marathi, marathi news paper, managarsanket news, nagarsanket,संपादकीय....

 

 

शुद्धलेखन

शुद्धलेखनावर पुन्हा लिहावे लागेल असे वाटले नव्हते परंतु चाळीसगावच्या अंकुर साहित्य संमेलनात जी चर्चा झाली त्यावरून मराठीसाठी ती काळाची गरज आहे, असे आम्हाला वाटते. काही विद्वान असे म्हणतात की, कोणतीही भाषा किंवा बोली ही शुद्धच असते, असे भाषा वैज्ञानिक सांगत आहेत. शुद्धलेखन हा शब्दच मुळात चुकीचा आहे असेही काही जण सांगतात. आणखी एक प्रवाह असा आहे की, मराठीतून ऱ्हस्व इकार उकार काढावे आणि सर्वच ईकार ऊकार दीर्घ लिहावेत. वरील तीनही विचार पद्धती मूळत: चुकीचे आहेत असे आम्हाला वाटते. कारण त्या मराठी प्रमाण भाषेचे प्रमाणत्व नष्ट करणारे आहेत. प्रमाण भाषेला नियम असतात. हा सार्वत्रिक व जागतिक सिद्धांत आहे. म्हणून प्रमाण भाषेला मारक असलेली गोंधळाची स्थिती उत्पन्न होऊ न देणे ही मराठी भाषकांची जबाबदारी आहे. अर्थातच मराठीला शुद्धलेखनाचे नियम असणे ही एक आवश्यक बाब आहे. मराठी संस्कृत पेक्षा वेगळी व स्वतंत्र भाषा आहे. मराठीची प्रवृत्ती व प्रकृती संस्कृतपेक्षा भिन्न आहे. या दोन भाषांचे रूपभिन्नता लक्षात घेऊन महामंडळाने १९६२ मराठी शुद्धलेखनाचे नवीन नियम अस्तित्वात आणले ते आजपर्यंत चालू आहेत. अलीकडच्या काळात शाळा महाविद्यालयात हे नियम न शिकवल्यामूळे मराठी लेखनात दोष निर्माण झाले आहेत. खरे तर या सर्व बाबींची जबाबदारी शिक्षक व प्राध्यापकांवरच येते. परंतु ती जबाबदारी झटकून हा वर्ग नियम बदलण्यात उद्युक्त झाला आहे असे वाटते. तरी ही मराठी ही चंद्रपूर, गडचिरोली पासून तो रत्नागिरीपर्यंत सामान्य माणसांची भाषा आहे म्हणून खेड्यापाड्यातीलही मराठी भाषिकांना ती सुलभपणे शुद्धस्वरूपात लिहिता येईल ही दृष्टी ठेवून शुद्धलेखनासंबंधी नियम तपासले पाहिजेत, असे आम्हाला वाटते. मराठी शुद्धलेखनाचे फक्त सोळा नियम आहेत. दोन दिवसात हे सर्व नियम अभ्यासून त्याप्रमाणे मराठी शुद्ध लिहिता येऊ शकते. ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. अनुच्चारित अनुस्वार देऊ नयेत, एक अक्षरी शब्द दीर्घच लिहावा, अंत्याक्षरातील ईकार व उकार दीर्घच लिहावे त्याला अपवाद नसावे, शब्दांना प्रत्यय लागला तरी अन्ताक्षर दीर्घ लिहावे व एकारान्त आडनावाचे सामान्यरूप एकारान्तच ठेवावे. असे जर केले तर आम्हाला वाटते मराठी शुद्धलेखनाचे नियम हे अत्यंत सोपे व सहज होऊ शकतील. सर्वांत मोठी अडचण अशी आहे की आज तत्सम, तद्भव, देशी, परदेशी शब्द कोणालाही पूर्णत: परिचित नाही किंवा त्याविषयीची माहितीही नाही. संस्कृतचा अभ्यास असल्याशिवाय हे ओळखणे अवघड आहे. संस्कृत भाषा आज अभ्यासक्रमामध्ये फारशी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठी अडचण निर्माण होत आहे. याची पूर्ण जबाबदारी संस्कृत शिवाय ज्यांनी वीस वर्ष अभ्यासक्रम राबविला त्यांच्यावर येत नाही काय ? तेव्हा अजूनही संस्कृतचा समावेश अभ्यासक्रमात करणे आवश्यक आहे असे ही आम्हाला वाटते. जगातल्याच सर्वच मान्य भाषांचे लेखनाचे नियम आहेत. त्या भाषा शिकणाऱ्यांना ते पाळावे लागतात ही एक सुसंस्कृतेची निशाणी आहे. नियम अस्तित्वात आले म्हणजे लेखनात समानता येते. हे नियम बहुतांशी उच्चारणाशी सुसंगत असावे. लेखनाचे सुलभीकरण व्हावे म्हणून नियमात बदल करणे अनावश्यक आहे.


एक अभिनंदनीय प्रवास
२०० वर्षातील ऐतिहासिक घटना

"प्रा. जवाहर मुथा यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास (सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकारिता पार्श्र्वभूमीच्या विशेष संदर्भासह)' या विषयावर प्रा. राजू रिक्कल यांनी पुणे विद्यापीठात डॉ. अनिल सहस्रबुद्धेंच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. साठी प्रबंध सादर करून ती पदवी स्वीकारली आहे, ही आमच्या दृष्टीने तरी अनन्यसाधारण अशीच घटना आहे. एक तर विषय-व्यक्ती हयात असताना अशा प्रकारचा अभ्यास संशोधनासाठी घेणे व ते पुणे विद्यापीठाने स्वीकारणे हीच खरी तर अभूतपूर्व घटना आहे. अशा घटना या ही अगोदर झालेल्या आहेत व ते सर्व प्रबंध पुढील संशोधनासाठी अत्युपयोगी ठरत आहेत. परंतु या सर्व व्यक्ती व प्रा. जवाहर मुथा यात थोडा फरक आहे, असे आम्ही मानतो. तसा विचार कोणी करू नये परंतु हे मान्यच करावे लागेल की एक अ-मराठी व्यक्ती मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी अतुलनीय त्याग, सयंम व ध्येय्यनिष्ठेने वेडे होऊन सातत्याने पन्नास वर्षे कार्य करीत आहेत व त्या कार्याची दखल विद्यापीठासह अनेकांना आता तरी घ्यावी लागत आहे. आजच्या राजकारणाच्या धकाधकीत कदाचित ही दखल अत्यंत धीमेपणाने किंवा अनुल्लेखाने घेतली जाईल, याचे ही भान आम्हाला आहे. ईर्षा, असूया, मत्सर आणि अकारण निर्माण झालेले हेवेदावे यांमुळे स्वतंत्र वृत्तीच्या मुथांची उपेक्षाच होण्याचा संभव आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्या साहित्यातील सकारात्मकता कोणालाच नाकारता येणार नाही, हे निर्विवाद आहे. त्याचे खरे श्रेय द्यावयास हवे ते प्रा. राजू रिक्कल व त्यांचे मार्गदर्शक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांना ! प्रा. मुथांची व प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे यांची मैत्री नगर जिल्ह्यात व महाराष्ट्रात ही सर्वांना सुपरिचित आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांनी प्रा. मुथांचे अनेक साहित्यविषयक गुणधर्म ओळखले. नुसते ओळखले नाहीत, तर त्यांतील मूल्यगर्भित चिकित्साही ध्यानी घेतली, प्रा. मुथांच्या काही ग्रंथांचे लेखनकार्य ही त्यांच्या समक्षच होत गेले. "एका ज्योतिषाची डायरी' या ग्रंथांचा लेखन-प्रपंच प्राचार्य सहस्रबुद्धे यांनी "चक्षुर्वैसत्य' पाहिला व अनुभवलाही ! मुथांची ही साहित्यसेवा तमाम मराठी बांधवांना माहिती व्हावी व त्याचे यथायोग्य परिशीलन व्हावे, असे त्यांना, त्यामुळे न वाटले, तरच नवल ! व ती गोष्ट त्यांनी या माध्यमातून घडवून आणली ! त्यांचे हे मित्रऋण प्रा. मुथा अनेकदा खाजगी बैठकीत व जाहीर रित्याही मान्यच करतात. नगर जिल्ह्यापुरतेच बोलावयाचे झाल्यास, गेल्या दोनशे वर्षात कधीच घडले नाही ते आता घडले आहे, ही एक ऐतिहासिक बाब आहे असे आम्हाला वाटते. या नगर जिल्ह्याला साहित्यसेवेची मोठी परंपरा आहे. हा जिल्हा संत ज्ञानेश्वर, संत दासगणू, साईबाबा, नवनाथ संप्रदायाचा जसा आहे तसा आनंदऋषी, मेहेरबाबांचे ही सान्निध्य व वास्तव्य लाभलेला आहे. या जिल्ह्यातून द. कों. घाटे, वि. द. घाटे, लक्ष्मीबाई टिळक, रे. ना. वा. टिळक, मनोरमाबाई रानडे, ह.की. तोडमल, मधुकर तोरडमल, ग. ल. ठोकळ सारखे अनेक दिग्गज साहित्यिक घडवले आहेत. बालकवी व आचार्य अत्रेंचे ही कैक वर्षे सातत्याने वास्तव्य या शहराला लाभले. डॉ. गंगाधर मोरजे सारखे प्रगाढ लोक साहित्य जाणणारे गाढे अभ्यासक या शहरातीलच ! आज ही या जिल्ह्यात यशवंतराव गडाख, सु.प्र.कुलकर्णी, अरुण शेवते, टी.एन्. परदेशी, रावसाहेब कसबे, लक्ष्मण हर्दवाणी, र.बा. मंचरकर, विलास गीते, रतनलाल सोनग्रा, सुधा कांकरिया सह अनेक साहित्यिक आपापल्या परीने साहित्य सृजनतेत तल्लीन आहेत. परंतु या सर्वांमध्ये आघाडी घेतली ती प्रा. जवाहर मुथा यांनीच ! गेली १६ वर्षे साप्ता. नगर संकेतच्या माध्यमातून त्यांनी केलेली वाङ्मयीन सेवा ही निखळ व मौलिक आनंद देणारी अनिर्वचनीय अशी बाब ठरली. ज्योतिष, परिचर्चा, चरित्र, समीक्षा, कथा, कादंबरी, नाटक, काव्य, तत्त्वज्ञान, आणि अध्यात्म या साहित्याच्या सर्व विधात त्यांनी लिलयेने ग्रंथरचना केली. साहित्य चळवळीत ते मोठ्या आकांक्षेने सहभागी झाले. चाळीस वर्षाची पत्रकारिता ही त्यांच्या बाजूने जमा आहेत. नगर संकेत मधून यांनी लिहिलेले पाचसहाशे अग्रलेख तर एक अनमोल असा खजिनाच ठरावा ! प्रा. मुथा स्वत: तीस-पस्तीस वर्षे विद्यापीठ पातळीवर प्राध्यापक ही होते. त्यांच्या या समग्र कार्याची नोंद आता विद्यापीठाय पातळीवर घेतली गेली आहे, याचे परिपूर्ण समाधान आम्हाला आहे. इतर कोणाच्याही वाट्यास न आलेले वर्ण्य विषय होण्याचे भाग्य त्यामुळे त्यांना लाभले व नगर जिल्ह्यातील साहित्य सेवेला एक नवा आकार त्यामुळे प्राप्त झाला. आमच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत महत्त्वाची अशीच आहे. आणि म्हणूनच आम्ही जाहीररीत्या प्राचार्य सहस्रबुद्धे व प्रा. राजू रिक्कल यांचे अभिनंदन करतो. साहित्याचा हा अभिनंदनीय प्रवास आता पुढे ही चालू राहो, हीच सदिच्छा !


कर्मयोगी कवीचे अवसान

बाबा आमटेंच्या निधन हे वृद्धापकाळाने झाले असले तरी त्यांचे साहित्य व सामाजिक कार्य अमर असेच आहे. बाबांचा व आमचा संबंध आम्ही धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असताना सन् ७४-७५ मध्ये आला होता. धुळ्याचे एक धडाडीचे युवा नेते प्रा. मु. ब. शहांनी आमची ओळख त्यावेळी बाबांशी करून दिली होती. त्या नंतर ७/८ वेळा तरी आम्ही बाबांना भेटलो असेन. चंद्रपूरहून वरोरा येथे जाऊन त्यांचे कार्य ही पाहण्याची संधी तेथे राहून आम्हाला मिळाली होती. देशातील युवाशक्तीवर त्यांचा दृढ विश्र्वास होता. ही युवाशक्तीच देशाचा विकास करेल, असे ते नेहमी म्हणत असत. त्यांच्या "ज्वाला आणि फुले'चा मराठीतून हिंदी अनुवाद आम्ही ७४-७५ मध्ये केला होता. "आंतरभारती' या पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या मासिकात तो क्रमश: प्रकाशित झाला होता. तो वाचून साधनाताईंनी आम्हाला पत्र लिहिले होते. आम्ही केलेला हिंदी अनुवाद त्यांना अत्यंत पसंत पडला होता. त्या कवितांचा संग्रह अजूनही प्रकाशित झालेला नाही, याची सल यावेळी ही आहे. काही महिन्यापूर्वी बाबांचे चिरंजीव प्रकाश आमटेंशी आम्ही भ्रमणध्वनीवरून बोललोही होतो व बाबांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. १९९९ मध्ये जेव्हा बाबांना म. गांधी शांतता पुरस्कार मिळाला होता तेव्हा साप्ता. नगर संकेतच्या वतीने अहमदनगरला बोलावून आम्ही त्यांचे स्वागत व सत्कार केला होता. ते सर्व चित्र आमच्या डोळ्यांसमोर अजूनही तरळते. बिछान्यात सदोदित आडवे असणारे बाबा त्या दिवशी उठून उभे राहिले होते व त्यांनी आमचा सत्कार आवर्जून स्वीकारला होता. साधनाताई ही त्यावेळेस सद्गदित झाल्या होत्या. बाबा म्हणजे तरुणाईचा खरा जल्लोष होते. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात गांधी तत्त्वज्ञानाचे स्मरण जसे होते तसेच तरुणांकडून नवराष्ट्र निर्मितीची त्यांची आकांक्षा ही त्याच तत्त्वज्ञानाचे परिणामस्वरूप फल ही होते. बाबांच्या जीवनावर एखादा महान चित्रपट निघावा असे त्यांचे जीवन होते. ते श्रेष्ठ कर्मयोगी होते. गीतेतील कर्मयोग ज्यांना कळला, त्या पैकी ते होते. आचरण, चिंतन व कर्मात त्यांची एकसूत्रता होती. म.गांधीकडून सेवाव्रताची प्रेरणा त्यांनी घेतली, विनोबांकडून धर्मचिंतनाचा विवेक त्यांनी घेतला व सरदार पटेलांकडून निश्र्चयाच्या महामेरूवर उभे राहून कार्य करण्याची तपश्र्चर्या त्यांनी आत्मसात केली. "सेवा हीच प्रार्थना' असे समजून ते आंतर्बाह्य मृदू मुलायम लोण्यासारखे झाले. बाबांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यांनी मनात आणले असते तर ते एक उत्कृष्ट कायदेपंडित झाले असते व खोऱ्याने पैसा मिळवला असता. परंतु तसे करणे त्यांना योग्य वाटले नाही. "सेवा' हेच जीवनसूत्र मानून त्यांनी कुष्ठरोग्यांची, आदिवासींची मनोभावे चाकरी केली. त्यांनी निर्माण केलेले "आनंदवन' म्हणूनच एक तीर्थक्षेत्र बनले. बाबांच्या कामाची तुलना कोणाशीही होऊच शकत नाही. मदर तेरसांचे कार्य एका "मिशन' तर्फे होते व त्यात त्या यशस्वी झाल्या व त्यांना शांततेचे "नोबेल' मिळाले. बाबांच्या कार्याशी त्यांची तुलना केली तर बाबा त्यापेक्षा कितीतरी सरस होते. परंतु बाबांना "नोबेल' मिळू शकत नव्हते; कारण त्यांच्या मागे "मिशन' ही नव्हते की एखादे "राष्ट्र' ही नव्हते! ते "स्वयंभू' होते. म. गांधींना "नोबेल पुरस्कार' न देण्याची चूक या वर्षी पुरस्कार समितीने मान्य केली; काय सांगावे; आणखी पन्नास-साठ वर्षांनी बाबांना ही "नोबेल' पुरस्कार न देण्याची "चूक' समिती मान्य करेल ! कारण बाबा केवळ सेवाभावी कार्यकर्तेच नव्हते, तर तरल मनाचे, भावुक वृत्तीचे आणि नाजूक शब्दसंपदा लाभलेले कवी ही होते. "ज्वाला आणि फुले' हा कवितासंग्रह त्याची साक्ष आहे. आणि आम्हास नम्रपणे अभिमान एव्हढाच आहे की त्याचा हिंदी अनुवाद आम्ही करू शकलो. बाबांच्या सहवासातले चार-आठ दिवस म्हणूनच आम्हाला चिरंतन ठेवा वाटतो. बाबांच्या कार्याचा वसा पेलविणारा आता कोणताही नेता भारतात नाही, याचा विषाद मनाला वाटतो. "जोडो भारत' साठी पदयात्रा काढणारा, पंजाब व काश्मिरातील दहशतवाद थोपविण्यासाठी अविश्रांत कृतिशील विचार करणारा, आणि देशातील गांजलेल्या लोकांची मनोभावे सेवा करून युवकांना देशप्रेमासाठी चेतविणारा हा नेता आपल्या परीने सर्वश्रेष्ठ असाच होता. त्यांना श्रद्धांजली वाहताना दोन्ही कर जसे जुळतात तसेच मस्तकही नत होते! रंजल्या-गांजल्यासाठी सेवा करणारा युवाशक्तीला चेतविणारा, राष्ट्र उभारणीचा ध्यास धरणारा, गांधी तत्वज्ञानाचा सदोदित पुरस्कार करणारा हा नेता अमर आहे !


रेने देकार्तचे स्मरण !

आज सर्वत्र अंधश्रद्धा फैलावत आहेत. त्यांचा विस्तार अधिक व्यापक व कल्पक व्हावा म्हणून दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या आणि त्यात भर म्हणून सर्व दैनिक वृत्तपत्रे ही आपापला हातभार उचलीत आहेत. निष्क्रिय माणूस हा नेहमीच नशिबाचा हवाला देत असतो. तेच चित्र आज सर्वत्र प्रामुख्याने दिसते आहे. अशा वेळी आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून ज्याचा उल्लेख सतत होतो त्या फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्तचे स्मरण होते. ११ फेब्रुवारी हा त्याचा स्मृतिदिन. बरोब्बर तीनशे अठ्ठावन्न वर्षापूर्वी त्याचे निधन झाले. ज्ञान हे बुद्धिजन्य असले पाहिजे आणि ज्ञानाचा उगम बुद्धीतच आहे, असे मानणारा हा पहिला तत्त्वज्ञानी ३१ मार्च १५९६ रोजी फ्रांस मधील तुरेन गावी जन्मला. व ११ फेब्रुवारी १६५० रोजी हॉलंड मध्ये त्याचे निधन झाले. चौपन्न वर्षाच्या जीवनात सुरुवातीची पंधरा वर्षे सोडली तर जवळजवळ चाळीसेक वर्षे त्याने बुद्धिवादाच्या प्रसाराची मुहूर्तमेढ रोवून अविश्रांत वैचारिक भूमिका प्रतिपादन करीत राहिला. देकार्त जसा तत्त्वज्ञ होता तसाच तो उत्कृष्ट गणिती व नामवंत वैज्ञानिक ही होता. विश्र्वातील सर्व घटना कार्यकारणभावाने नियत अश्या आहेत, तो कार्यकारणभाव गणिताच्या भाषेत मांडता येतो, हे जगात सर्वप्रथम देकार्तने मांडलं. भूमितीची मांडणी विश्लेषक पद्धतीने करून त्याने त्या ही क्षेत्रात एक आगळंच योगदान दिलं. कोणती ही श्रद्धा बुद्धीच्या कसोटीवर तपासली पाहिजे, असे तो नेहमी म्हणे. एखादा विचार आपण स्वीकारणार असू तर त्याबद्दल बौद्धिक सिद्धांत देता आला पाहिजे, असा बुद्धिवादाचा पुरस्कार तो करे ! तत्कालीन युरोपमध्ये ज्या काळी रोमच्या धर्मसत्तेच्या विरोधात जाऊन विज्ञानाचा तात्त्विक पाया बुद्धिवादाच्या चौकटीत मजबूत करणं अत्यंत अवघड कार्य होतं, ते त्यानं २३ वर्षे अज्ञातवासात राहून केलं ! आपल्या जीवनाची पहिली पंचवीस वर्षे नोकरी, भटकंती, प्रवास, चर्चा, अध्ययनात त्यानं व्यतीत केली. आणि त्या नंतर वैचारिक क्रांतीवर त्याचं विचार मंथन सुरू झालं. २० वर्षे अज्ञातवासात राहून त्यानं २३ निवासस्थाने बदलली व "ल मॉन्द' नावाचा वैज्ञानिक दृष्टिकोन समर्थन करणारा ग्रंथ लिहिला. वैचारिक दृष्ट्या क्रांती प्रेरक अशी आधिभौतिक प्रणाली या ग्रंथात प्रथमच मांडली. त्यानंतरच्या काळात "डिस्कार्स ऑन द मेथड', "मेडिटेशन्स' या त्याच्या ग्रंथरचनांनी अधिभैतिकतेचा मूलाधार असणाऱ्या विचारप्रणालीचा मुक्त असा आविष्कार करून दाखवला. "मी विचार करतो म्हणून मी आहे'- हे तत्त्व देकार्तच्या अधिभैतिकतेचा मूलाधार आहे ! हे तत्त्व म्हणजे ज्ञान व जाणिवेचा एक उत्तम आविष्कार आहे असे तो माने. हेच तत्त्व पुढे ठेवून पुढील सर्व चिंतनातून फक्त स्वच्छ आणि स्पष्ट अशा कल्पनांतूनच प्रतीत होणारं सत्य त्यानं स्वीकारलं. देकार्त हा वास्तववादी विचारवंत होता. पूर्णांशाने संशयरहित ज्ञान हेच तत्त्ववेत्त्याचं अंतिम ध्येय आहे असे तो सांगत असे. त्याच्या या समग्र सिद्धांतावर पुढे १७ व १८ व्या शतकात जगातील तत्त्ववेत्त्यांनी ऊहापोह केला व ते स्वीकारले. आज आम्हाला देकार्तचे स्मरण याचमुळे होते. मराठी व भारतीय मनात अंधश्रद्धांचे उठणारे मोहोळ जाळून भस्म झाले नाहीत तर त्यात सबंध मानवजात नामशेष होईल, असे आम्हाला वाटते. तसे व्हायचे नसेल तर आपण वेळीच जागे झाले पाहिजे. विचार, तत्त्वज्ञान व बुद्धीच्या पवित्र त्रिकोणात आपली कृती बहरली नाही तर वलयांकित दौर्बल्य येऊ शकेल ! ते येऊ नये म्हणूनच रेने देकार्त व त्याच्या विचारांचे स्मरण आपण करू या ! व असत्याला तिलांजली देऊ या !


ग्रंथाचे अंकियकरण

सध्या इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे फार मोठ्या प्रमाणात अंकियकरण होऊ लागल्याची बातमी साता-समुद्रापारहून आमच्याकडे आली आहे. ध्वनी व चित्रांचे "अंकियकरण' (डिजीटायझेशन) ही संकल्पना आपल्याकडे रूढ असून आता शब्दांचे व पर्यायाने ग्रंथांचे अंकियकरण होऊ लागले आहे. मराठी भाषेतील अनेक दुर्मीळ पुस्तके जी आत्तापर्यंत धूळ खात मोठ-मोठ्या ग्रंथालयात पडून आहेत त्यांचे या "अंकियकरणा'च्या दृष्टीने प्रयोग करणे आता अनिवार्य झाले आहे, असे आम्हाला वाटते. पुस्तकातला मजकूर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन संगणकात साठवण्याच्या पद्धतीला पुस्तकाचं अंकियकरण (डिजिटायझेशन) या नावाने आता संबोधू जाऊ लागले आहे. त्याचा वापर स्थानिक पातळीवर किंवा इतरत्र पोहोचविण्यासाठी होत असतो. "आंतरजाळ्या'द्वारे (इंटरनेट) हे शक्य होत असते. या संकल्पनेची मुहूर्तमेढ सगळ्यात पहिल्यांदा "कार्पोरेशन फॉर नॅशनल रिसर्च इनिशिएटिव्हज'ने १९८८ च्या सुमारास रोवली. त्यानंतर १९९४ च्या सुमारास एन.एस.एफ./डी.ए.आर.पी.ए./एन.ए.एस.ए. यांच्या अंकिय ग्रंथालयामुळे (डिजिटल लायब्ररींमुळे) त्याला सर्वत्र लोकप्रियता मिळाली. अंकिय ग्रंथालय हा शब्द सर्वत्र जरी प्रचारात असला, तरी वास्तविक त्या संकल्पनेअंतर्गत काही गोष्टींची पूर्तता करणं अत्यावश्यक ठरते. डिजिटल लायब्ररी हे पुस्तकांचे ऑनलाईन कलेक्शन असून त्याचं योग्य व्यवस्थापन करणं आणि त्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं जरुरीच आहे. त्याअर्थी काही वेब साईट्स या संकल्पनेअंतर्गत मोडत असल्या, तरी सगळ्याच वेब साईट्स डिजिटल लायब्ररी या नावाने संबोधल्या जात नाहीत. पण आता इंटरनेटचा वाढता वापर आणि सुलभ शोधप्रकियेमुळं युरोपियन लायब्ररी आणि लायब्ररी ऑफ कॉंग्रेससारख्या लायब्ररीजही या प्रकारावर भर देण्याच्या प्रयत्नात आहेत. डिजिटल लायब्ररीचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अतिशय सहजपणे माहिती, पुस्तकं आणि छायाचित्रं उपलब्ध होतात. त्यासाठी काळ-वेळाची बंधन नसतात आणि बसल्या जागी हा सर्व व्यवहार पार पडतो. या लायब्ररीत कमीतकमी जागेत जास्तीत जास्त माहिती पाठवून ठेवण्याची सोय उपलब्ध असते. त्यामुळे जागेची बचत होते. एकाच वेळी अनेक जण एकाच माहितीच लाभ घेऊ शकतात. कर्मचारीवर्ग कमी लागतो. सतत पुस्तकांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. त्यांचं काळजीपूर्वक जतन करावं लागत नाही. त्यामुळे व्यवस्थापन खर्च कमी होतो. डिजिटल लायब्ररी मुळातच तांत्रिक स्वरूपात असल्यामुळे तिला सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येतं आणि इलिक्ट्रॉनिक अथवा ऑडियो बुक टेक्नॉलॉजीचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. त्याप्रमाणे विकी आणि ब्लॉग्झसारख्या नव्या कम्युनिकेशन प्रकारांत त्यांना सक्रिय राहता येतं. डिजिटल लायब्ररीला जगभरातून मोठी मागणी असली, तरी त्यामुळे कॉपीराईट कायद्यामुळे त्यात वारंवार अडचणी येत असल्याची तक्रार अनेकजण करतात. कारण एका ठरावीक कालावधीच्या वर त्याचे कॉपीराईट्स मिळू नयेत अशी त्यांची इच्छा असते. पण गटेनबर्गसारखी लायब्ररी मात्र त्यांचा डिजिटायझेनशन करून संपूर्ण माहिती अतिशयपणे सगळ्या लोकांना उपलब्ध करून देते. अर्थात त्यावर उपाय म्हणून काही लायब्रीरजनी कॉपरीराइट लायसेन्स इश्यू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाचकांना आवश्यक ती रॉयल्टी भरल्यावरच माहिती उपलब्ध होते. या लायब्ररीचा वापर करते वेळी दुसरा अडथळा म्हणजे वापरणाऱ्याला सतत कॉम्प्युटर, वीज आणि कम्युनिकेशन लिंक्ससारख्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागत. त्यातल्या एखाद्या गोष्टीत कमी-जास्त बदल झाला, तरी सगळी कार्यप्रणाली थांबण्याची शक्यता असते. त्याशिवाय जगातले प्रगत देशच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतात. पण त्याच्या तुलनेत तिसऱ्या जगातल्या नागरिकांना मात्र सहजरीत्या त्याचा वापर करता येत नाही आणि या मर्यादेतून दोन देशांत वाढती दरी निर्माण होते. आज इंग्रजी ग्रंथाचे अंकियकरण करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. ते साकार झाले, की डिजिटल लायब्ररीची संकल्पना विस्तारण्यास मदतच होईल. एकंदर परिस्थिती बघता भविष्यात हीच पद्धत प्रचलित होणार असल्याची चिन्हं दिसून येते आहेत आणि असं घडलं, तर आत्ताची ग्रंथालयं पुरणवस्तुसंग्रहालयांत जमा होतील. तेव्हा आत्तापासूनच मराठीतील तंत्रज्ञानांनी ही हे तंत्र आत्मसात करण्यास प्रारंभ करावा, असे आम्ही आताच सुचवून ठेवतो.


साहित्याचा सारथी "श्रीकृष्ण'

साहित्याचे सारथी श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत जाऊन पंधरा दिवस झाले असतील. ऑगस्ट मध्ये त्यांनी आपली इहयात्रा संपवली, आणि अनेक मराठी प्रथितयश लेखकांना एक साहित्यिक आधार नाहीसा झाल्यासारखेच वाटले. ते खरे ही होते. कारण मुंबईतल्या अनेक लेखकांना त्यांनी घडविले होते; पन्नास वर्षापूर्वी मराठी साहित्यामध्ये नवसाहित्याचे जे एक नवयुग अवतरले, तिला पक्की बैठक श्रीपुंच्या मौज व सत्यकथा या साप्ताहिक/मासिकाची होती. श्रीपु तसे अबोल होते. परंतु त्यांनी या नवतेचे प्रणेते गंगाधर गाडगीळ, मर्ढेकर, करंदीकर, श्री. ना. पेंडसे, यांच्या नवतेच्या ध्वजेला मराठी साहित्याची गुढी समजून उभारी दिली व या साहित्य रथाचे यशस्वी सारथ्य केले. ग.रा. कामत, राम पटवर्धन सारख्या चतुरस्र शिलेदारांकडून त्यांनी सखोल आशयाची प्रशस्त वाट तयार केली. त्यांच्या या प्रयोगशीलतेमध्ये मन:पूर्वकता जशी होती तशीच अबोल राहून कृतिशीलतेची तयार केलेली व्यापकता ही होती. तसा श्रीपु जवळ फारसा वाङ्मयीन वारसा नव्हता. कोकणातील देवरूख सारख्या- छोट्या गावातून ते मुंबईला आले होते. स्वत:चे शिक्षण सुरू असतानाच भागवत बंधूच्या मुद्रणालय आणि वृत्तपत्र व्यवसायात मूल्य संस्काराची खोल जाणीव, बुद्धिचा कष्टाळूपणा आणि व्रतस्थतेचा घरंदाज वारसा ते घेते झाले. त्याला अभिजात रसिकतेची आवडही त्यांनी दिली. आणि या स्वागतशील उपक्रमातून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले. जुन्याचा आदर व नव्याची कदर हे त्यांचे समयोचित वर्तन होते. गाडगीळ, गोखले, माडगूळकर, भावे, रा.भि. जोशी, वा. ल. कुलकर्णी, दुर्गाबाई, इरावती कर्वे, मं.वि. राजाध्यक्ष, गोडसे, मर्ढेकर, करंदीकर, मुक्तीबोध, पाडगावकर, बापट, कुसुमाग्रज, ना.घ. देशपांडे, बोरकर यांसारख्या अनेक बिनीचे लेखक, कवी, समीक्षकांना एकत्रित करून निर्माण केलेला साहित्याचा वाद्यवृंद त्यांनी झंकारून दाखविला व त्यातल्या अभिजात सुरांनी मराठी सारस्वताचे दालन अलंकृत केले. श्रीपु तसे अबोलच होते व अबोलतेनेच त्यांनी इहयात्रा संपवली. परंतु त्यांनी केळव्याच्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना मराठी भाषा आणि साहित्याबद्दल जे मूलगामी आणि सांप्रतच्या अवस्थेला अनुलक्षून विचार मांडले ते केवळ अपूर्वच होते. बावनकशी सोन्याप्रमाणे त्यांचे ते भाषण उपस्थित-अनुपस्थित विचारवंतांना ते वाटले. श्रीपुंचे अवघे जीवनच साहित्यमय होते. आमचा त्यांच्याशी तसा काही फारसा संबंध आला नाही. सत्तरीच्या दशकात आम्ही मुंबईला जाऊन त्यांना जे भेटलो होतो तेच ! परंतु यांचा साहित्य दरबारातील त्यांचा दबदबा आणि राबता आम्ही ऐकून होतो. श्रीपुनी केवळ साहित्यिकच घडवले असे नाही तर अनेक पत्रकार आणि मुख्य म्हणजे मराठी साहित्यात रस घेण्यास प्रवृत्त करून विद्यार्थ्यांमधून चोखंदळ वाचकही घडवले. त्यावेळेस ते शीवच्या एका महाविद्यालयाचे उप-प्राचार्य ही होते. सूट आणि अन्य इंग्रजी पोषाख घालणाऱ्या प्राध्यापकांमध्ये ते केवळ एकच प्राध्यापक असे होते, ज्यांनी कधीही आपल्या स्वच्छ पांढऱ्याशुभ्र धोतर-झब्ब्याशिवाय इतर कुठलाही पोषाख वापरला नाही व त्यामुळे ते उठूनही दिसायचे. घारे आणि करारी डोळे यांच्यामुळे आणि त्यांच्या धीरगंभीर चालीमुळे ते जेव्हा महाविद्यालयाच्या कॉरिडॉरमधून जात तेव्हा कुठल्याही शाखेच्या कुठल्याही विद्यार्थ्याची वर्गाबाहेर उभे राहून वेळकाढूपणा करायची हिंमत होत नसे. प्राध्यापक म्हणून तर ते अद्वितीय होतेच. विशेषत: मराठीच्या तासाच्या वेळी जेव्हा ते मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांविषयी बोलत आणि त्यांच्यातील बारकावे समजावून सांगत तेव्हा तास संपूच नये असे वाटे. त्यातच भर म्हणजे साहित्य, संगीत आणि अन्य क्षेत्रांतील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्याशी निगडित काही किस्से, गोष्टी इतक्या रंगवून सांगायचे की त्यांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असायची. काही विज्ञान शाखेचे विद्यार्थीही, आवडीने वेळ काढून ते ज्या कार्यक्रमाचे अथवा समारंभाचे अध्यक्ष किंवा वक्ता म्हणून असत, त्या कार्यक्रमांना हजेरी लावत. लेखकाचं स्वातंत्र्य आणि त्याचा आत्मसन्मान जपून त्याच्या लेखनातील कमतरता दूर करण्याच्या सूचना श्रीपुंइतक्या आत्मीय पद्धतीनं क्वचितच कुणी करू शकेल. अतिशय मृदू आणि समतोल अशा त्यांच्या वाङ्मयीन प्रतिक्रिया असायच्या. त्यांच्याजवळ एक उपजत असावा असा अभिजात संयम होता. त्यांच्या स्नेहात निखळपण होतं. मैत्रीत सच्चेपणा आणि मन:पूर्वकता होती. ज्याच्याजवळ अनेकांची भली-बुरी जीवनमर्म सुरक्षित राहतील, असं ते खात्रीचं आणि विश्र्वासाचं विसाव्याचं ठिकाण होतं. समीक्षकाच्या रूढ प्रतिमेला छेद देणारी तालेवार संवेदनशीलता त्यांच्याजवळ होती. हृदयाचं भिजलेपण होतं.श्रीपुं तेजाचे पंख वाऱ्यावर हलवित गेलेल्या शब्द-पंक्ती प्रमाणे अंतर्धान पावले. शारदेचा देव्हारा येथे ठेवून त्यातील ज्योत पाजळण्याचे कार्य तुम्हा-आम्हांला करावे लागणार आहे. आज त्यांच्या सहवासाचा नसेल परंतु सार्थक शब्दांचा आधार सर्वांनाच आहे !


श्रीकृष्ण टिळकांचे "कालजयी' कार्य

जगात वेळोवेळी अनेक कालगणना सुरू झालेल्या आहेत. त्यातील काही काळाच्या उदरात गडप झाल्या. परंतु त्यांचे एकमेकांशी असलेले नाते इतिहास शोधताना, वाचताना माहिती असावे लागते. आपल्याकडे राज्याभिषेक करताना त्या दिवसांपासून त्या त्या राज्याच्या नावाने नवीन वर्ष गणना करण्याची प्रथा पडलेली आहे. शालिवाहन राजा, विक्रमादित्य, युधिष्ठिर, शिवाजी महाराज इ. अनेक युगपुरुषांच्या नावाने नवीन शक अस्तित्वात आले. त्यानंतरच्या काळात युरोपियन व मुस्लिमांनी ही आपापली कालगणना भारतात प्रचारात आणली. जैनाचा संवत ही कालगणना ही भारतात सुरू होतीच. या सर्व कालगणनांची एकत्रित सांगड घालणे ही अशक्य कोटीतील बाब होती. त्यासाठी भरपूर परिश्रम, संशोधन असणे आवश्यक होते. मुंबईचे मोडीलिपी तज्ञ श्री. श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक (वय आजमितीस ७४) व विनायक गणेश वझे महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. सोनाली पेडणेकर यांनी आपल्या अथक परिश्रमातून व संशोधनातून या सर्व कालगणनांची सांगड घालून एक जंत्री तयार केली. इतकेच नव्हे तर अत्यंत आकर्षक स्वरूपात ती जंत्री प्रकाशित ही केली आहे. त्यांनी स्वतंत्रपणे शोधलेल्या रुपलिपीत शालिवाहन शके व महिने, इंग्रजी सन व महिने, हिजरी सन व महिने यांची कोष्टरूपाने इ.स. १७८९ पासूनची तयार केलेली ही जंत्री म्हणूनच इतिहासतज्ञ, ज्योतिषतज्ञ, खगोलतज्ञ यांना अत्यंत उपयोगी पडणार आहे. तिथी, तारीख, चांद (मुसलमानी दिवस) या सर्वांची सांगड इंग्रजी तारखेशी घालणे हे अत्यंत अवघड व क्लिष्ट असे काम श्री. टिळकांनी केले आहे. चांद्रमानाच्या तिथी व सूर्यमानाच्या तारखा यांची सांगड अधिक मासाने (किंवा क्वचित क्षयमासाने) घालावयाची असते. तशी ती येथे दर्शविली गेली आहे. मुसलमानी तारखा या अमावास्येनंतर प्रथम चंद्रदर्शनाने प्रारंभ होण्याचा प्रघात असतो. त्यांचा मेळ ना तिथीशी असतो ना तारखेशी ! ती तिरकी चाल श्री. टिळकांनी अतिशय कुशलतेने येथे एकत्रित गुंफली आहे. मराठी बरोबरच हे सर्व कार्य इंग्रजी भाषेमध्ये ही आणले गेल्याने या कार्याला जागतिक स्तरावर नेले गेले आहे. इंग्रजीमध्ये पंचांगांचे कार्य केवळ ग्रहांपुरतेच मर्यादित असते परंतु येथे त्या ही पुढे जाऊन श्री. टिळक व प्रा. पेडणेकर यांनी ही रुपलिपी त्यापेक्षा ही अनेक दृष्टीने उपयुक्त तयार केली आहे. इतिहास व राजकीय संशोधकांना ही या रुपलिपीचा भावी काळात अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार आहे. श्री. टिळकांशी जेव्हा आमचे दूरध्वनीवर बोलणे झाले तेव्हा ते थोडे निराश झालेले दिसले होते. इतके प्रचंड कार्य करून ही त्याची व्हावी तितकी माहिती व परिचय तज्ञांना होत नव्हता, या मुळे ते थोडेसे निराश होते. परंतु वयाच्या ७४ व्या वर्षीही त्यांची खणखणीत वाणी बरेच काही सांगून गेली. "अनादी निधन: काल:' असे कालाचे वर्णन निरनिराळ्या शास्त्रकारांनी केलेले आहे. कालमापन केव्हा सुरू झाले याविषयी मतभेद असले तरी तो कधीच संपणारा नाही याबाबत शास्त्रांमध्ये एकमत ही आहे. अकाली केलेले कर्म इष्टफल देत नसल्याने योग्यवेळी कर्म कर्तव्य करावे या हेतूने प्राचीन काळी कालाचे गणित शोधून काढले असावे. लगधऋर्षीचा वेदांग ज्योतिष हा ग्रंथ त्याच अनुषंगाने तयार झाला. रवि, चंद्र, तारे, नक्षत्र यांची गती मोजून यथायोग्य काल ठरविला गेला व त्याचे गणित सूत्र रूपाने प्रगट झाले. सूर्यसिद्धांताकरांनी तर इसवीसनापूर्वीच कालाची व्याख्या, परिमाणे, संख्या सांगून कालाचे मोजमाप करून आजतागायत किती काल गेला व पुढे किती काल आहे, हे ही सांगितले आहे. गणनात्मक व विनाशात्मक असे कालाचे स्वरूप असून तो स्थूल व सूक्ष्म तसेच मूर्त व अमूर्त असा आहे. श्वासोच्छासात तो मूर्त असतो तर घटिकादिकात अमूर्त स्वरूपात असतो. सहा श्वासांची एक विनाडी, ६० विनाडींची एक घटिका आणि साठ घटींचा एक दिवस- अहो रात्र असे प्रमाणे ठरून गेलेले आहे. अणुयुगात ही त्यात लेशमात्र बदल करता येत नाही. त्याहून ही सूक्ष्म असे मोजमात श्रमण संस्कृती मध्येच झालेले होते. उपनिषदे, बृहत्संहिता, मनुस्मृती इत्यादी त्यानंतरच्या ग्रंथात ही ती सांगितली गेली आहे. त्या सर्वांचा यथायोग्य अभ्यास करून विविध कालगणनांशी त्यांची सांगड घालणे ही जवळ जवळ अशक्य कोटीतील बाब श्री. श्रीकृष्ण टिळकांनी आपल्या अथक परिश्रम व संशोधनाने शक्य करून दाखविली आहे. म्हणूनच त्यांचा "पंचकाल रूपलिपी' हा ग्रंथ सर्व कालगणनांना सामावून घेणारा एक अजेय व कालजयी ग्रंथ ठरला आहे. ग्रहलाघवी व शुद्ध निरयन या दोन्ही पंचांग करण्याच्या पद्धतींचा त्यांनी केलेला शास्त्रोक्त अभ्यास या पाठीमागे आहे. म्हणूनच श्री. श्रीकृष्ण टिळकांचे हे कार्य ऐतिहासिक असेच झाले आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक म्हणून या ग्रंथाचे मोल आम्ही जाणतो आहोत व त्यांच्या या महान कालजयी कार्याचे आम्हीच काय परंतु पुढील भावी काळ ही अभिनंदन केल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री आम्हास आहे.


स्वातंत्र्याचा "नवा' अर्थ

भारतीय स्वातंत्र्याचा "नवा अर्थ' शोधावयाचा झाल्यास बऱ्याच अनैतिक गोष्टींचा विचार करावा लागेल. राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्याचे "स्वातंत्र्य' गेली साठ वर्षे उपभोगले आहे. भारतीय प्रशासनाने त्यांचा भ्रष्टाचार लपविण्याचे "स्वातंत्र्य' त्यांना मुठीत ठेवून स्वीकारले आहे, येथील उद्योगांनी भ्रष्टाचाराची विक्री टेंडर पद्धतीने सुरूच ठेवली आहे. न्यायदानात अपवाद वगळता व "अपील' करण्याच्या हक्कांमुळे गदारोळ, स्वैराचार व लाचलुचपतीचे "स्वातंत्र्य' न्यायदानाने अंगीकारले आहे. आणि हे "स्वातंत्र्य' कमी पडले म्हणूनच की काय साहित्यिकांनी व विचारवंतांनी मूल्यांचे शोषण करीत शब्दरचनेला "साहित्य' म्हणण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. गेली साठ वर्षे हे "स्वातंत्र्य' आपण उपभोगीत असताना रुपयांचे अवमूल्यन होऊ नये म्हणून जागतिकीकरणाचा आंधळा सहारा घेत अनेक परदेशी कंपन्यांना व्यापाराचे "मुक्त स्वातंत्र्य' बहाल केले आहे. उद्योगपतींनी ही या "गंगेत' हात धुण्याचे ठरवून "सेझ' ची "संकल्पना' अधिकृतरीत्या शासनाकडून मान्य करवून घेऊन, कुठला ही व कोणाचा ही हस्तक्षेप न स्वीकारता हजारो एकर जमिनी गिळकृंत करून घेऊन "श्रीमंत' जपानला ही मागे टाकण्याचे "स्वातंत्र्य' घेतले आहे. स्वातंत्र्याचा हा नवा अर्थ आपल्याला पचनी पडणार नाही. परंतु हतबल, निराश व चिंताग्रस्त जनसमूह, मिळणाऱ्या मदती व सवलतींच्या खिरापतीने स्वत:ची भूक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याशिवाय दुसरे करू तरी काय शकतो ? आज राखीव जागांच्या संरक्षणाचाही प्रश्न विकट बनू लागला आहे, तो याच स्वार्थी व ढोंगी राजकारणांमुळे, याचा ही विसर आपणास पडला आहे. मागासवर्गीयांमध्ये जागृती घडवून आणून त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी विधायक कृती करणे आवश्यक असताना ती न करता एक गठ्ठा मतांच्या राजकारणाचा दुर्वास या देशाने स्वीकारण्याचे "स्वातंत्र्य' घेतले आहे. राखीव जागांचा मूळ उद्देश्य ज्यांना आत्मविश्वास नाही, जे सर्वस्वी परावलंबी आणि न्यूनगंडाने पछाडलेले आहेत, ज्यांचा जीवन संघर्ष इतका जीवघेणा आहे की अधिक चांगल्या जीवनाची कल्पना करण्यासही सवड नाही, लाचारीने जगणे एव्हढेच ज्यांना माहिती आहे; अशांना स्वाभिमान आणि आत्मविश्वास मिळवून देणे, संपन्न जीवनाची आकांक्षा त्यांच्यात निर्माण करणे आणि ज्या जीवनातून अशा संपन्न जीवनाचा लाभ होतो, त्या स्पर्धेसाठी त्यांची मानसिक व बौद्धिक तयारी करणे त्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत करणे आणि सर्वसाधारण पातळीवर येण्यासाठी त्यांना सवलती देणे. परंतु गेली साठ वर्षे झालीत, मागासवर्गीयांच्या दोन पिढ्या सरून तिसरी पिढी आली तरी या सवलती देण्याचे व घेण्याचे "स्वातंत्र्य'च त्यांना बहाल झाले आहे की काय ?- असे वाटू लागते. भारतीय स्वातंत्र्याची ही शोकांतिका आहे, असे ही आपल्याला वाटत नाही. येथले बुद्धिवादी विचारवंत ही थातूर-मातूर खंडन-मंडण करून वेळ निभावण्याचे "स्वातंत्र्य' लुटू लागले आहेत. आज भारतात खरे स्वतंत्र कोण आहेत ?-असे जर आम्हांला कोणी विचारले, तर आम्ही काय उत्तर देऊ माहीत आहे ? दैन्य, जुलूम, बेपर्वाई, लाचारी, मुजोरी, अकार्यक्षमता, तणाव, धर्मांधता, चुकारपणा, गुलामगिरी, अन्याय, दावे, खटले, तंटे-बखेडे, आपमतलबीपणा, स्वार्थ यांनीच या साठ वर्षात खरे "स्वातंत्र्य' उपभोगले आहे. भारतीय समाज आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुळाशी हे "गुण' चिकटविण्याचे महान कार्य गेली साठ वर्षे पत्रकार, पुढारी, आणि प्रशासन करीत आले आहेत. म्हणूनच स्वातंत्र्याच्या या चळवळीत आम्ही रोगांशी सामना नाही केला तर लक्षणांवरच सर्व शक्तीनिशी तुटून पडलो. भारतीय प्रबोधनाचे स्वरूप व मूल्य आज पायदळी तुडविले जात असताना चित्रपटातील देशभक्तीची गाणी लावून का आपण ती मूल्ये पुन्हा प्रस्थापित करणार आहोत ? या १५ ऑगस्टला तरी आपण "स्वातंत्र्या'चा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय ?हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही!
दिवस अमुचा येत आहे; तो घरी बसणार नाही.


सूरांचा गौरव

अहमदनगरचे पं. रघुनाथ नारायण केसकर यांचा अमृत महोत्सव नुकताच शब्द आणि सूरांच्या संथ व शांत महासागरात साजरा झाला. नगर हे तसे रूक्ष गाव. तेथे शब्द, सूर, साहित्य, संगीत यांचा वारसा सांगणारे काही रथी महारथी असले तरी घृणास्पद राजकारणांमुळे त्यांची दखल कोणी घ्यावी, असे कुणालाच वाटत नाही. त्या मुळे कलाकारांना उत्तेजन द्यावे, त्यांची जोपासना करावी किंवा त्यांचा सन्मान करावा असे येथे काहीच घडत नसते. तशी एखादी घटना घडली तर त्यामागे राजकीय व्यक्तींचाच जास्त उदो-उदो बातमीदार व वृत्तपत्रे करीत असतात. त्यामुळे कलाकारांच्या कारकिर्दीला सतत ग्रहण लागलेले असते. नगरला बालगंधर्वांची नाटके झाली, नगरला त्यांचे वास्तव्य होते हे ही लोक विसरले. बालगंधर्व, बालकवी, वि. द. घाटे, लक्ष्मीबाई टिळक, रामभाऊ फाटक ही नगरची कलावंत व्यक्तिमत्त्वे लोप पावून कितीतरी वर्षे झालीत ! त्यांची आठवण व्हावी किंवा राहावी असे येथे काहीच घडत नसताना सूरमणी पं. रघुनाथ केसकर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा व्हावा, हेच मुळी अपवादात्मक असले तरी आम्हांला अभिमानास्पद वाटतो. या कार्यक्रमाची दखल नगरच्या वृत्तपत्रांनी "कोण बुवा हे केसकर ?' असे म्हणत काहींनी बातम्या दिल्या तर काहींनी दिल्याच नाहीत ! उपेक्षा... घोर उपेक्षा सहन करीत जी व्यक्तिमत्त्वे नगरमध्ये आज कलांना समर्पित आहेत, त्यात पं. केसकरांचे नाव अव्वल आहे. पं. रघुनाथ केसकर (कोर्टीकर) हे उच्च कोटीचे संगीतकार, गायक, सतारवादक, चित्रकार, नाट्य-दिग्दर्शक, रंगभूषा आणि नेपथ्यकार आणि एक आदर्श संगीत-शिक्षक आहेत. त्यांचे समग्र जीवनच चित्रकला, रंगभूषा आणि शास्त्रीय संगीताला अर्पित आहे. १८ जून १९३२ रोजी पंढरपूर येेथे जन्मलेले पं. केसकर मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये पदवी घेऊन १९५७ मध्ये नगरच्या सोसायटी हायस्कूल मध्ये कलाध्यापक म्हणून रुजू झाले, त्यावेळी आम्ही तेथे नववीत शिकत होतो. १९९० पर्यत ते अध्यापक राहिले. शिवाय नाट्याभिनयापेक्षा नाटकांतील पात्रांचे मेकअपही करण्यात ही त्यांनी रुची घेतली. व्यावसायिक आणि हौशी नाट्यसंस्थांमधील आजपर्यंत जवळ जवळ तीस हजार पात्रांचे मेकअप त्यांनी केले आहेत, हे ऐकून ही खरे वाटणार नाही. हे करीत असतानाच शास्त्रीय संगीताच्या आवडीमुळे "संगीत अलंकार', "संगीत प्रवीण' या त्या वेळच्या अत्यंत अवघड परीक्षा त्यांनी दिल्या. त्या देत असतानाच त्यांचा संबंध भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी आला व शास्त्रीय संगीताचे जबरदस्त वेड त्यांना लागले. संगीतातील रागदारी ही तशी अनेक प्रकारची असते. गांधर्व वेद म्हणून संगीताचा जो पायाभूत ग्रंथ आहे त्यात १५शे रागरागिण्यांचा उल्लेख आहे. सध्या त्या पैकी ४शे पर्यंत रागरागिण्यांची माहिती आहे. त्यातील सत्तरेक राग-रागिण्यांचा अभ्यास हा गायकाला जवळ-जवळ करावाच लागतो. तो अभ्यास पंडितजींनी त्यावेळी पूर्ण केला. तो इतका पूर्णत्वास गेला की भारतातल्या बहुतेक सर्व प्रांतातील विद्यापीठांनी, पंडितजींनी सादर केलेला संगीताचा पाठ्यक्रम स्वीकारला. आजही तोच अभ्यासक्रम त्या विद्यापीठातून राबविला जात आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, दिल्ली, बनारस येथील नेट परीक्षांचे मार्गदर्शन ही त्यांनी केले. इतकेच नव्हे तर संगीत अध्यापनासाठी संगीतात डी.एड्. आणि बी.एड्. चा पाठ्यक्रम त्यांनी तयार केला असून अखिल भारतीय स्तरावर त्यांचे नियोजन ही केले आहे. पं. केसकर हे त्या नंतरच्या अवधीत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सतत सहा वर्षे उपाध्यक्ष राहिले त्या तर्फे प्रकाशित होणाऱ्या "संगीत कला विहार' या मासिकाचे संपादन ही केले. आज पंडितजींचे "सूरदास संगीत विद्यालय' म्हणून अहमदनगरला केंद्र आहे. व तेथे ते सातत्याने नव-नवीन विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवीत असतात. आमच्या अहमदनगरचे ते एक महा-भूषण असूनही दैनिक वृत्तपत्रांनी केलेल्या उपेक्षेचे ते शिकार बनले. परंतु त्या बद्दल त्यांना शतांशाने ही दु:ख नाही. ती "काळाची पावले' आहेत हे ते ओळखून आहेत व आपले कार्य ते तन्मयतेने करण्यातच मग्न आहेत. भारतात शास्त्रीय संगीताचा फार भक्कम पाया आहे, हे आम्हांला माहीत आहे. ख्याल गायकीची अनेक घराणी भारतात आहेत. ग्वाल्हेर घराणे, आग्रा घराणे, जयपूर घराणे, किराणा घराणे, दिल्ली घराणे, पतियाळा घराणे, अत्रोली घराणे, सेहस्वान घराणे, भेंडीबाजार घराणे, खुर्जा घराणे, मथुरा घराणे, इंदूर घराणे अशी कितीतरी घराणी आपापली वैशिष्ट्ये व शिस्त टिकवून गात असतात. "दरबारा कानडा' गातांना लय सावकाश लावावी लागते, "मारवा' रागात स्वर एकच असतात, "सोहनी' हा राग भक्ती, करुण, विरह, शृंगार रस निर्मितीस उपयुक्त असतो, तर शास्त्रीय संगीतात काही ख्याल हे तालातच बसविले जातात, हे उपजत ज्ञान गायकाला असावेच लागते. त्या साठी करावा लागणारा अभ्यास व सराव हा कठीण असला तरी साध्य करावा लागतो. ती एक तपस्याच असते ! ती तपस्या पं. केसकरांनी आजतागायत केली आहे. म्हणूनच त्यांचे अवघे जीवन नाद, सूर, लय, ताल, बंदिशी, द्रुत व विलंबीत ख्याल-तानांतून साकारले आहे. अर्थ, खयाल, विचार आणि कल्पना यांमध्ये डुंबून संगीत महासागरात स्वत:चे जीवन ओतून एखाद्या निष्णात खलाश्याप्रमाणे ते आजतागायत आपली जीवन-नौका इतरांच्या आनंदसाठी हाकारीत आहेत. म्हणूनच त्यांच्या अमृत महोत्सवदिनी सबंध दिवसाची उपस्थिती देऊन आम्ही ही त्यांना प्रणाम केला. संगीत हे देवांचे शास्त्र आहे. तो जे आत्मसात करतो त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेलीच असते. त्या टाळीत आमचा नाद आम्ही सामावून घेतला. पंडितजींना या अमृतमहोत्सवीवर्षात आमच्या लाख-लाख वंदना ! अमृत महोत्सवी वर्षात व पुढील पंचवीस वर्षात त्यांच्या या संगीत-साधनेच्या वेलीला असंख्य फुले लगडलेली असतील असा विश्र्वास आम्हाला आहे.


लेखकाचे लेखन

कोणता ही लेखक जेव्हा जे काही लिहितो, त्या पाठीमागे काही प्रेरणा असली पाहिजे. लेखक का लिहितो याचा विचार करताना त्याचा चेहरा हा सर्वांत जास्त जवळचा असतो असे आम्हाला वाटते. परंतु चेहरा आणि लेखन या दोघांमध्ये काही मूलभूत फरक ही असतो म्हणे ! कोणत्या ही लेखकाच्या व्यक्तिमत्त्वातला मिस्कीलपणा लेखनामध्ये हमखास यायलाच पाहिजे असे नाही. येण्यासाठी किंवा न येण्यासाठी ही काही कारणे असतात. दु:खाचे अनेक चेहरे टिपणारा लेखक हा निराशावादी असलाच पाहिजे असे नाही, किंबहुना तसा तो नसतोच ! लेखनातील सर्व पात्रे ही समाजातीलच घटक असावयास हवी असे ही नाही. क्वचित प्रसंगी त्यामध्ये एखादे पात्र हे वेगळेच असते. लेखन अनुभवसमृद्धीसाठी, तसं ते असणं कधी कधी आवश्यक ही असतं. हस्तलिखितावर आपलं नाव असलं म्हणजे ते लेखन त्या लेखकाचेच असतं अस ही नाही, किंवा ते नसतं असं ही नाही. लेखक हा कारकुनाप्रमाणे नसतो. हे काही अंशी आपणांस माहीत असावयास हवे. चरित्रात्म कतपशील निर्माण करणं हे कारकुनाचं कधीच काम नसतं. खरं तर जगातील अनेक महत्त्वाचं लेखन हे प्रथमपुरुषी निवेदनातूनच उलगडत गेलेलं आहे. लेखक हा पिंडाने कवी असावयास हवा का ? तर तसा तो हवा किंवा नाही ही ! लेखन कशा प्रकारचे आहे त्यानुसार पिंड ठरवता आला पाहिजे. आधीची जुळवाजुळव त्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. कारण बऱ्याचदा गद्याच्या मानाने पद्य ही अपुरे आणि तुटक वाटत असते. एका अर्थाने गद्याला दिलेला नकार म्हणजे पद्य असलेच पाहिजे असे ही नाही तर पद्याचा सकारात्मक विचारच काव्याला जास्त न्याय देऊ शकेल, असे ही आम्हाला कधी कधी वाटते. गद्यावर जमलेली धूळ म्हणजे पद्य नसते किंवा पद्यावर जमा झालेली कोळिष्टकं म्हणजे गद्य नसते, हे आपण लक्षात ठेवावयास हवे. शेवटी लेखक हा वाङ्मयीन मुखवट्याच्या आडून लिहिणारा असतो हे आपण ध्यानी ठेवलेच पाहिजे. तो स्वत:च्या आत अनेक व्यक्तिमत्त्व निर्माण करीत असतो हे बरीक खरे असते. लेखक हा बहिर्मुख असल्याशिवाय पात्रातून डोकावण्यास असमर्थ ठरतो. आतला "मी' शिल्लक असेल तर लेखन सशक्त होईलच असे नाही. तेव्हा "मी'चा विचार न करता बहिर्मुख होऊन पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये प्रसंगानुपात लेखून, लेखनाचा प्रपंच उभा करता आला पाहिजे, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटत आले आहे. वेगवेगळ्या भूमिका करता येणारा जसा रंगमंच असतो तसा "मी' असला पाहिजे. तरच अलिप्त राहून पात्र सजीव करता येवू शकेल. आरशापुढे जसे अनेक आरसे निरनिराळ्या कोनांनी आपण धरीत असतो व त्यात पडलेले प्रतिबिंब डोकावून पहात असतो, तसाच हा काहीसा प्रकार आहे, असे आम्हाला आवर्जून वाटते. स्वत:ला अनेक अंशामध्ये विभागून घेण्याचा आयुष्यभराचा छंद लेखकाला असला पाहिजे. प्रत्येक मुखवटा हा स्वत:हून कोरलेला मग पाहावयास मिळू शकेल. लेखनातील काही पात्रांची रचना ही स्वत:च्या जगण्यातूनही मग आपण उतरवू शकतो. लेखनातील पात्रांची स्वप्न-रचना लेखकाला नीट जाणून घेण्यासाठी त्यातील गुणवैशिष्ट्यांचा संयत अभ्यास ही आवश्यक आहे असे ही आम्हाला वाटत आले आहे. स्वत:च्या आयुष्यातील ताणतणावावर काही उत्तर मिळाले असेल तर त्याची गुंफण यशस्वीरीत्या करणं ही एक आव्हानात्मक बाब असली तरी ती नीट समजावून घेत जुळवता आली पाहिजे. कारण ते उत्तर ही असू शकतं. लेखकाची प्रतिभा ही सार्वकालिक असते. त्यामुळे गरज असलेल्या स्वरूपात ते लेखन उतरले की नाही याची शहानिशाही करता आली पाहिजे. अनुभवाला नवीनतेने मूर्त स्वरूप देणे ही लेखनाची प्रेरणा मानून तुलनात्मक दृष्टीने फरक अभ्यासणे हे ही वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकते, हे लेखकाला समजलेच पाहिजे, नव्हे ते त्याला कळते म्हणूनच लेखणीतून शब्दांना पाझर फुटत असतो. साहित्यातील जीवनमूल्यांच्या संकल्पनेतील वास्तवता स्वीकारून जेव्हा लेखनाची बैठक होते तेव्हा ती अनन्यसाधारण बनून एक नवीनच अक्षर वाङ्मय रचना करण्यासाठी सिद्ध होते. जीवनानुभूतीला निदान निर्मितीप्रक्रियेत पायाभूत मानून केले गेलेले लेखन म्हणूनच मग परिपूर्ण संदर्भाने लुप्त होतात.


साहित्य आणि अस्तित्ववाद

अस्तित्ववाद म्हणजे मूल्यांचा ऱ्हास असे समजावयाचे झाल्यास या वादाचे समर्थन कोण करू शकेल, असा प्रश्न आम्हांला कधी काळापासून सतावीत आहे. आज जिकडे-तिकडे आस्तित्ववादाचा बोलबाला आहे. उत्तर आधुनिकवाद आणि अस्तित्ववाद यातील सीमारेषा पुसट असली तरी अस्तित्ववाद हा स्विकार्य होऊ शकतो का ? तत्त्वज्ञानाच्या पातळीवर हा वाद पाश्चात्त्य पारंपारिक पद्धतीस अनुसरून कदाचित बोधगम्य होऊ शकेल; परंतु व्यवहारवादाच्या निकषांवर तो पूर्णपणे अ-समर्थनीय ठरू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याला आज आपण अस्तित्ववाद म्हणतो, तो आला कुठून ? कारण तो काल ही असलेला होता आणि आज ही असलेला आहे. प्रबोधनातून पुढे आलेला बुद्धिप्रामाण्यवाद हा या वादाचा कदाचित पाया असू शकेल. त्यातून मानवी विकासाला अवसर तरी असू शकतो. परंतु समाजात माजलेला स्वैराचार म्हणजेच अस्तित्ववाद असे जर कोणी म्हणत असतील व तसा प्रकार होत असेल तर तो अमान्य करण्यातच शहाणपणा आहे. मानवी जीवनातील जीवघेण्या समस्या या काल ही होत्या आणि आज ही आहेत. त्यावर निघत असलेले तोडगे हे शेवटी अपुरेच पडलेले दिसून येते. खरे तर माणसाने विचार करण्याचा पहिला प्रश्नच मुळी त्याच्या अस्तित्वाचा असू शकतो. आणि त्यातूनच मग अनेक उपप्रश्न निर्माण होऊ शकतात. मानवी जीवनाचा व ज्ञानाचा केंद्रीभूत प्रश्नच मुळी अस्तित्वाशी, म्हणजेच मानवी जीवनाशी निगडीत असतो. समाजात राहून ही माणसाला झालेली अलगता, जग आणि जीवन हे अर्थशून्य असल्याची जाणीव या अस्तित्ववादाला महत्त्वाच्या वाटत असतात, हे आम्ही विसरू शकत नाही. सत्त्वशील आणि स्वत्त्वशून्य जीवन प्रक्रियेतील मानवी भाव-भावनांची होणारी रिक्तता ही या वादाच्या प्रवाहातील दोन काठां आहेत. न्यूनता आणि आधिक्य यांची सर्वत्र होणारी विषमता ही आपण कशी स्वीकारणार आहोत, ही देखील फार मोठी समस्या असू शकते. स्वार्थ, मोह, माया, मद, मत्सर, लोभ आणि भौतिकाची लागलेली सवंगता यामुळे अस्तित्ववाद आज तरी पूर्ण झाकाळून गेला आहे, असे ही आम्हाला वाटते. अस्तित्ववादी लेखन म्हणून ज्यां पॉल सार्त्र जितका महत्त्वाचा ठरू शकतो, तितकाच आपल्याकडे सदानंद देशमुख किंवा कविता महाजन ही ठरू शकतात. परंतु म्हणूनच ते सर्व निखालस आदर्शवादी आहेत असे नव्हे! आज तरी अस्तित्ववादी साहित्य निवेदनात्मकच झालेले आहे, याचे कारणही बहुधा तेच असावे. साहित्याची मीमांसा करताना कलेची चर्चा जशी करावीच लागते, तसेच इतर कोणत्याही वादापेक्षा अस्तित्ववादी लेखन जीवनाच्या अर्थातील वेध घेण्यास प्रत्ययकारी असू शकतो, हे आपणांस नाकारता येणार नाही. मानवी जीवनाचे वर्णन हे "असलेल्यातून फेकण्यात'च असते, असा एक प्रवाह मानणाऱ्यांचा आहे. कल्पनाशील किंवा चिंतनशील लेखनातून या अस्तित्ववादाची जडण-घडण होण्यासाठी काय करता येऊ शकेल, याचा ही समग्र व्यापक विचार अभिप्रेत असून तिकडे टीकाकार साक्षेपी भूमिकेतून पाहू शकतात, हा ही एक अडसर वाटू लागतो. आज चिंतनशील तत्त्वज्ञानाचा अभाव मराठी साहित्यात आहे, असे आपण जेव्हा म्हणतो; तेव्हा त्यातून आपली दुर्बलता, हताशा व एक प्रकारची मरगळच आपण मान्य करतो. चिकित्सा व टीका ही कधीच आस्वादक होत नसली तरी ती अत्यावश्यक मात्र खास आहे, हे आपण समजून घेणे अपरिहार्य आहे. शेवटी चेतनेत किंवा जाणिवेत दुसऱ्याच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव होत असते हे या अस्तित्ववादाचे मौलिक रूप विसरता येत नाही. बऱ्याच दिवसांपासून साहित्यातील अस्तित्ववादावर आम्हांला लिहावेसे वाटत होते. ते येथे समग्रतेने आले असे नव्हे परंतु त्यांतील आंशिक भागही कदाचित इतरांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा; तितके झाले तरी या लेखनाचे सार्थक झाले, असेच आम्हांला वाटेल.


धर्म आणि साहित्य

धर्माचा आणि साहित्याचा काय संबंध आहे; असा जर प्रश्न एखाद्या मराठी विचारवंताला आम्ही विचारला तर तो बावचळून तर जाणार नाहीच परंतु मनातल्या मनात आमची किंव करून हसेल ही. कारण धर्माचा साहित्याशी खूप घनिष्ठ संबंध असतो हे त्याला पटलेलं असतं. ख्रिश्चन मराठी साहित्य परिषद, जैन मराठी साहित्य परिषद, मुस्लीम मराठी साहित्य परिषद आणि बौद्ध मराठी साहित्य परिषद आणि त्यांची "अखिल भारतीय' संमेलने खूप गाजावाजा करून मराठी मुलुखात भरत असतात हे त्याला माहीत असतं. अशा संमेलनाच्या उद्घाटनाला किंवा अध्यक्षीय भाषण करायला तो अनेकदा जाऊन आलेला असतो. हिंदू मराठी साहित्य परिषद, ब्राह्मण मराठी साहित्य परिषद, पर्शियन मराठी साहित्य परिषद किंवा हिब्रु किंवा इतर कोणत्याही भाषेचा मराठी साहित्य परिषदा अस्तित्वात आज नसल्या तरी ज्या "धार्मिक' परिषदा आहेत, त्यांची पाठ थोपटून तो आलेला असतो. अशा संमेलनाच्या उद्घाटन किंवा अध्यक्षपदामुळे आपण उदार असल्याची भावना त्याच्या मनात आलेली असते. मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध या सर्वांच्या साहित्य परिषदा व संमेलने यांची "सामाजिक नड' तो अशावेळी उकलून दाखवीत असतो. खरे तर त्यांच्या पैकी कोणालाच "मराठी वाङ्मय वा साहित्य' हा प्रकार माहीत नसावा काय ? तर्कदृष्ट्या ते खरे ही असू शकेल. परंतु तसे ते नाही, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. मग धर्माच्या नावाखाली मराठी साहित्य संमेलने व परिषदा का भरविल्या जातात ? त्यांचा गाजावाजा का होतो ? त्यावर ओढून ताणून झालेले "शोध-निबंध' का प्रकाशित होतात ? याचा कधी कोणी विचार केला आहे काय ? केला असल्यास त्याचे निष्कर्ष काय आहेत ? आणि केला नसल्यास का केला नाही ?- हे कुणी आम्हांला सांगेल काय ? जात किंवा धर्माच्या आडून मराठी साहित्य शारदेच्या मंचावर बसून "मराठी साहित्याचे आपण उपमर्द तर करीत नाही ? दिब्रिटो, कार्व्हालो कोण ? तर, ख्रिश्चन मराठी साहित्यवाले, भंडारी, शहा कोण ?- तर जैन मराठी साहित्यवाले, दलवाई, खान कोण ? तर मुस्लीम मराठी साहित्यवाले, आणि अडसूळ-बागूल कोण? तर बौद्ध मराठी साहित्यवाले ! अशी विभागणी मराठी साहित्य-विश्र्वात जाती धर्माच्या नावाखाली का केली जाते आहे ? याचा प्रारंभ कोठून झाला ? का झाला ? यांचे काही सयुदुक्तीत उत्तर आहे का ? आणि त्या उत्तराला काही सैद्धांतिक मूल्य राहील का ? असेल का ? इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, उर्दू, काश्मिरी, बंगाली, उडिया या सर्व भाषांच्या साहित्यविश्र्वात आपण फिरकलो तर कुठे ही धर्माच्या नावाखाली सवतेसुभे निर्माण झालेले निदान आम्हांला तरी माहिती नाहीत ! मग मराठीत हे का ? मराठी माणसांच्या संकुचित वृत्तीमुळे हे घडते आहे की विश्रब्ध शारदेच्या प्रांगणाचा हा विस्तार आहे ? साहित्याच्या मूल्याधारित चर्चा आम मराठीत का होत नाही ? की त्याची गरज आज तथाकथित विचारवंत व समीक्षकांनाच वाटत नाही, असे समजावयाचे ! दलित, जानपद, कृषी, ग्रामीण, नागरी हे साहित्य संमेलनाचे प्रकार एखाद्या वेळी क्षम्य ठरू शकतील किंवा प्रादेशिक विभाजन ही क्षम्य ठरू शकतील ! परंतु धर्म आणि जातीच्या नावावर आज "मराठी' साहित्याची उद्या डळमळीत होणारी इमारत उभी केली जात आहे, याची कुणाला फिकीर आहे काय ? त्या मुळे त्या लोकांना व्यासपीठ मिळते, वृत्तपत्रांना द्यायला फोटो व बातम्या मिळतात आणि स्वत:ला मिरवायला ही मिळते, ही बाब साहित्यमूल्य व सिद्धांताशी किती एकरूप होणारी असेल ? आणि अशी संमेलने व परिषदा ज्या महाराष्ट्रात होतात तेथे हिंदू मराठी साहित्य परिषद किंवा ब्राह्मण मराठी साहित्य संमेलने कोणी भरवून दाखवेल काय ? अशा परिषदा व संमेलनाच्या उद्घाटन-अध्यक्षपदाचा कुणी जैन, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध "साहित्यिक' किंवा "विचारवंताला' ते बोलावतील काय ? वरील सर्व बाबी या मराठी साहित्याच्या विश्रब्ध शारदा दरबारात महत्त्वाच्या नाहीत, असे कोणीच म्हणू शकणार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्य:स्थितीत वाङ्मयाचे प्रयोजनच सर्वजण दृष्टिआड करीत आहेत, हे आहे. वाङ्मयाची निर्मिती शब्द आणि अर्थ मिळून होत असली तरी ते गुणमंडित, दोषरहित व साभिप्राय असावे लागते; हेच आज विसरू जाऊ लागले आहे. मम्मटप्रभृति साहित्यशास्त्रकारांनी जी चर्चा केली होती किंवा क्षेमेन्द्रांनी वाङ्मयासंदर्भात जी औचित्य चर्चा केली होती ती आजच्या तथाकथित "साहित्यिकांना' माहिती आहे काय, याचा ही शोध अश्यावेळी घ्यावा लागेल. पद, वाक्य, प्रबंध, अर्थ, गुण, अलंकार, रस, क्रिया, कारक, लिंग, वचन, विशेषण, उपसर्ग, निपात, काल, देश, कुल, व्रत, तत्व, सत्व, अभिप्राय, स्वभाव, सारसंग्रह, प्रतिभा, अवस्था विचार, न्याय आणि आशीर्वाद इतक्या बाबतीतले वाङ्मयीन औचित्य तावून सुलाखून घेतले पाहिजे, हे क्षेमेद्रांचे मत आजच्या नवथर, नवशिक्के आणि नवोदितांना कितपत माहिती आहे ? वाङ्मय हा प्रतिभेचा उच्च दर्जाचा रसाविष्कार आहे व त्या रसात कोणताही जातिभेद नसतो, हेच मूर्धन्य व प्रथितयश ही विसरून गेले आहेत. म्हणूनच सर्वच जातीय व धर्माची नावे घेऊन साहित्य संमेलने व परिषदा होत आहेत. अशा या काळात हिंदू किंवा ब्राह्मण साहित्य संमेलनाची प्रतीक्षा आम्ही करावी काय ? तसे नसले तर या सर्व धार्मिक परिषदा विसर्जितच झाल्या पाहिजेत ! वर नावे घेतलेल्या व सर्वच साहित्यिकांनी अशा संमेलनाचा बहिष्कारच करावयास हवा ! वाङ्मयाचा धर्म वाङ्मयीनच असावयास हवा!


स्वप्न आणि वास्तव

आज एक निराळाच, परंतु स्वप्नांशी संबंधित अग्रलेख लिहावयाचे आम्ही योजले आहे. स्वप्नांचा ज्योतिषशास्त्रीच अभ्यास एखादा लेखक करू शकतो कां ? तर तसे होऊ शकते. माणसांना स्वप्ने पडतात हे तर सर्वांनाच माहिती आहे. अगदी आंधळ्या व्यक्तींना ही स्वप्नं पडतात. पण या स्वप्नांचा अर्थ कोणी सांगू शकेल काय ? स्वप्ने ही झोपेतील बोधावस्था आहे, असे म्हटले जाते.निर्वस्तुभास व आभास यांचे एक मिश्रण म्हणजे स्वप्न होय. स्वप्नांतील गोष्टी निव्वळ कल्पना भासत नाहीत, तर त्या खऱ्या आहेत असा एक सर्वांनाच विश्र्वास असतो. या कल्पना इकडून तिकडे भरकटत असतात. एका वेळी आपण निर्जन ठिकाणी तर दुसऱ्या वेळी सजीव सृष्टीचा एक भाग असतो. कधी पाण्यात तर कधी आगीत, कधी आकाशात तर कधी भूगर्भात संचार करीत असतो. अशी विसंगती व चमत्कारिकपणा अनेक वेळा आपण अनुभवतो. काही स्वप्ने आठवतात, तर काही वेळेस मनाची पाटी कोरी असते. स्वप्नाचे एक कारण असे की, झोपेपूर्वी मनात घोळणारे विचार किंवा अनुभव ! काही शास्त्रज्ञांनी यावर खोलात जाऊन काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या मते स्वप्नात विशिष्टच कल्पना का येतात ? इतर का येत नाहीत ? झोपण्यापूर्वी मनात विचार, हे उत्तर नेहमीच लागू पडत नाही. काही वेळा स्वप्नात आपले विसरलेले कर्तव्य पार पाडण्याची सूचना असते. मनात कधीही ज्या व्यक्तींचा विचार येत नाही, त्या व्यक्तीही स्वप्नात दिसतात, घटना व कल्पना दिसतात. आपण कधीकधी अश्लाघ्य व निंद्य इच्छा मनात आणून त्या खोलवर दडपून टाकतो. झोपेत मनाचे नियंत्रण कमकुवत असते. त्यामुळे त्या स्वप्नात दिसतात व नंतर त्याची आपल्याला शरम वाटते. फ्रॉईडच्या मते प्रौढांची स्वप्ने ही बलवत्तर इच्छा दडपल्या जातात त्याची असतात, म्हणजे कामुक स्वरूपाची. एखाद्या स्त्री वा पुरुषाविषयी मनात तीव्र स्वरूपाची अभिलाषा असेल, तर त्याच संदर्भात स्वप्ने पडतात. कारण प्राप्त परिस्थितीत हे विचार मनुष्य चारचौघांत प्रगट करू शकत नाहीत. लहान मुलांची स्वप्ने इच्छापूर्तीची असतात व या इच्छा दडपलेल्या नसतात, मनमोकळ्या असतात. काही स्वप्ने भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांची सूचना देतात. स्वप्नांचा अर्थ सांगताना प्रतीकाचा अर्थ लावावयाचा असतो. हत्ती-सर्प-सवाष्ण स्त्रीचे स्वप्नातील दर्शन शुभ असते. नागाने फडा आपटणे म्हणजे शाप दिला असे समजणे. गलिच्छ ओंगळ वस्तूंचे दर्शन म्हणजे आजारपण, असे प्रतीकात्मक अर्थ असतात. स्वप्नात सूर्याने कर्णाला, इंद्र कवचकुंडले मागायला येईल ती त्याला देऊ नकोस, असे सांगून सावध केले. बाणासुराच्या कन्येस, जो पुरुष तुझ्या अमुक रात्री स्वप्नात येईल, तोच तुझा पती होईल असा पार्वतीने (उषेला) वर दिला. हरिश्र्चंद्राला मुद्दाम स्वप्नात दर्शन देऊन विश्वामित्राने त्याचे राज्य दान करायला लावले व त्याच्या पत्नीमुलासह वनवासात धाडले. अशा स्वप्नांचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी पुराणातही आहेत. दिवास्वप्न हा एक स्वप्नाचाच प्रकार आहे. लहान मुले साधारण गोष्टींना महत्त्व देतात व कल्पनाविश्र्वात रमतात. स्पायडरमॅन, बॅटमॅन, शक्तिमान, डायनासोर इ. च्या खोट्या व भ्रामक कल्पना करून खेळतात. तो त्यांचा स्वभावधर्म असतो. सर्व वयाच्याच व्यक्ती दिवास्वप्नांत रंगून जातात. जागेपणी स्वप्न पाहणे, सुखाच्या नको इतके जवळ जाणे व त्यात एकजीव होणे हा मनुष्यधर्मच आहे. मात्र यात वास्तव व कल्पना यांचे भान सुटते. काही तरुण अशी खोटी स्वप्ने भोळ्या मुलींना दाखवून गैरफायदा घेतात. अतृप्त इच्छा तृप्त करण्याचा हा एक वाईट प्रकार आहे. माफक स्वप्ने हा मनाचा तोल राखतात व अतिरेक मनुष्याला कर्तृत्वहीन बनवतो. "मैंने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने सपने सुरील सपने'असे गुणगुणणे वेगळे व स्वप्नांचा भविष्यशास्त्रार्थ लावणे वेगळे. एक मात्र खरेच की स्वप्नांची सर्वच दुनिया आभासमय नसते, असा प्रत्यय आम्हांला कैक वेळा आला आहे. त्याची चर्चा पुन्हा केव्हांतरी !


संस्कृतीचे शासकीय धोरण

संस्कृती आणि भाषा याबाबत शासनाने धोरण ठरविणे आता अगदी अगत्याचे व अनिवार्य बनले आहे, असे आम्हाला वाटते. विचारवंत, संत, लोकनेत्यांचे साहित्य कमी किंमतीत विकावयास ठेवले म्हणजे संस्कृती टिकविण्याचे कार्य झाले, असे शासन कसे समजते ? साहित्य संमेलने, नाट्य,-संमेलने, नाट्य संकुल, साहित्यकोष, पुस्तके यांसाठी जे-जे मागितले ते ते शासनाने दिले-म्हणजे साहित्य-संस्कृतीसाठी बरेच काही केले असे जर शासनाला वाटत असेल तर तो त्याचा अहंगंडच समजायला हवा. दर्जेदार नाटकांचं आज मुळातच दुर्भिक्ष असताना नाट्यप्रयोगावर अनुदान देणारे सरकार काय साधू इच्छिते, हे न कळण्याइतपत आज कोणी ही नाही. मातृभाषा आणि संस्कृती टिकविण्याची जबाबदारी लोकांवरच अधिक असली तरी त्यासाठी आवश्यक असणारे घटकच आज मूल्यहीन ठरू लागली आहेत हे विसरता येणार नाही. शाळा-महाविद्यालयातून शिकविल्या जाणाऱ्या धार्मिक व कर्मकांडाच्या संस्कृतीबाबत शिक्षकांनी व शिक्षणतज्ञांनी आत्मपरीक्षण करून ती प्रवाही करणे हे आज जसे गरजेचे होऊन बसले आहे तसेच पाश्चात्त्यांचे अनुकरण हीनत्व देते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संस्कृती शासनाच्या हाती अशी कधीच नसते परंतु तिचा पत्कर घेऊन शासन कधी कधी असे निर्णय घेते की त्याचा खोलवर दुष्परिणाम लोकमनावर होत असतो. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर मानव संसाधन मंत्रालयाने व शिक्षण मंत्रालयाने जे निर्णय घेतले त्यांवरून त्याची कल्पना कोणी ही करू शकेल. संस्कृती हा वाहता प्रवाह असला तरी तो डबक्याकडे नेता कामा नये, हे खरे तर राज्यकर्त्यांना कळावयास हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. संस्कृतीचा प्रश्न केवळ लिहिता वाचता येणाऱ्यांपुरता मर्यादित असा कधीच नसतो. बहुतांश शिक्षकीपेशा करणारे संस्कृतीचा संबंध फक्त सणांशीच लावतात. कर्मकांडे आणि संस्कृतीतला मूलभूत फरकच ज्याला कळत नाही त्या व्यक्तींच्या हाती सत्ता आली की निर्णयाचे ताबूत नुस्ते दोलायमानच होत नाहीत तर ते बुडवावे ही लागतात. परंतु तो पर्यंत बरीच अनास्था समाजामध्ये संस्कृतीसाठी माजून राहते व त्याचे दुष्परिणाम समाजावर नंतरच्या काळात होतच राहतात. फक्त मराठी साहित्य व संस्कृती या संबंधीच बोलावयाचे तर शासन मराठी भाषा व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य राज्यांचा तुलनेने खूपच कमी लक्ष देत असल्याचे दिसून येईल. कन्नड, तामिळ किंवा बंगाली-उर्दू भाषा व संस्कृती साठी तेथील शासन जितक्या जागृतपणे कार्य करतात त्या मानाने मराठीच्या पदरी निराशाच येईल. खुद्द शासनाच्याच "लोकराज्य' या मराठी मासिकपत्रात इंग्रजी शब्द, वाक्यांचा असलेला भरणाही तेच दर्शविल्याशिवाय रहात नाही. शासनाने भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करू नये, असे म्हणणाराही एक अज्ञ वर्ग आज महाराष्ट्रात आहे, याची ही दखल खरे तर आपण घेतली पाहिजे. परंतु ते होताना दिसत नाही. शासनाकडून अपेक्षा ठेवावयाच्या तर हस्तक्षेप हा अन्योन्यमार्गाने ही का होईना येणारच ! तेव्हा कधी तरी कुठे तरी सर्व घटकांनी एकत्रित येऊन भाषा-संस्कृतीचे स्वरूप व विस्तार यांवर सखोल चर्चा होऊन निर्णयप्रत पोहोचणे आवश्यक आहे, असे आम्हाला सातत्याने वाटते. शासनाची जी तद्विषयक मंडळे आहेत ती आज तरी निष्क्रिय झाली आहेत. त्यांच्या निर्णयांची, बैठकांची बाहेर कुठेच वाच्यताही होत नाही, हे कसले लक्षण आहे? दिशानिर्देशच नसल्याचे चित्र आहे. परिणामत: मराठी शिवाय इतर भाषांचा वरचष्माच मुंबई व क्रमाने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वाढतो आहे. लावणी, तमाशा आणि नाटकं किंवा वग हेच संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे, असे जर राज्यकर्त्यांना वाटत असेल तर मग प्रश्नच संपला ! परंतु तसे ते नाही, हे समजून किंवा समजावून घेऊन राज्यकर्त्यांनी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आजतरी तेथे कोणी जाणकार नाहीत, हेच आमचे अजून एक दुखणे आहे.