनाग्रा यांच्यासोबत घनिष्ठ मैत्री झाली.या काळात संगीत, साहित्य, नाट्य, तत्त्वज्ञान यासंदर्भात वाचन,लेखन आणि सादरीकरण यात मुथा रमून गेले. रवींद्रनाथ टागोरांची पुस्तके त्यांच्यावर सतत प्रभाव टाकत होती.हिंदी कवितांचा अनुवाद करण्याचाही छंद त्यांना लागला.या काळात कथाकथनाचे प्रयोगही त्यांनी केले.

लेखिका – प्रा.डॉ.माहेश्वरी वीरसिंग गावित
प्राचार्य,हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय,अहिल्यानगर.
( लोकसाहित्य व आदिवासी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक )
मोबाईल क्रमांक-98 22 41 42 02


      इ.स.१९५८-५९ मध्ये मुथा नगर शहरातील काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी झाले.शहर काँग्रेस कमिटीची मोठी जबाबदारी त्यांनी पेलली.शहर काँग्रेसचे ते सेक्रेटरी झाले.१९६३-६४ पासून साहित्य साधनेचे सेक्रेटरीपद त्यांनी सांभाळले.त्याचबरोबर अहमदनगर शहर साहित्य संघाची त्यांनी स्थापनाही केली.महाविद्यालयीन साहित्य चळवळीच्या माध्यमातून मुथा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित राहिले.त्यामुळे साहित्य, संगीत,कला,राजकारण,विद्यार्थी चळवळ, नाट्य,वक्तृत्व,आयोजन,संयोजन,नियोजन,वार्तालेखन अशा विविध गोष्टींबरोबरच एन.सी.सी. सारख्या सैनिकी शिक्षणामध्येही रस घेणारे,धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते विकसित होत गेले. १९६८ सालापर्यंत हिंदी,मराठी या दोन्ही विषयात एम.ए.व प्रयाग विश्वविद्यालयाचा पत्रकारितेचा कोर्स त्यांनी पूर्ण केला.
    विद्यार्थी दशेमध्ये असताना १९५८-५९  या काळात त्यांनी काँग्रेस सेवादलाच्या,युथ काँग्रेसच्या माध्यमातून व स्वतंत्रपणे विद्यार्थी चळवळीमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते झटत.विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांना साहित्य व संस्कृती या दृष्टीने आकार देण्याचे उपक्रम त्यांनी राबविले.या चळवळीमध्ये त्यांना डॉ. श्रीराम रानडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील,स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन यांचे मार्गदर्शन मिळाले.
       विद्यार्थी चळवळीतूनच ते काँग्रेस सेवादलाकडे ओढले गेले. १९५८-६२ मध्ये ते काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी झाले.कवायती,स्वातंत्र्यसंग्राम यांच्या माध्यमांतून त्यांनी कामे केली, शिबिरे भरवली, श्रमदानाचे काम केले.या कामातून भावनगर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात पंडित नेहरूंच्या तंबूबाहेर त्यांची रक्षक म्हणून नेमणूक झाली.१९६२- १९६५  या काळात त्यांनी काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काम पाहिले.नंतर मात्र त्यांना राजकारणापेक्षा साहित्यकारणामध्ये विशेष रस निर्माण झाला. परंतु नंतरच्या काळात अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध आला व तो आजतागायत चालूच आहे.
     प्रा.मुथा यांचे साहित्यविषयक व सामाजिक कार्य अतिशय व्यापक आहे.साहित्यविषयक व सामाजिक क्षेत्रांशी संबंधित अनेक संस्थांमध्ये प्रा.मुथा हे मान्यवर पदांवर कार्यरत राहिले आहेत.१९९२- ९५ या काळात महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेचे अध्यक्ष, १९८२- ८४ या काळात अखिल भारतीय नवीन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, १९७०-७२ या काळात मुंबई येथील महाराष्ट्र बौध्द साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, १९६३-६५ मध्ये अहमदनगर महाविद्यालयातील साहित्य साधनेचे सचिव, १९६४-६६ मध्ये जिल्हा वाचनालयाचे कार्यकारी सदस्य, १९६५ मध्ये शिशु संगोपन संस्थेचे सचिव, १९६०-६२ या काळात युथ काँग्रेसचे अध्यक्ष,  १९९६-९९ महात्मा फुले कृषी विद्यापीठ अध्यापक संघाचे संस्थापक सहसचिव, १९७८-७९ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवक संघाचे कार्यवाह, १९६०-६२ मध्ये सेवा दलाचे मुख्य संघटक,अहमदनगर एज्युकेशन सोसायटी,हिंद सेवा मंडळ, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी,विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्र,अखिल भारतीय जैन श्वेतांबर संघ नवी दिल्ली, ज्येष्ठ नागरिक संघटना नगर या संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत.पद्मश्री अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन समिती अहमदनगरचे १९९४ पासून ते विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.पुणे व अहमदनगर येथील सामुदायिक विवाह समारंभाचे संयोजक,१९७७ मध्ये जैन युवा संघाचे अध्यक्ष,१९८८ पासून मोतीलाल मुथा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, धुळे येथील खानदेश कवी मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध साहित्यविषयक व सामाजिक संस्थांमध्ये नामांकित पदे त्यांनी भूषविली आणि आजतागायत हे काम ते करीत आहेत.
     प्रा.मुथा प्रबोधक या नात्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.त्याचबरोबर पत्रकारितेविषयी त्यांची स्वच्छ लोकप्रबोधकाची भूमिका आहे.राजकीय,सामाजिक चारित्र्य घडविण्याचे काम पत्रकार करीत असतात.पत्रकाराने एका नैतिक जबाबदारीने ताटस्धपूर्वक घटना,प्रसंग, विचार,वक्तव्य यांचे विश्लेषणपूर्वक विवेचन करून मतप्रदर्शन करावे, याकडे त्यांचा कटाक्ष आहे.पत्रकार,वार्ताहर या व्यक्तिमत्त्वांविषयी त्यांची एक निश्चित भूमिका आहे.या भूमिकेमुळे त्यांच्या लेखनातील उपरोध, उपहास यांना एक वेगळे परिमाण लाभले आहे.मुथांच्या मते,वर्तमानपत्र चालविणे ही समाजसेवा किंवा राष्ट्रसेवा अथवा सांस्कृतिक कार्य राहिले नसून,तो एक व्यवसाय झाला आहे.असे असले तरी पत्रकारांनी अग्रलेख स्तंभलेख अशी काही महत्त्वाची सदरे व्यक्तिमत्व जोपासण्यासाठी वापरली पाहिजेत.  अशी त्यांची भूमिका आहे प्रा.मुथा यांनी १९६०-६६ या काळात साप्ताहिक लोकशाही, साप्ताहिक लोकशक्तीचे सहसंपादक व दैनिक केसरीचा वार्ताहर म्हणून, १९६४-६५ या काळात मिलिंद पाक्षिकाचे संपादक म्हणून,१९६७-७० या काळात ‘स्त्री’,’मनोहर’, ‘किर्लोस्कर’ चे सहसंपादक म्हणून, १९७०-९९ या काळात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मराठी आणि हिंदीचे सहाय्यक प्राध्यापक व संशोधन संपादक म्हणून,१९८८ पासून तर आजपर्यंत ‘ज्योतिषपत्रिका’ षण्मासिकाचे मानद संपादक म्हणून,१९९२ पासून ‘साप्ताहिक नगर संकेत’ चे प्रमुख संपादक म्हणून, भारतीय भाषा ई समाचार पत्र संगठनच्या कार्यकारी मंडळावर १९९५-९६ मध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून, इंडियन फेडरेशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स दिल्लीच्या महाराष्ट्र शाखेचे जनरल सेक्रेटरी,’पाथ फाईंडर’ या रोटरी क्लब अहमदनगरच्या मुखपत्राचे मानद संपादक  महाराष्ट्र हिंदी पत्रकार संगठनाचे अध्यक्ष म्हणून ते १९९५ पासून कार्यरत आहेत.मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबुद्ध नायक’ च्या संपादक मंडळावर ते कार्यरत आहेत.
   ‘पत्रकार’ हा विशिष्ट विधायक दृष्टिकोनाने प्रेरित होऊन पत्रकारितेच्या माध्यमातून प्रगतशील, सांस्कृतिक जडणघडण करीत असतो असे त्यांचे मत आहे.तसेच व्यवहारातील पारदर्शकता हे पत्रकारितेचे उद्दिष्ट असावे असेही त्यांचे मत आहे.प्रा.मुथा हे महाराष्ट्राला निर्भिड पत्रकार म्हणून परिचित आहेत.त्याचबरोबर एक बुध्दिनिष्ठ विचारवंत म्हणून परिचित आहेत. असे असले तरी तत्त्वज्ञानाच्या बाबतीत त्यांच्यावर प.पू.आचार्यसम्राट आनंदऋषीजी महाराज,अवतार मेहेरबाबा आणि आचार्य रजनीश उर्फ ओशो या तीन संतांचा मोठा प्रभाव आहे.ते ख्यातकीर्त,निष्णात ज्योतिर्विद असल्यामुळे या संबंधातील तत्त्वज्ञानाचाही प्रभाव त्यांच्यावर झालेला दिसून येतो.जैन तत्त्वज्ञान व जैन तीर्थंकरांचा इतिहास  सौंदर्यशास्त्र, वेद ,उपनिषदे याविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.
      ज्योतिषशास्त्रातील एक अधिकारी पुरुष म्हणून त्यांचा लौकिक आहे.महाराष्ट्रातील ज्योतिष संशोधन केंद्राचे ते अध्यक्ष आहेत.१९८६  मध्ये धुळे येथे झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.ज्योतिषपत्रिकाचे ते १९८८ पासून आजतागायत संपादक आहेत.पुणे येथील ‘वराहमिहिर ज्योतीष मुक्त’ विद्यापीठाचे २०००-२००५ या काळात  ते कुलगुरू राहिलेले आहेत.त्यांचे याविषयी ‘भविष्यवेध’,’एका ज्योतिषाची डायरी’ ‘ ज्योतिषपत्रिका विशेषांक’, यांसोबतच चित्रपट तारकांचे ग्रहयोगही त्यांनी प्रकाशित केले आहेत.
    स्वीत्झर्लंड,नेपाळ, भूतान,तिबेट,इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांबरोबरच, युरोपीय देशांतही मुथा यांनी भ्रमंती केली आहे.एक कलावंत, लेखक आणि पत्रकार म्हणून हा प्रवास महत्त्वाचा ठरतो.’ फ्रान्सच्या फिरतीवर” हे पुस्तक अशा अनुभवावर आधारित आहे. सांस्कृतिक देवाण-घेवाणी बरोबरच वाचनालय,चित्रकला प्रदर्शने,संग्रहालय, विविध धार्मिक व सांस्कृतिक संस्था, क्लब यांना भेटी देण्यावर त्यांचा भर होता.या भ्रमंतीत भारतीय इतिहास, संस्कृती आणि साहित्य यांच्या तुलनेत विदेशातील या घटकांचे निरीक्षण असा त्यांचा दृष्टिकोन होता. या भ्रमंतीत केलेल्या निरीक्षणावर स्फुटलेखनातून त्यांनी वेळोवेळी कलात्मक अभिरुचीसह भाष्य केले आहे.     प्रा.मुथा यांच्या साहित्यावर दृष्टिक्षेप टाकला, तर सर्व साहित्यप्रकारांमध्ये त्यांचा संचार झालेला दिसतो. प्रयोगशीलता आणि लेखन मूल्यांचा ध्यास  हा त्यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन दिसतो. मुथा हे प्रामुख्याने नाविन्याची ओढ असलेले रसिक व प्रबोधनकार शिक्षक आहेत.कला आणि सामायिक जीवन या दोन्हींशी त्यांनी बांधिलकी स्वीकारली आहे.
    मानसशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा जमेल तेवढा विचार केलेला दिसतो. साहित्यविषयक दृष्टिकोनाच्या विचारात ते कोठेही वितंडवादात पडलेले दिसत नाहीत. असे असले तरी परभाषांचे आक्रमण आणि मराठी भाषेचे शुध्दिकरण, तसेच मराठी भाषेचे व्यावहारिक प्रचलन याविषयी मुथा जागृत दिसतात. प्रयोगशीलता आणि लेखनमूल्यचा ध्यास ही त्यांच्या साहित्यविषयक दृष्टिकोनाची धोरणात्मक बाजू दिसते.त्याचबरोबर कलेचा हट्टाग्रह धरणारे मुथा,त्याचबरोबर कलेच्या सौंदर्याविषयी मांडलेली भूमिका, तसेच संरचनेविषयी मानव्याच्या पातळीवरील आशयघनता आणि प्रगमनशील यादृष्टीने ते साहित्याकडे पाहतात.त्यांच्या प्रतिभाजन्य ललित वाङ्मयात त्यांचे सौंदर्यसक्त मन अधिक रमते,तर त्यांच्या प्रबोधनपर व माहितीपर वैचारिक वाङ्मयात त्यांचा सौंदर्यालोलुपतेचा व सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन  व्यक्त झालेला पाहावयास मिळतो. प्रयत्नांनी अशक्य ते शक्य करता येईल,असा त्यांचा विश्वास आहे.एक तत्त्वज्ञ, भविष्यवेत्ता अशा प्रकारे व्यावहारिक जाणीवेतून मानवी जीवनाकडे पाहतो, हे मुथा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य त्यांच्या साहित्यविषयक दृष्टिकोनात प्रतिबिंबित झाले आहे.म्हणूनच त्यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन नेमक्या शब्दात मांडताना असे म्हणता येईल की, अलौकिक सौंदर्य संवेदनेचा अनुभव नि:सारण सिध्दांताच्या आधाराने मानवाला मूर्त रूपात घेता येतो. सौंदर्यानुभूतीचे हे जाणिवेच्या कक्षेतील नि:सारण तत्व सामाजिक,राजकीय, नैतिक, सांस्कृतिक, धार्मिक, कलात्मक अशा मानवी जीवनाच्या सर्व अंगांच्या संदर्भात लावून माणसाला जीवन सुंदर बनविता येते, असे त्यांना वाटते.याच भूमिकेतून मुथा हे एका बाजूला निखळ सौंदर्यसक्त असताना किंवा कलांच्या संदर्भात आणि मानव आणि निसर्गाच्या संदर्भात निखळ रसिकतेने अनुभूती घेत असताना,संपूर्ण जीवनामध्ये नि:सारणाच्या माध्यमातून सौंदर्यनिर्मिती करता येईल, या भूमिकेने साहित्यामध्येही प्रबोधकता असली पाहिजे, अशी भूमिका घेतात. ‘सूर्यतनू ‘,’स्वप्नांचे दुःख’, ‘कृषी कविता’,’ फ्रान्सच्या फिरतीवर’, स्त्री सुक्ते'(कामूच्या कविता ),’ चंद्र गातो गीत'( गझलसंग्रह), ‘प्रेमगीत’ (ऑडिओ कॅसेट )आदी कवी म्हणून मुथा यांची साहित्यसंपदा. 
   ‘सूर्यतनू’ व ‘स्वप्नांचे दुःख’ या कवितासंग्रहांतील कविता ही अल्पाक्षरत्वाने छंदोबद्ध झालेली, स्वरांची,लयतालाची ओढ असलेली कविता आहे.भावनेच्या हळुवारपणासाठी हळुवार शब्दांची निवड मुथा करतात.रम्य कल्पनाविलास,संकेत सूचन, सामान्य प्रतिमासृष्टी ही त्यांच्या कवितेच्या आविष्कार रूपाची वैशिष्ट्ये सांगता येतील.त्यांच्या कृषी कवितेतून संपूर्ण कृषी जीवन वाचकांसमोर उभे राहते.ओवी- अभंग, गीतरचना व मुक्त छंद अशा त्रिविध स्वरूपात ही कविता अवतरली आहे.  माणूस आणि निसर्ग यांचे व्यक्त होणारे अतूट नाते या कवितेत व्यक्त झाले आहे ‘फ्रान्सच्या फिरतीवर’ या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे फ्रान्सचा काव्यात्मक आविष्कार आहे.फ्रान्समधील विविध प्रेक्षणीय स्थळे ,फ्रान्सचा सांस्कृतिक इतिहास, राजकीय इतिहास सूचित करणारे प्रसंग,  स्थळ, चित्र, उल्लेख इत्यादींसह फ्रान्समध्ये भेटलेल्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह येथे फ्रान्सचा परिचय कवितेतून होतो.काव्याविषयातून प्रवासवर्णन हे मराठी साहित्यातील एकमेव प्रवासवर्णन आहे .प्रेम भावनेला वाहिलेले गझल आणि भावकविता या स्वरूपात संगीतबद्ध होणारे काव्य ‘प्रेमगीत’ या श्राव्य ध्वनिमुद्रिकेत ग्रथित आहे.तर भावोत्कट उत्तर शृंगारिक काव्यात्मकतेची कलात्मक शब्दशिल्पे म्हणजे त्यांची ‘स्त्री- सूक्ते’ होय असे म्हणता येईल.
प्रा.मुथा यांच्या काव्यप्रतिभेची काही उदाहरणे-

‘सूर्यतनू’ या कवितेत कवी म्हणतो-
त्या पुष्पाची,
 एक पाकळी
बनून गेली
सूर्यतनू’
‘स्वप्नांचे दुःख’ या कवितासंग्रहातील ‘वेद’ या कवितेत कवी  म्हणतो –
तुझा एकेक अश्रू
बनून गेला मोती
माझा वेदनेचा वेद
वेधून गेला मोती
 
‘स्वप्नांचे दुःख’ या काव्यसंग्रहातील ‘सवे माझिया’ या कवितेत कवी  म्हणतो –
 व्याकुळतेची कोरीव लेणी
बनून जावे
माझे हे तन
सारे जीवन
‘कृषी कविता’ या काव्यसंग्रहातील ‘आशा’ या कवितेत कवी म्हणतो-
 मी बुडालो
तुक्याच्या अभंगासारखा
आणि समज
इंद्रायणी होऊन आली
बीजाने अंकुरले
तर पीक धरते
असे भावोत्कट व रसपूर्ण काव्यलेखन प्रा.मुथा यांनी केले आहे.त्यातही वैविध्यपूर्णता आहे, नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचे धाडसही त्यांनी केले आहे. 
   ‘प्रतिबिंब’,’ गंगेच्या काठी’या कादंबऱ्या, ‘पंख माझे बांधलेले’ सारखे एक अंकी नाटक, तर ‘सुनंदा’ हे संपूर्ण स्त्रीपात्री नाटक, तर ‘इंटरव्यू’ हे मुक्त नाट्य,असे नाट्यलेखन त्यांनी केले आहे. ‘फ्रान्सच्या फिरतीवर’ हे त्यांचे प्रवासवर्णन,नगर जिल्ह्यातील प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे ‘साद’ या नावाने संपादन,’सौंदर्यवेध’ या पुस्तकात कलेतील सौंदर्य या संकल्पनेचे तात्त्विक चिंतन मुथा करताना दिसतात.मुथा यांनी स्फुट स्वरूपाचे समीक्षणात्मक लेखन केलेले आहे. ‘विचार वैभव’या कृषी विद्यापीठाला नियोजित केलेल्या पाठ्यपुस्तकाचे संपादन, कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक ‘सरिता’चे संपादन, सोनग्रा यांच्या ‘व्यासपीठावर” या पुस्तकाचे संपादन मुथा यांनी केले आहे.बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या काव्यसंग्रहाचा ‘आंतरभारती’ या मासिकातून क्रमशः अनुवाद, आचार्य रजनीश यांच्या ‘क्रांतिबीज’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला आहे. नवभारत, किर्लोस्कर, स्त्री ,मनोहर, सह्याद्री, आलोचना, अनुप्रिता, दैनिक सकाळ,आपला महाराष्ट्र, लोकसत्ता,केसरी,  लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सार्वमत, नवा काळ या नियतकालिकांतून आणि वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर शेकडो लेख आणि कविता त्यांच्या प्रकाशित झाल्या आहेत.हे लेखन त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वाची साक्षच  म्हणावी लागेल.प्रा.मुथा यांच्या समग्र साहित्यावर २००८ मध्ये पुणे विद्यापीठात डॉ. राजू रिक्कल यांनी पीएच.डी.केली आहे.
       प्रा.मुथा हे सौंदर्यशास्त्राची जाण असलेले, साहित्यविचारावर भाष्य करणारे, मराठी भाषा शुध्दिकरणाच्या संदर्भाने जागृत असलेले असे चिकित्सक, चोखंदळ, रसिक, अभ्यासक व समीक्षक असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याकडून साहित्यकृतींवर समीक्षालेखन घडले आहे. मुथांचा स्वभावच मुळी क्रियाशील असण्याचा आहे. विद्यार्थीदशेपासून तर आजतागायत ग्रंथांवर परीक्षणे,निरीक्षणे,आकलने,समीक्षणे,ग्रंथपरिचय या स्वरूपाचे लेखन ते करीत आलेले आहेत.यात आस्वादक समीक्षणांची संख्या अधिक असली, तरी गुणदोषात्मक पाहणी व त्यावरील अभिप्राय मोठ्या खुबीने अर्थात हळुवारपणे मुथांनी नोंदविले आहेत.त्यांची प्रतिभाजन्य समीक्षा लेखनवृत्ती,सौंदर्यदृष्टी,साहित्यशास्त्रीय प्रगल्भता, स्पष्ट वक्तेपणा बरोबरच सहदयता व स्वागतशील प्रोत्साहकता यामुळे मुथांचे समीक्षा लेखन साहित्यिक,साहित्यकृती आणि वाचक यांना यथोचित साहाय्य करणारे आहे.
      तत्त्ववेत्ता किंवा सौंदर्यवेत्ता किंवा समीक्षक आणि संशोधक असे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती ही प्रत्येक क्षेत्रांत नाविन्याचा शोध,नाविन्याचा बोध,चिकित्साबुध्दी, उद्बोधन या दृष्टीनेच लेखन करीत असते, हे लक्षात घेतले तर जवाहर मुथांचे कवी आणि कादंबरीकार हे व्यक्तिमत्त्व बाजूला ठेवले,  तर अन्य सर्व बाबतीत त्यांचे प्रगल्भ, विचारवंत व तत्त्वचिकित्सक असे व्यक्तिमत्त्व आहे,असे निर्विवादपणे म्हणता येते.’सौंदर्यवेध’ या पुस्तकात साहित्य, शिल्प,नाट्य, चित्रपट, पत्रकारिता या क्षेत्रांतील कलाकृतींवर समीक्षात्मक आणि वैचारिक लेखन करीत ‘सौंदर्य’ या संकल्पनेचे ते तात्त्विक चिंतन करताना दिसतात. 
       ‘नाटक’ या प्रयोगसिद्ध वाङ्मय कलेसंदर्भात लेखक, साहित्यकृती,सादरकर्त्यांचा संच, नेपथ्य, प्रेक्षक आदी सर्व घटकांचा विचार मुथांनी केला आहे.त्याचबरोबर सौंदर्यशास्त्राचा विचार प्रत्येक घटकाला परिणामाच्या स्वरूपात लावून कलामूल्यांचा शोध त्यांनी घेतला आहे. 
       चित्रपट समीक्षा करताना मूळ कथावस्तू,पटकथा, संवाद,चित्रीकरण,पात्रे,अभिनय, संगीत, दिग्दर्शन आणि  प्रेक्षकांचा प्रतिसाद,त्याचबरोबर ऐतिहासिक आणि नाविन्यता या सर्व घटकांवर सौंदर्यलक्षी पद्धतीने ,तटस्थपूर्वक तरी गुणग्राहकतेने मुथा समीक्षा करतात.
     प्रा.मुथा यांच्या या बहुविध कार्याचा गौरव त्यांना विविध नामवंत आणि प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवित करून करण्यात आलेला आहे.त्यांच्या ‘भविष्यवेध’ या पुस्तकाला तत्त्वज्ञानांतर्गत महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार,बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, तुका म्हणे साहित्य पुरस्कार,कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार, राष्ट्रपती डॉ. नारायणन यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा सुपुत्र ‘म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.त्यांचा सन्मान करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. 
    सदैव क्रियाशील राहणे हा प्रा.जवाहर मुथा यांचा स्वभावच आहे. आजही ते सामाजिक, साहित्यिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,धार्मिक,अध्यात्मिक,राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.प्रा.मुथा सरांचे विविध क्षेत्रांतील अफाट कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.  प्रा.जवाहर मुथा सर १२ मार्च २०२५ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.मनाने ते आजही तरुणच आहेत.सरांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!! 
     या शुभेच्छा त्यांच्याच कवितेच्या काही ओळींतून…
 त्या रंगछटांचे एखादे
इंद्रधनू करता आले तर
पाहावे म्हणून काट्यांना
दूर सारत हात सरसावतात
गुलमोहर तेव्हाच लाजरा होऊन
झडू लागतो
मी आपल्या पुन्हा उन्हाची
तिरीप चुकवीत फुलांचे झाड
शोधू लागतो….

Leave a Reply