nagarsanket, nagar sanket, logo, art, sahity, book, news, paper 

लेख

 

तौलनिक साहित्याभ्यास : काळाची गरज

लेखक - प्रा. जवाहर मुथा

साहित्याचा अभ्यास हा पद्धतीवर अवलंबून असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पद्धती समीक्षा किंवा टीका यांच्यावरती अवलंबून आहे. निर्णय देणे हेच समीक्षकाचे एकमेव कार्य जोपर्यंत मानले जात होते तोपर्यंत पुस्तकावर चांगले किंवा वाईट असा शेरा मारला की आपले कर्तव्य संपले असे टीकाकारास वाटत असे. टीका करणे हे त्याच्या दृष्टीने बरेचसे सोपे असे. परंतु प्राचीन साहित्यशास्त्रकारांनी दाखविलेल्या तत्त्वांच्या निकषांवर कोणतीही वाङ्मयीन कृती तपासून पाहावयाची तर त्या मूलभूत तत्त्वांच्या अनुषंगाने तपासावी लागत असे. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. कादंबरी, कविता, नाटक, लघुकथा, प्रवासवर्णन याप्रकारांची निर्मिती झाल्यानंतर ती कृती चांगली की वाईट हे ठरवण्याचा एकमेव अधिकार समीक्षकास असे. समीक्षक हा शब्द अलीकडचा आहे. पूर्वी समीक्षकाला टीकाकार म्हणत. मराठीमध्ये साहित्यसमीक्षेला टीका म्हणण्याची जी रीत पडली त्यास सर्वप्रथम प्रा. ब. ग. खापर्डे यांनी विरोध केला. संस्कृतमध्ये टीका शब्दाचा अर्थ "विशदीकरण' किंवा "स्पष्टीकरण' असा आहे. मराठीमध्ये ह्या शब्दाचा अर्थ "दोष दाखवणे' असा आहे. साहित्य समीक्षेच्या बाबतीत स्पष्टीकरणाचा प्रश्नच येत नाही. कारण नुसते दोष दाखवणारा टीकाकार हा टीकाकार नसतोच. म्हणून टीका हा शब्द अत्यंत चुकीचा आहे. असे प्रा. खापर्डेंना वाटत असे. त्या एैवजी वाङ्मयीन समीक्षाच म्हणणे योग्य आहे असे ते म्हणत. इंग्रजी क्रीटीसिझम या शब्दाचे मराठीत शब्दश: केलेले वेडेवाकडे भाषांतर म्हणजे टीका हा शब्द आहे.आस्वादक, संस्कारवादी, निर्णायक, चरित्रात्मक याकाही साहित्य समीक्षेचे प्रकार असते. त्याशिवाय साहित्यमूल्य विचार करणारी समीक्षा महत्त्वाची मानली जाते. यासर्वं प्रकारानंतर जी समीक्षापद्धती आज अत्यंत महत्त्वाची होऊन बसलेली आहे ती म्हणजे तुलना पद्धती होय. इंग्रजी समीक्षा वाङ्मयामध्ये सर्वप्रथम ड्रायडनने ही तुलनापद्धती उपयोगात आणली. त्याकाळी एैतीहासिक पद्धत बाल्यावस्थेत होती. या दोन्ही पद्धतींचा समन्वय करावा असे ड्रायडनां वाटले व तौलनिक पद्धती रूढ होऊ लागली. समीक्षा हे साध्य असून पद्धती केवळ साधनभूत होत असा आक्षेप त्याकाळी घेतला जात असे. त्याला असे उत्तर असे की, समीक्षेचा सर्वसम्मत झालेले उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी तुलना पद्धतीचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे. मानवी विकार विचारांचे मर्म उकलून दाखविणे, आध्यात्मिक विचारांची वाढ आणि सूक्ष्म रूपांतरे कसकशीत होऊन गेली हे स्पष्ट करणारे विवेकबुद्धी व कल्पनाशक्तीत बाह्य परिस्थितीचे आकलन करून तिचे आविष्करण करण्याचे मोठे सामर्थ्य तुलना पद्धतीत आहे हे ड्रायडनने दाखवून दिले.समीक्षा हा प्रकारचा निर्णयच आहे, असे समीक्षक सुरुवातीपासून मानीत आले आहेत. एखादी कलाकृती खरी आहे, नीतीला धरून आहे, उपयुक्त आहे किंवा सौंदर्यतत्वाने युक्त आहे हे कसे दाखवावयाचे याचे उत्तर असे की, वरील गोष्टीसंबंधी आपल्या मनात संदेह नसलेल्या गोष्टीशी तुलना करूनच हे ठरवावे. ज्या गोष्टींच्या स्वरूपाविषयी आपण कोणत्याही प्रकारे साशंक नसतो त्या गोष्टीमध्ये व चर्चा विषय झालेल्या गोष्टीत जर संवाद दिसून आला तर त्या विवाद्य विषयासंबंधी निर्णय देण्याची शक्यता उत्पन्न होते. जी कलाकृती उत्कृष्ट आहे अशी आपली खात्री आहे त्या कृतीशी इतर कृतींची तुलना करून तिचे उत्कृष्टत्व अथवा नित्कृष्टत्व ठरवावयाचे असते. या न्यायाने समीक्षा करणे म्हणजेच तुलना करणे असा अर्थ उत्पन्न होतो. ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात मतभिन्नता व तुलना या तत्त्वांचे सदैव अस्तित्व असल्यामुळे तुलना म्हणजेच समीक्षा, असे त्यानंतरच्या काळात म्हटले गेले. एखादी कलाकृती इतर कलाकृतीपेक्षा कोणत्या बाबतीत अधिक चांगली आहे, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी यामुळे समीक्षकावर पडते.अर्वाचीन काळात कलेसाठी कला की जीवनासाठी कला असा जो फडके-खांडेकर यांचा वाद झाला त्यामध्ये तौलनिक विद्याभ्यासाची मूलभूत सर्व सूत्रे समाविष्ट झाल्याचे दिसून येते. मूल्य कल्पनेचा विकास झाल्यानंतरच्या याकाळात रस, ध्वनी, अलंकार यांचा प्रखर आविष्कार दिसून येतो.
ललित वाङ्मयाची प्रकृती व प्रयोजन हे समजून व जाणून घ्यावयाचे असेल तौलनिक पद्धतीशिवाय पर्याय नाही, असे मला वाटते. वाङ्मया संबंधीचा सर्व प्रकारांच्या सत्यांचा प्रश्न उपस्थित करावयाचा असेल व त्यातून मूल्य विचारांचा शोध घ्यावयाचा असेल तर तुलना पद्धती माझ्या दृष्टीने काळाची गरज ठरते. अलीकडच्या काळात साहित्य समीक्षक म्हणजे ज्याला साहित्याची संपूर्ण समज प्राप्त झाली आहे असा एखादा सर्वज्ञ असतोच असा नाही. साहित्याच्या प्रकृती संबंधीची समज प्रत्येक नव्या ललित कृतीच्या परीक्षणाने, अभ्यासाने, चिंतनाने अधिक निर्दोष करू पाहणारा एक साधक याच दृष्टीने समीक्षकाने कार्य केले पाहिजे. तसे जर झाले नाही तर चुकीचे आकलन झाल्यामुळे समीक्षक वाहवत जाते. व तसे झाले तर काही किरकोळ कलाकृती जास्त मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जाण्याचा संभव असतो. आपल्यासमोर असलेली साहित्यकृती ही श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे, चांगली आहे की टाकाऊ आहे या प्रश्नांची उत्तरे तौलनिक साहित्यभ्यासामुळेच शक्य आहे असे मला वाटते. यासाठी त्या समीक्षकाला नितांत वाचन, चिंतन व मनन करण्याची अत्यावश्यकता असते असे मला वाटते. हरिभाऊ आपटे आणि डोस्टोव्हस्की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण असा जर प्रश्न असेल तर तौलनिक साहित्याभ्यासाशिवाय ते शक्य होणार नाही. वाङ्मयीन महात्मतेचा शोध त्यामुळे घेता येऊ शकतो.प्रमाणशुद्ध रीतीने विचार करावयाचा असेल, कल्पकता व कल्पनाविलास यांचे स्थान ठरवावयाचे असेल आणि सौंदर्यतत्त्व आणि कला निकषाची चर्चा करावयाची असेल तर तुलनापद्धती महत्त्वाचे कार्य करते, हे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. भरतमुनीच्या रससिद्धांताचा, रसनिष्पत्ती व रसास्वादाचा व त्यामधील कलाकृतीतील तादात्म शोधण्याचा एकमेव उपाय तौलनिक साहित्याभ्यासामध्येच होऊ शकतो.मराठी किंवा हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेमध्ये तौलनिक साहित्याभ्यासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान विसाव्या शतकाच्या अखेरीस प्राप्त झालेले स्पष्ट दिसून येते. १९७९ मध्ये केंब्रिज युनिर्वसिटी प्रेसने तौलनिक साहित्यभ्यासावरती एक मासिक सुरू केले होते. त्या मासिकात नियमितपणे अनेक पुस्तकावर तौलनिकदृष्ट्या समीक्षा, प्रसिद्ध झालेले आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजचे प्रा. राबर्ट वेनिंगर यांनी संपादित केलेल्या या मासिकात याविषयासंबंधी भरपूर माहिती मिळते. आपल्याकडे साहित्य संमेलन होतात. परंतु त्यातून कोणत्याही साहित्य समीक्षेच्या पद्धतीवर चर्चा होत नाही. इंग्रजीमध्ये मात्र तसे नाही. १९७९ मध्ये तिकडे "ब्रिटिश कॉम्प्यारिटीव्ह लिटरेचर असोसिएशन' स्थापन झाली. आपल्याकडे तश्या प्रकारे का होऊ शकत नाही ? अजूनही मराठी समीक्षा ही एकतर्फी, एकाकी व एकांगी आहे ते याचमुळे ! इंग्रजी भाषेत तौलनिक साहित्याभ्यासाचे पंचवीस खंड प्रकाशित झाले आहे, हे ऐकूनच आपल्याला हबका भरेल. दरवर्षी एक याप्रमाणे १९७९ पासून हे कार्य तिकडे सुरू आहे. तिकडे "कॉम्प्यारिटिव्ह क्रिटीसिझम ऍकेडमी' स्थापन झाली आहे आणि आपल्याकडे अजून त्यासंबंधी "वर्ग'ही सुरू झाले नाही. मराठी समीक्षा ही आज अत्यंत तोकडी व काव्यगुणांनी रिक्त अशी झाली आहे. ख्यातनाम समीक्षक म्हणून आज ज्यांची नावे घेतली जातात, हे त्यामानाने सुमारच आहेत. असे आपल्याला संशोधन केले तर कळून येईल. एखाद्या ललित कृतीत मानवी मनाच्या मर्यादेपलीकडे भावनांचा उद्रेक झाला असेल तर त्याची समीक्षा करण्याची ताकद आज कोणत्याही समीक्षांकडे नाही हे दु:ख व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. लेखनशैलीच्या अभ्यासाची अतोनात हेळसांड आज समीक्षकांच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. विशिष्ट कवीची शैली, विशिष्ट काळातील शैली, भाषा अथवा अभिव्यक्तीच्या माध्यमांवर आधारलेली शैली, विषयाच्या अनुरोधाने निर्माण होणारी शैली, विशिष्ट देशात प्रचलित असलेली शैली, विशिष्ट वाचक डोळ्यासमोर ठेवल्यामुळे निर्माण झालेली शैली, लेखनाच्या उद्दिष्ट्याच्या किंवा प्रयोजनाच्या अनुरोधाने निर्माण होणारी शैली किंवा कवीच्या मनोवृत्तीशी संबंध असलेली शैली; यांपैकी किती शैलींचा तौलनिक साहित्याभ्यास आज समीक्षकांनी केला आहे. याचा शोध घेतला तर हाती काहीच लागत नाही. प्लेटो, ऍरिस्टॉटल यांचे नाव घेणे निराळे आणि त्या अनुषंगाने स्वत:चा साहित्याभ्यास वृद्धिंगत करणे निराळे !मीरा आणि राधा, कबीर आणि तुकाराम, केशवसुत आणि मर्ढेकर, ग्रेस आणि महानोर, कुसुमाग्रज आणि गोविंदाग्रज, तांबे आणि पाडगांवकर, विश्वासपाटील आणि रणजीत देसाई, वसंत कानेटकर आणि रांगणेकर यांचा आणि या सारख्या सर्वांचा तौलनिक साहित्याभ्यास झाला तर मराठी समीक्षेचे एक नवे दालन उघडेल आणि तौलनिकतेमुळे सरस-नीरसच निर्णय होऊ शकेल, असे मला वाटते. साहित्य समीक्षेची ही काळाची गरज ओळखून विद्यापीठ पातळीवर आणि संमेलनाच्या व्यासपीठावर याची चर्चा झाली तर आज खुजी असलेली मराठी समीक्षा उंच होईल यात शंका नाही.


१४ नोव्हेंबर : पं. नेहरू जयंती निमित्त खास लेख-

पं. नेहरूंच्या आठवणी

लेखक - प्रा. जवाहर मुथा

पं. नेहरू आठवणी लिहावयास मी काही मोठा राजकारणी पुरुष नाही. म्हणूनच त्या आत्तापर्यंत मी लिहिल्याही नव्हत्या व लिहिणारही नव्हतो. तसे काही मनात रेंगाळत ही नव्हते ! नेहरूंची जन्मशताब्दी महाराष्ट्रात धूमधडाक्यात साजरी झाली होती. त्यावेळीअनेकांना आठवणी लिहिण्यासाठी आवाहन शासकीय स्तरावर केले जात होते. महाराष्ट्रातील इतर जाणते नेत मंडळींना पं. नेहरूंचा जो सहवास घडला, त्यामानाने मी तर अगदी नगण्यच !परंतु कॉंग्रेस सेवादलाचा एक स्वयंसेवक म्हणून पुणे व भावनगर अधिवेशनात आणि जिल्हा युथ कॉंग्रेसचा सेक्रेटरी असताना अहमदनगर शहरात मला त्यांचा जो अल्प सहवास मिळाला, तो माझा जीवन उजळून काढणारा ठरला.
पुण्याला कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात नगरहून मी पाच-सहा सेवादल सैनिक घेऊन गेलो होतो. त्यावेळी कॉंग्रेस सेवादलाचे संघटक श्री. आनंदीराम कुमट होते. पहिल्याच दिवशी त्यांनी मला व्यासपीठाजवळ उभे केले होते. श्री. नीलम संजीव रेड्डी त्यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे काम चाले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मला पं. नेहरूंचा रुद्रावतार पाहावयास मिळाला. त्याचे असे झाले होते, अधिवेशनात कोणत्या तरी एका ठरावावर गरमागरम चर्चा चालू होती. दुपारच्या एक-दीड वाजायला आला होता. प्रतिनिधींची भाषणे होत होती. व्यासपीठावर श्री. नीलम संजीव रेड्डी, पं. नेहरू वगैरे जाणती मंडळी होती. तेवढ्यात कोणा एका प्रतिनिधीने श्री. संजीव रेड्डींच्या कानात येऊन सांगितले, ""अभी दो बज रहे है, खाने के लिये छुट्टी दे दो. बाद में बहस करेंगे, तो बात मन जैसी हो जायेगी''. संजीव रेड्डींना हा सल्ला पटला व त्यांनी चालू असलेल्या वक्त्याचे भाषण संपल्याबरोबर माईक हातात घेतला. ते ज्या लोडला टेकून बसले होते, तो त्यांनी हाताने दूर केला व ते म्हणाले, ""अभी भोजनका समय हुवा है, इसलिये पहले खाना खायेंगे और बादमें फिर बहस जारी करेंगे.'' संजीव रेड्डींचे हे म्हणणे होते न् होते, तोच पं. नेहरू ताडकन गादीवरून उठून उभे राहिले. मी व्यासपीठावरच त्यांच्या मागच्या बाजूला उभा होतो. त्यांनी हातातला लोड वर उगारल्यासारखा केला व चटदिशी खाली आपटत जोराने गरजले, ""क्या खाना लगाया है, पहले बहस होगी, बादमें खाना.'' त्यांचा तो रुद्रावतार पहाताच अध्यक्ष संजीव रेड्डी गांगरलेच. त्यांच्या तोंडून ही शब्द फुटेना. पण पं. नेहरूंनी लगेच पुढील व्यक्तीच पाचारण केली व त्याचे भाषण सुरू झाले. नंतर पंडितजींनी आपला क्रोध आवरला. त्यांचे भाषण संपल्यावर ते म्हणाले, ""ठीक है, अब दे दो खानेकी छुट्टी'' ते हसत होते. मी धैर्याने त्यांच्याजवळ गेलो व माझ्या स्वाक्षरी बुकात त्यांची सही घेतली. त्या संबंध दिवसात पं. नेहरूंची "स्वाक्षरी' घेणारा मीच सेवादल सैनिक होतो. पं. नेहरूंचे ते रागावणे, लालबुंद होऊन बोलणे, तडफदारपणे झटक्यात गादीवरून उठणे, माझ्या लक्षात कायमचे कोरून राहिले आहे. नगरला आल्यानंतर मी कितीतरी जणांना ती "स्वाक्षरी' दाखवली व पं. नेहरूंच्या मी किती "जवळ' गेलो होते, ते अभिमानाने सांगितले. नेहरूंची ती स्वाक्षरी मी जतन करून अजूनही ठेवली आहे.पं. नेहरूंच्या प्रत्यक्ष साहचर्याचा प्रसंग आला तो गुजराथ मधील भावनगरच्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी.
भावनागरला कॉंग्रेस अधिवेशनाच्या बरोबरच अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादलाने एक "श्रम संस्कार छावणी' घ्यायचे ठरवले होते. महाराष्ट्रातून कॉंग्रेस सेवादलाचा एक जथ्था त्यासाठी पाठवावयाचा होता. एकूण पंधरा कॉंग्रेस सेवादल सैनिकांची निवड त्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेस सेवादलाने केली होती. मी नगर जिल्ह्याच्या कॉंग्रेस सेवादलाचा त्यावेळी मंत्री होतो. माझी निवड झाली. पुण्याचे श्री. शिवाजी ढमढेरे माजी महापौर, शालिनी पाटील, सौ. शालिनी राणे, श्री. शांतीभाई बागमार, नाशिकचे श्री. कंत्रोड माझ्या जथ्यात होते. भावनगरला आम्ही मुंबई मार्गे गेलो. पंधरा दिवस श्रमदानाचा कार्यक्रम होता. भावनगरच्या जवळ एक खेडे होते. त्या खेड्यासाठी आठ मैल रस्ता पंधरा दिवसात श्रमदानाने कॉंग्रेस सेवादल, म्हणजे आम्ही करणार होतो व हे करतानाच कॉंग्रेस अधिवेशनात स्वयंसेवकाचे कामही करणार होतो. पाच-सहा दिवस श्रमदान केल्यानंतर श्री. सुब्बाराव, अ.भा. कॉंग्रेस सेवादलाचे संघटक यांनी माझी नेमणूक पं. नेहरूंच्या कुटी बाहेर केली. पं. नेहरूंच्याकडे अनेक नेते येत जात असत. मोरारजी देसाई, महताब, संजीव रेड्डी, कुष्णमेनन, गोविंद वल्लभ पंत वगैरे अनेक नेत्यांचे दर्शन मला त्यावेळी होई.एकदा सकाळी-सकाळी ८ वाजताच मोररजी देसाई पं. नेहरूंच्याकडे आले. मी त्यांना सेवादलाचा "सॅल्युट' केला. ते परतले तेव्हा साडेआठ वाजले होते. पं. नेहरू त्यांच्यासह, त्यांना सोडायला दारापर्यंत आले. मोरारजी गेल्यावर पं. नेहरूंनी माझ्याकडे पाहिले. मी त्यांना "सावधान' होऊन "सलामी' दिली. पं. नेहरू अगदी प्रसन्नचित्ताने हसले. माझ्याकडे येत म्हणाले, ""कहॉंसे आये हो''""महाराष्ट्रसे''- मी जुजबीच बोललो. आतून आनंद झाला होता.""कौन सुबेसे ?''- त्यांनी परत विचारले.""जी.... '' मी उत्तरलो. ""अहमदनगरसे''""अहमदनगरसे ?'' पं नेहरूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता, ""वहॉं तो मै बहुत दिनोंतक था'' ते उद्गारे""हॉं, मुझे मालूम है. आपने वहॉंपर "भारत का शोध' नामक किताबभी लिखी थी'' मी उत्तरलो.पं. नेंहरूंचे डोळे चमकले. स्मित हसून हातातली बाही मागे करत ते म्हणाले, ""तुम्हे मालूम है ?''
मी गर्वाने म्हणालो, ""मै कॉंग्रेस-सेवादल का सैनिक हूँ. सैनिक को, सेनापतीके बारे में जानकारी रखनी चाहिये''भयंकर खुश झाले असावेत माझ्या उत्तरावर ते ! माझ्या पाठीवर हात त्यांनी फिरवला. इतक्यात आतून त्यांचे पी.ए. येऊन म्हणाले, "ढेबरजीका फौन है' ते तसेच माघारी वळून आत परतले. त्याच दिवशी संध्याकाळही त्यांनी मला आत जाता-जाता विचारले, ""क्या नाम है तुम्हारा ?''""जी.... जवाहर'' मी उत्तरलो. त्यांनी पुन्हा माझ्याकडे स्मितहास्य फेकले व ते आत निघून गेले.
भारताच्या या महान पुत्राचा मी एक अख्खा दिवस "संत्री' होतो, ही भावना, अजूनही माझ्या मनातून जात नाही. ते संवाद , ते शब्द, ते रूप व ते स्मित, माझ्या काळजात मी कोरून ठेवले आहे.
पं. नेहरूंची आणखी एक आठवण माझ्या काळजात आहे. मी त्यावेळी जिल्हा युथ कॉंग्रेसचा सरचिटणीस होतो. पं.नेहरू नगरला येणार होते. १९५६ ची गोष्ट आहे ती. रेसिडेन्सिअल हायस्कूलवरील मैदानात त्यांची जाहीर सभा होणार होती. नगर शहरातून सभेची व्यवस्था ठेवण्यासाठी १६५ स्वयंसेवक त्यावेळी मी तयार केले होते. पं. नेहरूंच्या त्या सभेची इतकी चोख व्यवस्था होती कि त्यावेळचे कलेक्टर श्री. झुबेरी यांनीही माझी पाठ थोपटली होती. पं. नेहरूंचे त्यावेळचे समग्र भाषण मी पहिल्या पंक्तीत खाली बसून शब्दन्शब्द ऐकले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कै. तख्तमल जैन यांची नात व माझी आतेबहीण सरोज त्यावेळी माझ्याजवळ होती. सभा संपल्यावर ती म्हणाली, "जवाहर, तुमने बहुत अच्छा काम किया, तुम भी जवाहरलाल बनो.' पण मी "जवाहरलाल' बनू शकत नाही, म्हणूनच मी माझे नाव फक्त "जवाहर' लिहितो, "लाल' नाही.


 नगरचे दोन संस्कृत पंडित

""ज्येष्ठ संस्कृतचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ, प्राध्यापक डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी संस्कृत भाषेच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्कृततज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनाही संस्कृत विषयातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा कालिदास पुरस्कार जाहीर झाला आहे. साप्ता. नगर संकेततर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या निमित्ताने वरील दोघांचे विचार आम्ही येथे लेख रूपाने प्रकाशित करीत आहोत'' - संपादक

भाषांच्या पोषणासाठी संस्कृत महत्त्वाची - डॉ. म. ना. बोपर्डीकर

संस्कृत भाषेची गरज - राष्ट्रीय एकात्मतेसाठी संस्कृत भाषेची गरज आहे. संबंध देशात ही भाषा वापरली जाते. ऋग्वेद हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हटला जातो. सगळ्या भाषांचे मूळ संस्कृत आहे. दक्षिणेत एका गावात ९० टक्के संस्कृत बोलली जाते. संस्कृतला जागतिक भाषांचे मूळ म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही. संस्कृत भाषेचे विचार राष्ट्रीयत्वाचे आहेत. आधुनिक भाषा बिघडत चालली आहे. म्हणूनच संस्कृतचे अध्ययन महत्त्वाचे आहे. मराठीसह अन्य भाषांच्या पोषणासाठी संस्कृत महत्त्वाची आहे. संस्कृतमध्ये विज्ञानवाद ओतप्रोत भरलेला आहे. थोड्या शब्दात भरपूर आशय देणारी ही एकमेव भाषा आहे. व्याकरणाबद्ध भाषा आहे.व्यक्तिमत्त्व विकास- पुरोहित, भटजी किंवा धार्मिक कार्यासाठी सध्या संस्कृतचा वापर होतो. ही भाषा विशिष्ट धर्माची मानली जाते, मात्र तसे अजिबात नाही. सर्वच विषयांची व्याप्ती या भाषेत आढळते. राज्यघटना तयार करणाऱ्या समितीमध्ये संस्कृत पंडित महामहोपाध्याय डॉ. पा. वा. काणे सदस्य होते. गीतेमध्ये जन्मावरून जात ठरत नाही. हे स्पष्ट केलेले आहे. आयुर्वेद संस्कृतमध्ये आहे. युद्धशास्त्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, राजनीती याचे धडे संस्कृतमध्ये आहेत. अभ्यास कराल तेवढे भांडार संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे ही भाषा फक्त पुरोहितांपुरती मर्यादित आहे, असे म्हणता येत नाही. महाराष्ट्रात या भाषेला कमी लेखले जाते, हे दुर्दैव आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतात संस्कृतमध्ये झालेले तत्त्वचिंतक हे सर्वच समाजस्तरातील होते. त्यामुळे संस्कृत ही विशिष्ट वर्गाची भाषा आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. संस्कृत भाषा म्हणजे उच्चाराचे एक शास्त्र आहे. विज्ञानाच्या अभ्यासासाठी संस्कृतची गरज आहे. उच्चार, विचार, आचरण सुधारण्यासाठी ही भाषा उपयोगी पडते. विविध स्तोत्रे, श्लोक पठणामुळे मनावर संस्कार घडतात, लेखनकला नसताना वेद निर्माण झाले. गुरू-शिष्य परंपरा संस्कृत भाषेतून निर्माण झाली. उपजीविकेसाठी नसेल पण संस्कार म्हणून महत्त्वाची आहे. संस्कृतमधील संभाषण, बातम्या ऐकणे जरुरीचे आहे, नगर आणि संगमनेरमध्ये संस्कृत बोलण्याचे वर्ग घेतले जात आहेत.पाठांतर - संस्कृत भाषेबाबत काही गोष्टी चुकल्या आहेत, हे निश्चित आहे. संस्कृतमध्ये केवळ पाठांतरच झाले. त्याचा आशय समजून घेण्यामध्ये कोणीच फारसे स्वारस्य दाखविले नाही. पण पाठांतरामुळेच वेद टिकले. उलट-सुलट म्हणणे म्हणजे पाप समजले जाते, हे त्यामुळेच. उच्चार चुकला तर अर्थ चुकतो. म्हणून संस्कृतला मौखिक परंपरा आहे. ऋग्वेदात लेखनकला नव्हतीच, म्हणून पाठांतराला महत्त्व आहे.भवितव्य - संस्कृतच्या भवितव्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर कला शाखेसाठी संस्कृत विषय अनिवार्य केला पाहिजे. संस्कृतमध्ये अधिकाधिक संशोधन व्हायला हवे आहे. विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये डॉक्टरेट मिळविणे आवश्यक आहे.

००० ---०००---०००

संस्कृतमध्ये सर्वशाखीय गुप्तधनाचा खजिना - डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर

संस्कृतमध्ये मी जे काही थोडे फार कार्य करून शकलो त्याला मिळालेली ही सर्वोच्च पावती आहे. मला मिळालेल्या पुरस्कारामध्ये संस्कृत भाषेचा सन्मान झाला आहे. या यशाचे श्रेय प्रामुख्याने माझ्या आई-वडिलांना आहे, ज्यांनी माझ्यावर संस्कार केले. शाळा, महाविद्यालय आणि संशोधन पदवी मिळविताना मला मिळालेले मार्गदर्शन या सर्वांनाच श्रेय देणे उचित वाटते. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी या पुरस्कारामुळे मला मिळाली आहे.
कालबाह्य- संस्कृत ही समृद्ध भाषा आहे. नवीन नवीन शब्द निर्मितीची ताकद संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शास्त्रीय संकल्पना या भाषेत व्यवस्थितपणे मांडता येऊ शकते. संस्कृतीची जडणघडण ही संस्कृतशी निगडीत आहे. रामायण-महाभारत ग्रंथांचा "आसेतु हिमाचल' असा सर्वांनाच अभिमान वाटतो. सांस्कृतिक उन्नतीसाठी या भाषेचा उपयोग करून घेता येऊ शकेल. या भाषेत अफाट वाङ्मय आहे. सर्वसामान्य माणसाला फारशी माहिती नसते आणि जे काही असते ते फक्त कालिदास, व्यास, वाल्मिकी यांच्याभोवती घुटमळते. मात्र याहीपेक्षा अधिक समृद्ध दालने या भाषेत आहेत.वैज्ञानिकदृष्या- संस्कृतमध्ये कृषीशास्त्र, गणितशास्त्र आहे. दहाव्या शतकामध्ये सिद्धांत शिरोमणी मधील "आकृष्टी तत्त्व' म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. जे न्युटनच्या शोधाआधी लिहून ठेवले गेले आहे. संस्कृतमध्ये विज्ञान नाही, ही भ्रामक समजूत आहे. पाहिजे तेवढे लक्ष संस्कृतकडे दिले नाही, याची खंत वाटते. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा म्हणावा तेवढा अभ्यास झाला नाही. संगीतशास्त्र समृद्ध आहे. वैज्ञानिक शोध लागले नव्हते त्या काळात "स्वरसप्तक' तयार झाले होते. दोन स्वरांमध्ये गुणोत्तराबाबतचे विवेचन संस्कृतमध्ये आहे. नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, ललितकलांचा विकास संस्कृतमध्ये सापडतो. अश्वशास्त्र, हस्तीशास्त्र आहे. खगोलशास्त्र, ग्रहशास्त्र, वास्तुशास्त्र आहे. भूकंपाची अनुमाने संस्कृतमध्ये आहेत. अंकगणना आहे. मात्र या शास्त्रांची वाढ होऊ शकली नाही. हे सारे भांडार एखाद्या गुप्तधनाप्रमाणे राहिले.ज्ञानभांडार - पाश्चात्त्यांची भौतिक प्रगती पाहून असा आपला ग्रह होतो, परंतु सखोल अभ्यास केला तर इंग्रजी भाषेत जे ज्ञान आज उपलब्ध आहे, ते ज्ञान नसून निव्वळ माहिती आहे. खरे ज्ञानभांडार तर संस्कृतमध्ये आहे. मात्र आपण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्यामुळे आपली मूळ भाषा मागे पडली. आज विकसीत देशांमध्ये जे सामाजिक अध:पतन झालेले आपण पाहतो, ते केवळ नैतिकमुल्यांच्या अभावामुळे. ही नीतिमूल्य संस्कृतमध्ये आहेत. आज समाजात भ्रष्टाचार, अनाचार वाढला कारण नैतिकता कमी झाली. भौतिकसुखाच्या मागे लागून आपण आपले सत्त्व हरवून बसलो.सद्यःस्थिती - पूर्वी घरात निदान संस्कृतमधील एखादा श्लोक तरी म्हटले जायचे. त्यातून स्वरोच्चाराचा संस्कार घडायचा. घरात मांगल्य असेल, तर दारातील दुराचारीवृत्ती आत शिरत नाहीत. आज परदेशातील मंडळी संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत. आपण मात्र इंग्रजीच्या मागे लागलो आहोत. वस्तुत: ज्याला संस्कृत भाषा येते, त्याला जगातील कोणतीही भाषा अवघड नाही. भाषिक विकासासाठी संस्कृत ही मूळ भाषा आहे. या भाषेत देखील तुम्ही करिअर करू शकता. संस्कृतमध्ये असलेल्या वैज्ञानिक संज्ञांचा अभ्यास करून तुम्ही नवे शोध लावू शकता. नव्या पिढीने ही भाषा आत्मसात केली तर त्याला जग जिंकता येईल.


अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

लेखक - प्रा. जवाहर मुथा

१९६३ - ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही "मंडळी' बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्गारले, "अण्णा, हा आमचा जवाहर'.अण्णाभाऊ साठेंची आणि माझी ही पहिली ओळख मी कधीच विसरू शकत नाही. कारण त्यावेळी अण्णांनी माझ्याकडे आश्र्चर्याने पाहात, "असं का- येये' म्हणत जवळ बसवून घेतले होते. अण्णांनी माझी ओळख स्वत:हून करून घेतली. ते त्यांचे मोठेपण होते. मला काय कळणार ? ते म्हणाले, "तुझं नाव जवाहीरलाल आहे, म्हणजे तू चांगलाच असणार !' मला त्या वाक्याचा काहीच अर्थ कळला नाही. अमरशेखांबरोबर ही तात्यांनी माझी ओळख अशीच करून दिली होती. ते आठवले ! परंतु ते वर्षभरापूर्वीचे होते.मी त्यावेळी नगर कॉलेजमध्ये एस्.वाय्.बी.ए. ला होतो. "साहित्य-साधने'चा सेक्रेटरी म्हणून मी कॉलेजमध्ये कामही करीत होतो. प्रा. बंडेलू हे साहित्य साधनेचे अध्यक्ष होते. प्रा. स. वा. मुळे, प्रा. वसंत दीक्षित यांचे मार्गदर्शन या संस्थेला असावयाचे. प्रा. ह. कि. तोडमल हे जरी मराठी शिकवीत असत तरी ते एन्.सी.सी. चे ऑफिसर असल्याने त्यांची एकूणच देहयष्टी ही लष्करी अधिकाऱ्याचीच वाटायची. (अजून ही ते तसेच आहेत.)मी कॉलेजमध्ये मराठी विषयाचा विद्यार्थी आहे व मी कविता ही लिहितो, हे कळताच अण्णांना मी त्यांचाच वाटलो. ते नगरला काही दिवस मुक्कामासाठी आले होते. भाई सथ्थांकडे ते उतरले असावेत. कारण निघताना ते म्हणाले होते, "उद्या तिथून पुन्हा इकडे येणारच आहे. पिक्चरचं शुटींग आहे, तेव्हा काही दिवस नगरलाच ! भेटू या. 'दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट झाली. अण्णांनी त्यांच्या रशियाच्या प्रवासासंबंधी बऱ्याच गोष्टी आम्हांला सांगितल्या. त्यातल्या एक-दोन अजूनही आठवतात, अण्णा म्हणाले होते,-"आम्ही लेनिनग्राडला' विमानाने जात असताना एक तरुणी भेटली होती. ती विमानात खिडकी शेजारी बसली होती. मान कलती करून तिने खिडकीच्या काचेवर टेकवली होती. तीचे बंद असलेले डोळे उमलत्या कळीप्रमाणे मला भासले. तिच्या पुढे एक लहानसा पाळणा होता व त्यात शुभ्र वस्त्रात तिचे लहान मूल झोपले होते. उद्याचा रशियन नागरिक मला त्यात दिसला. किती काळजी घेतात ते लहान मुलांची ! नाहीतर आमची फरफट आहेच. ज्या देशात लहान मुलं सुखी तो देश किती सुंदर !'अण्णांची ती व्याख्या ऐकून मला खूपच नवल वाटले होते व त्यांच्या आस्थेवाईक तत्त्वज्ञानाची ओळख मला पटायलाही लागली होती.
त्यानंतरच्या काळात अण्णाभाऊ साठेंना मी ७/८ वेळा भेटलो असेल. कधी मुंबईत तर कधी नगरला. १९५७ च्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णांनी "दलित साहित्य' ही संकल्पना फार विस्ताराने मांडली होती. त्यावेळेस मी दहावीत होतो. वृत्तपत्रात मी त्यांचे भाषण व त्यांच्याविषयी बरेच वाचलेले आठवते. त्यातच संमेलनातील त्यांचे वाक्य, "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे-' हे नंतरच्या काळात तत्त्वज्ञान बनून राहिले होते.अण्णाभाऊंना १९६१ मध्ये त्यांच्या "फकीरा' या कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार लाभला होता. १९६७ पर्यंत खऱ्या अर्थाने त्यांची घोडदौड चालू राहिली. त्यांनी दलित साहित्याला चळवळीचे स्वरूप दिले होते. ते एकदा मला म्हणाले होते, "जवाहर, परंपरागत मूल्य व्यवस्थेला शह द्यावयाचा असेल तर त्याला चळवळीचे स्वरूप द्यावे लागते. गप्प बसून कसे चालेल.'
अण्णांच्या फकिरा, वैजयंता, वारणेचा वाघ या कादंबऱ्या मी वाचून काढल्या. चित्रा या कादंबरीवर नाटक लिहिले गेले जाईल- असे मला वाटले होते. मी त्यांना तसे बोलून दाखवले होते.
मुंबईच्या बौद्ध साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष असताना ते मला एकदा भेटले होते. अहमदनगरची आस्थेवाईकपणे चौकशी करीत ते म्हणाले, "जवाहर, ही परिषद चालली पाहिजे, तू त्याच्यात लक्ष घालतो, ही चांगलीच बाब आहे.'अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याचे शुटींग नगरला, वाळकी जवळच्या एका ओढ्यात चाललेले मी पाहिले. तात्या, कमला वहिनी, नंदिनी ने त्यातील काही दृश्यात काम केले. तात्यांनी पागोटे घातलेल्या एका पाटलाची भूमिका केली. एका माणसाच्या खाड्दिशी मुस्कटात मारायची, असे दृश्य होते. तात्यांनी ते समजावून घेतले व १/२ रिटेक मध्ये पूर्ण केले.
अण्णाभाऊ हे मातंग समाजाचे होते. त्यांना "लोकशाहीर' हा किताब जनतेने बहाल केला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अमरशेखांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनजागृती केली होती. त्यांचा जन्म १९२० चा! वयाच्या १४व्या वर्षी आपल्या मूळ वाटेगावहून पायी प्रवास करीत मुंबई गाठली होती. रस्त्यात वेठबिगारी केली. शिक्षण न घेताही ते विचारप्रवृत्त बनले. व मार्क्सवादकडे झुकले. ते अवघे ४९ वर्षे जगले; परंतु त्या काळात ३५ कादंबऱ्या, १५ कथा संग्रह, १० पोवाडे, १२ चित्रपटकथा आणि एक प्रवासवर्णन एव्हढे साहित्य त्यांनी निर्मिले. आजपर्यंत फकिरा कादंबरीच्या १७ आवृत्त्या निघाल्या. त्यांच्या कथा निरनिराळ्या २७ भाषेत अनुवादीत झाल्या. त्यांच्या हयातीत महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर १९६३ मध्ये "लोकराज्य'चा विशेषांक प्रकाशित केला होता.ते एकदा मला म्हणाले होते, "बरं का जवाहर, खरी गम्मत मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना यायची, त्यांनी माझ्या तमाशावर बंदी आणली होती. पण त्यांची "बंदी' फुसकी ठरली. मी जिथे जाई तिथे लोक मला वग करायला सांगत आणि आमचे "तमाशे' दुपारीच होऊ लागे. पोलीस त्यावेळी पेंगलेले असायचे'
१९६२ मध्ये अण्णांनी "चापऱ्याचोर' हे वगनाट्य लिहिले होते. ते त्यावेळी बरेच गाजले. त्याचा एक प्रयोग नगरला त्यावेळी झाला होता. "रंगभवन'च्या खुले नाट्यगृहातील त्या प्रयोगाला मी आवर्जून उपस्थित होतो. अण्णांनी त्या वगनाट्यात खापऱ्याचोराचे काम केले होते. प्रयोग संपल्यावर अनेकांनी अण्णांना गराडा घालून त्यांचे अभिनंदन केले होते.आमचे एक भाडेकरी आमदार बा. म. भारस्कर हे मंत्री झाले होते. समाजकल्याण खाते त्यांच्याकडे आले असावे. भारस्कर, दादासाहेब रुपवते हे अनुक्रम टिळकरोड व स्टेशनच्या आमच्या बोहरी चाळचे कैक वर्षे भाडेकरू होते. दादा रुपवते तर किमान ४० वर्षापासूनचे भाडेकरी होते. त्यामुळे त्या दोघांचा माझ्याशी चांगला संबंध होता. भारस्कर हे कॉंग्रेसचे व अण्णाभाऊ साठे भारस्करांच्या शपथविधीच्या कार्यक्रमास हजर होते. आपला एक दलित मित्र मंत्री होत होता त्याचा त्यांना तसा आनंदच होत असावा.अण्णाभाऊंची पुण्यातही अधून मधून भेट व्हायची ६६-६७ मध्ये मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक म्हणून रुजू झालो, तेव्हा ही एक-दोनदा भेटलो. घाटकोपरच्या झोपडपट्टीतून गोरेगावच्या फ्लॅटमध्ये ते १९६८ मध्ये राहायला आले होते. परंतु त्यांना तिथे करमले नाही. १९६९ च्या जुलै मध्ये जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा "साधना' मध्ये मी त्यांच्यावर लेख लिहिला.
२००९ मध्ये औरंगाबाद येथे मातंग समाज प्रतिष्ठानने मला जीवन गौरव पुरस्कार दिला. तो अण्णाभाऊंच्या नावाचा होता म्हणून घेण्यासाठी मी गेलो. गृहमंत्री भुजबळांच्या हस्ते तो घेताना भुजबळ म्हणाले, "मुथा, तुमचा आणि अण्णाभाऊंचा संबंध हा एक योगच म्हणावा लागेल !' त्यांच्या त्या उद्गाराने मी स्वत:ला कृतार्थ समजून घेतले. माझे मित्र श्री. लहू कानडेंनी पाठपुरावा केला नसता तर या आठवणी कदाचित मी लिहिल्याही नसत्या. अजूनही खूप काही आहे. परंतु नंतर केव्हा तरी !


- शुभानन गांगल, मुंबई

 

सुज्ञ मराठी भाषक लेखणी घ्यायला कारण त्याला स्वत:च्या लिखाणात शुद्धलेखनाच्या चुका होण्याची खात्री असते ! "भीक नको पण कुत्रा आवर' या म्हणीप्रमाणे "मराठी नको पण शुद्धलेखन आवर', असे म्हणायची पाळी "शुद्धलेखन नियमावलीने' आणली आहे.
मराठी भाषक मराठी बोलतो ते कशासाठी ?- १) त्याला मराठी बोलून विचार व भावना व्यक्त करता येतात म्हणून ! २) मराठीत मौखिक-नियम नाहीत म्हणून ! ३) तो जे बोलतो ते चुकीचे आहे असे सांगून कोणताही नियम त्याचे बोलणे अडवत नाही म्हणून !समजा मराठी "शुद्धलेखन- नियमावली' सारखी "शुद्धमौखिक-नियमावली' आहे. ते पाळण्याचे बंधन लादलेले आहे. ते नियम भाषकाला पाळता येत नाहीत. तर काय होईल ? १) भाषा भाषकाची नसून नियम बनवणाऱ्यांची ठरेल ! २) भाषकाच्या संवादातील वैयक्तिक प्रामाणिकपणा, सहजता व नैसर्गिक - सौंदर्य लोप पातेल ! ३) "प्रमाणित व प्रतिष्ठित' भाषा बनवण्याच्या नादात, "भाषक व भाषा' यात दरी निर्माण होईल ! ४) भाषकाला मराठी भाषेबाबत आत्मीयता वाटणार नाही ! ५) दुसऱ्या भाषेचा आधार घेण्याची वृत्ती बळावेल !जर..... "अशा मौखिक - नियमांबाबत, १) व्याकरणकारांनी विद्वत्ताप्रचूरतेने त्याच्या योग्यतेची खात्री दिली ! २) "मराठी भाषेच्या विकासासाठी त्याची गरज आहे', असे सरकारने सांगितले ! ३) शाळा-शाळांतून घेतलेल्या तोंडी परीक्षेत मुले "मौखिक - नियमांमुळे' नापास होऊ लागली ! ४) स्वत:चीच भाषा बोलताना भाषकाला नियम सहजतेने पाळता येत नाहीत, म्हणून "बोललेली मराठी' अशुद्ध ठरू लागली !.... तर "मराठी भाषक, १) मराठीचाच त्याग करतील ! २) मौखिक-नियमांना उधळवून लावतील ! ३) असे नियम बनवणाऱ्यांना "वाळीत' टाकतील !..... असे आपल्याला वाटते का ?अगदी असेच "शुद्धलेखन - नियमावली' मुळे घडत आहे का ? आपल्याला काय वाटत ? आमंत्रण-पत्रिका, लेख, निबंध, दुकानावरील पाट्या, ट्रक मागील वाक्ये, टीव्ही सिरीयल मधील नामावली, वर्तमानपत्रातील बातम्या,... किती किती गोष्टी (!), "शुद्धलेखन-नियमावली'ची "कला' अवगत असणाऱ्यांकडून, तपासून घ्याव्या लागतात का ? "लिहिले की तपासून घ्यायचे'.... "लिहिले की तपासून घ्यायचे'.... "लिहिले की तपासून घ्यायचे'.... यात तुमची भाषा कोणती ? तुम्ही लिहिलेली की तपासून घेतलेली ? "सुखी माणसाचा सदरा' या म्हणीपेक्षा "शुद्धलेखन पाळता येणारी व्यक्ती' हल्ली जास्त विरळा ठरते ! अहो अगदी एका "तज्ञा'कडून तपासून घेतलेली वाक्य दुसऱ्या "तज्ञा'ला चुकीची वाटतात ! गंमत सांगू की, "शुद्धलेखन' या विषयासाठी दाने दिवस भरलेल्या एका चर्चासत्रातील लिखित फलकातच (याला आपण सामान्यपणे बॅनर म्हणतो !) चूक होती आणि दोन दिवसात टिपलेल्या प्रत्येक छायाचित्रात ती चूक टिपली गेली !"आमची भाषा मराठी, आम्ही मराठीतूनच विचार करतो. मराठीतून सर्व भावना बोलून दाखवतो. मराठी अक्षराचा उच्चार व मराठी अक्षराचे लिखित रूप, यात विलक्षण साम्य असल्याचे अनुभवतो. आमच्या मनातील विचार व भावना आम्ही कागदावर उतरवतो. म्हणजे आमच्या दृष्टीने त्यात चूक नसते. त्यात चूक आहे असे वाटते ते "शुद्धलेखन-नियमावली' ला ! आम्हाला नाही !'.... हे आमच्या सामान्य मराठी-भाषकाचे मनोगत आहे असे म्हणता येई का ? जर बहुतेक मराठी व्यक्तींबाबत असे घडत असेल तर ती "चूक' न ठरता तोच भाषेचा "नियम' ठरतो, असे आपल्याला वाटते का ?आजपर्यंत मराठीत असे का घडले असावे ?- १) सामान्यांचा लिखांनिशी फारसा संबंध येत नव्हता. २) "मराठी व्याकरण व लेखन-नियम' ही इंग्रजी सरकारची गरज होती म्हणून मराठीत पहिले व्याकरणाचे पुस्तक इंग्रजी माणसाने लिहिले. ३) एका विवक्षित गटाकडे याबाबतचे नेतृत्व होते. ४) त्या विवक्षित गटाच्या निष्ठा मराठीभाषेपेक्षा संस्कृतभाषेशी जास्त निगडीत होत्या. ५) त्यांना मराठी व संस्कृत भाषेतला मूलभूत फरक जाणता आला नाही. ६) व्याकरणकारांना मराठीचे स्वतंत्र व्याकरण निर्माण करता आले नाही म्हणून त्यांनी संस्कृतच्या व्याकरणाची आयात मराठीत केली. ७) आयात केलेले व्याकरण, संस्कृतभाषेतल्या विविध शब्दात नटलेले असल्याने, मराठी भाषकाला कधीच ते सोपे, सुटसुटीत व आपलेसे वाटले नाही. ८) चुकीच्या व्याकरणाबाबत बोलण्याची क्षमता नसलेले, शिक्षक व प्राध्यापक घडले आणि चुकीचा पायंडा अखंड चालत राहिला. ९)"सारे आयुष्य चुकीचे शिकवण्यात घालवत शेकडो विद्यार्थी निर्माण केल्याने', जे घडले ते चुकीचे होते, हे मान्य करण्याची कुवत शाळा-कॉलेज-शिक्षक-प्राध्यापक व सरकार यात उरली नाही. १०) स्वत:चे अद्वितीय मोठेपण न उमगल्याने, भाषा-विज्ञानासाठी पाश्र्चिमात्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती आवश्यक आहे."मराठी राजहंसा'ने स्वत:चे असामान्यत्व ओळखावे !!! प्रसारमाध्यमांनी आता हा विषय उचलून धरून जनजागृती करणे आवश्यक आहे.


nagarsanket, article, mahabharat, marathi

उमाशशी भालेराव, पुणे

महाभारतातील स्त्री म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती "द्रौपदी.' तिच्या स्वयंवरात अर्जुनाने तिला जिंकले होते. तिनेही मनाने त्याला वरले होते, परंतु बळजबरीने तिला अर्जुनाबरोबर त्याच्या चार भावांशीही विवाह करावा लागला व पाच पतींचे पत्नीपद स्वीकारावे लागले. नंतर भर सभेतील तिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग घडला आणि त्यानंतर ती सतत सूडभावनेत जळत राहिली. महाभारतातील द्रौपदी इतकीच महत्त्वाची स्त्री आहे "कुंती.' विवाहापूर्वी कुमारी माता बनली आणि समाजाच्या भीतीने आपले बाळ तिने नदीत सोडून दिले. विवाहानंतरही पती कमजोर असल्याने तिला परपुरुषापासूनच तीन पुत्र झाले. तिची सवत "माद्री' हिला पण असेच दुसऱ्यांकडून दोन पुत्र झाले. त्यानंतर आपल्याला आठवते "गांधारी' गंधार देशाची सुंदर राजकन्या ! पण राजकारणी खेळी खेळण्यासाठी तिच्या पित्याने व बंधूने तिचे लग्न आंधळ्या राजपुत्राशी लावून दिले. तिने तक्रार केली नाही. पण पतीचे डोळे बनून त्याला मार्गदर्शन करण्याऐवजी स्वत:च्याही डोळ्यांवर पट्टी बांधून जन्मभर ती आंधळेपणाने जगत राहिली. त्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात, "अंबा, अंबिका, अंबालिका !' भीष्माने आपल्या भावासाठी काशी देशाच्या या तीन राजकन्या जिंकून आणल्या. पैकी अंबेचे शाल्वावर प्रेम होते. हे कळल्यावर भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिचा स्वीकार केला नाही. दोन्हीकडून झिडकारली गेलेली अंबा! तिने सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. महाभारतातील सुडाचा प्रवास इथून अंबेपासून सुरू होतो. अंबिका व अंबालिका यांना पतिनिधनानंतर परपुरुषापासूनच पुत्र झाले. महाभारतातील इतर महत्त्वाच्या स्त्रिया आहेत- देवकी, रुक्मिणी, सत्यभामा, सुभद्रा, उत्तरा वगैरे! या सर्वांचीच चरित्रे आपल्याला अतिशय अद्भुत वाटतात.महाभारतातील ही महत्त्वाची स्त्री व्यक्तिमत्त्वे व त्यांची चरित्रे आपणास माहीत असतात. पण मूळ महाभारतात एकूण १५९ स्त्रियांचा उल्लेख आहे. महाभारत ही राजघराण्यातील दोन कुटुंबाच्या संघर्षाची कथा असल्याने साहजिकच त्यात राजघराण्यातील स्त्रिया प्रामुख्याने आहेत. शिवाय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या स्त्रिया, ऋषिपत्नी, आश्रमात वाढणाऱ्या मुली, दासी, नर्तिका, गणिका इतकेच नव्हे, तर अमानवी स्त्रिया (उदा. देवता, अप्सरा, गंधर्वकन्या, नागकन्या) आहेत. शिवाय गंगेसारख्या नदीलाही स्त्रीरूपाने महाभारतात आणले आहे. कै. डॉ. वनमाला भवाळकर यांनी मूळ संस्कृत महाभारत वाचून या सर्व स्त्रियांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून "महाभारत में नारी' हा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला आहे. महाभारत काळात स्त्रीजीवन कसे होते याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आहे. मराठी वाचकाला ही सर्व माहिती खूपच उद्बोधक वाटेल.महाभारत काळातही समाज पुरुषप्रधान असल्याने पुत्रजन्म हा महत्त्वाचा असे. पुत्र हा वंशाचे नाव राखणारा, वंशवृक्ष पुढे चालवणारा, पित्यास मोक्ष मिळवून देणारा, कुटुंबाची जबाबदारी पेलणारा, देशाचे रक्षण करणारा असा मानला जाई. कन्या मात्र नाजूक, कमकुवत व दुसऱ्याचे धन मानले जाई. असे असूनही, कन्या जन्मली म्हणून क्षणभर वाईट वाटले तरी तिला लक्ष्मी मानून तिचे स्वागत होत असे. सावित्री, दमयंती, द्रौपदी, गांधारी या सर्वजणी आपल्या पित्याच्या अत्यंत लाडक्या होत्या. अनेक निपुत्रिकांनी कन्येला दत्तक घेतल्याची उदाहरणे महाभारतात आहेत. विदर्भराजाने लोपामुद्रास तर कुंतीभोजाने कुंतीस दत्तक घेतले होते. काही ऋषींनी पण शकुंतला, प्रमद्वरा, कृपि यांना दत्तक कन्या मानले होते. पुत्र झाला नाही व फक्त कन्याच असली तर कन्येसच "पुत्रिका' मानले जाई व तिच्या पुत्राला पित्याचे क्रियाकर्म (श्राद्ध पिंड) करण्याचे अधिकार दिलेला होता.धर्मशास्त्रात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी महाभारतातील स्त्रियांच्या वाट्यास फक्त तीनच संस्कार आलेले आढळतात. नामकरण, विवाह आणि अंत्यसंस्कार हे तीनच संस्कार स्त्रियांसाठी केले जात असत.उपनयन करून पुत्रांना शिक्षणासाठी आश्रमात गुरूकडे पाठवले जाई. मुलींसाठी मात्र अशी कोठे शिक्षणसंस्था असल्याचा उल्लेख महाभारतात नाही. आश्रमात ऋषिपत्नी, ऋषिकन्या असत पण आश्रमात मुली शिक्षणासाठी पाठवल्याचा उल्लेख कोठेही नाही. मुलींचे शिक्षण घरीच मातेकरवी होत असे. पित्याकडून शिक्षण मिळाल्याची काही उदाहरणे आहेत. शुक्राचार्याने देवयानीस, कुंतीभोजाने कुंतीस, अश्र्वपतीने सावित्रीस खास शिक्षण दिले होते. आईकडून मुलींना त्यांच्या कर्तव्याबद्दल शिक्षण मिळत असे. काही प्रसंगी पती आपल्या पत्नीबरोबर वादविवाद करून तिला अनेक महत्त्वाच्या विषयांची माहिती देताना आढळतो. भीष्म व युधिष्ठिर यांची द्रौपदीबरोबरची संभाषणे व कृष्णाची सत्यभामेबरोबरची संभाषणे उदाहरणादाखल सांगता येतील. दरबारात विद्वानांची चर्चा होत असे तीही कधी कधी त्यांच्या कानांवर पडत असे. द्रौपदी आपल्या भावासमवेत नीतिशास्त्र शिकल्याचा उल्लेख आहे. गांधारी अर्थशास्त्रात तरबेज होती. राजकन्येबरोबर तिच्या आसपास असणाऱ्या मैत्रिणी, दासी यांच्या कानांवरही हे ज्ञान पडत असणार. कोणत्याही शिक्षणसंस्थेत गेल्या नाहीत तरी मुली अज्ञानी नव्हत्या. वेद शिकण्याचा मात्र त्यांना अधिकार नव्हता.युद्धनीती व शस्त्रात्रे वापरण्याची कला मात्र खास पुरुषांनाच शिकवली जाई. तरीपण सुभद्रेने अर्जुनाचा रथ अत्यंत कौशल्याने चालवल्याचा उल्लेख आहे. शर्मिष्ठेचा पण "शस्त्रधारी' असा उल्लेख आहे. तलवारी हातात घेतलेल्या स्त्री रक्षकांबद्दलही महाभारतात वाचायला मिळते. दरबारात नृत्य संगीत यांत तरबेज असणाऱ्या स्त्रिया असत. तसेच सुईणी, परिचारिका, व स्त्री गुप्तहेरही असत. त्यांना त्या त्या कामाचे प्रशिक्षण नक्कीच दिले जात असणार. स्त्रियांना धार्मिक विधी व तपश्र्चर्या करण्याचे अधिकार होते, असे दिसते. आश्रमातील ऋषिपत्नी सर्व धार्मिक कृत्ये करताना आढळतात. कुंतीने, अंबेने तपश्र्चर्या केल्याचा उल्लेख आहे. पातिव्रत्याच्या व तपश्र्चर्येच्या जोरावर स्त्रियांना अनेक प्रकारची शक्ती व सामर्थ्य प्राप्त करून घेता येत असे.महाभारत काळात मुलगी वयात आल्यावरच तिच्या विवाहाचा विचार केला जाई. बालविवाहाचे एकही उदाहरण महाभारतात नाही. वयात आल्यावर तीन वर्षांनी तिचा विवाह केला जाई. म्हणजेच त्याकाळी विवाहाच्या वेळी मुलीचे वय १६ किंवा १७ असावे. मुलांचे लग्नाचे वय २१ ते २५ असावे. शिक्षण संपवून मगच पुरुष गृहस्थाश्रमाचा स्वीकार करत असे. पण नंतर मात्र पुरुषास अनेक विवाह करण्याची परवानगी होती. पण स्त्रीला मात्र दुसरा विवाह करण्यास मनाई होती व ते पाप मानले जाई. पाच पती असलेल्या द्रौपदीचे एकच उदाहरण महाभारतात आहे. पती-निधनानंतरही कोणी दुसरा विवाह केल्याचे आढळत नाही. स्वयंवरास उभी राजकन्या नक्कीच वयात आलेली, नीट समज आलेली असणार म्हणूनच ती आपल्या पसंतीचा वर निवडू शके. गांधर्वविवाहाची महाभारतात अनेक उदाहरणे आहेत. दुष्यंत-शकुंतला, अर्जुन-उलूपी, गंगा-शंतनू, शर्मिष्ठा-ययाती इत्यादी, त्याकाळी प्रेमविवाहाची प्रथा होती असे दिसते.विवाह करताना जातीपातीचे बंधन नव्हते. त्याकाळी आपल्यापेक्षा खालच्या वर्णजातीच्या मुलीशी लग्न करण्यास पुरुषास मुभा होती; पण खालच्या जातीच्या मुलाचा उच्चवर्णीय मुलीशी विवाह होत नसे. लग्नबंधनाशिवाय खालच्या जातीच्या स्त्रीशी संबंध येऊन झालेल्या अपत्यास मानानेच वागवले जाई. उदा. विदूर, युयुत्सु !
विवाहानंतर स्त्री पतिगृही गेली की पती हेच तिचे सर्वस्व असे. एकत्र कुटुंबपद्धती होती व कुटुंबातल्या सर्व स्त्रिया मिळून घरव्यवस्थेच्या कामात सहभागी होत असते. निष्ठावंत पत्नी ही नम्र, विनयशील, आज्ञाधारक, पतीची व सासू-साऱ्यांची सेवा करणारी, अतिथींचे योग्य प्रकारे स्वागत करणारी, गृहव्यवस्थेकडे नीट लक्ष देणारी, सवतीशी प्रेमाने वागणारी अशी असे. पत्नी आज्ञाधारक, विनयशील असली तरी प्रसंगानुसार पतीस वा पुत्रास कठोर शब्द सुनावत असे. वस्त्रहरण प्रसंगानंतर द्रौपदीने आपल्या पतींची निर्भर्त्सना केली होती. गांधारीने पण धृतराष्ट्रास कठोर शब्द ऐकवले होते. कुटुंबातील वडीलधाऱ्या स्त्रियांना मानाने वागवले जाई. सासू-सासऱ्यांनी सुनेला छळल्याचे एकही उदाहरण महाभारतात नाही.वंशाला वारस देणे हे स्त्रीचे मुख्य कर्तव्य मानले जाई. पतीपासून पुत्रप्राप्ती न झाल्यास "नियोग' पद्धतीने परपुरुषा-पासून पुत्रप्राप्ती होऊ देण्याची प्रथा होती. अशी अनेक उदाहरणे महाभारतात आहेत. उदा. अंबिका, अंबालिका, कुंती, माद्री.
पुत्रजन्माचे इतके महत्त्व असूनही सर्वांना भरमसाट अपत्ये असल्याची उदाहरणे नाहीत. फक्त गांधारीस शंभर पुत्र होते. सुभद्रेस एक, द्रौपदीस प्रत्येक पतीपासून एकेकच पुत्र होता. दमयंतीस एकच पुत्र होता. ऋषिपत्नींनाही एकेकच अपत्य असल्याचे दिसते. त्याकाळी कुटुंबनियोजन नक्कीच केले जात असणार.पतिनिधनानंतर "सती' जाण्याची प्रथा होती. पण निपुत्रिक स्त्री, गर्भवती स्त्री व लहान अपत्ये असणारी स्त्री यांना सती जाण्यास परवानगी नव्हती. निपुत्रिक स्त्रीला पतिनिधनानंतर नियोग पद्धतीने परपुरुषापासून पुत्र होऊ देत असत.उच्चवर्गातील व मध्यमवर्गातील स्त्रिया द्रव्यार्जन करताना आढळत नाहीत. विवाहप्रसंगी मिळालेले दागिने, द्रव्य व इतर मौल्यवान वस्तू हे तिचे "स्त्रीधन' असे व त्यावर तिचा संपूर्ण हक्क होता. पित्याच्या किंवा नवऱ्याच्या मालमत्तेत मात्र स्त्रीला वाटा नसे. स्वत:ला पुत्र नसेल तर कन्येच्या पुत्रास सर्व मालमत्ता दिली जाई.कनिष्ठ जातीच्या स्त्रिया मात्र द्रव्यार्जन करत असत. दासी, नर्तिका, गायिका, परिचारिका, गुप्तहेर अशी अनेक प्रकारची कामे करताना त्या आढळतात. शिवाय धोब्याच्या, विणकऱ्यांच्या, कुंभाराच्या स्त्रियाही आपापल्या पतीच्या कामात मदत करताना दिसतात.
महाभारतात अनेक दासींचे उल्लेख आहेत. राजवाड्यात व श्रीमंत घरी अनेक दासी असत तर मध्यमवर्गीय घरांत दोन-तीनच दासी असत. दासी ही मालकाची मालमत्ता समजली जाई. ते दासींना कोणालाही देऊन टाकत असत. विवाहप्रसंगी उपहार म्हणून दासींना दिले जाई. आलेल्या अतिथीचा सत्कार करतानाही त्यांच्याकडे दासी पाठवल्या जात. दासी अनेक प्रकारची कामे करताना आढळतात. लहान मुलांचा संभाळ, मालकिणीची सर्वतोपरी सेवा, साफसफाई, इकडूनतिकडे निरोप नेणे, परिचारिका, राजकन्येस मैत्रिणीप्रमाणे सोबत करणे, स्वयंपाकघरात मदत करणे इत्यादी ! या दासींना ठरावीक वेतन मिळत असे का याचा मात्र उलगडा होत नाही. पण भोजन, वस्त्र व इतर गरजेच्या वस्तू मात्र दिल्या जात. घरातील यजमानीण आपल्या सर्व दासींवर लक्ष ठेवून असे. परंतु या दासी केव्हा, कोणत्या पुरुषाच्या कामवासनेला बळी पडतील याचा मात्र नेम नसे. त्यांच्या बाबतीत कोणतेही नैतिक नियम पाळले जात नसत.महाभारत काळात स्त्रियांना पडदापद्धती नव्हती. त्या मुक्तपणे सर्वत्र हिंडताना आढळतात. दरबारात हजर राहणे, अतिथींचे स्वागत करणे, वडील मंडळींशी चर्चा करणे, संगीत, नृत्य इत्यादी कार्यक्रमांना उपस्थित राहणे, प्रवासास जाणे, उत्सवाच्या प्रसंगी समाजात सर्वांशी मिळून मिसळून वागणे, हे सर्व स्त्रिया करत असत. दासी, परिचारिका वगैरे स्त्रियाही मुक्तपणे हिंडताना दिसतात.लग्नसंस्था होती परंतु स्त्री-पुरुषांच्या लैंगिक आचरणात बरीच मुक्तता आढळते. मुली तरुण पुरुषांबरोबर रात्रभर नृत्य करताना व आपल्या प्रियकरांना भेटत असल्याचे उल्लेख आहेत. महाभारतात अनेक प्रेमविवाह झाले. अनेक स्त्रियांनी लैंगिक स्वातंत्र्य घेतल्याचे आढळते. उदा. कुंती, सत्यवती. पती आंधळा, रोगी, अपंग असाही असला तरी पत्नीने पतिव्रता धर्म पाळायला हवा. तिला दुसरा विवाह करणे वर्ज होते पण पतीपासून अपत्यप्राप्ती न झाल्यास मात्र ती परपुरुषाशी संबंध ठेवू शके. त्याकाळी पळवून नेलेल्या व बलात्कारित स्त्रियांना समाज वाळीत टाकत नसे. त्या स्त्रियांचा अपराध नाही असे मानून त्यांना विवाहाची परवानगी होती. त्यांची मुले ही औरस मानून त्यांचे पती त्यांना मानानेच वागवीत.वारांगना, गणिका, वेश्या यांना समाजाची गरज मानले जाई. अप्सरा या स्वर्गातील वारांगनेप्रमाणे राजवाड्यातील वारांगनांना पण शत्रुपक्षाकडे त्यांना मोहवण्याच्या कामगिरीवर पाठवले जाई.राजवाड्यात तसेच मध्यमवर्गीय घरांमध्येही स्त्रियांसाठी स्वतंत्र दालने असत. आश्रमातही स्त्रियांसाठी वेगळी झोपडी असे. महाभारतात स्त्रियांच्या तऱ्हेतऱ्हेच्या आभूषणांचे व वस्त्रांचे वर्णन आहे. त्यांच्या तऱ्हेतऱ्हेच्या केशरचना करण्यासाठी दासी असत. विधवा स्त्रियांचे केशवपन केल्याचा कोठेही उल्लेख नाही. विधवा स्त्रियाही मुक्तपणे वावरताना आढळतात. महाभारत काळात जेवण अमक्याच्या हातचे चालत नाही अशी शिवाशीव नव्हती. शुद्र दासी वाढण्याचे काम करीत असत. त्याकाळी जातिभेदामुळे उद्भवलेली अस्पृश्यता नव्हती.राजघराण्यातील स्त्रिया, सामान्य स्त्रिया, दासी, वारांगना वगैरे स्त्रियांखेरीज अनेक अमानवी स्त्रियाही महाभारतात आहेत. देवता, अप्सरा, गंधर्वकन्या, नद्या ह्या सर्व मानवी रूपात येऊन येथील मानवी पुरुषांशी विवाह करताना आढळतात. ह्या सर्व स्त्रियांना मानवी गुणांनी युक्त दाखवले आहे.तर, अशी ही महाभारतातील स्त्री जीवनाची कहाणी ! कन्या झाली तर लक्ष्मी मानून तिचे स्वागत होई. तिचे शिक्षण घरीच होत असे. ती वयात आल्यावर मगच तिचा विवाह होई. बालविवाहाची प्रथा नव्हती, हुंडा घेण्याची पद्धत नव्हती, पडदापद्धती नव्हती. सर्व स्त्रिया मुक्तपणे वावरत. त्यामुळे राजकन्यांचेही प्रेमविवाह जमत असत. स्त्रियांना कुटुंबात मानाने वागवले जाई. तिच्या पुनर्विवाहास मान्यता नव्हती. पण पतीपासून पुत्र न झाल्यास पुत्रप्राप्तीसाठी परपुरुषाशी संबंध ठेवू शकत असे. विधवा स्त्रियांना केशवपन होत नसे. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने मालमत्तेचा हक्क नसला तरी स्त्रीला अन्न, वस्त्र, निवारा मिळत असे. दासी मोलकरणींनाही असा आसरा मिळे. पातिव्रत्य पाळणे व वंशाला वारस देणे ही स्त्रीची मुख्य कर्तव्ये होती."पुतस्तु स्थाविरे भारे न स्त्री स्वातंत्र्यर्हति!' असे जरी महाभारतात म्हटले असले तरी त्याकाळी स्त्री बरीच मुक्तपणे वावरताना दिसते.


मराठी भाषेचे शुध्दलेखन आणि उच्चारण

"मराठी भाषेचे शुद्धलेखन : एक नवविचार या विषयावर पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे शुद्धलेखन आज "अवघड' नसूनही कठीण वाटत आहे. ते सोपे कसे करता येईल, या संबंधीचे हे विवेचन लिहिले आहे मराठी विभाग प्रमुख डॉ. स्नेहल तावरे यांनी.' या संबंधी अजून काही मते असतील तर ती अवश्य कळवावीत. "नगर संकेत' त्यांना आवर्जून स्थान देईल. - प्रमुख संपादक

मराठी साहित्य महामंडळाने शुद्धलेखन विषयक नियमक १९६२ मध्ये केले आणि मराठी भाषकांनी हळूहळू ते अंमलात आणले. आज पंचेचाळीस वर्षांनंतर मराठी भाषेच्या शुद्धलेखनाची अवस्था पाहिली की या नियमांचे सुलभीकरण करणे गरजेचे आहे असे एक शिक्षक म्हणून मला जाणवायला लागले आहे. गेली चोवीस वर्षे पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात मराठीचे अध्यापन मी करीत आहे. काही शाळांच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहते. भारती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर मी आहे. महाविद्यालयातील माझे विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयांच्या मुलाखतींसाठी येणारे शिक्षक-प्राध्यापक, स्नेहवर्धन प्रकाशनामुळे भेटणारे व्यावसायिक, लेखक, डी.टी.पी. ऑपरेटर, मुद्रित शोधक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये वावरताना मराठी भाषेचे शुद्धलेखन आणि उच्चारण याबाबत काळजी करण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे जाणवते. मराठी भाषेचे स्वरूप केवळ व्यवहारापुरते मर्यादित राहू नये, ती पिढ्यान्पिढ्या बोलली गेली पाहिजे, तिच्यामध्ये समृद्ध लेखन झाले पाहिजे, ती क्लिष्टही होता काम नये आणि मराठी भाषकांप्रमाणे परभाषकांनाही मराठी भाषेची मूलभूत सुलभता जाणवली पाहिजे. आधुनिक क्षेत्रातील कॉलसेंटर असो वा विविध प्रसार माध्यमे यामध्ये मराठी भाषकांना नोकरी विनासायास मिळाली पाहिजे. अशा प्रकारच्या सर्व बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेच्या शुद्धलेखनविषयक नियमांत काही फेरबदल करून नियम अधिक सोपे करण्याची आवश्यकता मला जाणवते.मराठी भाषेची परंपरा लक्षात घेतल्यास ती संस्कृतोद्भव आहे हे अनेक भाषा तज्ज्ञांनी मान्य केलेले आहे. संस्कृत भाषा पाचवीपासून किंवा शाळांमध्ये आठवीपासून शिकविली जात होती. संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी आहेत. अकरावीच्या परीक्षेत "जगन्नाथ शंकरसेठ स्कॉरलशिप' मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव वृत्तपत्रात अग्रक्रमाने झळकायचे. विद्यार्थी-पालक यांनाही या पारितोषिकाचे महत्त्व आणि अभिमान वाटायचा. आजकाल या पारितोषिकाचे नावही कोठे दिसत नाही. अशी परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे अनेक शाळांमधून संस्कृत भाषा घेण्याची सक्ती कमी केली गेली. संस्कृत भाषा म्हणजे मृत भाषा, तिचा आजच्या जीवनाला उपयोग काय ? अशा वादाच्या भोवऱ्यात संस्कृत भाषा अडकली आणि मराठीच्या या जननीचा विसर पडला, पर्यायाने शब्दांचाही. संस्कृत भाषेमधून आलेले अनेक शब्द मराठीमध्ये स्थिरावलेले आहेत. अशा शब्दांचे लेखन मराठीत तत्सम शब्दांप्रमाणे होते. वस्तुत: संस्कृतची तोंडओळख नसल्यामुळे कोणते शब्द संस्कृतमधले आणि कोणते इतर भाषांमधले याबाबत विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रमावस्था आहे. त्यामुळे संस्कृतमधील मूळ शब्द तो मराठीत आला की त्याचे होणारे लेखन आणि सामासिक शब्दात त्याचे लेखन कसे करायचे याबाबत खूपच घोळ होताना दिसतात. म्हणूनच मराठीच्या शुद्धलेखनविषयक नियमांत काही बदल का करू नयेत याबद्दल विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.शुद्धलेखनाच्या नियमांपैकी एक नियम असा आहे- मराठीतील तत्सम "इ' कारान्त आणि "उ' कारान्त शब्द दीर्घानत लिहावेत. उदा. कवी - कवी, बुद्धि - बुद्धी, गति - गती इत्यादी. मात्र सामासिक शब्दांतही तत्सम "इ' कारान्त व "उ' कारान्त शब्द पूर्वपदी असताना ऱ्हस्वान्तच लिहावे. उदा. बुद्धिवैभव, कविमन, गतिशील इत्यादी.
या नियमाबाबत असे धोरण अंमलात आणले की एखादा शब्द मराठी भाषेमध्ये जसा आहे तसा मान्य करून, तो सामासिक शब्दात आला तरी दीर्घच ठेवावा, उदाहरणार्थ संस्कृतमध्ये "कवि', मराठीत "कवी' आणि तो सामासिक शब्दात आला की "कविमन' असे न करता कवीमन, कवीवैभव तसेच कवीला, कवीसाठी, कवीकरीता (येथे करिता नाही) इ. याचप्रमाणे गतीशील, बुद्धीवैभव, दृष्टीकोन, अग्नीकन्या, रुढीग्रस्त असे होईल. अशा प्रकारचा बदल संस्कृत भाषेवर प्रेम करणाऱ्यांना रुचणार नाही. सुटा शब्द जसा आहे तो तसाच सामासिक शब्दातही स्वीकारायचा असे धोरण का स्वीकारू नये ?
तत्सम इ - कारान्त आणि उ - कारान्त नियमाप्रमाणेच इन् - अन्त शब्दांना असाच नियम लावल्यास ते दीर्घच होतील. उदा. विद्यार्थीमंडळ, गुणीजन, प्राणीसंग्रह, पक्षीमित्र इत्यादी.
उपान्त्य दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य "ई' कार किंवा "ऊ' कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा या नियमाप्रमाणे वकील - वकिलांना, गरीब - गरिबाला, चूल - चुलीस इत्यादी. अशा शब्दांमध्ये मराठीतील मूळ शब्द जसा आहे तसाच का ठेऊ नये ? असे केल्यास चूलीत, गरीबाला, वकीलांना, सूनेला, नागपूरास अशी रूपे होतील, नाहीतरी अपवाद म्हणून परीक्षा - परीक्षेला, दूत - दूताला, शरीर - शरीरास, जीव -जीवास (प्राणी या अर्थी) ही रूपे मान्य केलेली आहेतच. प्रश्र्न येतो तो काही समान शब्दांचा. उदा. जिवाला (प्राण, मन या अर्थी) आणि जीवास (प्राणी या अर्थी) येथे दोन्ही ठिकाणी जीवाला, जीवास, जीवाच्या असे केले तरी वाक्यानुसार अर्थ लक्षात येईल.विद्यार्थ्यांच्या मनाची अनिश्र्चितता "पूर' या शब्दाबाबत दिसून येते. पूर हा ग्रामवाचक शब्द ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्यच लिहावा या नियमानुसार नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जयपूर इत्यादी असे लेखन होते. पण उपान्त्य दीर्घ "ई' किंवा "ऊ' असलेल्या मराठी शब्दांचा जो नियम आहे त्यानुसार नागपुरास असे होते पण नागपूर, नागपूरसाठी, नागपूरने हे शब्द कसे लिहायचे ? अनेकांचा गोंधळ उडतो. नागपुरकरिता लिहायचे की नागपूरकरिता ? म्हणूनच वरील सर्वच शब्द दीर्घ का लिहू नयेत ? म्हणजे नागपूरास, नागपूरसाठी, नागपूरला, नागपूरहून, नागपूरपासून इत्यादी.
शब्दांचे एकवचन आणि अनेकवचन लिहिताना विद्यार्थी घोळ घालतात. उदा. मैत्रीण - मैत्रिणी, उणीव - उणिवा, जाणीव - जाणिवा, टीप - टिपा, भारुड - भारूडे इ. येथे अनेकवचन करताना ऱ्हस्व करण्यापेक्षा शब्द जसा आहे तसाच ठेवला तर ? म्हणजे मैत्रणी, टीपा, भारूडे, इ. याबाबत माझी एक प्राचार्य मैत्रीण म्हणाली होती की, "कान तयार करावे लागतात. मग ऱ्हस्व-दीर्घ कानाला आपोआप कळते आणि त्यानुसार लेखन होते.' पण उभ्या महाराष्ट्रात असे "कान' तयार करणारे किती शिक्षक आता मिळतील ? ग्रामीण - निमशहरी भागांचे काय करायचे ? त्यापेक्षा रूढ नियमांमध्ये बदल करून मराठीचे शुद्धलेखन सुलभ का करू नये ? असे सतत वाटत राहते.ठरावीक, लवचीक, विपरीत या शब्दातील उपांत उकार ९०% लोक ऱ्हस्व लिहितात आणि त्यांना दीर्घ लिहा असे सांगितल्यास आम्हाला असेच शिकवले आहे असे म्हणतात. "उज्ज्वला' नाव मुली "उज्वला' असेच लिहितात. "माउली' शब्दातील उ दीर्घच लिहिला जातो.उच्चारानुसार लेखन हा नियम ग्राह्य धरल्यास च, ज बाबतचे उच्चार कसे करायचे ? असा प्रश्न उपस्थित होतो. उदा. "कृष्णा गाई चार' आणि "वर्गात मुले चार'. या दोन वाक्यांमधील "चार' या शब्दाचा उच्चार पहिल्या वाक्यात चार आणि दुसऱ्या वाक्यात मात्र "च्यार' असा करावा लागतो. पाण्याचा जग आणि, सुखाने जग, या वाक्यांमध्ये पाहिल्या वाक्यात "ज्यग' असे म्हणावे लागते तर दुसऱ्या वाक्यात जग असे होते. म्हणजे चमचा, च्यमचा कधी म्हणायचे हे वाक्याप्रमाणे ठरवायचे. हे पर आणि नवभाषकांना काहीसे अवघडच जाते. म्हणून एकतर या शब्दांच्या खाली नुक्ता दिला पाहिजे किंवा च्य, ज्य असे लेखन केले पाहिजे. समाजाला की सामाज्याला म्हणायचे याबाबत एकमत कोठेच नाही.शुद्धलेखनाप्रमाणेच मराठी उच्चाराची जाणीव नसते. फारच कमी विद्यार्थी वरील अक्षरे शुद्ध स्वरूपात उच्चारतात, एम.ए., एम.कॉम., ऐवजी यम. ये., येम. कॉम., असे ऐकू येते. "प्रक्षुब्ध' ला "प्रशुद्ध' म्हणतात. "श्रीगणेशा' मधील "श्री' चा उच्यार "स्त्रीगनेशा' केला जातो हे बारकाईने लक्ष दिल्यास लक्षात येते. "ण' म्हणजे एक विशिष्ट वर्गाची मक्तेदारी. ती नकोच म्हणून सरसकट "न' चा वापर होतो. त्र्यंबकेश्र्वरी पौरोहित्य करणारे दीक्षित "माझी बायको पुन्याची आहे' असे म्हणतात. तर मराठवाड्यातील देशमुखसर "पन, मानिकबाई' असे जेव्हा बोलतात तेव्हा मराठीचे उच्चारण आणि लेखन सर्वच स्तरात विस्कळीत झाले आहे याची जाणीव होते. पुण्यासारख्या ठिकाणी एम.ए. मराठीच्या विद्यार्थ्यांना ऱ्हस्व रु आणि दीर्घ रू, य, ए, ण, न, श्री, स्त्री इ. अनेक उच्चार दरवर्षी मला शिकवावे लागतात. ९०% लोक मराठीतील ओष्ठ्य "फ' चा उच्चार इंग्रजीतील दंत्तोष्ठ "एफ' प्रमाणे करतात. (फणस, फजिती इत्यादी) हा फरक मराठी माणसे विसरत चालली आहेत. ब्राह्मण शब्द म्हशीतल्या म्ह (ब्राम्हण) प्रमाणे लिहिला जातो. मराठीत उच्चारानुसार लेखन ही पद्धत असल्यामुळे माझी गोखले नावाची मैत्रीण म्हणाली की "म'च्या आधी "ह' चा उच्चार करतो कोण ? सर्वच जण "म' नंतर "ह' चा उच्चार करतात. उच्चारानुसार लेखन हे मान्य केल्यास मराठीतील काही अक्षरे पूर्ण नष्ट होतील. उदा. ण, ष, क्ष, श्री, ए, फ इत्यादी आणि पानी, भाशा, प्रशुद्ध, स्त्री, यम.ए. आणि फरक (फ फॅक्स प्रमाणे) हे शब्द रूढ होतील.नाकात बोलणाऱ्यांच्या नको तेथे अनुस्वार देऊन बोलण्याच्या सवयीमुळे सानुनासिक बोलले की शुद्ध असा एक अपसमज रूढ झाला आहे. त्यामुळे "पानी' म्हणायचे पण सानुनासिक. (पानीं) तेव्हा सानुनासिक बोलणारे उच्चारानुसार लेखन या मराठीच्या नियमाप्रमाणे मराठी चुकीचे बोलतात आणि त्यांचे अनुकरण करणारे मराठी भाषेच्या स्वरूपात बदल करतात हे लक्षात कोण घेणार ?
एक शिक्षक म्हणून मला जाणवणाऱ्या या गोष्टींचा मी सातत्याने विचार करीत असते. यावर कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चर्चा का होऊ नये ?

- डॉ. स्नेहल तावरेमराठी विभाग प्रमुख, मॉडर्न महाविद्यालय, पुणे


sangeet, sur, nagarsanket, marathisangeet, sur, nagarsanket, marathi

इतर अनेक कौटुंबिक मालिकांपेक्षा संगीत स्पर्धाचे हे कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. श्रोते आवडीनं पाहतात. (ऐकतात ?) आणि चॅनल, मोबाइल कंपन्यांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांकडे कसं दुर्लक्ष करता येईल? संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचतंय हे पाहून मन सुखावतंय देखील... ही भरती अशीच राहावी, मात्र संगीताचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत जावा असं वाटतं. - आरती अंकलीकर

-------------------------------------------------

मी दहा वर्षांची होते तेव्हा साधना घाणेकर म्हणजे आता साधना सरगम म्हणून प्रसिद्ध असलेली साधना सरगम आठ-नऊ वर्षांची होती. स्वत: तंबोरा वाजवत १०-१२ मिनिटांची रागप्रस्तुती आलाप-तानांसहित अतिशय उत्तम तऱ्हेने करायची. हे पाहूनच खरं तर, माझ्या आईवडिलांना आणि मलाही खूप प्रेरणा मिळाली. असं वाटायचं की, ही इतकी छान गाते तर मी का नाही गाऊ शकणार ? अवघड नक्कीच असेल. पण आपण जास्त मेहनत करू. माझे आईबाबा देखील मग माझ्याकडून खूप मेहनत करून घेत. अनेक स्पर्धांमधून आम्ही दोघी भाग घेत असू. कधी तिचा नंबर पहिला, कधी माझा. तिच्या उत्तम सादरीकरणाने माझी जिद्द वाढायची. फार मस्त काळ होता तो. या स्पर्धांचं परीक्षण करण्यास मोठ्ठी मंडळी असत. पं. जसराज, शोभा गुर्टू, सुधीर फडके, खळेकाका, पं. हृदयनाथजी, कधी उषाताई मंगेशकरही... त्यांच्या भाषणातील एखादं वाक्य हृदयात कोरलं जाई. मेहनतीला, रियाजला नवीन डायमेन्शन मिळे. परत नवीन स्पर्धा, नवीन राग किंवा गाणं. रियाज, प्रस्तुतीकरण हा सिलसिला चालू रहायचा. छेींहळपस र्डीललशशवी ङळज्ञश र्डीललशीी. या स्पर्धांनी देखील खूप काही शिकवलं.तो काळ म्हणजे कोणाही मुलाला विचारलं की, मोठा होऊन तू कोण होणार तर तो म्हणे डॉक्टर किंवा इजिनीयर. या दोन क्षेत्रांव्यतिरिक्त कोणतंही इतर क्षेत्र निवडणं म्हणजे जणू "दालरोटीचं काय ?' असं वाटे. एखाद्या मुलाला शाळेत गती नाही तर चला गाणं शिकवा याला, असं म्हणत. कित्येक वेळा प्रवासात भेटणारे लोक मला विचारत, "अहो तुम्ही गाता-बिता ठीक आहे. पण पोटासाठी काहीतरी करत असाल ना ?' पण आज चित्र बदलतंय आणि दिवसेंदिवस जास्त बदलत चाललंय. आजची मुलं लहानपणीच ठरवू शकतात की त्यांना मोठेपणी काय व्हायचंय ? गायक की क्रिकेटर की बुद्धिबळपटू ? आम्ही संगीताकडे छंद, विद्या, साधना म्हणून पाहिलं. पण आज ज्या तऱ्हेची प्रसिद्धी, कीर्ती, पैसा या क्षेत्रांमध्ये मिळू शकतो त्यामुळे आजची पिढी त्याकडे आकर्षित होते आहे.अलीकडे अनेक चॅनलवर संगीत स्पर्धा होताहेत. मराठी स्पर्धांतून महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यातून, हिंदी स्पर्धांत भारताच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत आहेत. समाजाच्या सर्व थरांतून कित्येक मुलं प्रथमच मुंबईत पाय ठेवतात. त्यांना गाण्याचा सरावही जास्त नसतो, माईकची सवय नसते, स्टेजचीही नसते... अशा मुलांना मात्र या स्पर्धा खूप काही देऊन जातात. श्रीमंत करतात. अनुभवसंपन्न करतात. आणि आता तर, गाणं दृकश्राव्य झालंय. टीव्हीचा कार्यक्रम असल्यानं चांगलं गाणं आणि त्याबरोबर चांगलं दिसणं, वेशभूषा, केशभूषा, मेकअप, थोडं नाचणं हेही आलंच. पण या सगळ्याला महत्त्व किती द्यायचं ? गाणं बेताचं आणि इतर आवडंबरच फार नाही का ? तयार सुरेल गळा, उत्तम शब्दोच्चार, गाण्यात शब्दापलीकडे नेणारे तरल, उत्कट भाव, हृदयस्पर्शिता हेच खरं तर एक्स-फॅक्टर्स आहेत. गायकाच्या गळ्यातून उमटणारा सच्चा भावपूर्ण स्वर हा त्याचा चेहरा जास्त सुंदर बनवतो. गाताना गायकाच्या मनात उठणारे तरंग जर सहजतेने देहबोलीत प्रगट झाले तर ते हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव नैसर्गिक वाटतात. अर्थात हे सर्व कार्यक्रम पाश्र्चिमात्य देशात "हिट' झालेल्या कार्यक्रमांचंअनुकरण करताहेत म्हणा, किंवा, काही प्रमाणात त्यांच्या वेगाने धावताहेत. गुरफटून गेले आहेत त्यात. पण इतर अनेक कौटुंबिक मालिकांपेक्षा प्रसिद्ध आहेत हे कार्यक्रम. श्रोते आवडीनं पाहतात. (ऐकतात ?) आणि आर्थिक फायद्यांकडे कसं दुर्लक्ष करता येईल ? संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचतंय हे पाहून मन सुखावतंय देखील... ही भरती अशीच राहावी, मात्र संगीताचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत जावा असं वाटतं.
खरं तर शास्त्रीय संगीत (रागसंगीत) आणि सुगम संगीत ही स्वतंत्र आहेत. अनेकांचा गैरसमज आहे की, सुगम संगीत गाण्यासाठी रागसंगीत पाया आहे. मला वाटतं इथे "रागसंगीत म्हणजे गळ्याची तयारी' असा गैरसमज असतो त्यांचा. रागसंगीत हा पाया आणि सुमग संगीत कळस असाही गैरसमज ! सुगम गाणाऱ्याला रागसंगीताची नाही गळा तयार करण्याची गरज आहे. रागसंगीताला एक वेगळीच मनोबैठक, पिंड लागतो. दोन तानपुऱ्यात हरवून जाणारं. रागाच्या पाच-सहाच स्वरांत तासन्तास रमणारं मन, सृजनशीलता, बुद्धीला साथ देणारा गळा लागतो. रागसंगीत गाणारा गायक हा संगीत दिग्दर्शकही असतो. तोच कंपोझर आणि तोच गायक. तर, सुगम संगीताला चतुरस्त्र गळा, कवीचे शब्द उत्तम पोहोचवणारी वाणी, संगीतकाराच्या रचनेला न्याय देणारा आवाज आणि या सगळ्यापलीकडे नेणारा भाव, एक्सप्रेशन लागतं. अर्थात, शास्त्रीय संगीतदेखील भावसंगीतच आहे. भावाने ओतप्रोत भरलेलं.चॅनल्सवर होणाऱ्या स्पर्धांमुळे श्रोते मात्र मुग्ध होतात. जुनी-नवी प्रसिद्ध, प्रचलित गाणी नवीन मुलांच्या आवाजात ऐकताना हरवून जातात. त्या मुलांमध्ये क्वचित गुंततातही. त्याच्या हरण्याजिंकण्यानं त्यांची झोपही उडते. ठिकठिकाणी त्याचीच चर्चा... पुढच्या आठवड्यात कोण बाद होईल याची काळजीदेखील. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ही काळजी विरंगुळ्यांचं काम तर करत नाही ना ? आणि हो, हे एसएमएस प्रकरण मात्र थोडं डेंजरस वाटतं मला. कोणत्याही पात्र नसलेल्या स्पर्धकाला विजेता बनवणारं अस्त्र, शस्त्र आहे हे. संहारक. संभाव्य, सत्पात्र विजेत्याचा संहार करणारं. संगीताचा दर्जा न ओळखणारा श्रोता सत्पात्र गायकाचा पाय ओढून अपात्र गायकाला सिंहासनावर बसवू शकतो. अर्थात एकदा या विजेत्यानं जगात पाऊल ठेवलं की त्याचं सिंहासनावरचं स्थान डळमळीत होण्याचेच जास्त चान्सेस ! "त्याचं नशीब' म्हणून आपण गप्प बसणंच प्राप्त होतं ना ? इतके अनुभवी परीक्षक असताना केवळ एसएमएसला प्राधान्य देणं संगीताच्या दर्जाच्या दृष्टीनं हानिकारक वाटतं. अर्थात चॅनल, मोबाइल कंपन्यांना होणारे आर्थिक फायदे कसे दुर्लक्षित करणार ?या स्पर्धांमधून जाणवणारी आणखीन एक गोष्ट ही की, स्पर्धक आधीच प्रसिद्ध असलेलं, सर्वांच्या तोंडी असलेलं गाणं म्हणतात. त्यांनी एखादं नवीन गाणं, स्वत:चं गाणं, समर्थपणे गाऊन दाखवणं, ते पॉप्युलर करून दाखवणं जास्त महत्त्वाचं. अर्थात, अशी नवीन गाणी हे स्पर्धक सादर करायला लागले तर श्रोत्यांना ते किती आवडेल ? टीआरपीवर त्याचा परिणाम नक्कीच होईल. पण या स्पर्धकांना अशा सादरीकरणाच्या दृष्टीने प्रशिक्षित करणं गरजेचं वाटतं.आज या मुलांना किती मोठमोठ्या संधी मिळताहेत. करोडो प्रेक्षकांसमोर येताहेत ही मुलं. त्यांना शिकायला मिळतंय. प्रसिद्धी मिळते. स्वत:ला मार्केट करणं त्यांना सोप्पं होतं. पण एकदा ही स्पर्धा संपली की ही मुलं बाहेरच्या जगात येतात. तिथे त्यांना एका वेगळ्याच स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. चॅनलवरची स्पर्धा ही स्पर्धकांमधली स्पर्धा आहे आणि बाहेरच्या जगातली स्पर्धा ही "विजेत्यांमधली स्पर्धा' आहे. तिथं निभाव लागणं, टिकाव धरणं अवघड. मला नेहमी वाटत आलंय की, डोंगर चढताना पहिला चढ चढणं सोप्पं असतं. पण नंतरच्या चढ फार कठीण... जसजसं वर चढू, तसतसा अधिक "स्टीप' वाटू लागतो चढ. करियरच्या बाबतीतही तसंच आहे. स्पर्धेत भाग घेणं, जिंकणं सोपं. पण एकदा करियर म्हणून त्याचा स्वीकार केला की, आव्हानात्मक, कठीण अशा थोड्याच पायऱ्या चढून दमून परतणारेच जास्त असतात. शिखर सर करणारे विजेते किती असतात ? या स्पर्धांमधून बाहेरच्या जगात आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन, परिश्रम आणि सुयोग्य संधींची गरज आहे. या स्पर्धा "विजेत्यांच्या स्पर्धे'तील किती विजेते निर्माण करतात ते पाहू.


painter, art, marathi, nagarsanketpainter, art, marathi, nagarsanket

बाबुराव पेंटरांची सुकन्या आशालता यांनी रेखाटलेले हे त्यांचे जीवन चरित्र अलौकिक कलाकाराची रसात्मकता उत्कटतेने दर्शविते. जगद्विख्यात चित्रकार लिओनार्दी दि व्हिंची आणि कै. बाबुराव पेंटर यांच्या जीवनात अनेक साम्यस्थळे आहेत. म्हणूनच कै. बाबुरावांना भारताचे लिओनार्दो असे ही संबोधले जाते. खरे तर त्यांच्या नावाचे एखादे चित्रकला-विद्यापीठ महाराष्ट्रात एव्हांना व्हावयास हवे होते. जून मध्ये त्यांची जयंती आली होती. नगरसंकेतच्या वाचकांसाठी त्यांच्या सुकन्येने घडविलेले हे जीवन दर्शन अनेकांना प्रेरणा देऊन जाईल, अशी खात्री वाटते. - प्र. संपादक
------------------------------------
लेखिका : आशालता बाबुराव पेंटर
------------------------------------

 

विसाव्या शतकाच्या पहिल्या चार दशकात पश्र्चिम भारतात अनेक गुणवंत कलाकार उदयास आले. आपल्या कलेचं चीज व्हावं म्हणून प्रतिथयश कलावंत मुंबई शहरात जाऊन राहिले.
त्याच काळात मुंबईपासून दूर असलेल्या एका छोट्या कोल्हापूर संस्थानात अॆक वेगळाच मुलगा जन्माला आला. उपजतच त्याला कलागुणांची देणगी मिळाली होती, कोणत्याही कला शाळेत जाऊन त्यांनी कला शिक्षणाचे धडे घेतले नाहीत. कोणत्याही गुरूच्या मार्गदर्शनाखाली कला साधना न करता केवळ स्वत:च्या अंगच्या गुणांनी व स्वत:च्या कल्पकतेने त्या काळी प्रचलित असलेल्या पाश्चात्त्य कलाशैली मध्ये त्याने प्रभुत्व मिळविले. सौंदर्य आणि जिवंतपणा या गुणांनी संपन्न असलेली स्वत:ची चित्रशैली निर्माण करून त्या मुलाने जगाला थक्क केले. या मुलाचे नांव आहे कलामहर्षी बाबुराव पेंटर !त्यांचा जन्म झाला ती तारीख होती ३ जून १८९०. त्यांचे मूळ नांव बाबुराव कृष्णराव मेस्त्री. त्यांचे वडील सुतारकाम, शिल्पकला, चित्रकला यात तरबेज होते. बाबूरावांचं शिक्षण चौथी पाचवी पर्यंतच झालं. त्यांचे अंगचे कलागुण वडिलांच्या सोबत त्यांच्या हाताखाली विकसित होत होते. प्रत्येक गोष्टीत ते निपुण होत होते. केवळ इटालियन कलावंत लिओनार्दी-द-व्हिंची यांच्यासारख्या थोर प्रतिभावंताशी बाबूरावांची तुलना केली तर ती चुकीची होणार नाही. सुतारकी, चित्रकला, शिल्पकला या सर्व क्षेत्रात लिओनार्दी द व्हींची प्रमाणे सतत कार्यरत असत. ते यंत्रविशारदही होते. आपल्या बुद्धीने व कल्पकतेने नव्या गोष्टींचा ते शोध घेत. चित्रकला फोटोग्राफी या मध्ये त्यांचे मन अधिकाधिक गुंतत गेले. १९०८-१९०९ च्या सुमारास त्यांनी मुंबईत फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. त्याच काळात केशवराव भोसले त्यांच्या नाटक कंपनीकडून "राक्षसी महत्त्वाकांक्षा' या नाटकाचे पडदे रंगविण्याचे काम त्यांना मिळाले. त्या कामाची रसिकांकडून त्यांना "वाहवा' मिळाली. पुढे १९२१ साली बालगंधर्व यांनी बाबूरावांच्या कडून "द्रौपदी' नाटकासाठी पडदे रंगवून घेतले. या शिवाय वेशभूषा आणि अलंकार आभूषणे इत्यादिंची डिझाईन्स करून घेतली. या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली. पुराण काळातील वेशभूषा बाबूरावांनी ज्या पद्धतीने साकारल्या तीच वेषभूषा आजही वापरण्यात येते, हे बाबुराव पेंटरनी सिनेसृष्टीला दिलेले योगदान आहे असे चित्रपट अभ्यासक बापू वाटवे यांचे मत होते.बाबुरावांचे आतेभाऊ आनंदराव आणि बाबुराव सतत एकत्र असत. आनंदरावही अतिशय हुशार आणि उत्तम चित्रकार होते. दोघेही नाटकाचे पडदे रंगविण्यात दर्दी होते. आता दोघांनाही चित्रपट तयार करण्याचा इतका ध्यास घेतला कि घरातील वडिलमंडळीनी त्यांना वेड्यातच काढले. १९१६ च्या पावसाळ्यात पहिला बहर संपल्यानंतर बालगंधर्वाकडून "स्वयंवर' नाटकाचे पडदे रंगवून देण्यासाठी बाबुरावांना पत्र आहे. बाबुरावांनी ते काम स्वीकारले. आणि शिष्यांसह ते गंधर्व कंपनीत दाखल झाले. काम मिळाले म्हणून ही मंडळी आनंदात होतीच पण त्यामुळे मुंबईत पुष्कळ सिनेमे पाहायला मिळतील, त्याचा अभ्यास करायला मिळेल व आपल्याला उपयुक्त साधन सामग्री पाहता येईल याचाही आनंद त्यांना होता. पडद्याचे काम झाल्यानंतर पैसे घेऊन हे कलावंत कुटुंब म्हणजे दामले, लिमये व ते स्वत: मोठ्या आनंदाने कोल्हापुरास परत आले.१९१३ साली दादासाहेब फाळक्यांनी "राजा हरिश्चंद्र' हो कथानक असलेला पहिला चित्रपट तयार केला व प्रदर्शित केला. फाळकेंचे बडोद्याच्या कलाभवनात शिक्षण झाले होते. लंडनला जाऊन चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेऊन त्यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामग्री बरोबर घेऊन ते आले होते. फाळके हे आद्य चित्रपट निर्माते होते पण "कलात्मक मराठी चित्रपटांच्या' कीर्तीचं युग सुरू करण्याचा मान बाबुराव पेंटरांचा आहे असं म्हटलं पाहिजे. बाबुराव आणि आनंदरावांनी फाळक्यांचा हा चित्रपट पाहिला पण तो पाहून दोघांची निराशा झाली कारण त्यात स्त्रियांची भूमिका पुरुषांनी केली होती. आपल्या सिनेमात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनाच द्यायच्या हे त्यांनी पक्के ठरविले. चित्रपट निर्मितीचे कसलेही शिक्षण दोघांकडे नव्हते पण चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना केवढा होता याची त्यावरून कल्पना येते.बाबुरावांनी आता मनाशी एक योजना आखली. मुंबईत त्यांनी थोडासा नादुरुस्त असलेला "विल्यमसन' कॅमेरा मिळवला. पाहिले महायुद्ध सुरू झाले असल्यामुळे फिल्म किंवा कॅमेरा बाजारात मिळणे शक्य नव्हते. कॅमेरा घेऊन ते कोल्हापुरात आले. बाबुराव आणि आनंदरावांनी कॅमेरा खोलून दुरुस्त केला थोडी कच्ची फिल्मही मिळवली व काही दृश्ये घेऊन ट्रायल घेतली. फिल्म धुणे, तिचे प्रिंट काढणे या गोष्टी त्यांना नवीनच होत्या. प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर त्याही केल्या. परत ट्रायल्स घेतल्या. त्या मुळे त्यांना दिशा कळली. विल्यमसन कॅमेरा फारच लहान असल्यामुळे चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने कुचकामी होता. आता दोघांना नवीन कॅमेराचा ध्यास लागला. १९१७ मध्ये थोडेफार यश आले. रंकाळ्यावरील लोकांच्या पोहण्याची दृश्ये वगैरे घेऊन मुंबईहून आणलेल्या जुन्या प्रोजेक्टरवर त्याच्या ट्रायल्स घेऊन पाहिल्या व यश आता फार दूर नाही हे त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले, उत्साह वाढला. पण हे यश सुखासुखी मिळाले नव्हते. अनेक वेळा त्यांना चण्याचुरमुऱ्यावर दिवस काढावे लागत. एखादे पेंटिंग मिळाले कि ते करायचे, इतरही कामे करावयाची व पदरात पडतील त्या पैशावर गुजराण करायची व आपल्या प्रयोगात मशगूल व्हावयाचे असे दिवस चालले होते. मंडळींचा आत्मविश्वास शिगेला पोचला. १९१८ च्या मध्यानंतर योग्य असा कॅमेरा तयार झाला. आधुनिक कॅमेऱ्यात डायरेक्ट फोकसची जी सोय आहे ती १९१८ च्या त्या देशी कॅमेऱ्यात बाबुरावांनी कल्पकतेने केली होती हे त्या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य होय. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा कॅमेरा बघायला व त्यावर काम करायला आनंदरावांना नशिबाने साथ दिली नाही. आजारपणात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे वेळी बाबुराव त्यांच्या जवळ होते. ते आनंदरावांना म्हणाले "तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. तू कांही काळजी करू नकोस'. हे म्हणताच आनंदरावांनी बाबुरावांचेकडे पाहून "बाबूराव' असा शब्द काढला. जणू कांही त्यांना आशीर्वादच दिला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आनंदरावांचा मृत्यू हा बाबुरावांना मोठाच धक्का होता. आनंदराव व बाबुराव यांच्या कलेवर अनेकांनी प्रेम केले. त्यांचा सहवास लाभावा म्हणून तरुण मंडळी आपला कामधंदा सांभाळून त्यांच्याभोवती जमत. दामले, फत्तेलाल, धायबर, लिमये, बाबा गजबर, बाळासाहेब यादव, शांताराम, गणपत बकारे, झुंझारराव पवार, परशुराम बापू, दत्तोबा मेस्त्री, गुलाबबाई, अनुसयाबाई, गजराबाई असे कित्येक गुणी कलावंत व सहकारी बाबुरावांना मिळाले. सर्वांची बाबुरावांवर भक्ती होती. बाबुरावांसाठी काहीही करण्यास सर्वजण सदैव तत्पर असत. बाबुरावांची फिल्म कंपनी म्हणजे एक कुटुंबच होते.सिनेमा काढायचा म्हणजे त्याला भांडवल पाहिजे. त्यासाठी बाबुराव प्रयत्न करत होते. त्यांची आणि तानीबाई कागलकरांची ओळख झाली. कलाकाराचं अंत:करण त्या समजू शकत होत्या. श्रीमती तानीबाईंनी बाबुरावांना १०,००० रु. चे भांडवल दिले, आणि बाबुरावांच्या फिल्म कंपनीचे काम सुरू झाले. "सैरंध्री' चित्रपटाची तयारी सुरू झाली. सर्वच नवीन होते. १९१७ मध्ये त्यांनी लेन्स व कच्ची फिल्म लंडनहून मागवून घेतली. प्रिंटिंग-डिव्हेलपींगचे ज्ञान नव्हते व त्याचे साहित्यही नव्हते. कथालेखन, फिल्मचे संकलन (एडिटिंग) ह्या कशाचेच ज्ञान नव्हते. सर्व कांही स्वत:च्या तर्काने, कल्पनेने तयार करून त्यात त्यांनी यश मिळविले. आणि १९१९ ला अखेर "सैरंध्री' फिल्म तयार झाली. प्रसिद्धीच्या दृष्टीने पुण्यापेक्षा मुंबईला फिल्म लावणे हे त्यावेळीही हितकारक ठरले असते. पण ही फिल्म प्रथम पुण्यात लावणेच बाबुरावांनी पसंत केले. बाबुरावांची लो. टिळकांच्यावर भक्ती असावी. त्यावेळी लो. टिळक पुण्यातच होते. पुण्याच्या आर्यन सिनेमात शनिवारी ७ फेब्रुवारी १९२० रोजी "सैरंध्री' चित्रपट लागला. लो. टिळकांनी हा चित्रपट पाहून बाबुरावांची स्तुती केली. टिळकांच्या हस्ते बाबुरावांचा सत्कार करण्यात आला व आर्यन सिनेमा व पुणेकरांच्या तर्फे सुवर्णपदक देण्यात आले. सत्काराच्या वेळी टिळकांनी छोटेसे भाषण करून बाबूरावांना "सिनेमा केसरी' ही पदवी दिली. बाबुरावांनी इथेच कॅमेरा तयार करून फिल्म घेतली हे लोकमान्यांना कळताच त्यांनी कॅमेरा मागवून घेतला आणि तो पाहून बाबुरावांचे कौतुक केले. ते बाबुरावांना म्हणाले, "तुम्ही जालियनवाला बागेतील प्रसंगावर चित्रपट काढा. तो देशभर दाखविल्यास आमच्या शंभर लोकांनी जे काम व्हावयाचे नाही ते तुमच्या एका चित्रपटाने होईल.' आल्या लोकांचा लो. टिळकांनी गौरव केल्याचे ऐकून शाहू महाराज खूष झाले आणि त्यांनी कंपनीची जागा बाबुरावांना बक्षीस दिली. "सैरंध्री' मूकपटाच्या प्रारंभीच्या प्रस्तावनेत एक टायटल होती "परसेवा आदमी को कितनी लाचार बनाती है' ही टायटल म्हणजे त्यावेळच्या स्वातंत्र्योत्सुक हिंदी जनतेची दबलेली भावनाच होती. ती टायटल पाहताच लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि चित्रपटाचे यश निश्चित झाले. कथानक पुढे सरकू लागले आणि शेवटी भीमाने कीचकाचे मुंडके उपसून हातात उंच धरून सैरंध्रीला व प्रेक्षकांना दाखवले तेव्हा घट्ट मनाच्या प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या. स्त्रिया किंचाळल्या. काही तर बेशुद्ध पडल्या. बाबुरावांच्या प्रयत्नांचे सार्थक झाले. आनंदरावांचा आत्माही त्यावेळी हवेत कुठेतरी हे सर्व पहात असेल, त्यांनी बाबुरावांना शाबासकी दिली असेल. स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच केल्या हे बघून त्यांच्या आत्म्याला शान्ती मिळाली असेल. आनंदरावांची इच्छा पूर्ण केली म्हणून बाबुरावांच्या मनाला मोठं समाधान झालं असेल. कीचकाचं मुंडकं उपसलेला सीन बघून सरकारकडून बाबुरावांना बोलावणं आलं. त्यांना वाटलं कीचकांचे काम केलेल्या नटाला खरोखरच मारलं गेलय्. पण तो नट तिथे प्रत्यक्ष हजर केल्यामुळे त्यांचे निराकरण झाले. मात्र तो सीन चित्रपटातून काढावा लागला ! याच चित्रपटापासून "सेन्सॉर' सुरू झाले म्हणावयास हरकत नाही. "सैरंध्री' चित्रपटापासून हिंदी, इंग्रजी, गुजराथी भाषात चित्रपटांची माहिती देणाऱ्या व त्यांचे सूचक फोटो असणाऱ्या पुस्तिका छापण्यास त्यांनी सुरुवात केली. हा उपक्रम त्यांनीच सुरू केला.चित्रपट हे लोकशिक्षणाचे प्रभावी साधन आहे याची समर्थ जाण बाबुरावांना होती. याचे उदाहरण म्हणजे त्यांच्या "सावकारी पाश' या वास्तववादी मूकपटाची (१९२५) इतिहासात झालेली गौरवशाली नोंद होय. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात कायम राहावे लागे. त्यामुळे त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागत. अडाणी शेतकऱ्याचे अशिक्षितपणाच ह्या परिस्थितीला करणीभूत आहे ही गोष्ट बाबुराव पेंटरानी कथानकाच्या सहज तितक्याच प्रभावी मांडणीने प्रेक्षकांपर्यंत नेली. या मूकपटानंतर ११ वर्षांनी पुन्हा "सावकारी पाश' हा "बोलपट' बाबुरावांनी तयार केला. हा "पहिला सामाजिक' वास्तववादी चित्रपट म्हणून त्याची नोंद घेतली गेली.बाबुरावांनी पौराणिक चित्रपट पण घेतले. त्यानंतर त्यांच्या मनात अैतिहासिक चित्रपट घेण्याचे आले. ह.ना. आपटे यांच्या "गड आला पण सिंह गेला' या कादंबरीवरून "सिंहगड' हा चित्रपट घेण्याचे बाबुरावांनी ठरविले. कथेला अनुसरून त्या काळात वापरल्या जाणाऱ्या पोषाखांची, दागिन्यांची, केशभूषेची आणि सर्व सेट्सची बाबुराव स्वत: आधी स्केचीस करत. अशाच प्रकारची स्केचीस सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे पण करीत. दोघांचे चित्रपट वास्तववादी आणि सुंदर कलेचा नमुना होते. बाबुराव पेंटर उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांच्या चित्रपटात एक प्रकारचं सौंदर्य आणि एक अभिरुची दिसून येते होती. पुराण काळातील वेशभूषा बाबुरावांनी ज्या पद्धतीने साकारल्या त्याच वेशभूषा आजही वापरण्यात येतात. बाबुराव पेंटरांनी सिनेसृष्टीला दिलेले हे योगदान आहे असे मत चित्रपट अभ्यासक वाटवे यांनी व्यक्त केले आहे."सिंहगड' चित्रपटाच्या वेळी अॆक दुर्दैवी घटना घडली. वेस्ट फिल्मच्या स्टॉक ठेवलेल्या भागास दुपारी आग लागली. अॆका तरुण धाडसी मुलाने पेटलेल्या खोलीत प्रवेश करून कॅमेऱ्याच्या पेट्या बाहेर काढल्या. दुसऱ्याने त्या पाण्यात हौदात टाकून दिल्या. आग विझविण्याच्या धामधुमीत जो तो बाबुरावांना शोधीत होता. बाबुराव आणि दादा मेस्त्री "हा बेल अँड हॉवेल' कंपनीचा कॅमेरा शांतपणे खोलून त्याला तेलपाणी करत होते. ही गोष्ट त्यांनी वेळीच केली नसती तर हा कॅमेरा वाया गेला असता. संकटाच्या वेळी माणूस घाबरून डोक्याला हात लावून बसतो. पण बाबुराव वेगळे होते. अशावेळी प्रसंगावधान राखून आत्ताच्या त्या घटकेला काय केलं पाहिजे. याचाच ते विचार करीत आणि ताबडतोब तो आचरणात आणीत. दु:ख, संकट आलं तर त्याचावरचा तोडगा ते शोधीत. असं कोणी रडतकढत बसला कि ते त्याला म्हणत, "अरे असं रडत काय बसलास ? झालं गेलं ते विसरून जा. आता पुढे काय करायचं त्याचा विचार कर !'आगीमुळे बरेच नुकसान झाले होते. बाबुरावांचं मन त्यामुळे हळहळले. टिळक कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना बाबुरावांनी त्यांच्या देशी कॅमेऱ्यावर टिळकांची फिल्म घेतली होती ती आगीत जळून गेली. याचे त्यांना फार दु:ख झाले सर्व लोक निराश झाले होते. तेवढ्यात आगीच्या ढिगाऱ्यातून फक्त सिंहगडच्या मुहूर्ताचा निगेटिव्हचा छोटासा डबा मिळाला. हा एक शुभशकूनच होता. सर्वांचा उत्साह वाढला. आणि चित्रपटाच्या कामाला पूर्ववत सुरुवात झाली. कोल्हापूरपासून बारा मैलावर असलेल्या किल्ले पन्हाळा या स्थळी चित्रपटाचे चित्रण झाले. भारतातील हेच पहिले "बाह्यचित्रण' (ऑउटडोर शूटींग) होय. ह्याच पन्हाळ्यावर नंतर "राम और शाम' सारख्या अनेक हिंदी चित्रपटांचं शूटींग झालं.काही दिवसातच चित्रपट पूर्ण झाला. नवीनच बांधलेल्या नॉव्हेल्टी या थिएटरात "सिंहगड' दाखविण्याचे ठरले. चित्रपटातील दृश्यांची पोस्टर्स नॉव्हेल्टी या थिएटरवर झळकली. पोस्टर्स पाहायला लोकांची गर्दी होऊ लागली. त्यावेळचे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सीपल सॉलोमन आपल्या सहकाऱ्यांसह येत आणि तासनतास उन्हात उभे राहून पोस्टर्सचे निरीक्षण करीत. त्यांनी बाबुरावांची ओळख करून घेतली. आणि त्यांना म्हणाले, "ह्या चित्रांना मी ऍकॅडमीची पेंटिंग्ज समजतो. ती अतिशय सुंदर आहेत. कृपा करून ती जपून ठेवा'. प्रि. सॉलोमन, त्रिनीदाद, आगारकर, धुरंधर, मुक्कर यांनी सन्मानाने बाबुरावांना आर्ट स्कूल मध्ये बोलावले आणि त्यांचा सत्कार केला. सॉलोमन यांच्या हस्ते बाबुरावांना चांदीचा पेला अर्पण करण्यात आला. सॉलोमननी स्वत: काढलेले एक चित्र स्वत:ची आठवण म्हणून बाबुरावांना दिले. "सिंहगड' चित्रपटाला बेम्बले येथे भरलेल्या प्रदर्शनात प्रशस्तिपत्र व मेडल मिळाले. प्रशस्ति-पत्रात म्हणाले आहे. 'ढहळी ळिर्लींीीश ळी रप र्ेीींीींरपवळपस शुराश्रिश ेष ीळपलशीळींू ेष वळीशलींळेप'."सिंहगड'चित्रपट पाहून प्रेक्षक भारावून गेले. दिवसेंदिवस चित्रपटाला खूप गर्दी होऊ लागली. गर्दी हटविण्यासाठी पहिल्यापेक्षा पोलीसांची संख्या वाढवावी लागली. त्यामुळे सरकारचेही लक्ष वेधले. उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे पहिला करमणूक कर ह्याच चित्रपटावर बसला.कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा बाबुरावांशी आणि महाराष्ट्र फिल्म कंपनीशी जास्त संबंध वाढला. कोल्हापूरला जेव्हा जेव्हा गव्हर्नरची भेट होई तेव्हा तेव्हा छत्रपती बाबुरावांना गव्हर्नरच्या कार्यक्रमाची फिल्म घ्यायला सांगत. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत गव्हर्नरनी केलेल्या शिकारीची, अनेक लहान मोठ्या कार्यक्रमांची तसेच कुस्त्यांच्या मैदानावरील दृश्यांची बाबुराव फिल्म घेत. रात्री १० वाजता दरबार हॉल मध्ये ह्या संपूर्ण फिल्म मध्ये टायटल्स घालून ही फिल्म दाखविली जाई. ह्या अशा लघुपटांनाच सध्या आपण वार्तापट म्हणतो.महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबुरावांनी दहा वर्षात (१९२० ते १९३०) एकूण सतरा चित्रपट काढले. या सर्वांच्या कथा स्वत: बाबुरावांनीच लिहिल्या. बाबुरावांच्या जीवनातला महाराष्ट्र फिल्म कंपनीतला काल हा सुवर्णकाल होय. सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती तोपर्यंत ते अपराजित राहिले. यानंतरही त्यांनी बोलपटाच्या युगात सात बोलपट घेतले. त्यांपैकी "उषा', "सावकारी पाश', "रामजोशी' हे बोलपट सर्व दृष्टीने गाजले. कोल्हापूरच्या राजाराम छत्रपतींच्या भगिनी श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी खास बाबुरावांच्यासाठी १९३३ साली शालिनी सिनेटोन संस्था काढली. अशाप्रमाणे परत चारपाच वर्षांनी बाबुरांवाना त्यांच्या कलेला व गुणांना वाव देणारे साधन मिळाले. इथेच त्यांनी उषा, प्रतिभा, सावकारी पाश यासारखे चित्रपट काढून भारतात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज सत्यजित रेंच्या चित्रपटांना जे स्थान मिळाले ते स्थान बाबुरावांच्या "सावकारी पाश' ने मिळविले. रसिकांनी, साहित्यिकांनी बाबुरावांचे कौतुक केले. तेव्हापासून लोक कोल्हापूरला कलापूर म्हणू लागले. भारतात बाबुराव "कलामहर्षी' म्हणून ओळखू लागले. बंगाली दिग्दर्शक देवकीकुमार बोस, नितीन बोस, न्यू थिएटर्सचे निर्माते बी.एन. सरकार, मुखर्जी यांनी "सावकारी पाश' हा बोलपट पाहिल्यानंतर बाबूरावांची- एका मराठी कलावंताची- कलामहर्षीची ओळख करून घेतली.महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडल्यानंतर बाबुराव स्वस्थ बसले नाहीत. ते एक सव्यसाची कलाकार होते. त्यांच्या प्रतिभेला मर्यादा आणि बंधन माहीत नव्हते. यंत्र, शिल्प, चित्र, चित्रपट, सुतारकाम, शिकार कोणतीही गोष्ट ते तितक्याच हौसेने करीत. ते यंत्रविशारदही होते. त्यांची मोटार बिघडली तर नेमका फॉल्ट शोधून काढून दुरुस्त करीत असत. मेकॅनिझमची त्यांना आवड होती. त्यांनी म.गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे ब्रॉंझचे सुंदर पुतळे तयार केले. बाबुराव पेंटरांच्या चित्रकलेविषयी सांगायचं तर त्यांनी कित्येक पोटर्‌रेट्स लाइफ वरून केलेली आहेत. रोज तीन तास बसून तीन-तीन दिवसात पूर्ण केलेली आहेत. त्यांनी मंजीखॉंसाहेब (गवयी), गोविंदराव टेंबे, प्रो. ना. सि. फडके, कर्नल हार्वे व त्यांचा मुलगा, कोल्हापूरचे कलेक्टर श्री. नंजाप्पा व त्यांच्या पत्नी, बडोद्याच्या महाराजांचे सासरे श्रीमंत हसूरकर, माधवराव बागल आणि अशा बऱ्याच मान्यवर लोकांची पोटर्‌रेट्स केली. शिवाय करवीर संस्थापक ताराबाई यांचं अश्र्वारूढ पोटर्‌रेट बाबुरावांनी आपल्या कल्पनेने काढले. हे पोटर्‌रेट आणि छत्रपती राजाराम महाराजांचे घोड्यावर बसलेले पोटर्‌रेट शहाजी महाराजांच्या न्यू पॅलेसमधील म्युझियम मध्ये आहेत. चित्रकार मंडळींचे औंधला स्नेहसंमेलन होते. त्यावेळी परदेशाहून आलेले सुप्रसिद्ध चित्रकार सातवळेकर यांनी औंधच्या म्युझियम मध्ये बाबुरावांची कांही चित्रे पाहिली. अशा चित्रांपैकी "दत्त', "सरस्वती', "राधाकृष्ण', "रंगपंचमी खेळणारे राधा-कृष्ण' , "वटपूजा', "जलवाहिनी', "शोभा' ही चित्रे पाहून ते म्हणाले, "बाबुराव तुम्ही आपल्या देशात जन्माला आलात हेच तुमचं दुर्भाग्य आहे, पाश्चात्त्य देशांत लोक तुम्हांला डोक्यावर घेऊन नाचले असते.'कै. श्री. बाबुराव सडवेलकर हे स्वत: चित्रकार, लेखक, आणि मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये कलाशिक्षक होते. त्यांनी "कोल्हापूर दर्शन' या ग्रंथात चित्रकारांच्या संबंधी असे म्हटले आहे कि, "रंगछटांचे वजन जराही ढळू न देता सफाईदार रंगलेपण करणे व ते करीत असताना समोरच्या व्यक्तीमधून एक कल्पनारम्य प्रतिमा उभी करणे हे त्यांच्या इतके कोणत्याही समकालीन चित्रकाराला जमले नाही. रंगाच्या शुद्धतेची त्यांची जाणीव विलक्षण होती व रंगमिश्रणाचे त्यांचे ज्ञान अचूक होते, आणि हे सर्व स्कूल ऑफ आर्ट मध्ये न शिकता बाबुराव करू शकले हे विशेष. बाबुराव आपल्या चित्राचे तंत्र निश्र्चित करीत. त्यामुळे त्यांची चित्रे काळावर मात करू शकली व पंचवीस तीस वर्षानंतरही त्यांच्या चित्रातील ताजेपण हरपून गेले नाही.बाबुराव पेंटर हे जरी प्रकृतीने कल्पनावादी असले तरी ते शिस्तबद्ध व कठोर आत्मपरीक्षण करणारे होते. वस्तुस्थितीचा अंदाज ते त्रयस्थाच्या भूमिकेतून घेत व एकदा कामांत गुंतले कि मग पर्वताएवढे कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असे. चित्रकलेमध्ये वॅट्स्, रोझेटी, बर्न्स यांसारख्या कल्पनावादी कलाकारांना ते मानीत असावेत. बाबुराव पेंटर हे स्वत:च एक वेगवेगळ्या मनुष्य स्वभावाच्या मिश्रणातून बनलेले एक चित्र होते. म्हणून त्यांच्यात मनुष्य स्वभावाच्या अनेक रंगाच्या अनेक छटा दृष्टीस पडत.'कोल्हापूरचे एक सव्यसाची चित्रकार श्री.ना. कुलकर्णी हे कांही वर्षे टाईम्स ऑफ इंडिया संस्थेत लॅंगहॅमर या विख्यात चित्रकाराच्या हाताखाली साहाय्यक चित्रकार म्हणून काम करीत असत. बाबुराव मुंबईस गेले असता लॅंगहॅमरची चित्रे पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कुलकर्णींनी ही गोष्ट लॅंगहॅमरला सांगताच ते म्हणाले, 'जह, ींहरीं सीशरीं ारप ेष ींहश खपवळरप ऋळश्रा खपर्वीीींीू वशीळीशी ींे हर्रींश र श्रेेज्ञ रीं ाू ुेीज्ञी. थशश्रश्र, ळींी रप हेर्पेीी ींे ाश. इीळपस हळा हशीश ुहशप हश षळपवी ींळाश, ख ीहरश्रज्ञ लश हरििू ींे ाशशीं हळा,' , आणि मग एकेदिवशी कुलकर्णी बाबुरावांना घेऊन टाईम्स ऑफ इंडियात गेले. लॅंगहॅमरने त्यांचे स्वागत केले. आपली चित्रे दाखवली. ती चित्रे पाहून बाबुरावांचा चेहरा प्रसन्नतेने भरून गेला. हे पाहून लॅंगहॅमर खूष झाला. त्यांनी बाबुरावांना आपल्या घरी नेले. घरातील चित्रे दाखविली. उपहारानंतर बाबुरावांनी आपल्या चित्रात कांही वैगुण्ये वाटल्यास ती सांगावीत अशी विनंतीही केली. बाबुरावांच्या चित्रकलेतला अधिकार सांगण्यास ही घटना पुरेशी बोलकी आहे.बाबुरावांच्या वैवाहिक जीवनाबद्दल लिहायचं म्हणजे त्यांचं लग्न फारच लहान वयात म्हणजे सतराव्या वर्षी झालं. चित्रपटाचा ध्यास लागल्यामुळे त्यांचं ह्या संसाराकडे दुर्लक्ष झालं. "सिंहगड' चित्रपटाच्या सुमारास आजारपणामुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संसाराकडे दुर्लक्ष झालं याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली. परत लग्न करायचं नाही असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. ते आपल्या कामात परत मग्न झाले. पण बाबा गजबर आणि ज्ञानबा मेस्त्री या दोन स्नेह्यानी बाबूरावांना लग्न करण्याबद्दल आग्रह सुरू केला. शेवटी कसेबसे बाबुराव तयार झाले. १९२७ साली त्यांचे लग्न झाले. आत्ताची परिस्थिती वेगळी होती. आर्थिक सुबत्ता होती. चित्रपट सृष्टीतील यशामुळे बाबुरावांना समाजात खास स्थान होते. मान प्राप्त झाला होता. लग्न झाल्यावर बाबुरावांनी कंपनीतील सर्वांशी आपल्या पत्नीची ओळख करून दिली. तिथल्या अॆक नटी अनुसयाबाई म्हणाल्या, "ह्या आमच्या गुरूपत्नी आहेत. आमच्या सर्वांच्या माई आहेत,' असं म्हणून त्यांनी बाबुरावांच्या पत्नीला, आईला नमस्कार केला. तेव्हापासून सर्वजण त्यांना माईच म्हणू लागले.माईचा जन्म खेड्यातला. त्या गोऱ्यापान आणि सुंदर होत्या. सुसंस्कारित आणि गुणी होत्या. पट्टीच्या पोहणाऱ्या होत्या. शालेय शिक्षण मात्र त्यांना मिळाले नाही. माईंना लिहायला वाचायला यावं म्हणून माईंसाठी श्रीखण्डे नावांच्या मास्तरांची बाबुरावांनी नियुक्ती केली. श्रीखण्डे मास्तर घरी येऊन माईंना शिकवत असत. बाबुरावांना स्वत:ला शिकायला मिळालं नाही त्याची त्यांना हळहळ वाटत होती. सर्वांनी खूप खूप शिकावं, निरनिराळं ज्ञान मिळवावं असं त्यांना वाटे. ते स्वत: श्रीखण्डे मास्तरांकडे इंग्रजी शिकत होते. माई वाचायला शिकल्यानंतर त्यांच्यासाठी "स्त्री', "किर्लोस्कर' ही मासिकं सुरू केली. फावल्या वेळात माई मासिकं वाचीत असत. ते बघून बाबुरावांना खूप समाधान झालं. हळूहळू माईंची भाषा सुधारत गेली. माई उत्साही होत्या. बाबुरावांनी त्यांच्या एका स्नेहाच्या पत्नीशी माईंची ओळख करून दिली. त्यांच्याकडे माई जेवणाचे प्रकार, विणकाम, भरतकाम, शिवणकाम शिकल्या त्या चांगल्या सुगरण बनल्या. बाबुरावांनी माईंना भरतकामाचं साहित्य आणून दिलं. एका कापडावर रंकाळा तलावातल्या संध्यामठाचं चित्र काढून दिलं. बाबुराव रंग सांगायचे त्याप्रमाणे माई चित्रात रेशमानी रंग भरायच्या. माई बाबुरावांच्या विद्यार्थिनी बनल्या. आणि खूप कांही त्यांच्याकडून शिकल्या. खेड्यातल्या एका मुलीचा बाबूरावांनी असा कायापालट केला.बाबुरावांना आठ अपत्ये झाली. दोन मुलगे आणि सहा मुली. मोठा मुलगा रवींद्र अगदी वडिलांसारखाच सर्व गोष्टीत हुशार होता. त्याने मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जी.डी. आर्टचा डिप्लोमा घेतला. तो फर्स्टक्लास करिअरचा विद्यार्थी होता. तो नामांकित चित्रकार व शिल्पकार झाला. त्याने शिवाजीचे अनेक सुंदर पुतळे बनवले. त्याने बनवलेले ताराराणी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे कोल्हापुरातले पुतळे म्हणजे शिल्पकृतीचे उत्कृष्ट नमुने आहेत. स्वत:च्या मुलाचं कौतुक करायला बाबुराव हयात नव्हते नाहीतर त्यांचा ऊर अभिमानाची भरून आला असता. रवींद्रांचा पोटर्‌रेट्स करण्यात हातखंडा होता. त्यात त्यांनी बक्षिसे मिळविली होती. नागपूर, कोल्हापूर येथील म्युझियम मध्ये त्याने तैलरंगात केलेली सुंदर पोटर्‌रेट्स आहेत. बाबुरावांचा दुसरा मुलगा अरविंद ह्याने जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शिअल आर्टचा डिप्लोमा घेतला. थोडी वर्षे त्याने कोल्हापूरच्या "कला निकेतन' आर्ट स्कूल मध्ये प्रिन्सीपल म्हणून काम पाहिले. माझ्या सर्व बहिणी ही कलावंत आहेत.बाबुराव आणि माई दोघेही शांत, प्रेमळ आणि उदार मनाचे होते. आमचं घर नेहमी माणसांनी भरलेलं आणि हसतं खेळतं असायचं. सर्वांचं हसत मुखांनी स्वागत व्हायचं. घरातील नोकर माणसांनी ह्या कुटुंबाची भक्तिभावाने सेवा केली. बाबुराव दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. त्यांनी कुणाशी हेवेदावे केले नाहीत, कुणाचा मत्सर केला नाही. निंदा केली नाही. स्वार्थीपणा त्यांना कधी शिवलाही नाही. त्यांनी पैशाचा हव्यास कधी केला नाही. प्रसिद्धीच्या मागे ते लागले नाहीत. उलट प्रसिद्धीच त्यांच्या मागे लागली ! प्रसिद्धी, कीर्ती, मानपान याचा लवलेशही त्यांना नव्हता. ते अतिशय नम्र होते. समाधानी होते. वागणं अतिशय साधं पांढराशुभ्र शर्ट, पांढरे धोतर असा त्यांचा पोषाख होता. ठरावीक प्रसंगी ते कोट टोपी घालायचे. त्यांच्या पांढऱ्या दाढीमुळे ते ऋषीप्रमाणे भासायचे. ते ऋषी सारखेच होते. एखाद्या ऋषीप्रमाणे त्यांनी कलावंतांचे "कुल' निर्माण केले होते. "बाबुराव पेंटर आमचे गुरू होते' असं सांगणारी अनेक माणसं होती. शेकडो कलावंत त्याचंच कुल सांगत. कलामहर्षी ही एक व्यक्ती नव्हती तर एक संस्था होती. या संस्थेत शिकून अनेक शिष्य यशाच्या शिखरावर जाऊन पोचले.असे हे महर्षी कलेसाठी आणि कलेसाठीच जगले, आपल्या मुलांसाठी लौकिक संपत्ती न ठेवता कलेची न संपणारी दौलत आणि आशीर्वादाची त्यांच्यावर सावली ठेवून ते पंचत्त्वात विलीन झाले.


nagarsanket, article, marthi, sahitya

युरोपीय आणि अ-युरोपीय प्रतिमान या विषयावर नवी दिल्ली येथे अलीकडेच झालेल्या एका परिषदेत वाचल्या गेलेल्या प्रबंधाचा हा संपादित अंश. उत्तर आधुनिकवाद या संकल्पनेला मराठीत मांडली गेलेली "चौथ्या नवतेची' संकल्पना कशी समांतर आहे, हे मांडणाऱ्या या लेखात मराठी साहित्यातील "चौथी नवता' म्हणजे काय याची चर्चा करण्यात आली आहे. - श्रीधर तिळवे

सर्वसाधारण "चौथी नवता' असा शब्दप्रयोग केला की आधीच्या तीन कुठल्या, हा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर (१) स्वच्छंदवादी, (२) आधुनिक (३) देशीवादी हे आहे. विसाव्या शतकातील मराठी साहित्य हे या तीन नवतांतून उत्क्रांत होत गेले. कुठलीच नवता आधीच्या नवतांना नष्ट करत नाही. फक्त स्वत:ची मौलिक भर टाकून त्यांचे आधीचे स्वरूप बदलते. चिन्हीय चौथी नवताही हळूहळू आधीच्या तीन नवतांचे स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही. या चौथ्या नवतेचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी मी "झाड' ही थीम प्रत्येक नवतेने कशी हाताळली हे या लेखात स्पष्ट करणार आहे, जेणेकरून चौथी नवता ही आधीच्या तीन नवतेपेक्षा कुठे वेगळी आहे ते स्पष्ट होईल.१९ व्या शतकात ज्योतिबा फुले यांचा अभंग व नाटकांतून प्रबोधनवादी नवता अवतरली. विसाव्या शतकात केशवसुतांपासून पहिली स्वच्छंदवादी नवता अवतरली. त्यातील सर्वाधिक गाजलेली कविता ही झाडावर होती. बालकवींच्या "औदुंबर' या कवितेत औदुंबर हे झाड स्वच्छंदवादी नवतेतील अनेक आशयसूत्रांसकट अवतरले. आयुष्याकडे पाहण्याची रोमॅण्टिक वा गूढ दृष्टी, अभिव्यक्तीमधला मोकळेपणा व स्वातंत्र्य घेऊन धर्माच्या पगड्याखाली न येता स्वत:ला हवे ते व्यक्त करण्याची मुक्तता ही या नवतेची वैशिष्ट्ये इथे अवतरली. औदुंबर इथे एखाद्या भारतीय आध्यात्मिक हिरोप्रमाणे उभा आहे. तो विरक्त आहे आणि तरीही पाय टाकून जाळत बसला आहे. एखाद्या एक्स्प्रेशनिस्ट चित्रकाराप्रमाणे बालकवींनी त्याच्या आसपासचा परिसर शब्दचित्रात रेखाटला आहे. तो बालकवींना "भावलेला' औदुंबर आहे. त्यांच्या मनात उमटलेल्या निसर्गाच्या एका तुकड्याला जणू इथे त्यांनी शब्दात उमटवले आहे. त्याला औद्योगिकीकरणाचा कसलाही स्पर्श झालेला नाही.आधुनिक नवतेत मात्र "झाड' वेगळे दिसू लागले. मर्ढेकर, मुक्तिबोध करंदीकरांनी आधुनिक कविता प्रचंड प्रमाणात लिहिली तरी आधुनिक "झाड' चांगल्या कवितेच्या रूपात प्रभावीपणे अवतरले नाहीच. स्वच्छंदवादी नवतेतील बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर यांनी झाड अनेक पद्धतींनी आणले. आधुनिक "झाड' आपणाला मराठीत दिसते ते सुरेश मथुरे यांच्या "युकॅलिप्टस' संग्रहातील "युकॅलिप्टस' या कवितेत. तेंडुलकर, द्रविड, गांगुली फ्लॉप जावेत आणि हरभजन सिंगने सेंच्युरी मारावी तसे काहीसे इथे झालेय. हा युकॅलिप्टस "कोडाइकॅनालच्या डोंगरदऱ्यात हा इव्हिनिंग वॉक घेण्यासाठी रेस्तारांमधून बाहेर पडत होता' तेव्हा कवीला प्रथम दिसला. हा आहे कसा, तर फुलाफुलांचा स्कार्फ, डोक्यावर मेघांची हॅट आणि तोंडात भला मोठा तंबोरी पाईप, बरोबर खुज्या झुडुपांचा अस्सल कुत्रा. तो कवीकडे दुर्लक्ष करतो. कसे ? तर फ्रिजमध्ये कर्टुली ठेवताना करावे "अनादरी' दुर्लक्ष तसे. स्वच्छंदवादी नवतेत कवी स्वत: "हिरो' होता. आधुनिक नवतेत मात्र त्याच्याकडे समाजाने अनादरी दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आधुनिक नवतेत ईश्र्वराला फारसे स्थान नाहीच. त्यामुळेच "चर्चच्या आमेन घंटाचा आवाज कानावर आदळत असूनही' हा युकॅलिप्टस ती न ऐकता मावळतीची रजत रुपेरी आरस पाहतो. कशी, तर पाइपमधून ढगांचे लोट सोडत, कॉकटेलच्या दर्दी कैफात ! ही आधुनिकता युरोपियन समाजाकडून उसनी आणलेली. त्यामुळेच युकॅलिप्टस कसा, तर "गोऱ्या तैलबुद्धी कलेक्टराप्रमाणे'! या आधुनिकतेची उंची व अवाढव्यता केवढी ? तर कवी त्याच्यापुढे जाऊन उभा राहतो, खाकरतो तेव्हा "गालिव्हरचा झोकात तो हात पुढे करतो आणि कवी लिलिपुटी राज्याचा रहिवासी होतो'. या युकॅलिप्टसपुढे आपोआपच मग सर्व घरे भातुकलीची होतात, माणसे बाहुल्याएवढी होतात आणि त्याची मेघखंडी लांबच लांब सावली थेट नदीपर्यंत पोहोचते. संपूर्ण कवितेत युकॅलिप्टस एखाद्या साहेबाप्रमाणे वावरताना दिसतो. युकॅलिप्टस हा तसा बाहेरून आणलेला. जशी आपण "आधुनिकता' बाहेरून आणली.या बाहेरून आणलेल्या आधुनिकतेला आव्हान दिले ते देशीयतेने ! आधुनिकतेचे देशीकरण घडवणे आणि "भारतीय' "आधुनिकता' उभी करणे हे या नवतेचे सुरुवातीचे ध्येय. पुढे ते देशीवादात रूपांतरित झाले आणि परंपरेबाबत कर्मठ आग्रही होत गेले.तिसऱ्या देशी नवतेला "झाड' अनेक आकारांत सापडले. ना. धों. महानोरांना ते पीकपाण्याच्या स्वरूपात सापडत गेले. मात्र महानोरांचा पिंड आधुनिक नसल्याने ते स्वच्छंदवादीच राहिले. इंद्रजीत भालेराव ते अविनाश साळापुरीकरांपर्यंत अनेकांनी ते देशीवादी केले. या झाडाला अस्सल आधुनिक देशी पद्धतीने उभे केले ते मनोहर ओक यांनी (मनोहर ओकच्या ऐंशी कविता या संग्रहातील) "झाड' या कवितेत. या कवितेची सुरुवात "झाड/हे झाड नसतं/ एक जंगल असतं अशी ! ते सूर्य परतवत, वारा नमवत, अकुसर प्राण्यांना सौजन्य शिकवते. आकाशाच्या पार्श्र्वमंचावर सकाळ-संध्याकाळ पाखरांचे किलबिलते कंठवृंद रहस्यमय रंगाचे फुललेले ताटवे ते माथे दिमाखात ते उभं असतं. झाड बेफिकीरपणे आपली सावली लुटवतं असावध म्हशीवर- गाई- बकऱ्यांवर. येणारे मोहोर दरवळतेवयात येणारी फळं डोलदार
गाणारे कोकीळ का कर्कटणारे कावळेवाढणारे अंगावर वेल, फुलहिना वा ऋतूमतीया अवांतर घटनात संभवत नाही ते
ते असतं तेच मुळी निवांत म्हणून
जे असतं तेच मुळी एक आरोप घेऊन.
या कवितेची खरी ताकद शेवटच्या ओळीत. जणू माणसाचं अस्तित्व हेच मुळी एक आरोप घेऊन आहे. हे झाड जणू कोर्टातच उभे आहे. मात्र तरीही ते त्याच्या अंगावर रुतुहीन की ऋतुमती कोकीळ की कावळे याची फिकीर न करता निवांत आहे. एक बंगली स्वप्न पाहतीये, ही झाडाची पैलूदार अंगी आपल्या बोटात येण्याची तरीही त्या बंगलीला धूप न घालता ते झाड सर्वांच्यावरच सावली लुटवते आहे.तीन नवतांची ही तीन तऱ्हेची तीन झाडं. मी जेव्हा कविता लिहायला बसतो होतो तेव्हा मात्र बंगलीने हे झाड केवळ आतच घेतले नव्हते तर अंगठी म्हणून ते मढवण्याऐवजी सरळ सरळ कापायला सुरुवात केली होती. त्यातूनच पुढील कविता जन्मली.
झाडं तोडली जातायत
पण माणसांना पूर्वीसारखं त्याचं आता दु:ख होत नाहीये
लहानपणी एक वृक्ष जरी तोडला गेला
तरी काळीज तोडून कुणी हातात दिलंय असं वाटायचं
आता काळजातच उरलेली नाहीत मुळं
तर अरण्य नाहीसं होण्याचं दु:ख आणि भय
मेंदूत कुणी पोहचवणार कसं ?
माणसं वाढत चाललेत आणि
झाडांच्या जवळ अधिकृत प्रॉपर्टीकार्डे नाहीत
झाडं पडली जातायत माणसांसाठी
आणि माणसं झाडांना रिप्लेस करत राहण्यासाठी जातायत
झाडांना कायदा करता येत नाही
झाडं निरक्षर आहेत
आणि झाडांना मूळ सोडून जगण्यासाठी कुठं जाता येत नाही
झाडांची मुळंच
झाडांच्या मुळावर आलेत
देशी नवतेने माणूस व संस्कृती यांचे प्रतीक म्हणून नेहमीच झाड आणि मूळ यांचा वापर केला. अगदी दिलीप चित्रेसारखा भटका कवीही "तुम्ही माझ्या अंगणातला वड कापलात म्हणून जगभर मी माझी मुळे शोधत राहिलो' असं "भुंडं टेकाड' या कवितेत म्हणून राहिला. १९८० नंतर ही मुळे अभिमानाचा विषय राहिली नाहीत तर ती बेड्या झाली. ही कविता दोन पातळ्यांवर "झाड' दाखवते. ज्यांना मुळं आहेत आणि जे त्या मुळात अडकल्याने स्थलांतर करण्याची क्षमता गमावून बसलेत त्यांच्या मुळावर त्यांची ही मुळेच येण्याची शक्यता ती दर्शविते. तर दुसऱ्या पातळीवर ही कविता झाडांचे दु:ख मांडते. चिन्हसृष्टीच्या आगमनानंतर माणसाला सगळ्याच गोष्टींचे संगणकीकरण करण्याची खोड जडली. ज्याच्याजवळ ही क्षमता तो सत्तावान बनला आणि जे निरक्षर, ज्यांच्याजवळ कायदा करण्याची क्षमता नाही असे सर्व झाड बनले. असे झाड जे कुणीही सत्तावान माणसाने कापावे. माणसांना झाडांप्रमाणे मुळे नाहीत. ज्यांना मुळे आहेत ते इतरांची मुळे कापू शकत नाहीत, ही मुळांची खासियत ! त्यामुळेच झाडे इतर झाडांना कापू शकत नाहीत. माणसांना आता काळजातच मुळे उरलेली नाहीत. म्हणून माणसे मोकाट झाडे कापत सुटतील. माणसे "जगण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, पण झाडांना मुळांमुळे असे "जगण्यासाठी' कुठेही जाता येत नाही आणि असे जाता न येणे ज्या मुळांमुळे घडते तीच मुळे एका अर्थाने त्यांच्या मुळावर येतात. झाडांना नष्ट करण्याची प्रक्रिया तरी पार आदिम काळातील खांडववन जाळणाऱ्या आर्यांपर्यंत भिडवता येते. प्रथम शेतीसाठी, नंतर उद्योगासाठी झाडे कापली गेली. आमच्या काळात ही प्रक्रिया कळसाला पोहोचली. इतकी की पृथ्वीचेच जगणे आता धोक्यात आले.'चौथ्या नवतेत संगणक,टीव्ही, माध्यमे यांच्यामुळे झाडांना आणखी एक वळण लाभले.झाड
राजे माझ्यासमोर एक झाड असतं
मी झाडाला झाडासारखं पाहू शकत नाही
माझ्या डोळ्यांत एक कॅमेरा असतो
मेंदूत एक डिरेक्टरसायलेन्स साऊंड कॅमेरा ऍक्शनझाड मला एखाद्या मॉडेलसारखं फोटोजेनिक दिसतंरोज माझ्यासमोर एक झाड असतं
मी झाडाला झाडासारखं हुंगू शकत नाही
माझ्या नाकात एक सेंट असतो
मेंदूत एक फ्रेंच हु हुं उफ व्वाह
झाड माझ्या नाकात रेडिमेड अत्तरासारखं दरवळतं
रोज माझ्यासमोर एक झाड असतं
मी झाडाला झाडासारखं स्पर्शू शकत नाही
माझ्या त्वचेत एक पोत असतो
मेंदूवर काही कपडे
रफ टफ टफर बफर
झाड मला एखाद्या काष्ठशिल्पासारखं स्पर्श करतं
रोज माझ्यासमोर एक झाड असतं
मी झाडाला झाडासारखं खाऊ शकत नाही
माझ्या जिभेत एक फास्टफूड असतं
मेंदूत ऍरेंज्ड टेस्टस्
मचक मचक मचक मचक
झाड माझ्या पोटात होमपॅक्ड प्रोग्रॅमसारखं पसरतंरोज माझ्यासमोर एक झाड असतं
मी झाडाला झाडासारखे ऐकू शकत नाही
माझ्या कानात एक माईक असतो
मेंदूत एम्प्टी कॅसेट
सळसळ सळसळ सळसळ सळसळ
झाड माझ्या देहात एक सिंफनी रेकॉर्ड करतं
रोज माझ्यासमोर एक झाड असतं
झाडाचा रोल पार पाडून झाडामध्ये नाहीसं होतं
आधुनिक व देशी नवतेत "झाड' ही कमोडिटी बनली वा बनवण्याचा प्रयत्न झाला. चौथ्या नवतेत ती चिन्हवस्तू म्हणजे (डशाळेवळींू) सिमिओडिटी बनली. त्यामुळे एका आत्यंतिक तटस्थतेने इथे झाड हे कधी "मॉडेल' बनते, तर कधी रेडिमेड अत्तर, कधी होमपॅक्ड प्रोग्रॅम तर कधी सिंफनी रेकॉर्ड करणारं मशीन. आधुनिक व देशी नवतात झाडाला प्रत्यक्ष अनुभवण्याची ताकद शाबूत होती. इथे माणसांची तीही क्षमता संपलीय. झाड हे फक्त जणू एक "चिन्ह आहे, एक "परफॉर्मर' आहे आणि मॉडेल. रेडिमेड अत्तर वगैरे त्याला दिलेले रोल्स आहेत आणि रोल्स पार पाडून ते स्वत:त निघून जातं. या कवितेत निवेदक हे झाड "त्याची' प्रेयसी आहे की आई आहे की संस्कृती आहे की खरोखर प्रत्यक्षातलं काही आहे, याविषयी काहीही सांगत नाहीय. फक्त ते "परफॉर्मर' आहे एवढंच आपणाला कळते. मी जेव्हा ही कविता लिहिली तेव्हा माझ्या आत नेमकं काय होतं हे मलाही सांगता येणं शक्य नाही. कवी लिहायला बसतो तेव्हा नवतावादी वगैरे लिहायचं म्हणून लिहीत नाही. ते आपोआप होतं.ज्ञानेश्र्वरांच्या "मोगरा फुलला'पासून सुरू झालेलं झाड आज "रेडिमेड अत्तर' बनावं ही माणसाची प्रगती की शोकांतिका हे ठरवणं अतिशय अवघड आहे. पण काळच असा कमर्शिअल बनलाय की कवींना एकाच वेळी खरेखुरे झाड शाबूत ठेवणे, त्या झाडाच्या बाजूने उभे राहणे आणि त्याच वेळी झाडाचे "चिन्हसृष्टीय' भासमान रूप भाषेत उमटवणे अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागतेय.आजचे जगच मूलत: वस्तुनिष्ठ वास्तव जग, स्पेशल इफेक्ट्समुळे आकर्षक पॅकेजमध्ये मांडले गेलेले जग आणि व्हर्च्युअल रिऍलिटीमुळे आलेले भासमान जग अशा तीन पद्धतीने आपल्यावर आदळते आहे आणि चौथ्या नवतेला या तिन्ही पद्धतींच्या जगांना एकत्रच सामोरे जावे लागते आहे. हे आत्तापर्यंतच्या आधीच्या तीन नवतांबाबत घडले नव्हते. १९८७ पासून मी चौथ्या नवतेविषयी बोलतो आहे. "नव्यांची अक्षर चळवळ (१९९२)' व "सौष्ठव' (फेब्रु. १९९३) या दोन अनियतकालिकांमधून समीक्षा करून मी चौथ्या नवतेची मांडणी केली. आज त्या मांडणीलाही १५ वर्षे उलटून गेली आणि तरीही महाराष्ट्रात चौथ्या नवतेचा आवाज फारसा उमटला नाही. आता तरी चौथ्या नवतेचा विचार व्हावा.


 

 

Nagarsanket is first weekly marathi - hindi news web site, www.nagarsanket.com, Marathi Nesw, Marathi News Paper, Marathi Online News Paper, Marathi, Marathi Articals, Marathi Poem, Marathi Nagarsanket News, Hindi Nesw, Hindi News Paper, Hindi Online News Paper, Hindi, Hindi Articals, Hindi Poem, Hindi Nagarsanket News, Marathi Hindi,  Hindi Marathi, Maharashtra Marathi, Bruhan Maharashtra News, Prof. jawahar Mutha, Satyen Mutha, Hemant Mutha